जहाँपनाह म्हणजे विश्वाला आसरा देणारी जागा. मुहम्मद बिन तुघलकाने मेहरौली, सिरी आणि तुघलकाबाद यांच्या मधील भागात हे शहर वसवलं साधारण १३२८च्या सुमारास. हे दिल्लीचं चौथं शहर. मंगोल आक्रमकांपासून संरक्षण मिळावं यासाठी एक लांबलचक संरक्षित शहरांची मालिका करण्याचा हेतू जहाँपनाह बांधण्यामागे होता परंतु मुहम्मद बिन तुघलकाने राजधानी दिल्लीतून देवगिरी-दौलताबाद ला हलवण्याचा निर्णय घेतला आणि या शहराची निर्मिती मागे पडली. आज दक्षिण दिल्लीच्या काही परिसरात जहाँपनाह शहरातील विखुरलेली बांधकामे दिसतात पण त्याला आता एकसंध सीमेचे स्वरूप नाही. १३८७ साली दोन मजली आणि चौरस आकाराचा तलविन्यास (प्लॅन) असलेली मशीद बांधण्यात आली. ही खिडकी नावाच्या गावाजवळ असल्याने तिला खिडकी मस्जिद असं नाव पडलं. जहाँपनाह शहरातील ही एक प्रमुख वास्तू

या मशिदीच्या एका बाजूची लांबी साधारण २८८ फूट असेल. तिथं ११ फूट उंचीचे तळघर असून सुमारे १०० खोल्या तळघरात आहेत. हा भाग आता पुरातत्व खात्याने बंद केला आहे. मशिदीच्या चारही बाजूंना घुमट असलेले स्तंभ आहेत ज्यांची उंची सुमारे ४५ फूट असावी. या मशिदीतील स्तंभ आणि कमानींच्या रचनेतून सावली आणि प्रकाशाचा खेळ पाहायला मजा येते. पायऱ्या चढून छतावर गेलं की जवळजवळ ८५ छोटे घुमट तिथं दिसून येतात.
जहाँपनाह शहरातील अजून एक पाहण्यासारखे बांधकाम म्हणजे सातपुला धरण. मंगोल आक्रमणे आणि दुष्काळ यामुळे दिल्लीवर वाईट परिस्थिती ओढवलेली असताना मुहम्मद तुघलकाने अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी जहाँपनाह शहराच्या पूर्वी सीमेवर हे धरण बांधले. दगडी बांधकामाच्या या धरणात ३८ फूट उंचीच्या सात कमानी आहेत. १७७ फूट लांब या धरणाच्या दोन्ही बाजूला अष्टकोनी स्तंभ आहेत ज्यांना ३९ फूट कमानी आहेत. इथं मदरसे होते. प्रेस एन्क्लेव्ह मार्गावर साकेत या ठिकाणी सातपुला धरण पाहता येते.
प्रमाणबद्ध दगडी बांधकाम अन त्यावरील प्रमाणबद्ध कमानी व या दगडांचा पिवळट केशरी रंग यामुळे एक सुंदर रचना निर्माण होते. तिथं आता झुडपे माजली आहेत आणि आसपासच्या भागातील मुले खेळायला येतात. त्यामुळे हा भाग ओसाड पडलेला नाहीए. धरणाच्या भिंतीवर चढून या अभिकल्पनेचा आनंद जवळून घेता येतो.
ये बात और की अख्तर हवेलियां ना रहीं
खंडहर में कम तो नहीं अपनी आबरू रौशन

