Chinmaye

डंकर्क – एक आकांतकथा


परवा पानिपत पाहिला आणि एक काही दिवसांपूर्वी फत्ते शिकस्त. या दोन्ही कथा मला आवडल्या. चित्रपटही आवडले. पण खूप आवडलेले चित्रपट पाहिल्यावर जसं भारावलेपण येतं तसा परिणाम झाला नाही. हे दोन्ही ऐतिहासिक युद्धपट माझ्या आवडीच्या विषयांवर बेतलेले.. पानिपतला तर बॉलिवूडपटाचे बजेटही होते. भव्य दिव्यता.. सुंदर कॅमेरावर्क वगैरे होतं. पण तरीही पानिपत सारख्या वीरश्रीयुक्त शोककथेचे चित्रण पाहताना किंवा शाहिस्तेखानावर छत्रपती शिवरायांनी मारलेल्या नाट्यमय छाप्याची गोष्ट पाहताना पूर्णतः गुंगून जाणं, भान हरपून कथेचा एक भाग होऊन जाणं अपेक्षित होतं. पण तसं काहीही झालं नाही. पानिपत नंतर सिनेमागृहाबाहेर पडून चालत असताना मनात विचार आला की आपण कधी उत्कृष्ट ऐतिहासिक युद्धपट बनवू शकणार आहोत का? इतिहासाची पुन्हा मांडणी करत असताना त्या काळाचं भौतिक विश्व आणि त्या काळात घेऊन जाणारी पटकथा हवी. संदर्भ, तपशील, कपडे, हत्यारे या सर्व बाबतीत संशोधन आणि अभ्यासाअभावी असणारी अनैतिहासिकता सतत रसभंग करत राहते. त्यातील चुका दिसत राहतात. मराठीला बजेटची मर्यादा म्हणून समाधान मानायचं तर हिंदी वाल्यानी मराठा इतिहास लोकांसमोर मांडला यात समाधान मानायचं.

अशा सिनेमातील अनैतिहासिकता दाखवली रे दाखवली की वास्तव दाखवायला ही डॉक्युमेंटरी नाही असा एक प्रतिवाद केला जातो. पण ज्या घटना आणि ज्या व्यक्तिरेखा मुळातच खूप नाट्यमय आणि रंजक आहेत त्यात अजून मसाला घालणं म्हणजे प्रेक्षकांच्या नावावर खपवलेली सिनेमॅटिक अतिशयोक्ती आहे.

पण ऐतिहासिक चरित्रकथांतील अनैतिहासिकता आणि अनावश्यक नाचगाणी किंवा बटबटीत खलनायक वगैरेंपेक्षा आपल्या ऐतिहासिक युद्धपटांत अजून एक मोठी कमतरता आहे असं मला वाटतं. ती म्हणजे आपण खूपच सरळधोपट अशी लिनियर मांडणी करतो, नातेसंबंधांवर खूप भर देतो, व्यक्तिरेखा रंगवण्यावर भर दिला तरीही त्या खूपच काळ्या किंवा पांढऱ्या असतात आणि मानवी स्वभावाचे कंगोरे त्यात क्वचितच उलगडतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळी मांडणी ही रंगमंचावर किंवा टीव्ही मालिकेत जसं संवादफेक आणि प्रत्यक्ष सांगून विषयाची मांडणी होते तसंच आपण सिनेमाच्या भव्य कॅनव्हास लाभला तरीही करतो. सिनेमा म्हणजे शब्दप्रधान कथा-कादंबरी नसून चित्रांच्या जगात घेऊन जाणारा अनुभव आहे. हा अनुभव घेत असताना आपण आपलं रोजचं वास्तव काही तास विसरून जातो आणि त्या कथेच्या काळात आणि भौतिक जगात मनाने जाऊन पोहोचतो. आपण कथेचा इंद्रियानुभव घेऊन बाहेर पडतो. म्हणून सिनेमाची बांधणी करताना हा अनुभव परिणामकारकपणे उभा करतील अशी चित्रे आणि तितक्याच ताकदीचा साउंड (यात साउंड इफेक्ट आणि पार्श्वसंगीत दोन्ही आलं) दिग्दर्शकाला गुंफावा लागतो. डंकर्क पाहताना दुसऱ्या महायुद्धातील एका मोठ्या घटनेच्या विश्वात पोहोचलो आहोत असा भास मला झाला. इतिहासाच्या पुस्तकातून डंकर्कच्या माघारीबद्दल वाचलं होतं. नोलनने या घटनेचं अनुभव विश्व जगता येईल असा सिनेमा निर्माण केला आहे. ही परिणामकारकता त्याने कशी साधली हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे.

