
दूर डोंगरातून वाहत येणारे अवखळ बोलके झरे माणसाला खुणावतात. आणि मग आश्रयाला एखादी झोपडी उभी राहते. हळूहळू तिथं शहर उभं राहतं आणि झऱ्याचा प्रवाह अरुंद होत जातो. त्यात अडथळे निर्माण होतात आणि मग नागरीकरणाच्या पसाऱ्यात तो कधी लुप्त होतो किंवा सांडपाण्याचाच प्रवाह होतो हे लक्षातही येत नाही. गोष्ट ऐकल्यावर ओळखीची वाटते ना? पण इथं मात्र एक गंमत आहे. सोलमधील एका अशा हरवून गेलेल्या झऱ्याला पुन्हा एकदा संजीवनी दिली गेली आणि मग तिथं पाणी पुन्हा एकदा खळाळू लागले. आज हा झरा सोलमध्ये येणाऱ्या जवळवळ सगळ्याच पाहुण्यांच्या कौतुकाचा विषय झालाय. आणि नागरिकांच्या अभिमानाचाही.

हा साडे आठ किलोमीटर लांबीचा झरा पुढे हान नदीच्या उपनदीला जाऊन मिळत असे. कोरियन युद्धानंतर या भागात शरणार्थी येऊन राहिले. पुढं अध्यक्ष पार्क चुंग ही यांच्या काळात इथं काँक्रीटने झरा बुजवून एक उन्नत महामार्गही बांधला गेला. ली म्यूनग बाक सोलचे महापौर असताना महामार्ग काढून झरा पूर्ववत करण्याचा प्रकल्प सुरु झाला आणि २००३ ते २००५ या काळात हे काम पूर्ण केले गेले. एकेकाळी औद्योगिकरणाच्या लाटेत व्यापलेल्या शहरात निसर्गाच्या पाऊलखुणा पुन्हा दिसायला लागल्या. मासे, पक्षी, कीटक आले. झाडे वाढली आणि सोलच्या मध्यवर्ती भागात एक सांस्कृतिक केंद्र उभे राहिले.
शहरातील नागरिकांच्या सहभागानेच हा प्रकल्प साकार झालेला असल्याने विविध सांस्कृतिक प्रदर्शनाच्या बरोबरच धावपळीच्या रुटीनमध्ये काही निवांत क्षण शोधण्यासाठी इथं सोलचे रहिवासी नेहमीच येतात. आपल्या जोडीदाराबरोबर गप्पा मारण्यासाठी युगुलं येतात. आठवड्याच्या कोणत्याही दिवशी जा इथं उत्साह असतो आणि शांतताही असते.

आता इथं पाण्याच्या प्रवाहात अडथळा नाही. दोन्ही बाजूला हिरवळ आणि सावली आहे. पाण्यातून चालत जाण्यासाठी दगडी पायवाटा आहेत. जुने पूल पारंपरिक पद्धतीने पुन्हा बांधले गेले आहेत. लहान मुलांना इथं धमाल करायला भरपूर वाव असतो.



हा झरा जिथं सुरु होतो तिथं मोठी कारंजी आहेत. आणि दोन्ही बाजूला सोलमधील गगनचुंबी इमारती दिसतात. आणि मग काही अंतर पुढे गेल्यावर सोल स्क्वेयर चा गेयाँगबॉकगुंग राजवाड्यासमोरील भाग येतो! तिथं शनिवारी किंवा रविवारी भटकंती करणे ही सुद्धा एक पर्वणीच असते. त्याबद्दल पुढील भागात.

अजिबात न दमता केलेली ही भ्रमंती संध्याकाळ पर्यंत सुरूच होती. आणि संधीप्रकाशात या झऱ्याने एक वेगळं रूप धारण केलं .. आजूबाजूच्या परिसरातील लोक संध्याकाळी इथं चालायला येतात आणि गप्पांचे फडही रंगतात.

सोल शहर माझ्यासाठी आधुनिकता, तंत्रज्ञान, अद्ययावत वाहतूक व्यवस्था यांचे प्रतीक होते. आणि अशा शहराने पर्यावरणाला पूरक अशी भूमिका घेऊन हा प्रकल्प साकार करणे ही माझ्यातील डिझायनर ला अंतर्मुख करणारी गोष्ट वाटली. सोलच्या दक्षिण भागात कचऱ्याच्या डेपोच्या जागी वनीकरण होऊन बाग निर्माण केली गेली आहे हे समजलं तेव्हा उत्सुकता अजूनच वाढली. या देशाच्या संस्कृतीचे, अभिकल्पनेचे नवनवीन पैलू उलगडू लागले होते.