
क्रीडा पत्रकारितेच्या जगाला रामराम करून मी आता (2009) क्वांटम नावाच्या एका कंपनीत रिसर्च मॅनेजर म्हणून नवी इनिंग सुरु केली. कोणतीही नवीन गोष्ट बनवताना, किंवा असलेली गोष्ट सुधारत असताना ग्राहकांच्या गरजांची, तक्रारींची, आकांक्षांची माहिती घेणं आणि त्यातून शिकणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. एखादी नवीन गोष्ट किंवा सेवा सुरु केल्यावर ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी, प्रचार करण्यासाठी, जाहिराती निर्माण करण्यासाठी अशा संशोधनाची आवश्यकता असते. एखादं जाहिरातीचं कॅम्पेन माध्यमांमध्ये आल्यानंतर त्याचा अपेक्षित परिणाम होतो आहे का हे जोखण्यासाठीही संशोधनाची गरज पडते. हे संशोधन दोन प्रकारचे असते. संख्यात्मक आणि गुणात्मक. अमुक एका बाजारपेठेतील किती टक्के लोकांना तुमचं प्रोडक्ट उपयुक्त वाटलं हा संख्यात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रश्न झाला. ते उत्पादन का आवडलं, कसं आवडलं, किंवा का उपयुक्त वाटलं नाही? ते विकत घेण्याचा निर्णय कसा झाला, विकत घेतल्यावर जीवनशैलीत कोणते आणि कसे बदल झाले, त्यामागे सांस्कृतिक आणि अभिव्यक्तीच्या प्रेरणा कोणत्या हे प्रश्न गुणात्मक पद्धतीने सोडवावे लागतात. या प्रकारचं काम करत असताना पत्रकार घेतात तशाच प्रकारच्या मुलाखती आणि चर्चा कराव्या लागतात. फक्त संशोधक म्हणून काम करत असताना आपल्याला पत्रकारापेक्षा अधिक चांगला ऐकणारा व्हावं लागतं. मला मुलाखत घेण्याची पद्धत आणि पवित्रा पूर्णतः बदलावा लागला. पत्रकार म्हणून अनेकदा असं होत असे की समोर असलेला प्रसिद्ध खेळाडू प्रांजळ उत्तर टाळत आहे, लपवाछपवी करत आहे हे ठाऊक असायचं. आणि मग ऑन कॅमेरा त्याने स्पष्ट भूमिका घ्यावी यासाठी आक्रमक पवित्रा घ्यावा लागायचा. संशोधक म्हणून मुलाखत घेत असताना एकही प्रश्न लोडेड (उत्तराचा संकेत असलेला) असू नये आणि आपण शांतपणे, कोणताही निष्कर्ष लगेच न काढता मुलाखत देणाऱ्याला व्यक्त होऊ द्यावे ही काळजी घ्यावी लागते.