चित्रपटाच्या सुरुवातीला इंग्लिश फ्रेंच युतीला जर्मन सैन्याने डंकर्क जवळ घेरलं आहे हे स्पष्ट होतं आणि जीवाच्या आकांताने समुद्राकडे धावणाऱ्या एका पोरसवदा सैनिकाची धडपड आपल्याला दिसते. इथं संवाद जवळजवळ नाहीतच. कॅमेराची दृष्टी आणि सशक्त साउंड डिझाईन प्रेक्षकाला डंकर्कच्या आभासी जगात पोहोचवते. घड्याळाची टिकटिक भासावी असं पार्श्वसंगीत सुरु होतं आणि लय हळूहळू जलद होत जाते आणि सूर टिपेला जातात.. हा सैनिक मोकळ्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचतो आणि काही सेकंद आपल्यालाही सुटकेची आशा खुणावते. मग दिसतात किनाऱ्यावर बोटींची वाट पाहणाऱ्या हजारो सैनिकांच्या रांगा आणि त्यात जागा शोधण्याची धडपड करत असणारा हा तरुण सैनिक. आणि मग जर्मन वायुसेनेचा हल्ला होतो आणि हे जवान कीडा मुंगीप्रमाणे बळी जातात. बचाव करण्यासाठी आडवा झालेल्या जवानाला आपण अगदी जमिनीला लागून असलेल्या कॅमेरातून पाहतो आणि स्फोट होणारे बॉम्ब या जवानाच्या जवळ येत आहेत अशी जाणीव होते. शेवटच्या स्फोटाने वाळू उडून त्याच्या डोक्यावर पडते आणि त्याचा जीव वाचतो. इथं पुन्हा एकदा आपल्याला तणावातून मुक्तता मिळते पण काही सेकंदातच पुढचे अरिष्ट येते. चित्रपटाच्या शेवटपर्यंत भय-तणाव-सुटका या वर्तुळातून पाहणाऱ्याला दिग्दर्शक पुन्हा पुन्हा नेतो. पण हे सगळं फक्त कथेच्या एकाच रेषेवर घडत नाही हा एक महत्त्वाचा फरक आहे.

डंकर्क हून तीन लाखांहून अधिक ब्रिटिश सैनिकांना इंग्लिश खाडी पार करून परत आणण्यासाठी शेकडो नागरी बोटींची मदत घेतली गेली. सैनिक नसलेल्या सामान्य लोकांचं धैर्य आणि देशभक्तीची ही परीक्षा. अशाच एका बोटीचा कप्तान आणि त्याचे सहकारी ही जबाबदारी घेतात. ६० किलोमीटर लांबीची खाडी पार करून सैनिकांना परत घरी आणण्याचं मिशन पार पाडायचं आहे पण हे जर्मन वायुसेनेच्या बॉम्बफेकीच्या दहशतीखाली सुखरूप करायचं आहे. या एक संपूर्ण दिवसाच्या नाट्यमय प्रवासाची गोष्ट आपल्याला दिसत राहते. संकट-सुटका-उसासा-चिंता-पुन्हा नवीन संकट हे वर्तुळ इथंही सुरूच राहतं आणि आपण या अनुभवाच्या भोवऱ्यात आता अडकलेले असतो.

