
संतोष सिवन, राजीव मेनन वगैरे निष्णात सिनेमॅटोग्राफर्स चे सिनेमे पाहिले आणि माझ्यातील फोटोग्राफरला सिनेमाची भुरळ पडली. खरंतर सिनेमा हे माध्यम फार पूर्वीपासूनच आवडत होतं. टीव्हीमध्ये काम करत असताना आपण केलेल्या बातम्या व्हिजुअली उत्कृष्ट कशा होतील हे शिकायचा मी नेहमी प्रयत्न करत असे. सुदैवाने NDTV सारख्या वाहिनीत मला पहिली नोकरी मिळाली आणि तिथं अनेक प्रतिभावंत न्यूज व्हिडीओग्राफर लोकांकडून खूप काही शिकायला मिळालं. आमचे एडिटर लोक सुद्धा अतिशय कलात्मक एडिट्स विलक्षण चपळतेने करत असत. आणि मुख्य म्हणजे शूटमध्ये काही त्रुटी राहून गेल्या असतील तर पुढच्या शूटला काय नवीन करता येईल याबद्दल खूप उपयुक्त सूचना देत असत. आपणही फिल्म बनवावी असं मला २००७-८ पासून वाटायला लागलं. किमान आपण उत्तम शूट तरी करावं असं वाटायचं. याचे श्रेय संतोष सिवन आणि राजीव मेनन यांनाच जातं. त्यामुळे पहिली पायरी म्हणून माझ्या फीचर बातम्या शक्य होईल तितकं मी स्वतः शूट करू लागलो. माझा मित्र सुहास चौधरी आणि अब्दुल्ला झकारिया यांची मदत घेऊन मी मल्लखांब या खेळावरील एक फीचर थोडं सिनेमॅटिक पद्धतीने शूट केलं होतं. माझं सुदैव असं की रोहिताश सिंह नावाचा अप्रतिम एडिटर या एडिटला लाभला. तीन-साडेतीन मिनिटांचा कन्टेन्ट मी व्हिजुअली बराच चांगला करू लागलो होतो. पण टीव्ही न्यूजमध्ये धावपळ करून घाईघाईने त्याच दिवशी कन्टेन्ट प्रकाशित करायचा असतो आणि थोडक्यात बातमी देणे हा मुख्य फोकस असतो. कोणत्याही स्टोरीत खोलवर जाणं शक्य नव्हतं. पण क्रीडा विषय घेऊन स्वतःची फिल्म बनवायची या कल्पनेने मनात घर केलं होतं हे नक्की.

पुढे काही वर्षांनी आयआयटी मुंबईच्या डिझाईन स्कूलमध्ये शिकत असताना फिल्म मेकिंग वर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. सुदैवाने हॉलिवूडमध्ये काम केलेले दोन मार्गदर्शक मला लाभले. माझे गुरु प्राध्यापक सुदेश बालन आणि स्टीव्हन स्पीलबर्गचा सिनेमॅटोग्राफर ऍलन डेव्हीयु कडे शिकलेले माझे कोरियन गुरु प्राध्यापक जॉन्ग हो पार्क. भारतीय हॉकीबद्दल काहीतरी फिल्म बनवायची असं ठरलं होतं. ही फिल्म माझं मास्टर ऑफ डिझाईन चं थिसीस प्रोजेक्ट असणार होतं. पहिल्या टप्प्यात मी राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, झारखंड अशा अनेक ठिकाणी खूप रिसर्च केला. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्यावर अजूनही टीव्ही आणि पत्रकारितेचाच प्रभाव आहे. मी अजूनही तसाच म्हणजे बातमीदारासारखाच विचार करतोय. अजून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे माहितीपट किंवा डॉक्युमेंट्री म्हणजे काहीतरी कंटाळवाणे नीरस ज्ञानामृत पाजणारे असते आणि त्याचा मनोरंजनाशी काहीही संबंध नाही असा पक्का समज सामान्य भारतीय प्रेक्षकांमध्ये अजूनही आहे. तेव्हा निश्चय केला की विषय कितीही खोल असला तरीही मनोरंजन करणारी आणि सगळ्यांना आवडेल अशीच फिल्म बनवायची.

आणि त्यानंतर राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील एक भन्नाट कहाणी माझ्या पाहण्यात आली. जर्मनीहून भारतात येऊन, इथं स्थायिक होऊन, इथल्या ग्रामीण मुलांसाठी इंग्लिश शाळा आणि हॉकी चे प्रशिक्षण देणाऱ्या आंद्रियाची आणि माझी भेट घडली. आणि मी आठवडाभर त्या गावात राहिलो आणि मला लक्षात आलं की भारतीय हॉकीबद्दल माहितीपट बनवून पत्रकारितेसारखं काम करण्यापेक्षा ज्यांना हॉकीतच काय क्रीडा क्षेत्रातही रस नाही अशाही लोकांना रंजक वाटेल अशी विलक्षण कथा सिनेमॅटिक पद्धतीने चित्रित करण्याची संधी माझ्यासमोर आहे. अर्थातच हॉकी हा या कथेचा बॅकड्रॉप आहेच.

ही फिल्म सगळ्यांना आवडेल न आवडेल हा भाग वेगळा पण निर्मितीच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर या फिल्मच्या बाबतीत तीन विशेष गोष्टी आहे. एक म्हणजे ही फिल्म मी स्वतः एकट्याने कोणताही असिस्टंट न वापरता शूट केली आहे आणि फिल्मचा साउंड सुद्धा मीच केला आहे. दुसरं म्हणजे या फिल्मसाठी निधी संकलन मी क्राउड फंडींगच्या माध्यमातून केलं आहे. जवळपास ७५-८० प्रायोजकांनी मिळून मला साडेतीन लाख रुपये गोळा करायला मदत केली आणि मी जर्मनी हॉलंड बेल्जीयम अशा विविध ठिकाणी जाऊन शूट करू शकलो. तिसरी मजेशीर गोष्ट म्हणजे फिल्म एडिट करायला, साउंड मिक्सिन्ग करायला आणि अतिरिक्त पार्श्वसंगीतासाठी मला फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या तीन प्रतिभावंत युवा कलाकारांनी दिलखुलासपणे मदत केली. सुरुवातीला हॅंडीकॅम वापरून शूट करताना आवाज नीट रेकॉर्ड करता येत नव्हता तेव्हा मला एकट्याला काय शक्कल लढवून चांगला साउंड रेकॉर्ड करता येईल याबद्दल मार्गदर्शन अनमोल भावेने दिले. अन फिल्म एडिट झाल्यावर मिक्स साठी मदतीला अक्षय वैद्य धावून आला. या विषयावर मी जवळजवळ ४ वर्षे काम करत होतो.. त्यामुळे मी शूट केलेलं सगळंच मला आवडत होतं.. त्यामुळे या कथानकाचं वस्तुनिष्ठ एडिट करणं मला कठीण जाऊ लागलं. माझा मित्र आणि फिल्म इन्स्टिट्यूट चा संपादनाचा स्नातक प्रदीप्तो रॉयला मी एडिट करशील का विचारलं. तो हो म्हणाला आणि नेमका त्याला उच्चशिक्षणासाठी कॅनडाला जाण्याचा योग आला. मग त्यानेच यातून मार्ग काढला. आम्ही स्काईप वापरून एडिटबद्दल चर्चा करायचो. कोणते सीन हवेत, कोणते काढायचे.. क्रम कसा असावा.. कोणते शॉट किती वापरावेत.. कट्स कुठं असावेत.. आम्ही बोलत गेलो आणि तो सांगेल तसं मी एडिट करत गेलो. नंतर फिल्मच्या एका भागात मला डान्स लूप हवा होता.. माझा फेसबुकवरचा लाडका मित्र शंतनू पांडेने आनंदाने हे काम मला करून दिले.. फत्तेशिकस्त सारख्या फिल्मसाठी काम केलेला हा ताज्या दमाचा संगीतकार, त्याने एका दिवसात तो ट्रॅक करून दिला. माझी फिल्म ही तांत्रिक दृष्टीने मोठ्या पडद्यावर दाखवता येईल या दर्जाची आहे.. कोणतेही प्रोडक्शन हाऊस पाठीशी नसून हे सगळे मित्र तत्परतेने वेळोवेळी मदतीला धावून आले म्हणून फिल्मचं स्वप्न सत्यात उतरू शकलं.
पत्रकार ते फिल्ममेकर या प्रवासात मी खूप काही शिकलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही निष्कर्ष न काढता, जज न करता मी निरीक्षण करायला शिकलो. या फिल्मला काहीच स्क्रिप्ट नाही. पण तरीही फिल्मला कथानक आहे.. ही अमूर्त आर्ट फिल्म नव्हे. सुरुवात-नाट्यमय संघर्षबिंदू-शेवट अशी तीन टप्प्यांची रचना माझ्याही फिल्मला आहे. पण ती शूट करत असताना यापैकी काहीही ठरलेलं नव्हतं. आंद्रियाच्या आयुष्यात, तिच्या सभोवताली २०१४-२०१८ काय काय घडलं ते या फिल्मचं कथानक आहे. यापैकी कशावरच माझे किंवा तिचे नियंत्रण नव्हते. तिच्या आयुष्यातील या चार वर्षांतील काही क्षणांचा मी साक्षीदार म्हणून तिच्या आसपास कॅमेरा घेऊन वावरलो आणि यातून फिल्मने आकार घेतला. आणि फिल्म पाहणाऱ्याला आंद्रियाच्या गावात, तिच्या जर्मनी देशात जगल्याचा अनुभव मिळावा अशी या फिल्मची रचना आहे. या पद्धतीने केलेल्या फिल्मला एथनोग्राफीक फिल्म म्हणतात. सिनेमा व्हेरितें या तंत्राचा यावर प्रभाव आहे. फिल्म शूट करत असताना कुठेही वेगळे कृत्रिम प्रकाश संयोजन केलेलं नाही. सूर्य, चंद्र, रोजच्या वापरातील दिवे हेच माझे सोर्स ऑफ लाईट. गंमत म्हणजे जेव्हा मी जटवारा आणि गढ हिंमत सिंह या दोन गावात प्रथम गेलो तेव्हा पहिले दोन आठवडे मी कॅमेरा सुद्धा बाहेर काढला नाही. लोकांना भेटणे, गप्पा मारणे, त्यांच्याकडून विविध गोष्टी ऐकणे.. मैत्री करणे हा सुरुवातीचा टप्पा होता.. त्यामुळे कोणीतरी गावात शूट करायला आलाय म्हणून आपण काहीतरी वेगळं कृत्रिम वागलं पाहिजे असं कधी या लोकांना वाटलं नाही. काही काम असेल तर सगळे मला हक्काने सांगायचे. नोटबंदी झाल्यावर नोटा बदलून नेणे.. आंद्रियाची गरोदर मैत्रीण आणि तिच्या नवऱ्याला गाडीने डॉक्टरकडे वेळोवेळी तपासणीला नेणे असली कामे ते मला बिनधास्त सांगायचे. आंद्रिया बरोबर जर्मनी, पोलंड, स्पेन अशा विविध ठिकाणाहून स्वयंसेवक म्हणून काम करायला आलेले युरोपियन विद्यार्थी आणि राजस्थानातील रांगडं पब्लिक अशी सांस्कृतिक समरसतेची गंमत मी अनुभवली. जर्मनीत शूट करत असताना तिथली मुले आणि राजस्थानमधील मुलं मुली एकमेकांशी कसे वागत होते हे अनुभवलं. तान्या कर्ष बॉय आणि तिच्या कुटुंबीयांनी दोन आठवडे त्यांच्या घरी मला जर्मनीत शूट साठी राहण्याची सोय करून दिली… तो सुद्धा एक विलक्षण अनुभव होता.
