पृथ्वीमध्ये बहु लोक,
परिभ्रमणे कळे कौतुक
प्रवासासारखे दुसरे शिक्षण नाही असं समर्थ रामदास सांगून गेलेत. माझा लाडका वास्तुविशारद जपानचा अंडो तडाओ प्रवासाला सगळ्यात चांगली शाळा मानतो. पण बरेचदा प्रवासी म्हणून एखादा देश पाहताना खूप घाईने आणि वरवर पाहिला जातो. त्या देशाच्या संस्कृतीशी, इतिहासाशी एकरूप होण्याची संधी पर्यटक म्हणून क्वचितच मिळते. लोकजीवनाला अनुभवण्याची मजा पर्यटक म्हणून खूप खोलवर घेता येत नाही कारण तुम्ही शेवटी बाहेरचे असता. पण आयआयटी मुंबईत शिकत असताना माझ्या मास्टर ऑफ डिझाईन च्या कोर्समधील एक सत्र मला दक्षिण कोरियात अनुभवायला मिळालं. ग्लोबल कोरिया शिष्यवृत्तीच्या माध्यमातून चार महिने तिथं वास्तव्य करता आलं. आणि हा एक आगळा अनुभव होता. यापूर्वी कामासाठी मी दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, मलेशिया, केनिया, नायजेरिया अशा अनेक ठिकाणी गेलो आहे. नंतर जर्मनी, हॉलंड, बेल्जीयम मध्ये माझ्या फिल्मच्या शूट साठी भटकलो आहे. पण चार महिने एखादा छोटा देश अनुभवणे ही माझ्यातील संस्कृती अभ्यासकाला एक मोठी पर्वणीच होती. या वास्तव्यात मी डोंगूक विद्यापीठात फिल्म मेकिंग, डॉक्युमेंट्री निर्मिती, डिजिटल सिनेमॅटोग्राफी असे विषय शिकलो. आणि प्रकल्प म्हणून दक्षिण कोरियाचे दृश्य-प्रवासवर्णन केले. पण २०१३ पासून हे सगळं काम माझ्या प्रोजेक्ट फाईलमध्ये आहे. ते तुम्हा सगळ्यांसमोर यावं. तुम्हालाही दक्षिण कोरिया अनुभवायला मिळावा या हेतूने ही लेखमालिका सुरु करतो आहे.

आज पंधरा ऑगस्ट … भारताचा स्वातंत्र्यदिन .. तसाच तो दक्षिण कोरियाचाही स्वातंत्र्यदिन आहे बरं का! याच दिवशी जपानने दुसऱ्या महायुद्धात आपला पराभव स्वीकारला आणि जपानची वसाहत असलेला कोरिया पारतंत्र्य पाशातून मोकळा झाला. शीत युद्धाची सुरुवात होत असताना या देशाची फाळणी झाली आणि ती पुढे कायम राहिली. व्हिएतनाम किंवा जर्मनीचे भाग्य कोरियाच्या वाट्याला आले नाही. आजही दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया हे देश वेगळे आहेत आणि हे वेगळेपण इतकं आहे की ते एकमेकांना देश म्हणून मान्यताही देत नाहीत. पण ती गोष्ट पुढे सविस्तर पाहूच. भारत आणि कोरियाला एकच स्वातंत्र्यदिन लाभला आहे आणि हे दोन्ही देश बुद्धाला मानणारे देश आहेत. दक्षिण कोरियाने तंत्रज्ञान आणि उद्योग वापरून आपल्या जनतेचे प्रारब्ध बदलले तर भारत ते करू पाहतोय. पण मी डिझाईन शिक्षण घेताना दक्षिण कोरियाची निवड केली कारण पूर्वेचा हा देश आपली संस्कृती जपत असतानाच डिझाईन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक आंतरराष्ट्रीय हिरो म्हणून समोर आला आहे. पश्चिमेपेक्षा इथं डिझाईन शिकण्याचा अनुभव घेणे, इथली संस्कृती समजून घेणे मला जास्त रंजक वाटले. आयआयटी मुंबई आणि डोंगुक विद्यापीठ हे पार्टनर आहेत आणि सोल मधील चुंगमुरो उपनगरातील हे बौद्ध विद्यापीठ फिल्म, चित्रकला, डिझाईन या साठी नावाजलेले आहे. कोरियन फिल्म इंडस्ट्री चुंगमुरोत असल्याने हे विषय या विद्यापीठात अधिक विकसित झाले असावेत. मी तिथं चार महिने काय पाहिले, काय अनुभवले हे तुम्हाला या लेखमालिकेतून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या मालिकेत फोटो आणि व्हिडीओ च्या माध्यमातून तुम्हालाही दक्षिण कोरिया अनुभवता यावा असा माझा प्रयत्न आहे.