मुलाखतींच्या पलीकडे जाऊन प्रश्न समजून घेण्याची पद्धत म्हणजे निरीक्षणात्मक संशोधन. ही पद्धत मानववंशशास्त्रज्ञांनी विविध संस्कृतींचा अभ्यास करत असताना अंमलात आणली आणि मग पुढे विविध ज्ञानशाखांनी ही पद्धत स्वीकारली. एका प्रकल्पात आम्हाला जाणून घ्यायचे होते की ट्रक ड्रायव्हर ओरिजिनल स्पेयर पार्ट विकत न घेता स्वस्त, कधीकधी जुने स्पेयर पार्ट का वापरतात. यासाठी आम्ही भारताच्या विविध भागातील २० ट्रक ड्रायव्हर्स चे निरीक्षण केले. म्हणजे प्रत्येक वाहकाबरोबर ४८ तासांचा प्रवास ट्रकमध्ये बसून केला. त्यांच्याबरोबर धाब्यावर जेवलो, ट्रकमध्येच किंवा टपावर झोपलो.. खूप फोटो काढले, विविध गोष्टींचे व्हिडीओ काढले.. विविध घटना आणि त्यांना ट्रक ड्रायव्हर नी दिलेली प्रतिक्रिया … ट्रक नादुरुस्त झाल्यास कशा पद्धतीने उपाय काढला जातो, कोणाची मदत मिळते. ट्रक ड्रायव्हर लोकांचे सामाजिक समूह कोणते, त्यात कोणत्या गोष्टी घडतात अशा अनेक गोष्टींचे निरीक्षण करून काही उपाय सुचवले गेले. या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची असते ती गोष्ट म्हणजे सहवेदना. हे लोक आपल्या आयुष्याचा एक कप्पा संशोधनासाठी खुला करून देत असतात. त्यांचं जग आपल्यापेक्षा कितीही वेगळं असलं तरीही निरीक्षणात्मक संशोधन करत असताना त्यांच्या जगाचा एक भाग होऊन गोष्टींकडे पाहणं महत्त्वाचं असतं. म्हणूनच या पद्धतीला participant observation म्हणजे समाज प्रक्रियेत सहभाग घेऊन केलेलं निरीक्षण असं नाव आहे. हे करत असताना फोटो-व्हिडीओ या साधनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक माहिती शब्दात व्यक्त केली जाऊ शकत नाही. माहितीचा एक भाग हा पाहण्याचा आणि अनुभवण्याचा असतो. त्यामुळे तिथं माझ्यातील फोटोग्राफर-व्हिडीओग्राफर ला खूप वाव होता. कौशल्य तेच पण त्याचा वापर वेगळा.

या कामात मिळालेला सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यात हिंडण्याची संधी. मी इंग्लिश, हिंदी आणि मराठीत मुलाखती घेऊ शकतो. गुजराती, बंगाली आणि पंजाबी मला बऱ्यापैकी समजतात त्यामुळे मदुराई ते अमृतसर आणि भूज ते कलकत्ता विविध ठिकाणी लोकांना जाऊन भेटण्याची संधी मिळत असते. हे सगळे लोक तुमच्या आमच्या सारखे सामान्य लोक असतात. त्यांना भेटताना पत्रकार असल्याचं वलयही नसतं त्यामुळे या गप्पा खूपच उस्फूर्त आणि पारदर्शक होतात. सगळेच अनुभव सांगता येणार नाहीत पण नाशिक जिल्ह्यातील सधन शेतकरी, आंध्र प्रदेशच्या ताडेपल्लीगुडम मध्ये ट्रॅक्टर दुरुस्त करणारा मेकॅनिक, उत्तर प्रदेशात मदरशात शिकवणारा काजी, बिहारमधील अंगणवाडी सेविका, मध्य प्रदेशात जगातील सगळ्यात मोठा टॉवेल कारखाना चालवणारा इंजिनियर, पंजाबमध्ये मोठी पिठाची गिरणी चालवणारा उद्योजक, गोव्यात खाणींमध्ये जेसीबी चालवणारा तंत्रज्ञ अशा विविध प्रकारच्या लोकांना भेटण्याचा योग आला आणि त्यांच्याकडून खूप वेगवेगळ्या गोष्टीही समजल्या. भारताबाहेरही काही प्रकल्प करण्याची संधी मिळाली. नायजेरियात लागोस मधील अल्प उत्पन्न कुटुंबात पाण्याचा वापर कसा होतो, किंवा इंडोनेशियात लोक कुटुंब म्हणून गाडीने प्रवास कसा करतात अशा मजेशीर गोष्टी पाहता आल्या. दुसऱ्या संस्कृतीमध्ये जाऊन काम करत असताना त्यांच्या भूमिका समजून घेणे आणि त्यांच्या सारखा विचार करता येणे हे एक महत्त्वाचं कौशल्य एथनोग्राफी करणाऱ्या माणसाकडे असावं लागतं. प्रवासी म्हणून एखादी जागा पाहताना खूप वरवर पाहणं होतं. पण एथनोग्राफर म्हणून विचार केला तर अनुभव विश्व समृद्ध करणारे अनेक अनुभव मिळतात.

