दक्षिण कोरिया आणि जपान यांच्यामध्ये जेजू नावाचे एक विलक्षण बेट आहे. माझ्यासाठी जेजू पाहणे म्हणजे निसर्गाच्या श्रीमंतीची मुक्तहस्ते उधळण व्हावी आणि त्यामधील हिरे माणके वेचता वेचता आपली दमछाक व्हावी इतका समृद्ध करणारा अनुभव होता. आयआयटी मुंबईत डिझाईन शिकत असताना एक सत्र मला दक्षिण कोरियाला राहायला मिळाले. ते सत्र संपता संपता हिवाळा आला आणि बर्फ पडायला लागलं. मी तिथं डोंगूक विद्यापीठात शिकत होतो. माझ्याबरोबर आलेल्या अनेक मुलांनी जेजू बेट पाहून झाले होते. माझा प्रोजेक्टच तर दक्षिण कोरियावरील फोटो प्रवासवर्णन होता त्यामुळे जेजू न पाहता परत येणे शक्य नव्हते. तेव्हा डिसेंबर च्या सुरुवातीचा एक वीकएंड मी सोलहून जिन एयरच्या फ्लाईटने जेजू गाठायचे ठरवले. आणि २-३ दिवसात हे बेट शक्य तितके पाहून घेतले. जेजूत अनेक ठिकाणे पाहण्याजोगी आहेत पण आजचा ब्लॉग तिथल्या हाला पर्वताच्या भटकंतीबद्दल आहे.. १२-१३ तासांत समुद्रसपाटीपासून ६३०० फूट चढणे आणि उतरणे म्हणजे व्यायामाची सवय गेलेल्या शरीरासाठी आव्हानच.. पण त्या १२ तासांमध्ये मला जे अनुभव मिळाले ते मी कधीही विसरू शकणार नाही असेच आहेत.. त्यांचीच ही चित्रकथा…

जेजूमध्ये मी एका युथ हॉस्टेलमध्ये राहिलो होतो. सकाळी लवकर उठून हाला पर्वत चढायला अलार्म लावला खरा पण उठायला उशीर झाला आणि बस चुकली होती. पुढची बस मिळून मी पर्वताच्या पायथ्याशी पोहोचलो खरा परंतु तोवर उशीर झाला होता. मी तिथं सकाळी सव्वासातला पोहोचणे अपेक्षित होते पण मला तिथं पोहोचायला नऊ वाजले. तिथं शिखरावर पर्यटकांनी गर्दी करून निसर्गाला हानी पोहोचू नये यासाठी नियम केला गेला आहे की कोणालाही वर राहता येत नाही. त्याच दिवशी परत खाली उतरून यावे लागते. आणि समजा अमुक एक वाजेपर्यंत तुम्ही ठराविक टप्पा जर ओलांडला नाहीत तर आल्या वाटेनेच परत धाडले जाते. मी पायथ्याच्या बोर्डवर पाहिले की १२ वाजायच्या आत मला तो टप्पा पार करणे अनिवार्य आहे .. बर्फाचा थर साचला होताच तिथं.. माझ्याकडे गरम कपडे तर होते पण बर्फातून डोंगर चढण्याचा पहिलाच अनुभव. मी एकटाच होतो आणि सकाळी उशीर झाल्याने चिडचिड झाली होतीच.. त्यामुळे १२ च्या आत अर्धी चढाई पूर्ण करणे अशक्य वाटायला लागले आणि मी बेत रहित करण्याच्या मनस्थितीत होतो. पण क्षणभर विचार केला की पुन्हा आयुष्यात कधी इथं जेजू बेटावर येण्याची संधी मिळेल न मिळेल.. चढून पाहू.. वेळेत नाही पोहोचलो तर काही तास वाया जातील इतकेच. आणि मी सीयॉन्गपनाक या मार्गाने चढू लागलो.

या पर्वतावर चढण्याचे २-३ मार्ग आहेत. त्यापैकी सोप्या चढाईचा पण लांब आणि वेळखाऊ असलेला मार्ग मी निवडला होता. ४-५ तासात सुमारे सहा हजार फूट चढायचे. आणि त्यातले निम्मे मला जेमतेम अडीच तासात ओलांडायचे होते. माझ्याकडचे बूट काही बर्फात ट्रेक करण्याचे नव्हते त्यामुळे मी घसरून पडू लागलो. एकदोन ठिकाणी बर्फाच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि पाय तीन फूट आत गेला.. अशी तारांबळ सुरु होती.. तेव्हा पहिला टप्पा गाठेपर्यंतचा एक तास प्रगती जेमतेमच झाली होती. तिथं मला एक दुकान दिसले.. मी त्या दुकानात लोकरीची कानटोपी आणि बुटांना बांधायचे लोखंडी दात विकत घेतले. हे लोखंडी दात बांधले की बूट घसरत नाहीत आणि बर्फावरून नीट चढता येते. त्यानंतर माझी गती चांगली वाढली.

