Chinmaye

भटकंती फिरोजशहा कोटल्याची (शहर पाचवे)


फिरोजशाह कोटला म्हंटलं की बहुतेक लोकांना आठवतं क्रिकेटचं मैदान! अनिल कुंबळेनी दहा विकेट टिपण्याचा पराक्रम ज्या मैदानात केला तेच! त्या मैदानाच्या अगदी बाजूलाच एक ऐतिहासिक स्थळ आहे. ते म्हणजे फिरोजशाह कोटला नावाचा किल्ला. खरंतर मैदानाला नाव मिळण्याचं कारण हा किल्ला आहे. पण सामान्य लोकांच्या दृष्टीने हे समीकरण थोडंसं उलटं आहे. २०१६ च्या आयपीएल मध्ये क्रिकेट प्रोड्युसर म्हणून मी काही सामने या मैदानात केले होते. तेव्हाच या किल्ल्याचे बुरुज दिसले होते. मग नंतर निवांत फोटो काढायला गेलो तेव्हाही रिक्षावाल्याने कोटला म्हंटल्याबरोबर स्टेडियम का अशी पृच्छा केली. तर आज तुम्हाला सांगणार आहे फिरोजशाह तुघलक या सुलतानाने बांधलेल्या फिरोजाबाद शहराची कहाणी. हे दिल्लीचं पाचवं शहर.

दगडी बांधकाम असलेल्या भिंती

फिरोजशहाला बांधकामे करण्याचा छंद तर होताच शिवाय जुनी बांधकामे जतन करण्यासाठी त्यांची दुरुस्ती करण्याचं महत्त्वही त्याला पटलेलं होतं. कुत्ब मिनार, हौज खास, अल्लाउद्दीन खिलजी आणि शमसुद्दीन इल्तमश च्या कबरी या बांधकामांची डागडुजी त्याने केल्याच्या नोंदी आहेत. भारतातील सर्वात जुना मकबरा म्हणजे महिपालपूरचा सुलतान गढीचा मकबरा .. त्याचीही दुरुस्ती फिरोजशहाने केली होती. पण बशीरउद्दीन अहमदच्या नोंदीप्रमाणे आपल्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत फिरोजशाह तुघलकाने ४० मशिदी, ३० मदरसे, २० खानका (बहुतेक अन्नछत्रे), २०० सराई, ३० गावे, १०० तलाव, ४० धरणे, १०० राजवाडे, १५० पूल आणि अनेक बगीचे बांधले. (The Forgotten Cities of Delhi – Rana Safvi (p.124) यमुना नदीकाठी गाविन नावाच्या गावाजवळ फिरोजशहाने १३५४ च्या सुमारास फिरोजाबाद शहर बांधायला घेतले. तत्कालीन पद्धतीप्रमाणे हे बांधकाम करण्यासाठी सिरी, जहाँपनाह, किला राय पिथौरा शहरांतील बांधकामे पाडून सामग्री गोळा करण्यात आली

मलिक गाझी शाहना हा फिरोजशाह चा मुख्य वास्तुविशारद होता तर अब्दुल हक हा त्याचा सहाय्यक. या काळात दहा हजार जण नमाज पढू शकतील अशा ८ मशिदी बांधल्या गेल्याची नोंद आहे. या किल्ल्याचे मूळ नाव कुष्क-ए-फिरोजाबाद होते. तारीख-ए-फिरोजशाही या ग्रंथात त्या काळाबद्दल बरीच माहिती सापडते. शम्स सिराज अफीफ नामक लेखकाने या नोंदी केल्या आहेत.