डंकर्क ची तिसरी कथा म्हणजे जर्मन विमानांना टक्कर द्यायला ब्रिटिश वायुसेनेने पाठवलेल्या तीन विमानांचा ट्रॅक. त्यापैकी एकजण क्रॅश होणं आणि दुसऱ्याच्या विमानाचा इंधन दर्शक बंद पडणं यातून अनिश्चिततेचे सावट उभं राहतं. समुद्रातील ब्रिटिश जहाजांवर बॉम्ब फेकून त्यांना बुडवणाऱ्या जर्मन विमानांना पाडण्याचा प्रयत्न हे दोन वैमानिक जीवाच्या आकांताने करत राहतात. एखाद्या सेकंदाचा उशीर म्हणजे शेकडो जवानांच्या जीवन मरणाचा प्रश्न. ब्रिटिश विमानांना वारंवार होणाऱ्या जर्मन हल्ल्याला तोंड देत राहायचे आहे. पहिला ट्रॅक १ आठवड्याचा आहे, दुसरा ट्रॅक एक दिवसाचा तर विमानांचा ट्रॅक फक्त एक तासाचा. पण आपण काळाचं भान विसरून आता एकेक क्षण अस्वस्थ करत पुढं टिकटिक करत असतो.

मरणाच्या दारात घाबरून लाचार उभा असलेला माणूस कसा वागतो, त्याचे नैतिक संदर्भ कसे बदलतात, तो कसा अविचारी आणि रासवट वागतो हे दिसायला लागतं. वीरश्री, देशभक्ती च्या चौकटी मोडणारे अगदी raw किंवा आदिम मनोव्यापार दिसायला लागतात. ही गोष्ट युद्धकथा नसून मृत्यूला टाळून घरी पोहोचण्यासाठी केलेल्या आकांताची गोष्ट आहे हे आता पाहणाऱ्याला लक्षात आलेलं असतं. यातील कोणत्याही व्यक्तिरेखेचा खोलवर परिचय होईल असे सीन नाहीत, पार्श्वभूमी नाही.. त्यामुळे आपण कोणत्याही एका व्यक्तीशी भावनिकदृष्ट्या जोडले जात नाही. याला साधारणपणे कमकुवत व्यक्तिरेखन मानलं जातं. पण डंकर्कच्या बाबतीत हा दिग्दर्शकाचा एक चाणाक्ष निर्णय आहे हे लक्षात येतं. त्या ठिकाणी, त्या वेळेला मृत्यूच्या सापळ्यात अडकलेल्या सगळ्यांचीच ही गोष्ट आहे. नोलनला तुम्हाला एखाद्या पात्राशी जोडायचं नसून त्या आकांताचा अनुभव द्यायचा आहे. अनेक ठिकाणी सुटकेचे मार्ग दिसतात आशा निर्माण होते. परतणारे सैनिक चहा घेताना, न्याहारी घेताना दिसतात आणि मग काही क्षणातच एखादा टॉर्पेडो त्या जहाजाचा वेध घेतो आणि मग पुन्हा समुद्रात उडी मारून नवा आधार शोधण्याची धडपड सुरु होते.

