
लाल किल्ल्यापासून अर्धा किलोमीटर अंतराच्या आतच सतराव्या शतकात बांधली गेलेली सुप्रसिद्ध जामा मशीद (शुक्रवारी मशीद) म्हणजे शाहजहानाबादमधील एक महत्त्वाची वारसा वास्तू. दहा लाख रुपयात बांधल्या गेलेल्या या मशिदीची काही सुंदर चित्रे पुरातत्व विभागाकडे आहेत.

कांद्याच्या आकाराचे तीन घुमट आणि निमुळते होत जाणारे जवळजवळ ४० मीटर उंच असलेले दोन मिनार हे जामा मशिदीचे वैशिष्ट्य. लाहोर येथे मुघल काळात बांधल्या गेलेल्या बादशाही मशिदीशी अनेक ठिकाणी आपल्याला साधर्म्य दिसते.


जामा मशिदीचा नमाज पढण्याचा भाग जवळपास १०० स्क्वेयर मीटर क्षेत्रफळाचा असून उंच कमानीच्या दरवाज्यातून आत प्रवेश करता येतो. मी प्रवेश केला बादशहासाठी राखीव पूर्व दरवाज्यातून. एकंदर ११ कमानी मशिदीच्या समोरच्या भागावर आहेत आणि मधील कमानीवर विशेष कोरीवकाम आहे.





या मशिदीचे उद्घाटन उझबेकिस्तान मधील इमाम बुखाराने केले. प्रांगणाच्या चारीबाजूला स्तंभांच्या आधारावर उभे असलेला भाग आहे आणि मधील जागेत जवळपास २५ हजार लोक एकावेळी नमाज पढू शकतात. चारही टोकांना घुमट असलेले छज्जे आहेत. २०० रुपयांचे तिकीट काढून आणि सुमारे ३२० पायऱ्या चढून मशिदीच्या छतापर्यंत जाता येते आणि तिथून घुमट, मिनार आणि जुन्या दिल्लीचा देखावा फारच अद्भुत दिसतो.



या मशिदीचे जुने नाव मस्जिद-ए-जहांनुमा होते. म्हणजे जगाचे सुंदर दृश्य दाखवणारी मशीद. इथं उभं राहून दिल्लीचे सुंदर दृश्य नव्हे तर अनेक दृश्ये पाहता येतील याची खात्री मी जरूर देईन. इंटरनेटवर अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की ही भारतातील सर्वात मोठी मशीद आहे.. परंतु खरं म्हणजे भोपाळची मशीद भारतातील सगळ्यात मोठी मशीद आहे.

भोपाळच्या ताज-उल-मस्जिदची गोष्ट पुन्हा कधीतरी. हा ब्लॉग वाचत राहा आणि नक्की शेयर करा.