
दिल्ली शहराचा इतिहास शोधताना आपण अगदी पांडवकालीन इंद्रप्रस्थापर्यंत जाऊन पोहोचतो. गेल्या दीड हजार वर्षांची साक्ष देणाऱ्या विविध वास्तू आजही दिल्लीत पाहता येतात. आणि त्या पाहताना जणू टाइम मशीन मध्ये बसल्यासारखा अनुभव आपल्याला मिळतो. लालकोट-किला राय पिथौरा च्या परिसरातच पुढे मेहरौली ची बांधकामे झाले. कुत्ब मिनार उभा राहिला. १४व्या शतकाच्या सुरुवातीला दिल्लीवर मंगोल आक्रमणे सुरु झाली आणि त्यांच्यापासून शहराचे रक्षण करण्यासाठी सिरी दुर्गाची बांधणी सुरु झाली. सिरी हे दार-उल-खिलाफत या नावानेही प्रसिद्ध झाले. अनेक राजवाडे आणि मोठी बांधकामे उभी केली गेली. आज त्याच्या खुणाही अभावानेच दिसतात. शेरशहा सुरीने शेरगढ बांधताना सिरी दुर्गाचे दगड वापरले असं दाखवणाऱ्या नोंदी इतिहासकारांना मिळालेल्या आहेत. आज हौज खास आणि ग्रीन पार्क परिसरात या दुर्गाचे बुरुज आणि दगडी बांधकाम दिसते. काही इतिहासकार मानतात की हे शहर बांधत असताना हजारो मंगोल आक्रमकांची मुंडकी इथं पुरली गेली म्हणून सिरी हे नाव पडले. तर सय्यद अहमद खान मानतात की तिथं पूर्वी सिरी नावाचे छोटे गाव होते.
सिरी किल्ल्याची भटकंती सुरु होते शाहपूर जाट नावाच्या दक्षिण दिल्लीतील एका गावात. हो दिल्लीत अरुंद गल्लीबोळ असलेली गावं आहेत बरं का! तिथं काही बुरुज डीडीए उद्यानात दिसतात. दगडी बांधकाम आणि जवळपास अठरा फूट रुंद तटबंदी आपल्याला पाहता येते. गावात गेल्यावर तोहफेवाला गुम्बद नावाची खल्जी-तुघलकी शैलीत बांधलेली साधी पण आकाराने भव्य मशीद दिसते.

गुलमोहर पार्क भागात दरवेश शाह ची मशीद आहे. हे बांधकाम लोदीकालीन असलं तरीही किल्ल्याजवळील स्थान पाहता एकेकाळी ही मशीद महत्त्वाची होती असा कयास बांधता येतो.

या किल्ल्याच्या भिंतींचे विस्तृत बांधकाम पंचशील पार्क जवळ पाहता येते. हे एका कुंपण घातलेल्या बागेत बंदिस्त असून स्टेप बाय स्टेप नर्सरीच्या बाजूने तिथं प्रवेश करता येतो. उंच दगडी बांधकाम आणि सैनिक हत्यारे नेऊ शकतील व किल्ल्याचा बचाव करू शकतील इतकं रुंदही. बुरुजांना तीर मारण्यासाठी व शत्रूवर हल्ला करता यावा म्हणून जंग्याही होत्या. वेगवेगळ्या आकाराच्या दगडांना एकमेकांवर रचून आणि मध्ये जोडणी करणारं दगडमातीचं मिश्रण करून या भिंती बांधल्या गेल्या. मंगोल आक्रमकांना खिलजीने अनेकदा पराभूत केलं. पुढे तुघलक काळात दिल्लीत आलेल्या तैमूरने या तटबंदीचे आणि दुर्गातील इमारतींचे कौतुक केलेले दिसते.
सिरीच्या तटबंदीचा अजून एक सलग भाग पंचशील पार्कच्या दुसऱ्या टोकाला पुरातत्व सर्वेक्षणाच्या लहान मुलांच्या संग्रहालयाजवळ दिसतो. इथल्या भिंती पडलेल्या असल्या आणि उंच नसल्या तरीही तटबंदीचा तलविन्यास आणि दगडी बांधकामाची पद्धत समजून घ्यायला इथं निरीक्षण करणे उपयुक्त ठरते.
इथंच मुहम्मद वाली मस्जिद नावाची एक लोधी कालीन सुबक मशीद आहे. कोर्बेल पद्धतीच्या कमानीच्या दरवाजातून आत गेल्यावर घुमत असलेली आणि भिंतींवर कुराणातील आयत कोरलेली ही मशीद पाहायला मिळते. बागेत असल्याने इथं मोरांचा आवाज ऐकू येत असतो.
हौज खासच्या उच्चभ्रू वस्तीत अजून दोन महत्त्वाच्या वास्तू आहेत. मल्लू खान म्हणजेच इकबाल खानने नासिरुद्दीन तुघलकाच्या काळात बांधलेला ईदगाह आणि अलाउद्दीन खिलजीने उभा केलेला चोर मिनार.

