
भारतासारख्या खंडप्राय देशात पाहण्याजोगं खूप काही आहे. सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाची असलेली सारीच ठिकाणे पर्यटनाच्या नकाशावर आली आहेत असं नाही. त्यामुळे नवीन ठिकाणी कामासाठी गेलो म्हणजे त्या भागात अपरिचित असं कोणतं ठिकाण पाहता येईल याचा मी शोध घेतच असतो. गेल्यावर्षी कामासाठी कानपूरला जाणे झाले. तिथं जवळच भितरगांव येथे सुंदर मंदिर आहे असं समजले… नेटवर माहिती घेतली तर या ठिकाणाबद्दल भीती वाटेल अशा पोस्ट सापडल्या. तिथं हिंसा झाली त्यामुळे अतृप्त आत्मे वावरतात वगैरे नेहमीचे तिखटमीठ लावून अनेकांनी या मंदिराबद्दल लिहिलं आहे. मी ठरवलं की जागा सुंदर आहे तर स्वतःच जाऊन खातरजमा करून घ्यावी.

हे मंदिर जवळजवळ १५०० वर्षे जुने आहे असं तज्ज्ञांचं आकलन आहे. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे इतर गुप्तकालीन मंदिरे दगडी आहेत आणि हे विटांचे बांधकाम आहे. मंदिराचे आताचे बाह्यस्वरूप conservation करून पुनर्निमित असले तरीही ते जुन्या मंदिराच्या फॉर्मला धरूनच बांधले गेले आहे. सोबत १८७५ ब्रिटिशांनी काढलेला फोटो देतो आहे. वर्तमानपत्रात उगाचच इथं भुते राहतात. खजिना आहे म्हणून शोधायला येणारे लोक मरतात. रात्रीबेरात्री शेहनाई (सनई) चे आवाज ऐकू येतात असल्या कहाण्या प्रकाशित झाल्या आहेत. पण मंदिराच्या चारी बाजूंना पक्की घरे आहेत ज्यात लोक राहतात आणि पुरातत्व विभागाचे दोन कर्मचारी तिथं कायमस्वरूपी राहतात. आता तिथं पूजा अर्चा होत नाही कारण गर्भगृह रिकामे असून मंदिर कोणत्या देवतेचे आहे हे ज्ञात नसावे. जुन्या अपूर्ण आणि भग्न मूर्ती अजूनही भिंती आणि शिखरावर दिसतात. डिझाईन रीसर्चच्या कामामुळे अशा ठिकाणी जाण्याचा योग येत असतो.
या मंदिराची रचना सुमारे ३६ फूट रुंद आणि ४७ फूट लांब चौथऱ्यावर केली आहे. मंदिराच्या भिंती ८ फूट जाड असून गर्भगृह १५ फूट लांबीच्या चौरस आकारात बांधलेले आहे. या गाभाऱ्याला खिडकी नाही त्यामुळे पूर्वाभिमुख दरवाजातून आत येतो तो प्रकाश एवढेच उजेडाचे साधन. त्यामुळे थोडी गूढरम्यता इथं भासते हे खरं. सुमारे ६८ फूट उंच शिखरावरील कोनाड्यांमध्ये काही शिल्पं दिसतात. गणेश, महिषासुरमर्दिनी अशी ही शिल्पं आहेत. भिंतींवरही असूर, शिव, विष्णू इत्यादी मूर्ती आहेत. १८९४ साली वीज पडून या मंदिराचं मोठं नुकसान झालं असं सांगितलं जातं. अलेक्झांडर कनिंगहॅम ने जेव्हा हे मंदिर पाहिलं तेव्हा ते बरंचसं भग्न अवस्थेत होत अशी नोंद सापडते.

कामासाठी प्रवासाची संधी म्हणजे पर्वणीच असते. काहीतरी नवीन पाहण्याची, अनुभवण्याची संधी असते. पण अनेकांना असं वाटतं की कामासाठी प्रवास करावा लागणं ही किती मजेची गोष्ट आहे. पण तसं होत नाही. पहाटे लवकर उठून फ्लाईट पकडण्यासाठी विमानतळावर जाणे, प्रवासाचा शीण आलेला असूनही फ्लाईटनंतर लगेचच कामाला लागणे. अनेक दिवस घरापासून दूर बाहेरचे खाणे, हॉटेलात एकटे असणे. आणि कमीतकमी वेळात काम आटोपून पुन्हा घरी येणे यात मौज कमी आणि धावपळच जास्त असते. ज्यांना संधी मिळेल तेव्हा नवीन काही शोधून काढण्याचा उत्साह असतो तेच लोक या धावपळीत काम संपवून एखादी जागा पाहणे, तिथं फोटोग्राफी करणे हे मॅनेज करू शकतात. तेव्हा ज्यांना आम्ही भटके फक्त मौज मज्जा करतो असं वाटत असेल त्यांना एकच गोष्ट सांगेन… जलो मत बराबरी करो!
हे मंदिर पाचव्या शतकातील आहे. म्हणजे भारतातील विटांचे बांधकाम केलेले हे सगळ्यात जुने मंदिर आहे. भितरगांव चे मंदिर पाहून झाल्यावर वेळ असेल तर जवळच बेहता बुजुर्ग नावाचे जगन्नाथ मंदिर सुद्धा पाहायला हवे. त्याची गोष्ट पुढच्या ब्लॉगमध्ये.