चित्रपटाच्या शेवटी हे तीन ट्रॅक एकत्र येतात आणि त्या तणावातून सुटका होईल अशी आशा निर्माण होते. संगीतकार हान्स झिमर ने आत्तापर्यंत घड्याळाची टिकटिक आणि शेफर्ड टोन नावाचा परिणाम वापरून जे तणाव विश्व निर्माण केलेलं असतं त्यातून क्षितिजावर अनेक ब्रिटिश नौका दिसताच एका शांत ध्यानमग्न करणाऱ्या सुरावटीच्या आधाराने तो आपल्याला बाहेर काढतो. आणि ब्रिटिश सैनिकांची घरवापसी सुरु होते. त्यांना वाचवणारा ब्रिटिश लढाऊ वैमानिक इंधन संपून डंकर्कच्या किनाऱ्यावर उतरतो आणि युद्धबंदी होतो. इथं आणि एकंदर सिनेमातच आपल्याला शत्रू दिसत नाही. जिथं दिसतो तिथंही एक पुसटशी प्रतिमा दिसते. सोनेरी सूर्यप्रकाशात इंधन संपलेले ब्रिटिश स्पिटफायर उतरताना बरंच काही सांगून जाते. संवादफेकीतून textually काही मांडण्याची गरजच भासत नाही. शत्रू दिसत नाही कारण आपल्याला अज्ञाताचे भय जास्त असते. युद्धातही अनेकदा शत्रू दिसत नाहीत पण त्याने केलेल्या गोळीबाराच्या, बॉम्बफेकीच्या व्यूहात सैनिक अगतिकपणे सापडतो.. हाच अनुभव आपल्याला दिग्दर्शक जगायला भाग पाडतो. ब्रिटिश सैनिकांच्या मानवी प्रतिमांचा मुकाबला जर्मन युद्धयंत्रांशी आहे.. त्यातून निर्माण होणारी भीती अनुभवनिर्मितीसाठी आवश्यक ठरते. इथं बॉर्डर सारखं एकमेकांना शिवीगाळ करणारे, ललकार देणारे अधिकारी दिसत नाहीत. इथं कोण चूक कोण बरोबर वगैरे विषयच नाही. फक्त आणि फक्त जिवंत राहण्याची धडपड इतकंच.

मला सुखरूप घरी पोहोचायचं आहे ही अगदी साधी प्राथमिक भावना आहे. जेव्हा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्या भावनेचा जीवघेणा आकांत होतो. आणि मग सुखरूपपणे ब्रिटनला पोहोचलेल्या पराभूत सैनिकांना शरमेची जाणीव होते. आपले देशवासी आपला धिक्कार करणार याचं भय मृत्यूच्या भयाची जागा घेतं. पण प्रेमाने आणि आपुलकीने त्यांचं स्वागत ब्रिटिश जनता करते. कोणी बियर देतं, कोणी हुरूप वाढवणारे चार शब्द बोलतं. कुठेही मोठमोठे संवाद किंवा भाषणबाजी नाही. सगळंकाही साध्या सोप्या घटनांतून उलगडतं. एक आंधळा सैनिकांना पांघरूण वाटत असताना वेल डन म्हणत असतो. आम्ही काहीच केलं नाही आम्ही फक्त मरण टाळू शकलो असं एक ब्रिटिश सैनिक त्याला सांगतो. पण या अपमानास्पद लष्करी पराभवातून बाहेर पडून पलटवार करता यावा यासाठी जगणं गरजेचं आहे याची जाणीव करून देत चित्रपट संपतो. यात कथेचे सगळेच पैलू मी सांगितले असले तरीही हा ब्लॉग स्पॉईलर ठरणार नाही. कारण डंकर्क हा गोष्ट सांगणारा सिनेमा नव्हे. हा अनुभव देणारा सिनेमा आहे. जगण्याचा आकांतच नाट्यमय आहे.. तीन साडेतीन लाख सैनिकांची यशस्वी माघार ही घटनाच इतकी भारावणारी आहे की त्या अनुभव विश्वात दीड तास जगल्याचा आभास होणं हेच खूप रंजक आहे, रोमांचक आहे, करमणूक करणारं आहे. असा परिणाम नाटक, कादंबरीतून, टीव्हीतून साधणं खूप कठीण आहे. आणि सिनेमाचं हेच बलस्थान ज्याला कथेच्या मांडणीत चातुर्याने वापरता येतं तोच उत्तम ऐतिहासिक युद्धपट बनवू शकतो.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: