काल अनेक दिवसांनी गाडीत बॉम्बे ची गाणी ऐकली आणि आठवलं की ए आर रहमानचा फॅन मी बॉम्बे ऐकूनच झालो होतो. त्याआधी रोजाचा साउंडट्रॅक ऐकला तेव्हा त्यातील साधेपणा, प्रसन्नता, वेगळेपणा … सिनेमॅटिक भव्यता पण तरीही मृदगंध जितका सहज आवडतो तितक्या सहज मेलडी हे सगळं विलक्षण वाटलं होतंच .. आणि साधेपणा हा शब्द मी कमीपणा या अर्थाने अजिबात वापरत नाहीए. मी घेतलेल्या एका मुलाखतीत रहमान म्हणाला होता की तुम्हाला कितीही गहन राग येत असला किंवा अनवट कॉर्ड ची जंत्री वापरण्याची हौस असली तरी कधीकधी तुम्हाला येतं त्यातलं जेमतेम १% सुद्धा चांगलं संगीत करायला पुरेसं असतं .. जितकं जास्ती ज्ञान अनैसर्गिकपणे वापरायला जाल तितकं गाणं फसण्याची शक्यता जास्ती. रोजाचा साधेपणा निरागस होता आणि परिणामकारकही. बॉम्बे च्या संगीत रचनांना मात्र साधं म्हणता येणार नाही. काटेकोरपणे तासून एकेक बारकावा घडवलेलं शिल्पं असावं तशी ही गाणी आहेत.
खूप लोक म्हणतात की रहमानच्या गाण्यात गोडवा नाही.. शब्दांना महत्त्व नाही… मला वाटतं एक्सप्रेशन जास्ती महत्त्वाचं आहे. अमूर्त आणि गुंतागुंतीच्या भावना संगीत शब्दांपेक्षा अधिक समर्थपणे मांडू शकतं. बॉम्बे ची गाणी डब केलेली असली तरीही मेहबूब साहेबांनी शब्द सुंदर लिहिले आहेत. तू हि रे किंवा कहना ही क्या मध्ये ते कवितेसारखेच अलगदपणे उलगडत जातात. रहमान दक्षिणेतील असला तरीही रोजा आणि बॉम्बे च्या मेलडीज हिंदुस्थानी रागांवर आधारलेल्या आहेत असं वाटतं. केहना ही क्या ची सुरुवात वेगळ्या धाटणीच्या कोरस हार्मनीने होते कव्वालीचा ठेका आणि त्याला बेस गिटारचा साज आणि चित्रा/ कविता कृष्णमूर्ती यांचे गायन .. पेटी, तबला एकेक वाद्य आपलं अस्तित्व जाणवू न देता परिणामकारक पद्धतीने वापरलेलं. कुच्ची कुच्ची रकम्मा किंवा हल्लागुल्ला मध्ये असलेला सवाल-जवाब संवादाचा खट्याळपणा, उत्सव आणि त्याला दिलेली ताजी, मुक्त वाद्यरचनेची जोड … मुख्य म्हणजे लहान मुलांसाठी ४० वर्षाच्या बायकांचा आवाज वापरण्याची मूर्ख पद्धत बंद करून घेतलेला मुलांचा निरागस आवाज यांनी त्या गाण्यांना एक निरागस सौंदर्य दिलं.. हम्मा हम्मा चा माहौल, मादकता रणजित बारोटने केलेला रिदम हे तेव्हाच न्यू एज होतं .. त्याचा साउंड किंवा नादही न्यू एज होता… हल्ली केलेलं त्या गाण्याचं रिमिक्स विशेष आवडलं नाही कारण नुसतं ढिकचिक ढिकचिक केलं म्हणजे न्यू एज गाणं होत नसतं ..
तू ही रे ची ओढ, आर्त हाक … गाण्याच्या तालात केलेलं डिटेलिंग.. त्यात डोकावणारा चारुकेशी .. आणि मूळ मेलडीच्या मागे व्हायोलिन्स नी अलगद उभी केलेली हार्मनी .. कितीही वेळा लूपवर ऐकलं तरी समाधान होत नाही … बॉम्बे थीमबद्दल काय बोलू … नवीन कुमारांची बासरी .. व्हायोलिन्स आणि चेलोज नी केलेली करामत आणि एच श्रीधर यांचा साउंड … डोळे मिटून ऐकलं तर चित्रांच्या जगात नेणारा असा हा साउंडट्रॅक… त्याच वर्षी रहमानने हिंदीत रंगीला होऊन पदार्पण केले .. त्याबद्दल पुन्हा कधीतरी – चिनोबा भावे
ReplyForward |