दिल्लीतील कुत्ब मिनार सगळ्यांना माहिती असतो पण हा खिलजी कालीन मिनार फारसा ठाऊक नसतो. चौदाव्या शतकाच्या सुरुवातील हा मिनार बांधला गेला असावा. नीट पाहिलं तर दगडी बांधकामाच्या या मिनाराला कमानींचा पाया आहे आणि मिनारवर अनेक ठिकाणी भोकं आहेत असं दिसतं. सुमारे २२५ भोकं आहेत. ती कशासाठी असावीत? मंगोल आक्रमक किंवा चोरांना पकडून त्यांचा शिरच्छेद केला जात असे आणि त्यांच्यावर दहशत बसावी म्हणून या मिनारावर ती मुंडकी लटकवली जात असत. अलाउद्दीन खिलजीच्या एकंदर क्रौर्याच्या प्रकृतीकडे पाहता हे आश्चर्यकारक वाटत नाही.
८ हजार मंगोल आक्रमकांना ठार करून अलाउद्दीन खिलजीने जरब बसवली अशा नोंदी इतिहासकारांना मिळाल्या आहेत. जाफर खान सारख्या सेनानींच्या मदतीने खिलजीने या आक्रमकांचा निकराने बिमोड केला असं दिसतं. काही जणांच्या मते हे मारलेले मंगोल आक्रमक नसून स्थायिक झालेले दिल्लीकरच होते. त्यांनी मंगोल हल्लेखोरांना सामील होऊ नये म्हणून अलाउद्दीन खिलजीने हे क्रौर्य दाखवले असा एक दावा केला जातो. इथं वर जायला छोटासा जिना आहे पण त्याला कुलूप होते.
अलाउद्दीन खिलजीने १३०३ च्या सुमारास सिरी दुर्ग बांधला त्यापूर्वी १९२५ च्या सुमारास त्याने पाणीपुरवठा व्हावा म्हणून हौज खास येथे एक मोठा तलाव बांधला. पुढे १३५४ साली फिरोजशाह तुघलकाने त्यातील गाळ उपसून तलाव पुन्हा वापरात आणला.
सुमारे ७० एकर परिसरात हा तलाव पसरला होता. इथं इंग्लिश अक्षर एल च्या आकाराचा एक मदरसा आहे. एक मशीद आहे आणि स्वतः फिरोजशाह तुघलकाचा मकबरा सुद्धा आहे. तैमूरच्या नोंदीप्रमाणे हा तलाव इतका मोठा होता की एका टोकाहून मारलेला बाण दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचणे अशक्य होते. हौज अलाई नावाने हा तलाव प्रसिद्ध होता. आजही हौज खास हरीण उद्यानातून हा तलाव पाहायला जाता येते. तिथंच मुंडा गुम्बद नावाची अजून एक खिल्जीकालीन वास्तू आहे.
सर सय्यद मानतात की इथला मदरसा धार्मिक शिक्षणाच्या दृष्टीने एक महत्वाचे स्थान बनला होता. तिथंच फिरोजशाह तुघलकाचा मकबरा आहे जो त्याचा मुलगा नासिरुद्दीन तुघलकाने १३८९ मध्ये बांधला. या ठिकाणी नासिरुद्दीन तुघलक आणि अलाउद्दीन सिकंदर शाह (फिरोजशाहचा नातू) यांच्या कबरी सुद्धा आहेत. १३८८ पर्यंत सय्यद युसूफ बिन जमाल हुसेनी या मदरशाचे प्रमुख होते. या ठिकाणाची ख्याती मध्य आशिया, अरबस्तानातही पोहोचली होती.
या ठिकाणी दगडी बांधकामाच्या सौंदर्याचा सुंदर प्रत्यय येतो. तिथेच बाजूला असलेली नवीन काँक्रीटची बांधकामे अगदीच निरस दिसू लागतात.
या ठिकाणी अनेक लोधी कालीन मकबरे आहेत. हरीण उद्यानातील वनराईत असलेला बाग-इ-आलम का गुम्बद आणि जवळच असलेला काली गुमटी नावाचा छोटा मकबरा वाट वाकडी करून पाहायला हवा.

बाघ-इ-आलम चा घुमट हा मिया शेख शहाबुद्दीन ताज खान नामक संताचा असून अबू सय्यद नावाच्या माणसाने १५०१ च्या सुमारास सिकंदर लोदीच्या कालखंडात हा मकबरा बांधला. इथंच एक छोटी मशीद सुद्धा आहे आणि अनेक निनावी कबरी सुद्धा. राखाडी रंगाच्या दगडात नक्षीकाम करून एक वेगळा परिणाम इथं साधलेला दिसतो. (Forgotten Cities of Delhi – Rana Safvi page 26)

लोदीकालीन आणखी काही मकबरे या परिसरात आहेत. काही ठिकाणी मकबरे आहेत पण कबर नाही असं दिसतं. कदाचित कंत्राटदारांनी हे बांधले पण कोणा सामंताला ते विकले नाहीत अशी शक्यता आहे. छोटी गुमटी आणि सक्रि गुमटी (अरुंद घुमट) हे या दोन वास्तू प्रेक्षणीय आहेत.


सक्रि गुमटीच्या समोरच बारा खांब आणि कमानी असलेला बाराखम्बा मकबरा दिसतो. दगडी बांधकामातील प्रमाणबद्ध कमानी, खिडक्या आणि त्यातून चालणार ऊनसावलीचा खेळ सकाळी आणि सायंकाळी अधिक छान दिसतो. तिथं कबर नाही पण परिसरात अनेक निनावी थडगी मात्र आहेत.


ही भटकंती संपवून अरबिंदो मार्गाने परतण्यापूर्वी तिथं एका उद्यानात असलेली मकबऱ्यांची जोडगोळी पाहिली पाहिजे. दादी पोतीचे गुम्बद असे नाव यांना आहे. उंच मकबरा कोण्या मोठ्या उमराव महिलेचा असून छोटा मकबरा तिच्या विश्वासू सेविकेचा आहे. पोतीच्या म्हणजे सेविकेच्या मकबऱ्याच्या शिखरावर षट्कोनी आकारात लाल वालुकाश्म वापरून दिव्यासारखा कळस रचलेला दिसतो.

ही आहे सिरी किल्ल्याची म्हणजे दिल्लीच्या दुसऱ्या शहराची गोष्ट. आपण हा परिसर पाहताना काही लोदीकालीन मकबरे पाहिले. असे जवळजवळ १०० मकबरे दिल्लीत आहेत. लोदी काळातील सर्वात भव्य मकबरे लोदी उद्यानात किंवा बाग-ए-जद मध्ये आहेत.. त्याबद्दल विस्तृत चित्रप्रवास पुन्हा कधीतरी. दिल्लीचे तिसरे शहर म्हणजे तुघलकाबाद – त्याची कहाणी पुढील लिंकवर वाचा. https://chinmaye.com/2019/06/15/mtughlaqabad/