तीन-साडेतीन वर्षे हे काम केल्यानंतर असं वाटायला लागलं होतं की केवळ संशोधनापुरतीच आपली भूमिका मर्यादित असू नये. विविध प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनेही आपल्याला काम करता यायला हवं. फोटोजर्नलिझम चे प्रशिक्षण घेण्याची माझी पूर्वी इच्छा होती. परंतु आता असं वाटायला लागलं होतं की ही गोष्ट प्रत्यक्ष काम करून शिकण्याची आहे. असा विचार सुरु असताना आयआयटी मुंबईतील डिझाईन प्रशिक्षण संस्था आयडीसी बद्दल समजलं. तिथं दोन वर्षांचा मास्टर ऑफ डिझाईन प्रोग्रॅम आहे त्याबद्दल कळलं. व्हिजुअल कम्युनिकेशन बद्दल सर्वंकष प्रशिक्षण देणारा हा कार्यक्रम मला खूपच आवडला. तिथं प्रवेश मिळण्याची प्रक्रिया बरीच लांबलचक आहे.

आयडीसी आणि आयआयटी मुंबईतील अनुभव हा एका वेगळ्या सविस्तर पोस्टचा विषय होईल तेव्हा ते पुन्हा कधीतरी. पण काही ठळक गोष्टी सांगतो. डिझाईन करणे म्हणजे गोष्टी सजवणे असा एक सरळधोपट अर्थ आपण मानतो. तो अर्थ चूक नसला तरीही मर्यादित आहे. डिझाईन म्हणजे लोकांच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे. आयडीसी मध्ये इंडस्ट्रियल डिझाईन, ऍनिमेशन, इंटरॅक्शन डिझाईन, मोबिलिटी वेहिकल डिझाईन आणि व्हिजुअल कम्युनिकेशन अशा पाच शाखा आहेत. व्हिजुअल कम्युनिकेशन मध्ये दृश्य-भाषा, ग्राफिक डिझाईन, फोटोग्राफी, पेंटिंग, ह्युमन इन्फर्मेशन प्रोसेसिंग, विविध टाईप किंवा फॉन्टचे डिझाईन अशा गोष्टी शिकवल्या जातात. या प्रशिक्षणाने मला दृश्य-भाषा शिकायला मदत केली. संस्कृती आणि अभिकल्पना यातील नाते समजून घ्यायला मदत केली.

आयआयटी मुंबई आणि अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचा समन्वय असल्याने मला एक सत्र दक्षिण कोरियातील दोंगुक विद्यापीठात शिकण्याची संधी मिळाली. तिथं चार महिने दक्षिण कोरियाचे फोटोग्राफी द्वारे दृश्य-प्रवासवर्णन मी प्रकल्प म्हणून केले. मला सिनेमॅटोग्राफी आणि फिल्म या दोन गोष्टींची प्रचंड आवड नेहमीच होती. संतोष सिवन आणि राजीव मेनन हे माझे आवडते सिनेमॅटोग्राफर. कधीतरी आपण आपली एखादी गोष्ट शूट करून फिल्मच्या माध्यमातून मांडायची अशी इच्छा होती. पत्रकार म्हणून गोष्ट सांगत असताना पटकन आणि घाईने सगळं मांडायला लागत असे. कोणत्याही बातमीचा सखोल विचार करणे कठीण होते. तो प्रयत्न मी प्रथम माझी फिल्म स्टिक टू ड्रीम्स बनवताना केला. जर्मनीतून राजस्थानमध्ये येऊन राहिलेल्या आणि मुलांना हॉकी शिकवणाऱ्या अँड्रिया तुमशर्न ची गोष्ट मी माझ्या कॅमेराने टिपण्याचा प्रयत्न केला. मी गोष्ट सांगण्यापेक्षा अँड्रियाचे जग फिल्म पाहणाऱ्याला अनुभवता यावे असा माझा प्रयत्न होता. कोणतीही कथा मांडण्याच्या विविध पद्धती असतात. निरीक्षणात्मक फिल्म ही एक पद्धत जी मला स्वतःला खूप आवडली. डॉक्युमेंट्री किंवा माहितीपट रटाळ असतात, मनोरंजन करत नाहीत हा आपल्याकडे असलेला एक पक्का समज आहे. या पूर्वग्रहाला मोठ्या प्रमाणावर सिनेमाच्या रसग्रहणाचे प्रशिक्षण न घेता समीक्षा करणारे लेखक लोक जबाबदार आहेत. जरी हॉकी या गोष्टीच्या केंद्रस्थानी असली तरी सगळ्यांसाठी एक रंजक गोष्ट सांगता यावी हा माझा प्रयत्न होता. त्यात मला कितपत यश मिळाले माहिती नाही पण पहिली फिल्म करण्याचा अनुभव मला खूप काही शिकवून गेला.

२०१४ ला मास्टर्स पूर्ण झालं आणि काही कारणाने मला मुंबई सोडणे शक्य नसल्याने फ्रीलान्स काम करण्याचा निर्णय घेतला. आणि मग डिझाईन रिसर्च आणि व्हिडीओ प्रोडक्शन या दोन प्रकारची कामे सुरु केली. कामाचा जम बसलेला नसताना लाईव्ह स्पोर्ट्समध्ये काम करणाऱ्या एका मित्राने आयपीएल साठी प्रोड्युसर म्हणून काम करशील का असं विचारलं आणि २०१५ ते २०१७ या काळात सोनी सिक्स वाहिनीसाठी तीन सीझन आयपीएल चं काम मी केलं. यामध्ये विविध फीचर शूट करणे, खेळाडूंच्या मुलाखती, प्रायोजित कार्यक्रम, फॅन्स च्या प्रतिक्रिया असे कामाचे स्वरूप होते. अर्चना विजया, गौरव कपूर, समीर कोचर, शिवानी दांडेकर, रोशेल राव अशा अँकर सोबत आणि विविध खेळाडूंसोबत काम करण्याची संधी मिळाली. लाईव्ह स्पोर्ट मध्ये कामाला प्रचंड वेग असतो. एकही चूक झाली तर ती लगेच ऑन एअर जाऊन वाहिनीचे आणि तुमचे हसे होऊ शकते. निर्णय घ्यायला आणि कंटेन्ट तयार करायला खूप कमी वेळ असतो. या वेगातच कामाची सारी मजा आहे. श्रीलंकेत एक टेस्ट सिरीज केली तेव्हा समालोचनाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. गावस्कर, मांजरेकर, मुरलीधरन, जयसूर्या अशा दिग्गज खेळाडूंना काहीही सांगताना भीती आणि दडपण वाटत असे. पण हे सगळे इतके विनम्र आणि साधे होते की काम करणे सोपे गेले. टेस्ट क्रिकेट अधिक रंजक पद्धतीने मांडण्याचा, विविध फीचर्स करण्याचा प्रयत्न आम्ही केला. जेव्हा अजिंक्य रहाणेने सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम केला तेव्हा नेहमीच्या पद्धतीने मुलाखत न घेता जॉन्टी ऱ्होड्स बरोबर मास्टर क्लास करण्यासारखे प्रयोग करता आले. त्यानंतर एक सीझन स्टार स्पोर्ट्स साठी आयपीएल, फिफा युवा वर्ल्ड कप च्या दरम्यान कतार मधील एका वाहिनीसाठी काम, २०१८ च्या फिफा वर्ल्ड कप मध्ये स्टुडिओ प्रोडक्शन अशा विविध असाइनमेंट केल्या आहेत. आता रणजी ट्रॉफी, ऑलिंपिक्स अशा स्पर्धा करण्याची इच्छा बाकी आहे.

बाकी डिझाईन रिसर्च आणि युजर एक्सपीरियन्स रिसर्च चे काम सुरु आहेच. कधीकधी हे स्टुडिओत बांधून ठेवते तर कधीकधी फील्डवर्क करण्याची संधी देते. मध्यंतरी ड्रायव्हर रहित गाड्यांसाठी जे विशेष नकाशे बनवले जातात त्यासाठी संशोधन करण्याची संधी मिळाली. माणसे विचार कसा करतात, संगणकाशी काम करताना संवाद कसा साधतात. त्यात त्यांना कुठं अडचणी येतात. असे विविध पैलू या संशोधनात तपासले जातात आणि संगणकावरील विविध टूल्स ना अधिक सोपं आणि कार्यक्षम केलं जातं.

सध्या वेळ मिळेल तेव्हा मल्लखांब या खेळाचे फोटो काढत असतो. कधीतरी त्याचं एखादं छोटंसं पुस्तक करता येईल असं वाटतं. व्यावसायिक कामाबरोबर सध्या सुरु असलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर्या फिरस्ती. संपूर्ण कोकण किनाऱ्याची भटकंती करताना फोटो-व्हिडीओ आणि चित्रकलेच्या माध्यमातून डोळस पर्यटनाला चालना देऊ शकेल अशी माहिती एकत्र करण्याचा हा प्रयत्न आहे. पुढच्या वर्षी गुढीपाडव्या पर्यंत या प्रकल्पाला मूर्त स्वरूप द्यायचे असा संकल्प आहे. या प्रकल्पातील पहिले व्हिडीओ पुष्प होते पावसाळ्यात गवसलेल्या रायगडाबद्दलचे. त्याला दीड लाख व्ह्यू मिळाले आणि हुरूप बराच वाढला आहे.
तर असा आहे या फ्रीलान्सर चा प्रवास … एक गोष्ट जरूर सांगितली पाहिजे की फ्रीलान्स काम करणे म्हणजे आर्थिक अस्थैर्य. पण तुमचे काम चांगले सुरु असेल तर एकंदर वर्षभरात चांगली मिळकत होते. आपल्याला हवे ते काम निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते. विविध प्रकारच्या गोष्टी करता येतात. घरी आणि नात्यांना वेळ देता येतो. पण दोन किंवा तीन ठरलेले क्लायंट जर नियमितपणे काम देत नसतील तर फ्रीलान्स काम करणे धोक्याचे ठरू शकते. आर्थिक अस्थैर्याचे म्हणाल तर सरकारी नोकरी सोडली तर कोणत्याही नोकरीची खात्री आज देता येत नाही, त्यामुळे जर आर्थिक शिस्त असेल तर तो तितका मोठा आव्हानाचा मुद्दा ठरत नाही. हल्लीच मला एका पुस्तकाबद्दल कळले ज्यात छोटी कंपनी कशाप्रकारे व्यावसायिक यश मिळवू शकते याबद्दल विवेचन आहे. पॉल जर्व्हिस चे कंपनी ऑफ वन! मी उत्सुक आहे हा दृष्टिकोन जाणून घ्यायला! जाता जाता मी लिहिलेल्या चार ओळी शेयर करण्याचा मोह आवरत नाहीए!
मंज़िल की तलाश अधूरी ही सही
राह का साथ पक्का रहे
गुमराह होना आसान ही रही
भटकने की चाह सच्ची रहे …
लेख आवडला
Reblogged this on गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही and commented:
काहितरी वेगळे करण्याची हौस असणाऱ्या आणि काहितरी वेगळे बघू शकणाऱ्यांना हे लेखन नक्कीच मार्गदर्शक ठरेल