सुमारे दीड तास चढून डोंगराखालील जंगलाचा भाग पार झाला आणि आता पठारावरून काहीशा कमी चढ असलेल्या वाटेने शिखराच्या दिशेने चालायला लागलो. इथं वर जाण्याचे ४-५ मार्ग आहेत. त्यापैकी फक्त दोनच वरपर्यंत जातात. इतर मार्गानी तुम्ही अर्धे अंतर चढून शिखराचे दृश्य पाहून उतरू शकता. मी घेतलेला मार्ग चढायला तर सोपा होता परंतु तिथून दिसणारे दृश्य तितकेसे मोहक नव्हते असं याआधी गेलेल्या अनेक ब्लॉगर्सनी लिहून ठेवलेलं मला दिसलं होतं. त्यामुळे मी असं ठरवलं होतं की कठीण असलेल्या ग्वानेउमसा मार्गाने खाली उतरायचं आणि उतरताना जमेल तितके फोटो काढायचे. पण त्यासाठी वेळेत चढणं मात्र आवश्यक होतं. जेजू हे ज्वालामुखीच्या कृपेने घडवले गेलेले बेट आहे. हाला पर्वताच्या शिखरावरही ज्वालामुखीचा अधिवास आणि त्यातून निर्माण झालेले छोटेसे विवर आहे. मी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चढून गेलेल्या मित्रांनी काढलेले खूपच सुंदर फोटो पाहिले होते. अर्थात त्या फोटोंमध्ये सर्वत्र हिरवळच दिसत होती.. मला मात्र दृष्टी पोहोचू शकेल तिथवर फक्त बर्फच दिसत होता. मला एक गोष्ट पाहून मात्र सुखद आश्चर्य वाटलं की ६०-७० वर्षांचे स्त्री पुरुषही अगदी आवडीने पर्वत चढत होते. सुमारे अर्धे अंतर पार होता होता माझी बरीच दमछाक होऊ लागली होती. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. मला मधला टप्पा पार करायला आता अर्धा तासच जेमतेम उरला होता. इथं एक गोष्ट नक्की चांगली केली आहे ती म्हणजे आपण कुठे आहोत, किती चढलो आहोत, किती अंतर बाकी आहे, उरलेला चढ किती फूट आणि किती कठीण आहे याची कल्पना यावी अशा ग्राफिक पाट्या इथं लावलेल्या आहेत. त्यामुळे सारखं सारखं उतरणाऱ्या लोकांना अजून किती बाकी आहे असं विचारायला लागत नाही. आणि सतत आपली किती प्रगती होते आहे हे कळत राहतं त्यामुळे हुरूप वाढतच राहतो.

वेळेची मर्यादा संपायला अगदी थोडासाच वेळ उरलेला असताना मी मधले जिंदालेबात शेल्टर गाठले. इथं काही एंट्री केली आणि काही मिनिटे आराम करायला थांबलो.. त्या दिवशी मी तिथं गरमागरम नूडल्स खाण्याचा जो स्वर्गीय अनुभव घेतला आहे त्याची कशाचीही तुलना होऊ शकत नाही. इन्स्टंट नूडल्स इतके छान कसे लागू शकतात हा विचार करता मी वाडगाभर नूडल्स आणि तिखट मसालेदार सूप घेतले आणि मग पुढं निघालो. या शेल्टरमध्ये पिण्याच्या पाण्याबरोबरच कोणाला हृदयविकाराचा झटका आल्यास उपचार करायला इमर्जन्सी साधने सुद्धा होती
मला अजून साडेचार किलोमीटर चढायचे होते आणि जवळपास दोन हजार फूट चढाई अजून बाकी होती.. पण नूडल्सच्या शक्तीने जोशात आलेलो मी दीड तासात हे अंतर पार केले आणि शिखरावर येऊन पोहोचलो. तिथं दिसणारं हिमाच्छादित शिखर एखाद्या शुभ्र चादरीप्रमाणे भासत होतं

त्या दिवसाची आठवण म्हणून माझा फोटो काढून घेण्याचा मोह मला आवरला नाही. तिथं असलेल्या सुरक्षा रक्षकाला विनंती केली आणि त्या क्षणातलं फीलिंग एका फोटोत साठवून घेतलं.

निसर्गाची किमया पाहत थांबायला मला इथं मला जेमतेम २० मिनिटे मिळाली असतील.. पण खाऱ्या वाऱ्याच्या समुद्रकिनाऱ्यापासून अगदी पाच साडेपाच तासात मी एकदम बर्फाच्छादित शिखरावर येऊन पोहोचलो होतो. धाप लागली असली तरीही स्वच्छ हवेचा ताजेपणा अनुभवत होतो.. बर्फावर परावर्तित होणारा शुभ्र प्रकाश आणि मागे स्वच्छ निळं आकाश लक्ष वेधून घेत होतं. या पर्वतावर देवांचा अधिवास आहे त्यामुळं इथं मुक्काम करायचा नाही अशी कोरियन लोकांची श्रद्धा आहे. हाला पर्वत हा दक्षिण कोरियातील सर्वात उंच बिंदू आहे. आता मला सूर्यास्त होण्याच्या आत उतरणं भाग होतं त्यामुळे मी अधिक फोटोजेनिक असलेल्या ग्वानेउमसा मंदिराच्या वाटेने उतरायचं ठरवलं.

या मार्गाचे अंतर कमी आहे पण तितकीच उंची कमी अंतरात उतरायची म्हणजे तीव्र उतारावरून बर्फाच्या भुसभुशीत वाटेतून मला खाली उतरायचे होते, दुपारचे सव्वा वाजले असतील.. निदान साडेपाच पावणेसहा पर्यंत पायथा गाठणे गरजेचे होते. या वाटेने उतरणाऱ्यांची फारशी गर्दी नव्हती परंतु एक ट्रेकिंग ग्रुप जाताना दिसला त्यांच्या मागे मी चालू लागलो. काही अंतर पुढे गेलो आणि मला बर्फ आणि कातळ यांच्या संगमातून गुंफलेली विलक्षण दृश्ये दिसायला लागली.

या वाटेवर कठीण ठिकाणी लाकडी पायऱ्या बांधलेल्या आहेत त्यामुळे थोडं सुरक्षित वाटतं. पण त्या पायऱ्या बर्फाने भरून गेलेल्या असल्याने सावकाश चालत राहायचं. जर पायऱ्या दिसेनाशा झाल्या तर गोंधळ होऊ नये म्हणून लाल झेंडे लावले आहेत. त्यांच्याकडे लक्ष ठेवून उतरत राहायचं.
सुमारे दोन तास गुडघे दुखेपर्यंत उतरत राहायचं तरीही या पायऱ्या आता कधी संपणार हे कळत नाही. एक व्हॅली उतरलं की एक लाकडी पूल लागतो. एखाद्या सिनेमात दिसते तसे दृश्य आपले मन मोहून टाकते.

मी सहजच मागे वळून पाहिलं तर मला शिखराची उत्तरेकडील बाजू दिसत होती. मी इतकं अंतर इतक्या लवकर उतरून आलो हे पाहून स्वतःलाच एक रास्त शाबासकी देऊन पुढं निघालो.

काही अंतर सपाटीवरून पार झाले आणि मग पुन्हा तीव्र उताराच्या पायऱ्या सुरु झाल्या. ट्रेकिंग ग्रुप आता बराच पुढं निघून गेला होता. सूर्य आता मावळतीकडे कलायला लागला होता आणि पर्वताने आपल्या अंधारलेल्या सावलीच्या कुशीत मला घ्यायला सुरुवात केली होती. साधारण साडेपाचला डोंगर उतार एकदाचा संपला आणि रानातून मंदिराकडे जाणारी वाट मला दिसायला लागली. १२ तासाचा हाईक संपवून मी आता खाली येऊन पोहोचलो होतो.

इथं मात्र पायथ्याशी बस येत नाही. आता अजून चार किलोमीटर चालायचे कसे .. इतकी एनर्जी आणायची कुठून असा विचार करत मी चालू लागलो. चार लेनचा मस्त रस्ता होता आणि संधी प्रकाशात उजळला होता.. बोचरा थंड वारा आता सुखद वाटायला लागला होता.. पाय ठणकू लागले होते.

माझी बॅटरी अगदीच डाऊन झाली होती.. वृद्ध जोडपे चालवत असेल एक गाडी मला येताना दिसली आणि मोठ्या आशेने मी त्यांच्याकडे अंगठा हलवून लिफ्ट मागितली. ते थांबलेही आणि मी गाडीत बसलो.. अनोळख्या ठिकाणी मी हे काय केलं आहे अशी भीती क्षणभर मनात आली. तिथून होस्टेलला पोहोचलो तो अनुभवही विलक्षण आहे. तो पुन्हा कधीतरी.