
मला नामसान डॉर्मिटरीत ३३१४ क्रमांकाची खोली मिळाली होती. पण ती होती मात्र दुसऱ्या मजल्यावर. लिफ्टमध्ये गेलो तेव्हा लक्षात आलं की कोरियात तळमजल्याला पहिला क्रमांक देतात त्यामुळे आपण ज्याला दुसरा मजला म्हणतो तो तिथं तिसरा मजला असतो! छोटीशीच खोली होती. एक मोठी पुर्वेकडे उघडणारी खिडकी होती त्यामुळे सकाळी सोनेरी प्रकाश खोलीत येत असे. दोन बेड होते आणि दोन अभ्यासाची टेबले आणि त्याला जोडलेली कपाटे. शिवाय दोन कपड्यांची कपाटेही होती. माझ्या रूम मध्ये कोण रूममेट असणार आहे याची कल्पना नव्हती. काही परदेशी विद्यार्थी अजून पोहोचले नव्हते त्यापैकी कोणीतरी असेल असा अंदाज होता. विद्यापीठातील सगळं कारकुनी काम पूर्ण करून मी सामान आणायला बाहेर पडलो. लोट्टो मार्ट नावाच्या ठिकाणी स्वस्त आणि विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू मिळतात असं मागील सत्रात आलेल्या भारतीय मुलांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे सोल स्टेशन बाहेर असलेल्या या मार्टमध्ये जायला निघालो.

मी जाणार होतो ते ठिकाण माझ्या चुंगमुरो स्टेशन पासून फक्त दोन किंवा तीन मेट्रो स्टेशन्स अंतरावर होते आणि मेट्रोजवळच मॉल होता त्यामुळे तसंच जायचं ठरवलं. मेट्रो प्लॅटफॉर्मवर भलामोठा आरसा पाहून सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. अर्थात त्याकाळी सेल्फी हा शब्द तितका रूढ झाला नव्हता. अनेक मोठ्या चित्रकार-फोटोग्राफर लोकांनी सेल्फ पोर्ट्रेट या नावाखाली स्व-प्रतिमा उदात्तीकरण प्रयोग केलेला आहेच त्यामुळे आपण पामरानेही तो करावा म्हणून एक सेल्फ पोर्ट्रेट काढलं.

सोल मेट्रो नेटवर्कबद्दल मी खूप ऐकलं होतं. आमच्या वर्गातील अमेरिकन, युरोपियन विद्यार्थ्यांच्या मते सोलची मेट्रो सेवा त्यांच्याकडील सेवेपेक्षाही उत्तम आणि आरामदायक होती. मला डोंगुकमधील शिनहान बँकेने दिलेलं कार्ड मेट्रो कार्ड, लायब्ररी कार्ड, हॉस्टेल प्रवेश कार्ड, एटीएम-डेबिट कार्ड आणि आयडी कार्ड अशी सर्व कार्डांची कामे करणारं होतं. ते वापरून मेट्रोत आलो आणि काही वेळातच सोल स्टेशनला पोहोचलो. सोल मेट्रोमध्ये आज २२ लाईन आहेत, ७१६ स्टेशन आहेत आणि ११०० किमी हून लांब हे नेटवर्क आहे. मी पुढचे चार महिने या नेटवर्क वर भरपूर प्रवास केला आणि पूर्ण शहराची फोटोग्राफी केली.

मला अनेक गोष्टींबद्दल माहिती हवी होती. दीर्घ वास्तव्याचं कार्ड नोंदणी करायचं होतं. सोल बाहेर विविध ठिकाणी कसं जाता येईल याबद्दल विचारणा करायची होती. ही सर्व माहिती मला या अद्ययावत पर्यटन माहिती केंद्रात मिळाली. तिथं मला अनेक माहितीपत्रके मिळाली, विविध अधिकारी आणि संस्थांचे संपर्क मिळाले आणि फोटोग्राफी करण्यासाठी कुठं परवानगी लागेल इत्यादी माहितीसुद्धा मिळाली. तिथल्या सगळ्या विश्व वारसा स्थळांची माहिती, कोरियाबद्दलची पुस्तके वगैरे सगळंच एका ठिकाणी मिळालं. ही माहिती नीट देता यावी यासाठी त्यांच्याकडे मोठे टीव्ही स्क्रीन वगैरे होते आणि आवश्यक ते फोटो-व्हिडीओ वगैरे सुद्धा होते. न कंटाळता जितक्या तपशीलवार शक्य होईल तितकी माहिती मला त्यांनी दिली. पुढे एकदोन कार्यक्रमांना त्यांनी निमंत्रणही दिले. ज्यांना इंग्लिश बोलताना अडचण येत होती ते आयफोन चे app वापरून बोलत होते! इतकं सौजन्य अनुभवण्याची सवय मला नसल्याने आश्चर्य वाटलं हे खरं!

दक्षिण कोरिया म्हणजे ह्युंदाई आणि किया सारख्या ऑटो कंपन्यांचा देश त्यामुळे इथं लोक कशा गाड्या वापरत असतील याबद्दल मला तर उत्सुकता होतीच पण माझ्याबरोबर आयआयटीत डिझाईन स्कूल मध्ये मोबिलिटी डिझाईन शिकणाऱ्या मित्रांनाही याबद्दल अधिक जाणून घ्यायचं होतं! पण सॅमसंग या कंपनीची गाडी सुद्धा असते (रेनॉ कंपनीच्या सहकार्याने) हे पाहिलं तेव्हा गंमत वाटली. खरंतर यात वेगळं असं काहीच नव्हतं. पण काही ब्रॅण्ड्स ची आपल्या डोक्यात एक विशिष्ट जागा असते तिला धक्का लागला की थोडं अवाक व्हायला होतं तसं झालं.

सामान फारसं वजनदार नव्हतं त्यामुळे चालतच परत येत होतो आणि सोल शहराची ओळख करून घेत होतो. वाटेत मला फुटपाथवर एक फेरीवाला दिसला जो ससे घेऊन बसला होता. हा प्रकार माझ्या कल्पनेपलीकडचा होता. मी फोटो काढू लागलो तर तो वैतागला आणि मला कोरियन भाषेत हाकलू लागला (बहुतेक रस्त्यावर असं ससे किंवा पाळीव प्राणी विकणं बेकायदेशीर आहे) मी पटकन तिथून सटकलो आणि पुढं निघालो.

परत मेयॉन्गडाँग मार्गे चुंगमुरोला आलो! फूटपाथवर कोरलेले संदेश मला फारसे कळले नाहीत पण संध्याकाळच्या तांबड्या प्रकाशात त्या लोखंडी पट्ट्या चमकत होत्या! दक्षिण कोरियाची राजधानी सोल माझ्यासमोर हळूहळू अशी उलगडत होती.