या रहे उजर या बसे गुज्जर
सूफी संत हजरत निजामुद्दीन औलिया च्या या शब्दांत या किल्ल्याच्या भग्न शांततेचे रहस्य बहुतेक सामावले आहे. चौदाव्या शतकात दिल्लीच्या या तिसऱ्या शहराची निर्मिती घियासुद्दीन तुघलक या प्रथम तुघलक शासकाने केली. हे बांधकाम १३२१ साली सुरु झालं असं मानलं जातं .

.घियासुद्दीन गाझी मलिक हा एका तुर्क माणसाचा आणि त्याच्या हिंदू जाट पत्नीचा मुलगा होता. मेहनत आणि कर्तबगारीने तो अल्लाउद्दीन खिलजीच्या राज्यात प्रांत सुभेदार किंवा गव्हर्नर पदाला जाऊन पोहोचला. गाझी मलिक खिलजीच्या विश्वासू सेनानींपैकी एक मानला जाऊ लागला. देपालपूर प्रांताचा मुख्य असताना त्याने मंगोल आक्रमकांचा कडवा प्रतिकार करून प्रतिष्ठा मिळवली होती. अशी गमतीशीर आख्यायिका आहे की दिल्लीचे दुसरे शहर सिरी बांधणाऱ्या सुलतान अल्लाउद्दीन खिलजीला गाझी मलिकने दक्षिण दिल्लीत एक नवा किल्ला आणि शहर बांधायला सांगितले, अल्लाउद्दीन खिलजीने त्याला तू सुलतान झालास तर बांध असं उत्तर दिलं. अल्लाउद्दीन खिलजीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा कुतुबुद्दीन मुबारकशाह सुलतान बनला पण खुसरो खानाने त्याला ठार करून सिंहासन ताब्यात घेतले. गाझी मलिकने याचा बदला घेत खुसरो खानाला संपवले आणि १३२० साली तुघलक घराण्याची स्थापना केली. अशी गमतीशीर आख्यायिका आहे की दिल्लीचे दुसरे शहर सिरी बांधणाऱ्या सुलतान अल्लाउद्दीन खिलजीला गाझी मलिकने दक्षिण दिल्लीत एक नवा किल्ला आणि शहर बांधायला सांगितले, अल्लाउद्दीन खिलजीने त्याला तू सुलतान झालास तर बांध असं उत्तर दिलं.


सुलतान होताच त्याने तुघलकाबाद किल्ला बांधायला सुरुवात केली. त्याच वेळी निजामुद्दीन औलिया बावलीचे बांधकाम करत होते. सुलतानाला हे पसंत नव्हते कारण त्याला सगळ्या मजूरांनी फक्त तुघलकाबाद किल्ल्याचे बांधकाम करायला हवे होते. त्याने तसा आदेश काढल्यावर काही भक्त असलेले मजूर बावलीचे काम रात्री करू लागले. मग संतापून सुलतानाने तेलाचा पुरवठा बंद केला जेणेकरून रात्री दिवे लावले जाणार नाहीत. सुफी आख्यायिकेप्रमाणे निजामुद्दीन औलियाचे शिष्य रोशन-चराग-ए-दिल्ली यांनी चमत्कार करून पाण्याचे तेलात रूपांतर केले आणि दिवे तेवते ठेवले. या संघर्षामुळे निजामुद्दीन औलिया आणि घियासुद्दीन तुघलक यांच्यात कटुता आली. औलियाने नवीन बांधू घातलेल्या शहराला शाप देत म्हंटले की हे उजाड तरी होईल किंवा भटकणाऱ्या गुज्जरांच्या वस्तीचे स्थान तरी होईल. आज या किल्ल्याची स्थिती काहीशी तशीच आहे.


या शापाबद्दल अजून एक आख्यायिका दर्ग्याचे फरीद निझामी इतिहासकार राणा सफावि यांना सांगतात. तिचा संबंध इस्लामच्या दृष्टीने संगीताला मान्यता आहे का? या प्रश्नाशी आहे. तुघलकाच्या दरबारात हजरत निजामुद्दीन औलियांना चर्चेचे आमंत्रण आले कारण सभांमध्ये संगीताला परवानगी असावी की नाही यावर चर्चा होणार होती. हा थोर सुफी संत दरबारात येताच सगळेजण उठून उभे राहिले आणि चर्चेचे अध्यक्ष न्यायाधीश काझी उल सुलतान यामुळे दुखावले गेले कारण सभेत काझीचे स्थान मानाचे होते. काझीला संगीतावर बंदी हवी होती पण निजामुद्दीन औलियानी हदिस चा हवाला देत सांगितले कि प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी आयेशाला लग्नाच्या वेळी आणि ईदच्या वेळी गायन वादन ऐकण्याची परवानगी दिली होती. आणि इमाम अल गझली सांगतात की प्रेषितांनी एका आनंदाच्या क्षणी अबू-बकर आणि उमर यांना गायन-वादन थांबवण्यापासून रोखले होते. (इहया-उलूम-अल-दीन २/२७८) The forgotten cities of Delhi – Rana Safavi (page 43) यावर वैतागलेल्या काझी उल सुलतानाने इमाम-हनाफी यांनी संगीताला परवानगी दिल्याचा दाखला मागितला. जिथं प्रेषितांची हदीस अंतिम पुरावा मानला जात नाही अशा चर्चेत मला सहभागी व्हायचं नाही असं सांगून संतापलेले हजरत निजामुद्दीन औलिया दरबारातून बाहेर पडले आणि तेव्हाच त्यांनी तुघलकाबाद शहराला उजाड होण्याचा शाप दिला.


पुरातत्व विद्वान अलेक्झांडर कनिंघम यांच्यामते किल्ल्याला १३ दरवाजे होते आणि अर्ध षट्कोनी आकारात किल्ला बांधला गेला होता. ४० फुटी उंच बुरुजांचे बांधकाम प्रचंड आकाराच्या दगडांनी केले गेले होते आणि काही दगडांचे वजन ८-९ टन इतके प्रचंड असल्याचे चाचण्यांनी सिद्ध केले. किल्ल्याचा आकार साधारणपणे शाहजहानाबाद शहराइतका असून ईजिप्शियन पद्धतीच्या उताराचे बुरुज मेहरौली बदरपूर रोडवरून स्पष्ट दिसतात. पुरातत्व विद्वान अलेक्झांडर कनिंघम यांच्यामते किल्ल्याला १३ दरवाजे होते आणि अर्ध षट्कोनी आकारात किल्ला बांधला गेला होता. ४० फुटी उंच बुरुजांचे बांधकाम प्रचंड आकाराच्या दगडांनी केले गेले होते आणि काही दगडांचे वजन ८-९ टन इतके प्रचंड असल्याचे चाचण्यांनी सिद्ध केले.


इब्न बतूताने केलेल्या वर्णनानुसार त्याने सुलतानाला हजार खांब असलेल्या राजवाड्यात पाहिले. आज मात्र तिथं केवळ भग्न अवशेष आणि गुरे चारायला आलेले काही गुज्जर एवढंच शिल्लक दिसतं
हुनुज दिल्ली दूर अस्त
दिल्ली अजून दूर आहे, सुलतान इथं पोहोचत नाही निजामुद्दीन औलियाचे उद्गार होते. बंगाल आणि बिहारवर विजय मिळवून परतणाऱ्या घियासुद्दीन तुघलकाच्या स्वागतासाठी तुघलकबाद जवळ युवराजने उभारलेल्या शामियानाला आग लागली आणि त्यात घियासुद्दीन तुघलक सुलतान मारला गेला. हे १३२५ साल होतं मुहम्मद तुघलकाने सत्तेसाठी हा कट केल्याचे इब्न बतूताचे म्हणणे आहे. पण हजरत निजामुद्दीन औलियाची भविष्यवाणी खरी ठरली असे भक्त मानतात. नंतर लगेचच पाण्याच्या कमतरतेमुळे तुघलकाबाद किल्ल्यावर उजाड होण्याची वेळ आली. घियासुद्दीन तुघलकाने हजरत निजामुद्दीन औलियाला दिल्ली सोडण्याचा आदेश दिला होता आणि युवराज मुहम्मद तुघलक औलियाच्या जवळ होता हे घियासुद्दीन सुलतानाला मंजूर नव्हते त्यामुळे हत्तींनी लाकडी शामियान्याच्या आधाराला धडक देऊन ते पाडले आणि अशा कट-कारस्थानाचा परिणाम तुघलकाच्या मृत्यूत झाला असं इब्न बतूता सांगतो तर अबू फझलने हे खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

घियासुद्दीन तुघलकाचा मकबरा किल्ल्यासमोरच आहे. चहूबाजूंनी तटबंदी आहे आणि कृत्रिम तळे निर्माण करण्यात आले आहे. या मकबऱ्याची निर्मिती घियासुद्दीन तुघलकाने तो जीवंत असतानाच केली होती. त्याने मूलतनामध्येही स्वतःसाठी एक मकबरा बांधला होता, जो त्याने एका सुऱ्हावर्दी संताला अर्पण केला असे दिसते. रुक्न-ए-आलम या नावाने हा मकबरा मुल्तानमध्ये आजही प्रसिद्ध आहे.


या मकबऱ्याच्या बांधकामात लाल वालुकाश्म आणि संगमरवर यांच्या मिलाफाचं सौंदर्य दिसतं. आतमध्ये एकंदर तीन कबरी आहेत. बहुतेक एक पत्नीची आणि एक मुलाची. तिथं जवळच अजून एक छोटा मकबरा आहे तो जफर खान या विश्वासू सेनापतीचा आहे असं मानलं जातं



तुघलकाबाद किल्ल्यात अजून काही बांधकामे आहेत, बावली आहे. तिथं जवळच आदिलाबाद नावाचा किल्लाही आहे. मागच्या खेपेत मी सगळं काही शूट करू शकलो नाही. पुढच्या वेळी तुघलकाबादमधील बांधकामे आणि जवळ असलेलं सुरजकुंड दोन्ही पाहण्याचा प्रयत्न करीन आणि दिल्लीच्या या तिसऱ्या शहराबद्दल अजून एक ब्लॉग लिहीन.
संदर्भ –
दिल्ली आणि परिसर – भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, The Forgotten Cities of Delhi – Rana Safavi