मुंबई-बँकॉक-सोल असा विमानप्रवास करत मी इंचेऑन विमानतळावर येऊन पोहोचलो तो दिवस होता ३० ऑगस्ट २०१३ चा. सकाळ होती आणि विमानातून बाहेर पडलो तेव्हा जाणवलं की इथंही मुंबईसारखाच पाऊस आहे. विद्यापीठाला जायला टॅक्सी घेणे खूपच महाग पडले असते.. जवळजवळ साडेपाच हजार रुपये! पण विद्यापीठाने कोणती बस घेऊन जवळ पोहोचता येईल ते सांगितले होते. तो नंबर शोधला आणि डोंगूक कडे निघालो.

पावसाची सर ओसरली आणि आता फक्त थेंब थेंब रिपरिप होत होती. माझ्या विद्यापीठाजवळच्या बस स्टॉप वर उतरलो आणि टॅक्सी पकडून टेकडीवर असलेलं डोंगूक गाठलं. हॉस्टेल रूम मिळाली. आणि विद्यापीठाचे आवर पाहायला बाहेर पडलो!
डोंगूक हे बौद्ध लोकांनी स्थापलेले आणि चालवलेले विद्यापीठ आहे. दक्षिण कोरियाच्या स्वातंत्र्य लढ्यातही या विद्यापीठातील लोकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. चुंगमुरो उपनगराला लागून एक टेकडी आहे त्या टेकडीवर आणि टेकडीच्या दोन्ही बाजूला डोंगूक पसरलेले आहे. काहीसे उंचावर असल्याने सोल शहराचा देखावा आणि बुखानसान-नामसान असे पर्वत गच्चीतून पाहता येतात. मी या बौद्ध मंदिरात पोहोचलो तेव्हा अनावधानाने समोरच्या दाराने मंदिरात प्रवेश केला. तिथे असलेल्या भगव्या वेशातील भिक्खूने मला हे दार फक्त बिक्खूंसाठी राखीव आहे आणि डाव्या बाजूच्या दाराने सामान्य लोकांनी प्रवेश करायचा असं सांगितलं. तू कुठून आलास असं त्याने मला विचारले. मी भारतीय आहे हे कळताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. तू तर बुद्धाच्या देशातून आलास म्हणजे समोरच्या दाराने तुझं स्वागत करायला काही हरकत नाही असं तो मला हसून म्हणाला. बुद्धाच्या देशातील असण्याची पुण्याई मला पुढचे चार महिने पुन्हा पुन्हा अनुभवता येणार होती याची मला तेव्हा पुसटशी कल्पनाही आली नव्हती. कोरिया आणि भारतातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक पूल म्हणजे बुद्ध आणि बौद्ध धर्म.. तो पूल ओलांडून मी या पूर्वेच्या देशात आलो होतो.

आता भटकंती करता करता मला भूक लागली होती आणि तिथं नक्की काय खायचे हे मी ठरवलं नव्हतं. मी शाकाहारी आहे असं नाही. पण मांसाहार करण्याची मला सवय नाही आणि तितक्या आवडीने मी चिकन मासे मटण वगैरे खात नाही. एक अनुभव म्हणून सगळीकडे सगळं खाऊन पाहण्याची मला सवय आहे त्यामुळे तशी काळजी नव्हती. शिवाय रात्री खायला आणलेली मेथीच्या थेपल्यांची थप्पी फ्रिजमध्ये होतीच. पण तिथल्या चलनाचा मला पुरेसा अंदाज आलेला नव्हता आणि मेन्यू वरील कोणतीही गोष्ट एकदा भारतीय रुपयांमध्ये मोजली की फार महाग वाटत होती. शेवटी एका दुकानातून दोन केळी घेतली आणि चुंगमुरो परिसराचा फेरफटका मारायला बाहेर पडलो.

हल्लीच अभिनेता राहुल बोसला हॉटेलने ४०० रुपयात केळी विकली त्या हिशेबात मला तिथं ती स्वस्त पडली म्हणायचं. दक्षिण कोरिया म्हंटले की के-पॉप, कोरियन ड्रामा, सॅमसंग-ह्युंदाई सारख्या कंपनी, उत्तर कोरिया, तायक्वांडो, सोल ऑलिंपिक्स, भारतातून अयोध्येहून तिथं गेलेली त्यांची राणी अशा अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात. मी गेलो तेव्हा नुकतेच ओप्पा गंगनम स्टाईल खूप प्रसिद्ध झाले होते. कोरियन युद्ध १९५३ च्या सुमारास संपले. सोल शहर या लढाईत चार वेळा बेचिराख झाले आणि पुन्हा उभे राहिले. या विलक्षण शहराचा अनुभव मी घ्यायला उत्सुक होतो.

शहरात भटकून आलो तेव्हा संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. मी कँटीन मध्ये चौकशी केली तेव्हा ते सात वाजता बंद होते असं सांगितलं गेलं. तिथं सोबन मील नावाचा प्रकार असतो. म्हणजे पूर्ण थाळी मिळते ती घ्यायची आणि एकट्याच्या छोट्याश्या टेबलवर बसून खायची. माझा तिथला सहकारी अजून भेटला नव्हता त्यामुळे मी सीफूड मील घेतले आणि खिमची च्या आंबट-तिखट स्वादाचा अनुभवही घेतला. हे जेवण तुलनेने स्वस्त म्हणजे ४००० वॉन होते! सुरुवातीला मला खिमची सोडून फारसे काही आवडले नाही पण पोटभर खाल्ले! गरम सूप घेऊन विद्यापीठाच्या गच्चीत जायला निघालो.

बाहेर पडलो तेव्हा आमच्या हॉस्टेलच्या आवारातून आकाश डोकावताना दिसत होतं. टेकडी चढून डोंगूक विद्यापीठाच्या माथ्यावर आलो तेव्हा पाऊस, वारा सगळेच शांत होते. त्या शांततेत विद्यापीठातील बुद्ध मूर्ती अजूनच धीरगंभीर पण दिलासा देणारी भासत होती.


दिवस संपायला आला होता. वसतिगृहाच्या गच्चीतून सोल शहराचे दिवे खूपच सुंदर दिसत होते. कोणताही आवाज नाही. गोंगाट नाही. बोलण्याची कुजबुज नाही. अगदी नीरव शांतता पसरली होती. त्या शांततेचा अनुभव कॅमेरात टिपणे शक्य नाही. पण तो अनुभव अविस्मरणीय होता एवढं मात्र नक्की
नामसान डोंगरावरील मनोऱ्याचे दिवे लागले होते. दूरवरची हॉटेल्स, मोठ्या इमारती रात्री अगदीच निवांत दिसत होत्या. त्या निर्मनुष्यतेत भीती नव्हती. शांतता होती. दुसऱ्या दिवशी विद्यापीठात आलेल्या सगळ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा ओळख समारंभ होता आणि मग शहर पाहायला आम्ही बाहेर पडणार होतो. दक्षिण कोरियाच्या भटकंतीचा श्रीगणेशा झाला तो असा!