
विहीर म्हणजे पाण्याचा साठा करण्यासाठी जमीन खोदून बांधून काढलेली सोय. पण भारतीय स्थापत्य परंपरेत विहीर बांधत असताना उपयुक्ततेच्या पलीकडे जाऊन केलेला व्यापक विचार हा बारव स्थापत्य रूपात विकसित झालेला दिसतो. खोलवर केलेलं दगडी बांधकाम, विविध आकारात रचना केलेला तलविन्यास आणि पाण्याच्या पातळीपर्यंत जाता यावं यासाठी केलेली पायऱ्यांची रचना. या सगळ्याचं भौमितीय सौंदर्य अनुभवायचं असेल तर बारव पाहायला हवी. इंग्लिशमध्ये या रचनेला step well तर हिंदीत बावली असं म्हंटलं जातं. गुजरातमध्ये पाटण येथे राणी की वाव या नावाने प्रसिद्ध असलेल्या विहिरीतील नाजूक नक्षीकाम आणि शिल्प सौंदर्याने या रचनेला विश्व वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. अशाच बारवांची मालिका राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र राज्यात दिसते. राजस्थानमध्ये माझी फिल्म शूट करत असताना मी पाहिलेली एक सुंदर बारव म्हणजे आभानेरी येथील चांद बावली …

निकुंभ घराण्यातील राजा चांद किंवा चंद्र याने ८-९ व्या शतकात आभानेरी किंवा आभानगरी येथील आपल्या राज्यात ही विहीर बांधली. या विहिरीची खोली सुमारे १९.५ मीटर आहे. या आयताकृती विहिरीच्या तीन बाजूंना पायऱ्यांची सुंदर रचना आहे तर चौथ्या बाजूला जणू महालच बांधावा त्याप्रमाणे छज्जे आणि दरवाजे आहेत. विहिरीच्या चारही बाजूंना संरक्षक भिंत असून उत्तर दिशेला दरवाजा आहे.

या रचनेत सुमारे 3500 पायऱ्या आहेत आणि १३ मजली बांधकाम केले गेलेले दिसते. राजा चांद हा गुर्जर प्रतिहार घराण्यातील शासक असावा आणि या घराण्याच्या उत्कर्ष काळात या बारवेची बांधणी झाली असे इतिहासकार सांगतात.

या परिसरात एक प्राचीन मंदिरही आहे जे हर्षत माता मंदिर म्हणून ओळखले जाते आणि सुमारे १२ वर्षे जुने बांधकाम मानले जाते. स्थानिकांच्या मते गझनीच्या महंमदाच्या हल्ल्यात या मंदिराचे बरेच नुकसान केले गेले.

या मंदिराची जुने अवशेष वापरून पुनर्बांधणी केली असावी असं वाटतं. इथलं कोरीवकाम आणि शिल्पेही आवर्जून पाहावीत अशीच आहेत.
या मंदिराची जुने अवशेष वापरून पुनर्बांधणी केली असावी असं वाटतं. इथलं कोरीवकाम आणि शिल्पेही आवर्जून पाहावीत अशीच आहेत. दिल्ली-आग्रा-जयपूर या पर्यटन त्रिकोणात असलेलं हे ठिकाण जयपूर आणि आग्रा महामार्गाजवळच आहे. आमेर किल्ला, हवामहल, आग्रा किल्ला, ताजमहाल अशी भटकंती करत असताना आभानेरी सारखी अद्भुत ठिकाणे सुद्धा नक्कीच पाहिली गेली पाहिजेत.