Chinmaye

चिन्मय, तू नक्की काय करतोस? पूर्वार्ध


ती सध्या काय करते च्या चालीवर तू नक्की काय करतोस हा प्रश्न मला खूप लोक विचारतात. त्यावर डिझाईन रिसर्च असं उत्तर दिलं तरी ९०% लोकांचं समाधान होत नाही. अनेक लोक मी अजूनही कोणत्यातरी टीव्ही चॅनलचा पत्रकार आहे असंच समजतात. जे मला ओळखतात त्यांना मी पत्रकारिता शिकलो, फोटोग्राफी करतो वगैरे ठाऊक असतं पण त्यांनाही अनेकदा हा प्रश्न पडतो. एवढं कशाला माझे आईवडील, सासू-सासरे, चुलत भावंडे, पुतणे-पुतण्या-भाचे-भाच्या या सर्वांनाही हा प्रश्न पडतो. ज्यांना डिझाईन रीसर्च हा शब्द ऐकून कुतूहल वाटतं ते अजून चौकशी करतात. पण मग पत्रकारितेनंतर इथं कुठं हा प्रश्न त्यांना पडतोच. बरं मी एकाच वेळी दोनतीन प्रकारची कामे कशी करू शकतो, याचा अर्थ मला करियर फोकस आहे की नाही असं मला अनेकदा जवळचे लोकही विचारतात. मला ऑफिस का नाही? मी इतका प्रवास कसा करू शकतो.. असे पुरवणी प्रश्नही असतातच. मी इंजिनियर नाही मग मी आयआयटी मुंबईत कसा गेलो आणि काय करत होतो अशी शंकाही काहींना येते! डिझाईन रिसर्च करतोस तू तर मग कधीतरी आयपीएल च्या मैदानात किंवा कोकणात-राजस्थानात फोटोग्राफी करताना कसा दिसतोस असं मला अनेकदा विचारलं गेलं आहे! तेव्हा विचार केला की एकदाच याबद्दल सविस्तर लिहून टाकावं. म्हणजे फक्त लिंक दिली की झालं. थोडी पार्श्वभूमी देतो आहे कारण त्याशिवाय एकंदर प्रवासाची लिंक समजणार नाही!

ahangama
भारत श्रीलंका टेस्ट सीरिज मध्ये प्रोड्युसर म्हणून काम करताना मी – फोटो दीपक कट्टार

१९९९ म्हणजे मी १८ वर्षांचा झालो त्यावर्षी मी राष्ट्रीय छात्रसेनेच्या वायुसेना विभागात कॅडेट म्हणून दाखल झालो. तेव्हा वायुसेनेत लढाऊ वैमानिक व्हायचं ही एकमेव महत्त्वाकांक्षा होती. विज्ञान विषय फारसा आवडत नव्हता पण वायुसेनेत ते अनिवार्य होते त्यामुळे १२ विज्ञान करून बी एस सी मध्ये -प्रवेश घेतला होता. एयर विंग मध्ये असताना फायरिंग, स्कीट शूटिंग, ग्लायडिंग असे अनुभव मिळाले. बऱ्यापैकी फिट झालो होतो. आणि महाराष्ट्राच्या वतीने अखिल भारतीय वायुसैनिक शिबिरात निवडही झाली होती. स्वावलंबन, साहस, शिस्त, कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणे असे अनेक संस्कार एनसीसी ने मला दिले. पण एअर फोर्स अकादमीच्या प्रवेशासाठी तयारी करत असताना मला लक्षात आलं की मी रंगांधळा आहे. आणि तिथंच वायुसेनेत जाण्याचे स्वप्न संपले. अर्थात जरी एनसीसी उत्तम केले असले तरीही वायुसेनेत अधिकारी म्हणून प्रवेश मिळणे खूप कठीण असते. माझ्या हातून ते साध्य झालेच असते असं नाही. पण रंगांधळेपण असण्याचा अर्थ असा होता की मी निवडीसाठी अपात्र होतो. मग प्रथमच विचार केला की मला काय करण्याची प्रेरणा आहे. समाज शास्त्र विषयाबद्दल फारशी माहिती नव्हती, कॉमर्स ची आकडेमोड आवडत नव्हती किंवा त्यात आकडेमोड आणि आर्थिक व्यवहार इतकेच असते असा समज होता. मग बी एम एम बद्दल समजलं आणि पत्रकारिता शिकायचं असं ठरवलं.

