
पहिली मोटरसायकल हा हृदयाच्या कप्प्यात खास जागा असलेला विषय असतो. खूप कमी जण असतील जे पहिल्या फटफटीकडे निव्वळ एक वाहन म्हणून पाहू शकत असतील. पहिल्या मोटरसायकलशी (मग ती कोणत्याही मॉडेलची का असेना) खास भावनिक बंध नाही असं क्वचितच होत असेल. असं म्हणतात की माणसांवर प्रेम करावं आणि वस्तूंचा वापर करावा.. कधीही उलट करू नये. हे मला अगदी मान्य आहे. पण माणसांवर कितीही जीव लावला तरीही सगळ्याच वस्तूंकडे अगदी कोरड्या थंड मनाने उपयुक्ततेच्या नजरेने पाहणे कदाचित साक्षात गौतम बुद्धांनाही जमले नसावे. माझ्याकडे माझी पहिली बाईक आली त्याला आता पंधरावं वर्ष लागत आहे. ३० डिसेंबर २००५ रोजी काळी होंडा युनिकॉर्न १५० सीसी मोटरसायकल मी पाषाणकर मोटर्स पुणेहून आणली आणि आजवर सुमारे लाखभर किमी भ्रमंती या फटफटीवर झाली आहे. मला कॅम्पसमध्ये नोकरी मिळाल्याच्या आनंदात आई-बाबांनी मला हे गिफ्ट दिलं आणि नोकरीतली जवळजवळ पाच-सहा वर्षे मी युनिकॉर्न वापरत राहिलो. महाबळेश्वर, कोल्हापूर, पुरंदर, जव्हार, बंगळूर, म्हैसूर, कूर्ग, चेन्नई, गोवा अशा अनेक ठिकाणी ३००-३०० किमी बाईक रोज हाणत मी भटकलो. दर्या फिरस्तीची सुरुवात ज्या बाईक ट्रिपने झाली ती रेवस ते तेरेखोल भ्रमंती मी प्रथम २००९ मध्ये युनिकॉर्नवरच केली. नंतर दापोली, गुहागर, दिवेआगर, मुरुड, सातारा, माळशेज घाट, जुन्नर अशा अनेक ठिकाणी फिरणं झालं.

मी दुचाकी चालवायला लागलो तेव्हा एकोणीस वर्षांचा असेन. आमच्याकडे बजाज एम८० होती १९८६ साली उत्पादन केलेली गियर असलेली मोपेड. स्वदेस मधील शाहरुख खानचे वाहन. चारपाच वर्षे ही मोपेड वापरली. विलेपार्ले-चेंबूर-बेलापूर आणि परत असा रोजचा ४० किलोमीटरचा प्रवास मी या मोपेडवर करत असे. पुढे पुण्याला शिकायला गेलो तेव्हाही ही मोपेड दोन वर्षे मस्त वापरली. गियर असल्याने कधी पॉवर कमी पडली असं वाटलं नाही आणि चाकांचा व्यास स्कूटर पेक्षा मोठा असल्याने चालवणेही सोयीचे होते. महाबळेश्वरचा घाट, पुरंदर किल्ला, रायगड पायथा, ताम्हिणी आणि वरंध घाटातून पुण्याहून कोकणात उतरणे आणि वीकेंडला सुट्टी मिळाली तर मुंबई पुणे प्रवास सुद्धा बजाज एम८० वर केला आहे.

ही मोपेड वापरायला लागून २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन्ही दुचाकी मी विकलेल्या नाहीत. माझ्या पार्किंगमध्ये त्या चालू अवस्थेत आहेत. बजाज एम८० तर विंटेज बाईक होईपर्यंत मी जपणार आहे. ही मोपेड १९८६ साली लाँच झाली त्याच वर्षीचे मॉडेल माझ्याकडे आहे. फक्त पॉईंट स्टार्टरच्या जागी इलेक्ट्रॉनिक स्टार्टर बसवून मी गाडी सुरु करण्यातील कटकट थोडी कमी केली इतकंच. मुंबईत मुसळधार पाऊस असतानाची चेंबूरची एक आठवण आहे. तेव्हा आमच्या विवेकानंद कॉलेजवळ खूप पाणी तुंबले होते. गाड्या आणि अगदी बुलेटसारख्या रांगड्या मोटरसायकल बंद पडल्या होत्या. मी मात्र मोपेडच्या exhaust वर प्लॅस्टिकची पिशवी बांधली असल्याने गाडी सुरू व्हायला कोणताही त्रास झाला नाही आणि मोठ्या ऐटीत मी आणि माझा मित्र कौशिक वैद्य तिथून बाहेर पडलो.
होंडा युनिकॉर्नवर माझा ६ जानेवारी २००९ साली साली अपघात झाला. दारू पिऊन ट्रिपल सीट जाणाऱ्या तिघांनी मला बंगळूरला सिग्नलवर धडक दिली. लिगामेंट टेयर वर निभावले. दुरुस्ती करून महिन्याभरात बाईक सुद्धा पूर्ववत झाली. अजूनही ती साथ देते आहे. कधीकधी स्टार्ट व्हायला कटकट होते.. सीट जुनी झाली आहे त्यामुळे पूर्वी इतकी आरामदायी राईड मिळत नाही! या वर्षी इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कूटर घ्यावी असा विचार आहे! पण होंडा युनिकॉर्नची सगळ्यात खास आठवण म्हणजे माझी प्रेयसी आणि आता बायको मानसीला घेऊन पार्ल्याहून केईएम ला मारलेल्या चकरा.. याच होंडा युनिकॉर्नवर आम्ही दोघे परळला जात असताना सांताक्रूझला हायवेवर तिला लग्नाची मागणी घातली होती! आता मला सांगा अशा यंत्राकडे खरंच केवळ एक वस्तू म्हणून पाहणं शक्य आहे का?
आम्ही पण ५ वर्षांपुर्वी M80 देताना (बाबांनी लहान भावाला वापरायला दिली गावाकडे) भावनीक झालो होतो. खुप साऱ्या आठवणी होत्या त्या गाडीसोबत. बाबांची ती पहिली गाडी.