
सुमारे वीस लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून या बेटाचा जन्म झाला. दक्षिण कोरियाच्या दक्षिण टोकावरून जर आकाश निरभ्र असेल तर जेजू बेट आणि त्याच्या मध्यभागी असलेला ६३०० फूट उंचीचा माउंट हाला दिसू शकतो. आशिया खंडातील हवाई म्हणून जेजू बेटाची ख्याती आहे. अनेक अमेरिकन, युरोपियन, चिनी पर्यटक इथं येत असतात. स्वच्छ सागरतीर, निळेशार पाणी, निरभ्र आकाश, जंगले आणि त्यात लपलेले धबधबे आणि या सगळ्याच्या मध्यभागी असलेला हाला पर्वत. बेटाच्या उत्तरेला असलेल्या जेजू सिटी शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ जेजूला सोल आणि इतर मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांशी जोडतो.

जेजू बेटावरील विविध ज्वालामुखीजन्य गोष्टींना नैसर्गिक विश्व वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे. हाला पर्वताच्या शिखरावर असलेलं बाएन्गनोकदाम विवर यापैकी एक. इथं उन्हाळ्यात हिरवळ आणि विवरात साचलेलं पाणी असा देखावा असतो तर हिवाळ्यात सगळंच बर्फाने झाकून गेलेलं असतं.. त्यातून बसाल्ट खडकाचे कातळ बाहेर डोकावताना दिसत असतात. बाएन्गनोकदाम म्हणजे पांढऱ्या हरणाचा तलाव.. इथं देवतांचा अधिवास आहे अशी कोरियन लोकांची श्रद्धा आहे. लावातून निर्माण झालेले दगडी कोन इथं आपण सर्वत्र पाहू शकतो. जेजू बेटावर मेहनत करून आपल्या कुटुंबासाठी अर्थार्जन करणाऱ्या मासेमार महिलांना खूप आदर दिला जातो. हानेयो नावाने प्रसिद्ध या महिलांची शिल्पे जेजूमध्ये अनेक ठिकाणी किनाऱ्यावर लावलेली दिसतात.

जेजूच्या पूर्व टोकाला एक डोंगर आहे… त्याचे कोरियन नाव सेयॉन्गसान ईलचूलबॉंग .. त्याला सूर्योदयाचे शिखरही म्हणतात.. सकाळी लवकर उठून हा डोंगर चढणे एक अप्रतिम अनुभव असतो. हे शिखर सुमारे १८० मीटर म्हणजे साधारणपणे ६०० फूट उंच आहे. व्यवस्थित बांधलेल्या लाकडी पायऱ्यांवरून आपण तासाभरातच शिखरावर पोहोचतो. जवळपास ६००० वर्षांपूर्वी डोंगराची निर्मिती झाली. पूर्वी हे एक स्वतंत्र बेट होते पण कालांतराने बेट आणि किनाऱ्याच्या मध्ये गाळ साचत गेला आणि एका अरुंद भूभागाने डोंगर किनाऱ्याला जोडला गेला.

सूर्योदयाचा आनंद घेता घेता आणि सकाळच्या नारिंगी उन्हाची अनुभवत डोंगर चढायचा. डोंगराच्या पूर्वेकडील पदरावरून सागराचे निळेपण अधिकच गडद झालेले दिसते आणि या बेटाच्या ज्वालामुखीजन्य स्वरूपाची जाणीवही आपल्याला होते.

इथं पूर्वी शेती केली जात असे पण आता या भागात निसर्ग उद्यान केले गेले आहे जिथं अनेक विविध वनस्पतींचे संवर्धन केले जाते. शिखराच्या मध्यभागी ज्वालामुखीचे विवर आहे ज्याचा व्यास सुमारे अर्धा किलोमीटर आहे आणि खोली जवळजवळ ५० मीटर आहे. इथून पश्चिमेकडे नजर टाकली तर जेजू बेटाचे विहंगम दृश्य दिसते आणि मध्यभागी हाला पर्वताचे दर्शनही होते.

पर्वत उतरून जर थोडंसं उत्तरेच्या दिशेने पाहिलं तर जेजूजवळच असलेलं एक छोटंसं उदो नावाचं बेटही दिसायला लागतं. फेरी पकडून इथं आपल्या वाहनासकट जाता येते. इथून दिसणारे समुद्र आणि परिसराचे दृश्यही अतिशय सुंदर असते.

दक्षिण कोरियात शाकाहारी जेवण मिळणे मुश्किल.. आणि तुम्हाला अगदी बौद्ध पद्धतीचे शाकाहारी जेवण जरी मिळाले तरीही ते आपल्या अभिरुचीला पसंत पडेल असं नाही. मी मात्र तिथं बिनधास्त बिबिम्बाप, किंबाप, पाँजूआम अशा विविध कोरियन मांसाहारी डिशेस खायला लागलो होतो. पण कधीतरी खूपच कंटाळा येत असे. अशावेळेला मी चॉकलेट बदाम डोनट खायला डंकिन डोनट मध्ये जात असे. जेजूमध्ये हानेयो प्रमाणेच सर्वत्र पसरलेली पण विचित्र दिसणारे शिल्पे आहेत त्यांना डोलारुबांग असे म्हणतात. या शब्दाचा अगदी साधा अर्थ म्हणजे दगडात घडवलेले आजोबा… या गूढ आकृत्या का घडवल्या गेल्या हे नेमके माहिती नाही पण अशा ४७ मूर्ती इथं होत्या.. काहींना ते राजवाडा किंवा किल्ल्याचे रखवालदार वाटतात तर काहींच्या मते ही प्रजननाची देवता असून तिच्या नाकाला बोट घासणाऱ्याला मुलगा होतो तर कानाला बोट घासले तर मुलगी.
उदो बेटावर किमान दोन तास तरी हवेत.. डोंगराच्या माथ्याला वळसा घालणारी पायवाट तिथं आहे. गवताचा हिरवा गालिचा आणि समुद्राचं चकाकणारे स्वच्छ पाणी यांचा सौंदर्याविष्कार इथं अनुभवायला मिळतो.
ज्वालामुखीजन्य खडकाला समुद्राच्या प्रहाराने केलेल्या कोरीव कामातून जेजू बेटावर अनेक विलक्षण शिल्पे निसर्गाने कोरली आहेत. उदो बेटावर त्याचे नमुने पाहिल्यानंतर आपण जेजू बेटाच्या दक्षिण भागातही लाव्हातूनच निर्माण झालेले कातळाचे स्तंभ पाहू शकतो. निळ्या रंगाच्या इतक्या छटा आता आपण पाहिलेल्या असतात की त्यापैकी सगळ्यात जास्त विलोभनीय कोणता हे ठरवणे कठीण होऊन बसते.

जुंगमूनसांग भागातील हे लावा स्तंभ पाहून झाले की ओले ट्रेल नामक पायवाटांच्या भ्रमंतीला निघायचे. इथं किम यंग गॅप नावाचा फोटोग्राफर होऊन गेला. जेजूच्या विविध भागात जाऊन सुंदर फोटो काढणाऱ्या या माणसाने जेजू बेटाची कीर्ती जगभर सर्वदूर पोहोचवली. पुढं लोकांना इथं नीट फिरता यावं यासाठी लाकडी जिने, रेलिंग अशा सुविधांसह विविध पायवाटा बांधण्यात आल्या आणि त्यांना क्रमांक दिले गेले. अशाच एका जंगलात जाणाऱ्या ओले ट्रेलवर मला अचानकपणे अतिशय सुंदर धबधबा पाहता आला. याचे नाव आहे चेअन्जेयॉन धबधबा.

इतक्या छोट्याशा बेटावर निसर्गाची इतकी विविध रूपे कशी बरे असू शकतात हा प्रश्न आपल्याला जेजूला आल्यावर पडतोच. इथं एक धबधबा तर थेट समुद्रकिनाऱ्यावर जाऊन कोसळतो. सूर्यास्त होण्यापूर्वी मला जेओंगबांग चा धबधबाही पाहायला मिळाला.

ज्वालामुखीने इथं जशी पर्वतशिखरे, विवरे, कातळस्तंभ कोरले आहेत तसाच एक चमत्कार जमिनीखालीही घडवला आहे. इथं नैसर्गिक पद्धतीने निर्माण झालेल्या गुहा आहेत. त्यापैकी एकतरी आवर्जून पाहावी अशी आहे. मी जेजूच्या पूर्व भागात असलेली मंजांगुल नावाची गुफा पाहिली.
ही गुफा सुमारे 7.5 किमी लांब आहे. गुहेची साधारण रुंदी 18मीटर आणि 23उंची मीटर आहे. गुहेला तीन प्रवेशद्वारे आहेत त्यापैकी पर्यटकांना एकच खुले असून साधारणपणे एक किलोमीटर आतवर जाऊन गुहेचे निरीक्षण करता येते. केवळ पर्यटनस्थळ म्हणूनच नव्हे तर संशोधनासाठीही हे ठिकाण महत्वाचे आहे. stalactite, stalagmite, फ्लो स्टोन, लावा ट्यूब, लावा शेल्फ, लावा राफ्ट अशा विविध प्रकारची भूरूपे इथं पाहता येतात. आतमध्ये जवळजवळ २० फूट उंचीचा लावा स्तंभ आहे. तिथल्या वैज्ञानिकांनी सांगितल्याप्रमाणे हा जगातील सर्वात उंच लावा स्तंभ आहे.

जेजू बेटावर मला अनपेक्षितपणे सापडलेली गोष्ट म्हणजे माझा आवडता वास्तुविशारद जपानी आर्किटेक्ट अंडो ताडाओ याने बांधलेलं ग्लास हाऊस. सेयॉन्गसान ईलचुलबॉन्ग च्या दक्षिणेला एका भूशिरावर बांधलेलं हे कॉंक्रिट मधील रेखीव बांधकाम. इथं बसून समुद्राची गाज ऐकत न्याहारी घेण्यातली मजा काही औरच!

जेजू बेटावरची ही भ्रमंती माझ्यासाठी नेहमीच अविस्मरणीय राहील. दक्षिण कोरियाला मी विद्यार्थी म्हणून गेलो होतो आणि तिथं मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत मला सगळी भटकंती बसवणे भाग होते. त्यामुळे ही जेजू सहल मी अगदी कमीत कमी खर्चात केली. भारतीय रुपयांमध्ये सांगायचं तर सोल ते जेजू असं माझं रिटर्न विमान तिकीट फक्त सहा हजार रुपयांना पडलं. तर तिथं मी चार रात्री हॉस्टेलमध्ये राहिलो त्याचा खर्च झाला फक्त साडेतीन हजार रुपये. मुख्य म्हणजे हॉस्टेलमध्ये राहताना आपण हॉटेल रूम प्रमाणे एकटे राहत नाही त्यामुळे प्रवासाची आवड असलेले आपल्यासारखेच धूमकेतू सुद्धा भेटतात हे विशेष. कधी संधी मिळाली तर हे विलक्षण बेट नक्की पहा.