विज्ञान शाखेची पदवी पूर्ण करून पत्रिकारितेत पुढे शिकता आलं असतं परंतु माझा पाया पक्का असावा असं वाटलं म्हणून तीन वर्षे मुंबई विद्यापीठातील विवेकानंद महाविद्यालयातून पदवी घेतली. इथं शिकत असताना सकाळमध्ये आधी सब-एडिटर म्हणून आणि नंतर वार्ताहर म्हणून पार्ट टाइम काम केलं. कॉलेजसाठी मासिकाचे संपादन आणि मुद्रण केलं आणि जव्हारच्या आदिवासी मूर्तिकारावर एक छोटी फिल्मही बनवली. तेव्हा मला प्रथम जाणवलं की माझा कल व्हिज्युअल कम्युनिकेशन कडे आहे. मग पुण्याला सिम्बायोसिस मध्ये शिष्यवृत्ती मिळाली आणि पत्रकारितेचे व टेलिव्हिजन चे तिथे प्रशिक्षण घेतले.

A Fisherman’s Prayer या आमच्या माहितीपटासाठी केलेलं काम

तिथं माझा फोटोग्राफी आणि टेलिव्हिजन मधील रस खूपच वाढला. फोटोग्राफीचे प्राथमिक प्रशिक्षण मी विवेकानंद ला असताना शशी नायर यांच्याकडून घेतले आणि पुढे डॉ राजेंद्र महामुनी, धनंजय बोरखेडकर यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. सिनेमॅटोग्राफी ची ओळख करून देणाऱ्या बिपीन नारिया सरांच्या लेक्चर्सचा ही माझ्यावर प्रभाव पडला. पत्रकारितेच्या शिक्षणाबरोबर मी कॅमेरा आणि दृश्य कथाकथन करण्याकडे आकर्षित होऊ लागलो. २००५ च्या डिसेंबर महिन्यात जी सुनामी आली त्यावर मी आणि माझ्या वर्गमित्रांनी एक फिल्म बनवली. अमोल खामकर आमचे मार्गदर्शक होते. आणि वर्गातील मित्र मैत्रिणींचे फोटो काढणे चालूच असे!

सिम्बायोसिस मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु असताना इंडियन एक्सप्रेसमध्ये फोटोग्राफी इंटर्न म्हणून काम केले आणि काही असाइनमेंट प्रकाशितही झाल्या. नीरज प्रियदर्शी सारखा फोटो एडिटर लाभल्यामुळे इंटर्न असूनही लोकसत्ता, एक्सप्रेस दोन्हींत माझ्या फोटोंना चांगला डिस्प्ले मिळत असे. तिथंच स्पोर्ट्स फोटोग्राफीला सुद्धा सुरुवात केली.

पुढची इंटर्नशिप मी स्टार न्यूजमध्ये केली. टीव्ही माध्यमाचे प्राथमिक धडे इथेच मिळाले. शाळेत शिकलेलं हिंदी कौशल्य उपयोगी पडू लागलं. मी केलेल्या बातम्या ऑन एयर जाऊ लागल्या. मनोरंजन डेस्क वरील संपादक रुक्मिणी सेनने मला फिल्डवर जाण्याची संधीही दिली. तिथं असतानाच मी चेन्नई ला ए आर रहमानची exclusive मुलाखत घेतली.

हा अभ्यासक्रम पूर्ण झाला आणि मला एनडीटीव्ही मध्ये क्रीडा वार्ताहराची नोकरी मिळाली. तिथं मी जवळपास साडेतीन वर्षे काम केले. सुरुवातीचा काळ मी मुंबई ब्युरोत क्रिकेट वार्ताहर म्हणून काम करत होतो. बीसीसीआय चे कामकाज, टीम निवड, धोरणे आणि सामने कव्हर करणे असे माझ्या कामाचे स्वरूप होते. काही टेस्ट मालिका केल्या. टेनिस स्पर्धा केल्या, २००६ ची चॅम्पियन्स ट्रॉफी केली. आणि २००७ मध्ये मला पहिली आंतरराष्ट्रीय टूर करण्याची संधी मिळाली. महेंद्र सिंह धोनीने कप्तान म्हणून जिंकलेला पहिला ट्वेन्टी२० वर्ल्ड कप मी डरबन आणि जोहान्सबर्ग हून कव्हर केला.

आणि नंतर आयपीएल सुरु झाली. मला मात्र ऑलिंपिक्स खेळांचे आकर्षण वाटत होते. आणि बंगळुरू हून दक्षिणेतील तीन राज्यात ऍथलेटिक्स, स्विमिंग, टेनिस, बॅडमिंटन, बिलिअर्ड-स्नूकर असे खेळ कव्हर करायला सुरुवात केली. या काळात हिंदी आणि इंग्लिश दोन्ही भाषांतून वार्तांकन, कॅमेरा, एडिटिंग असं सगळंच शिकत होतो. प्रकाश पडूकोण, गीत सेठी, पंकज अडवाणी, अंजु बॉबी जॉर्ज अशा अनेक दिग्गजांना भेटण्याची, त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली.

मल्लखांब एक देशी आणि रांगडा खेळ. योगाचे एक खास रूप. त्यावर काहीतरी करावं अशी माझी खूप इच्छा होती. वेळ मिळेल त्याप्रमाणे मी शूट करत राहिलो आणि एक स्टोरी केली थोडासा सिनेमॅटिक अप्रोच वापरून. खेळांमधील सांस्कृतिक पैलूवर प्रकाश टाकणाऱ्या स्टोरीज करण्याचाही मी प्रयत्न करत असे आणि तेव्हाच मला समाजशास्त्र, मानववंशशास्त्र यांची गोडी लागली आणि मी या ज्ञानशाखांबद्दल वाचायला लागलो.

मल्लखांब आणि हिजाबातील बॅडमिंटनपटू

महेंद्र सिंह धोनीला जेव्हा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार मिळाला तेव्हा मी त्याची exclusive मुलाखत घेतली होती. गंमत म्हणजे ओम शांति ओम नुकताच रिलीज झाला होता आणि प्रकाश-दीपिका पदुकोण अशी बाप-लेकीची पहिली टीव्ही मुलाखतही घेण्याची संधी प्रकाश सरांच्या कृपेने मिळाली.

2008 Bangalore

संगीताबद्दल कानसेन असल्याने मला खास आपुलकी आहे. २००९ मध्ये ए आर रहमान जेव्हा दोन दोन ऑस्कर पुरस्कार जिंकला तेव्हा त्याचा स्टुडिओ, त्याचं संगीत विद्यालय, त्याच्याबरोबर काम करणारे गायक वादक यांचं मनोगत, अनुभव असलेला एक कार्यक्रम मी NDTV साठी केला. उन्नीकृष्णन, सुजाता मोहन, श्रीनिवास, सुरेश पीटर्स, कीथ पीटर्स, नवीन कुमार, शिवमणी अशा अनेक दिग्गज लोकांच्या मुलाखती त्या कार्यक्रमात आहेत. तो माझा एनडीटीव्ही साठी शेवटचा मोठा कार्यक्रम होता.

Rahman Dil Se – 2009

टीव्ही पत्रकारिता आणि ndtv मध्ये मी बऱ्यापैकी स्थिरावलो होतो. बंगळुरूत राहणं आवडायला लागलं होतं. मी केलेलं काम जवळजवळ रोजच ऑन एयर जात होतं. एकच खंत होती की टीव्ही माध्यमात कोणत्याही मुद्द्याच्या खोलवर जाता येत नाही. पण यावर काय मार्ग निघू शकतो हे मला समजत नव्हतं. सिम्बायोसिस मध्ये माझा जुनिअर असलेल्या माझा मित्र भावीन शेठ मार्केट रिसर्च मध्ये उत्तम काम करत होता. त्याने मला एथनोग्राफी हा पर्याय सुचवला. हा शब्द मी प्रथमच ऐकत होतो.. मी त्याला माझं प्रोफाइल तर पाठवलं पण काही निर्णय घेतला नव्हता. . २००९ च्या आर्थिक मंदीत अनेक घटना घडत गेल्या आणि मला ndtv सोडावं लागलं. तो एका स्वतंत्र ब्लॉगचा विषय होऊ शकेल. पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी. नंतर मी टीव्ही९ बंगळूर आणि मुंबईत काम केलं. तो अनुभव माझ्यासाठी फारच तापदायक होता. फक्त सनसनाटी काम करू इच्छिणारा संपादक बंगळूरला होता. मुंबईत त्यामानाने परिस्थिती चांगली होती. आम्ही तिथं ब्रेकफास्ट स्पोर्ट्स बुलेटिन सुरु केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळायला लागला. पण तिथं कामाचं वातावरण फारसं खेळकर आणि खुलं नव्हतं. तेव्हाच क्वांटम नावाच्या एका मार्केट रिसर्च कंपनीला माझं प्रोफाइल आवडलं आणि मी एका वेगळ्या क्षेत्रात काम करायचा निर्णय घेतला. एथनोग्राफी म्हणजे संस्कृतीचे निरीक्षण करून त्याबद्दल लिहिणे, संशोधन करणे आणि याचं उपयोजन करून विविध नवीन कल्पना/ सुधारणा/ प्रोडक्ट निर्माण करणे. एथनोग्राफर ते डिझायनर हा प्रवास कसा झाला ते उत्तरार्धात!

2 comments

  1. Niranjan Lele

    Ohh….aree baapre….khupch avghad….tari romanchak pravaas aahe…..mala.mahit aslelya Chinmay Bhave peksha ha khupch vegla pravas aahe….tula tuzya oudhchya vatchalisathi khup.khup shubhechcha

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: