
दिल्ली म्हणजे भारतीय राजकारणाचे सिंहासन. राजे बदलले, तारखा बदलल्या, कालगणना बदलल्या, राजघराणी बदलली पण दिल्लीचे स्थान अटल आहे. सुरजकुण्ड आणि लालकोट ते ल्युटेयन्स दिल्ली हा मोठा कालखंड. एक हजार वर्षांपेक्षाही मोठा. पण आजही भारतीय प्रजासत्ताकाची राजधानी दिल्लीच आहे. काही काळ हा मान कलकत्ता, आग्रा वगैरेंना मिळाला पण तो त्या शहरांना टिकवता आला नाही. दिल्लीच्या इतिहासाचा वेध घेता घेता आता आपण शाहजहानाबाद म्हणजे दिल्लीच्या सातव्या शहरापर्यंत आलो आहोत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपले पंतप्रधान तिथूनच भाषण करतात. मुघल बादशाह शाहजहानने वसवलेले हे शहर आणि त्याचा मुकुटमणी म्हणजे लाल किला

दिल्लीतील प्रत्येक शहर आपल्याला वेगवेगळ्या कालखंडाची ओळख करून देते. नगररचना, स्थापत्यशास्त्र, त्या काळातील कारीगरी नि सौंदर्यदृष्टी. इतिहासातील घडामोडी आणि त्यांचा अभिकल्पना आणि स्थापत्यावर झालेला परिणाम अशी बरीच ज्ञान-दालने अशा वास्तू आपल्याला खुले करून देतात. इतिहास म्हणजे फक्त लढाया आणि राजे-राजवाडे यांची चरित्रे नव्हे. लोकजीवन, कला, तत्कालीन राहणीमान अशा अनेक गोष्टी इतिहासाच्या अभ्यासात महत्त्वाच्या असतात. विविध काळातील या वास्तू तर त्या काळाशी आपल्याला जोडणारे दुवेच. थेट त्या काळापासूनचे मूक साक्षीदारच. शाहजहान प्रसिद्ध आहे ताजमहाल बांधला म्हणून परंतु शाहजहानाबाद हे शहरसुद्धा डिझाईनच्या दृष्टीने खास आहेच. लाल किल्ला हा तर विश्व वारसा स्थळ आहे.


किल्ला मुघल काळात लाल वालुकाश्म वापरून बांधला गेला. आज मुघल सैनिकांची जागा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या सैनिकांनी घेतली आहे. दिल्ली दरवाजा आणि लाहोरी दरवाजा रचनेच्या दृष्टीने जवळजवळ सारखे आहेत. किल्ल्याभोवती विस्तृत खंदक असल्याने थेट हल्ला चढवणे कठीण होते. किल्ल्याचा परिसर मोठा असून आत मोठी बाजारपेठ सुद्धा आहे.

या बाजाराचे नाव छट्टा चौक. तुम्हाला निवांतपणे किल्ला पाहायचा असेल आणि बरोबर शॉपिंगप्रेमी जनता असेल जी तुम्हाला घाई करत असेल तर त्यांना या बाजारात सोडून पुढे जावे. कारण किल्ला नीट पाहायला दोन तास तरी लागतात. जर बरोबरचे लोक खरेदी वेडे असतील तर त्यांना चांदणी चौकात किंवा चावडी बाजारात सोडणे उत्तम.





प्रथम दिसणारे बांधकाम म्हणजे नगारखाना किंवा नौबत खाना. एकंदर मुघल शैलीवर उझबेक शैलीचा प्रभाव जाणवतो. कारण ही शैलीही तिमुरीद होती. समरकंद ला उलुघ बेगचा मदरसा आहे त्याचे फोटो पाहिलेत तर तुम्हाला अनेक साम्यस्थळे जाणवतील. अर्थात दोन्ही शैलींमधील सौंदर्य-विचाराची उत्क्रांती स्थानिक संस्कृतीच्या परिणामांमुळे बरीच वेगळी झालेली दिसते.

आता त्या इमारतीत हत्यारे आणि लढायांचा इतिहास सांगणारे उत्तम संग्रहालय आहे. सफाविद घराण्यातील हत्यारेही इथं पाहता येतात. आत गेल्यानंतर दिवाण-इ-आम आणि दिवाण-इ-खास अशा इमारती आहेत. दिवाण-इ-आम च्या खांबांमधील भौमितीय संतुलन अन दिवाण-इ-खास मधील कोरीवकाम फारच सुंदर आहे. मुमताज महल पाहताना तिथल्या जाळीकामातील नजाकत पाहून आश्चर्य वाटतं. काही वेळ तिथं बसून प्रकाशाचे दिशा बदलणारे कवडसे पाहायला मजा येते.




अनेक ठिकाणी कोरीवकाम, धातुकाम आणि इतर शिल्पनमूने आजही चांगल्या स्थितीत आहेत. मुमताज महालच्या इमारतीत सुंदर चित्रे असलेलं एक संग्रहालयही आहे. इस्लामिक कॅलिग्राफी किंवा अक्षरकलेचेही उत्तम नमुने इथं पाहता येतात. अनेक ठिकाणी कोरीवकाम, धातुकाम आणि इतर शिल्पनमूने आजही चांगल्या स्थितीत आहेत. मुमताज महालच्या इमारतीत सुंदर चित्रे असलेलं एक संग्रहालयही आहे.




या सगळ्या दिमाखात औरंगजेबाने बांधलेल्या मोती मशिदीचा साधेपणा जाणवतो. धर्मांध क्रूरकर्मा ही औरंगजेबाच्या स्वभावाची एक बाजू तर साधेपणा आणि शिस्त ही दुसरी बाजू. औरंगाबादजवळ जिथं त्याला दफन केलं गेलं ती जागाही त्याच्या मृत्यूपत्रात सांगितल्याप्रमाणे साधीच आहे.

हा किल्ला वास्तुरचनाकार उस्ताद अहमद लाहोरीने १६३९ ला बांधून पूर्ण केला त्याची शंभरी आली तेव्हा १७३९मध्ये नादिरशाहच्या स्वारीत दिल्लीची धूळधाण उडाली होती. नंतर ब्रिटिशांच्या काळातही या किल्ल्याला संघर्षाला सामोरे जावे लागले. सावन आणि भादो या दोन बांधकामाच्या समोर उभे राहिले की अनेक ब्रिटिशकालीन इमारती मागे दिसतात आणि ब्रिटिश राजसत्तेच्या आठवणी जागृत होतात. अठराव्या शतकाच्या शेवटी लखनवी शैलीत केलेल्या या चित्रातून आपल्याला किल्ल्याच्या तलविन्यासाची थोडी कल्पना येते. हा किल्ला वास्तुरचनाकार उस्ताद अहमद लाहोरीने १६३९ ला बांधून पूर्ण केला त्याची शंभरी आली तेव्हा १७३९मध्ये नादिरशाहच्या स्वारीत दिल्लीची धूळधाण उडाली होती. नंतर ब्रिटिशांच्या काळातही या किल्ल्याला संघर्षाला सामोरे जावे लागले. सावन आणि भादो या दोन बांधकामाच्या समोर उभे राहिले की अनेक ब्रिटिशकालीन इमारती मागे दिसतात आणि ब्रिटिश राजसत्तेच्या आठवणी जागृत होतात.




इथं किल्ल्यात पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे दुकान आहे. तिथं चांगली पुस्तके आणि भेटवस्तू घेता येतात. इथं एक बावली (विहीर) सुद्धा आहे. परंतु मी गेलो तेव्हा ती बंद होती. शेरशहा सुरीने बांधलेला पूल ओलांडून पलीकडे सलीमगड पाहायला गेलंच पाहिजे.


सलीमगढ किल्ल्यात आहेत नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेची स्मरणचिन्हे. पुढल्या वेळी आपण शाहजहानाबाद मधील जामा मशिदीच्या भटकंतीला जाऊ.