जहाँपनाह शहरातील सर्वात देखणी इमारत म्हणजे विजय मंडल. काही जण त्याला बिजय मंडल सुद्धा म्हणतात. एका उंच टेकडीवरील अष्टकोनी शीर्ष असलेली ही इमारत जहाँपनाह किल्ल्याचा बुरुज मानली जाते. इथूनच मुहम्मद बिन तुघलकाने त्याच्या सैन्याचे निरीक्षण केले असं म्हंटलं जातं. तीन दरवाजे आणि हजार खांब असलेला एक महाल इथं होता असं इब्न बतूताच्या नोंदीतून लक्षात येतं. आदिलाबाद किल्ल्यातही असा एक महाल असल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. त्याला हजार सुतुन महल म्हंटलं गेलं आहे. या जागेला बदीह मंजिल म्हणजे खास जागा मानलं गेलं असून स्थानिकांच्या मते तिथं काही वर्षांपूर्वीही सोन्याची नाणी सापडत असत. अल्लाउद्दीन खिल्जीनेच हजार सुतुन राजवाडा बांधला आणि त्याच्या पायात मंगोल आक्रमकांची मुंडकी पुरण्यात आली अशी आख्यायिका आहे. इथं सापडलेल्या स्लॅब्स प्रमाणे जनरल कनिगहॅम ने या राजवाड्याचे ठिकाण विजय मंडलजवळ निश्चित केलेलं दिसतं. इथंच मलिक काफूरचा खून, अल्लाउद्दीन खिलजीच्या मलाच म्हणजे कुतुबुद्दीन मुबारकशाहचा खुसरो खानकडून खून आणि मग खुसरो खानचा घियासुद्दीन तुघलक कडून खून अशा घटना घडल्या. आज मात्र त्याचे अवशेषही इथं सापडत नाहीत. तिथेच पश्चिम बाजूला एक वेगळ्या आकाराचा मकबरा असून तो लोधी काळातील असण्याची शक्यता आहे. त्याच्या आत मात्र कब्र दिसत नाही.
बेगमपूर गावात विजय मंडलाच्या अगदी जवळच बेगमपुरी मस्जिद नावाची प्रचंड मोठी मशीद आहे. ही मशीद जहाँपनाह शहराची जामी मस्जिद होती. काही जणांच्या मते या मशिदीचा निर्माता खान-ए-जहाँ मकबूल तिलंगनी होता. मात्र पुरातत्व विभागाच्या पुस्तिकेप्रमाणे, सर सय्यद अहमदखान यांच्या असर-उस-संदीद मधील प्रतिपादनानुसार ही मशीद खान-ए-जुआन-शाह ने बांधली. यानेच खिडकी मशीद, कलन मस्जिद, कालू सराई मस्जिद, अशा एकंदर ७ मशिदी बांधल्या असे मानले जाते. पंधरा फूट पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला मशिदीचे उंच द्वार लागते त्यातून प्रवेश केला की प्रचंड मोठे प्रांगण दिसते.

पहिली बृहतमुखी मशीद असे या फॉर्मचे वर्णन केले गेले आहे. ६४ घुमट आणि २४ कमानींच्या मध्यभागी असलेली मोठी कमान व निमुळते होत गेलेले मिनार आपल्याला प्रांगणातून दिसतात.
शेख कबिरुद्दीन औलियाचा दर्गाह किंवा लाल गुम्बद किंवा रकाबवाला गुम्बद या नावाने जहाँपनाह शहरातील एक महत्त्वाची इमारत प्रसिद्ध आहे. काही प्रमाणात हा मकबरा घियासुद्दीन तुघलकाच्या मकबऱ्याशी साधर्म्य असलेला आहे पण त्याचा डोम किंवा घुमट मात्र तितकासा प्रमाणबद्ध नाही. काही चोरांनी सोनेरी कळस चोरण्यासाठी इथं कड्या लावल्या म्हणून रकाबवाला असे नाव पडले. तिथं अजून एक छोटा घुमट आणि मशिदीचे अवशेष दिसतात. लाल वालुकाश्म वापरून केलेलं नक्षीकाम आणि जाळीकाम सुंदर आहे.
हजरत युसूफ कातल हा संत लाहोरच्या काझी जलालुद्दीन यांचा शिष्य होता त्याचा दर्गा आपल्याला जहाँपनाह शहराच्या अवशेषांत पाहता येतो. आजही इथं पीरबाबाला फुलं, उदबत्त्या, चादरी वाहिल्या जातात. आणि मोकळ्या जागेत क्रिकेट खेळायला मुलं जमा होत असल्याने ठिकाण जागृत वाटतं. १२ खांबांवर १८ फुटी घुमट आणि जाळीच्या भिंती असा सुंदर फॉर्म या दर्ग्याला आहे.

तिथेच पांढऱ्या रंगाची छोटी पण रेखीव मशीद आहे आणि इथलं जाळीचे काम कुत्ब मिनारच्या अला-इ-दरवाज्या जवळील इमाम-जमीनच्या मकबऱ्याशी साधर्म्य असलेलं आहे, अर्थात तो मकबरा नंतर बांधला गेला त्यामुळे प्रेरणा युसूफ कातलच्या दर्ग्यातून आली असं म्हणता येईल. तिथं जुनी खानका (अन्नछत्र) आणि मदरसा यांचेही अवशेष दिसतात.
तुघलक घराण्यातील राजांनी तीन शहरे आबाद केली – घियासुद्दीन तुघलकाने तुघलकाबाद, मुहम्मद-बिन तुघलकाने जहाँपनाह आणि फिरोजशाह तुघलकाने कुष्क-ए-फिरोजाबाद. त्यानंतर लोधी घराण्यात मोठ्या प्रमाणावर मकबरे जरूर बांधले गेले पण स्वतंत्र शहर वसवण्यात आले नाही. त्यांनी अनेक बांधकामे पूर्वी वसवलेल्या शहरांमध्येही केली. जहाँपनाह नंतर फिरोजाबाद, नंतर दीनपनाह, मग शाहजहानाबाद आणि मग आजचं दिल्ली असा काही शतकांचा मागोवा आपण इथं घेणार आहोत. जहाँपनाह पूर्वी वसवलेल्या लालकोट आणि सिरीची कहाणी सुद्धा रंजक आहेच! तेव्हा या ब्लॉगवर येत राहा, follow करा आणि अभिप्रायही नोंदवा ही विनंती.