
उत्तर प्रदेशात भटकंती म्हंटलं की डोळ्यासमोर येतो ताजमहाल आणि विदेशी पर्यटकांनी गजबजलेले वाराणसीचे घाट. पण हजारो वर्षांचा वारसा असलेल्या आपल्या खंडप्राय देशात पाहण्यासारखे खूप काही आहे. इतकं की कदाचित एक जन्म कमी पडेल. कानपूर शहराजवळ भितरगांव येथे असलेलं गुप्तकालीन विटांचे मंदिर पाहिलं की सुमारे साडेचार किलोमीटर अंतरावर असलेलं भगवान जगन्नाथाचे बेहता बुजुर्ग मंदिरही पाहायचं. या मंदिराकडे पाहिलं की आधी वाटतं की एखादा प्राचीन बौद्ध स्तूप लपला असावा या मातीच्या ढीगामागे. पण नीट पाहिल्यावर नागर शैलीच्या मंदिराचा आकार लक्षात येतो.

या मंदिराला मान्सून मंदिर असं नावही आहे. स्थानिकांची श्रद्धा आहे की पावसाळा येण्यापूर्वी या मंदिराच्या छतातून पाण्याचा अभिषेक होतो आणि भगवान जगन्नाथ पाऊस येत असल्याचा शुभसंकेत स्वतः लोकांना देतो.

हे मंदिर भारतीय पुरातत्व खात्यातर्फे संरक्षित असून मंदिराच्या आवारात सूर्य आणि विष्णूच्या प्राचीन मूर्ती पाहता येतात. नक्षीकाम केलेले बांधकामाचे अवशेषही दिसतात. शेषशायी विष्णूची इथं असलेली मूर्ती अतिशय सुबक आणि संतुलित रचनेची आहे.
११ व्या शतकात या मंदिराची दुरुस्ती केली गेली असे काही ऐतिहासिक नोंदी सांगतात. हे मंदिर पूर्वाभिमुख असून जवळच १०० फूट खोल प्राचीन विहीरसुद्धा आहे. मंदिराच्या आतील भागातील कोरीवकाम आवर्जून पाहण्यासारखे आहे