फिल्मच्या पोस्टरसाठी मला आंद्रियाचे चित्र काढून हवे होते. अमोल ठाकूर या आयआयटीतील मित्राने ते पटकन काढून दिले आणि जे जे ची स्नातक आणि आता सृष्टी स्कूल ऑफ डिझाईनमध्ये शिकवणारी प्रज्ञा नाईक हिने माझ्या फिल्मचं शीर्षक अतिशय सुंदर लेटरिंगमध्ये करून दिले त्याबद्दल मी या दोघांचाही ऋणी आहेच.
ही फिल्म मी डीएसएलआर कॅमेरा वापरून शूट केली आहे. कॅनन ५डी मार्क३ हा कॅमेरा, झूम एच४एन रेकॉर्डर, रोड माईक, गो प्रो, नंतर घेतलेला कॅनन ८०डी वगैरे वापरून हे शूट केलं आहे. या फिल्मचा एक शॉट चक्क मायक्रोमॅक्स कॅनव्हास ४ फोननं शूट केलाय.. कारण माझ्यासमोर अचानकपणे कॅमेरा हातात नसताना काहीतरी घडलं आणि ते मी फोननेच शूट केलं.. पण सहजासहजी तो शॉट ओळखता येत नाही. हे विविध कॅमेरा मी आयआयटी मुंबईत शिक्षण घेत असताना विद्यार्थी कर्ज घेऊन विकत घेतले ही अजून एक मजेशीर गोष्ट!
मी शूट केलं होतं ते फुटेज जवळजवळ २० तासांचं होतं.. त्यातून होणारी फिल्म काहीतरी अगम्य अमूर्त कथानक नसलेली बनेल की काय अशी चिंता मला होती. पण माझ्या सुदैवाने आमच्या सिनियर बॅचच्या दीक्षांत समारंभासाठी श्याम बेनेगल आले होते. आणि त्यांच्याशी १५-२० मिनिटे बोलण्याची संधी मला मिळाली. त्यांनी मला त्या पंधरा मिनिटांत जे समजावलं तो माझ्यासाठीच मोफत मास्टरक्लास होता. फिक्शन फिल्मच्या कथानकात काहीतरी संघर्षबिंदू असतो.. तसाच संघर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असतो.. जी काही सामाजिक प्रक्रिया तुम्ही माहितीपटात टिपत आहात, त्या प्रक्रियेने संघर्ष सोपा झाला की बिघडला हे उलगडणे म्हणजे तुमच्या माहितीपटाचा शेवट.. असा एक सोपा narrative formula त्यांनी मला सांगितला. आंद्रियाचे आयुष्य, तिचे अनुभव, तिच्या जीवनातील ऊन पाऊस, त्यामधील नाट्य आणि तिच्या संघर्षाचा निष्कर्ष या फिल्ममधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.
ही फिल्म वेड्या, स्वप्नाळू, काहीतरी ध्येय घेऊन झपाटल्याप्रमाणे काम करणाऱ्या आंद्रिया सारख्या निस्पृह लोकांची गोष्ट आहे. या स्वप्नांच्या जगातील प्रवास खूपच अद्भुत असतो आणि ही स्वप्ने प्रत्यक्षात येण्यासाठी किंमतही मोजावी लागते.. या सगळ्या नाट्यमय प्रवासाची साधी सोपी गोष्ट म्हणजे स्टिक टू ड्रीम्स ही माझी पहिली फिल्म. दिनांक २५ ऑक्टोबर २०२० रोजी दसऱ्याच्या दिवशी ही मी युट्युबवर सर्वांसाठी प्रकाशित करत आहे. नक्की पहा आणि तुमचा अभिप्राय कळवा. मी उत्सुकतेने वाट पाहतोय.
सस्नेह
चिन्मय अनिरुद्ध भावे