फिरोजशाह कोटला मध्ये जिन्न राहतात, तिथं लोकांना भयंकर अनुभव येतात असल्या कहाण्या अनेक ब्लॉग/ ट्रॅव्हल साईट्स वगैरेंनी पसरवल्या आहेत. मला तिन्ही वेळा कोणताही भयानक अनुभव आला नाही. एकदा तर मॅच संपल्यावर मध्यरात्री त्या परिसरात गाडीची वाट पाहत तासभर उभे होतो. दिल्लीत धोका असेल तर भूत किंवा जिन वगैरेपेक्षा चोर, दरोडेखोर वगैरेंपासून जास्ती आहे हे लक्षात घ्यायला हवं, थोडक्यात माणसाकडून! अर्थात तिथं जिन राहतात हा जुना विश्वासाचा भाग आहे. तिथं नन्हें मियां नावाच्या एका जिनसाठी पूजाही केली जाते. तारीख ए फिरोजशाही मधील वर्णनाप्रमाणे तिथं तीन महाल होते. महल-ए-अंगूर (खास लोकांसाठी) महल-ए-छज्जा-ए-चोबीन (लाकडी सज्जा असलेला महाल जो दरबारी नोकर वापरत) आणि महल-ए-बारी आम (सामान्य लोकांसाठी) तिसऱ्या महालाच्या पायाचा काही भाग अजूनही शाबूत असून तिथं अनेक श्रद्धाळू लोक आपापली गाऱ्हाणी जिन ला मिळावीत म्हणून तावीज, उदबत्ती वगैरे लावतात. या राजवाड्यांवर पूर्वी चित्रे आणि नक्षीकाम होते पण सुलतानाने यांना इस्लामविरोधी मानत पांढरा रंग लावून घेतला ( The Forgotten Cities of Delhi – Rana Safvi page 133) इस्लामविरोधी म्हणून रेशमी आणि सोनेरी नक्षीचे काम असलेले अंगरखे घालण्यासही मनाई होती.

तिथं असलेली जोती पाहिली की लक्षात येते की राजवाडे आणि इतर राजेशाही इमारती नदीकिनाऱ्याला समांतर बांधल्या गेल्या होत्या. तिथंच प्रांगणात एक सुंदर विहीर किंवा बावली आहे पण २०१४ मध्ये एक आत्महत्या घडल्यावर तिथं लोखंडी कुंपण आणि कुलूप लावून ती बंद करण्यात आली असं सांगितलं जातं (असं अनेक ऐतिहासिक ठिकाणांच्या बाबतीत घडल्याचा दुर्दैवी प्रकार आहे) दोन पातळ्या असलेल्या या विहिरीला परियों का कुंवा म्हंटले जाते. काही जणांच्या मते तिथं पऱ्या नव्हे जिन राहतात.

फिरोजशाह तुघलकाचा सरदार खान-ए-जहान ने एकंदर सात मशिदी बांधल्या असं मानलं जातं त्यापैकी एक जामी-मस्जिद कोटल्यात आहे. १३५४ साली ही बांधली गेली. तैमूरलंग ने इथं नमाज पढला तेव्हा त्याला ही इमारत इतकी आवडली की अशीच मशीद त्याने समरकंदला बांधून घेतली. घुमटाचे बांधकाम आणि पायऱ्या असलेलं प्रवेशद्वार ओलांडून या मशिदीत प्रवेश करता येतो. आजही इथं नमाज पढला जातो.

या इमारतीतील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथं असलेला अशोक स्तंभ. हरयाणातील टोबरा या ठिकाणी फिरोजशहाला हा स्तंभ दिसला आणि त्याने तो दिल्लीत आणून फिरोजाबादमध्ये स्थापित करण्याचे ठरवले. मौलवी जाफर हसनच्या नोंदीप्रमाणे – सेनवल रेशीम आणि सुती कापडात त्याला गुंडाळण्यात आले. गवताच्या गंजीने आधार व संरक्षण दिले आणि ४२ चाके असणाऱ्या गाड्यावरून हा स्तंभ दिल्लीत आणण्यात आला. दोरखंडाने हा गाडा ओढला गेला आणि एकेक दोरखंड २०० मजूर ओढत होते. दिल्लीत पोहोचल्यावर ७५ हजार किलो वजन नेऊ शकेल अशा बोटीतून हा स्तंभ यमुना नदीतून कोटल्यात आणला गेला. या स्तंभाच्या शीर्षावर ब्रॉन्झ धातूचा मुकुट होता जो सतराव्या शतकापर्यंत पाहण्यात होता (विल्यम फिंच १६११ नोंद शेवटची) वालुकाश्म उन्हात सोनेरी रंगात चमकत असल्याने या स्तंभाला सोनेरी स्तंभ किंवा मिनार-ए-झरीन असे नाव देण्यात आले.

१३ मीटर उंचीचा हा स्तंभ एका हवा महल सदृश इमारतीच्या शिखरावर आहे. त्यावर ब्राम्ही आणि संस्कृतमध्ये लेख आहेत. मूळ स्तंभ इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात तयार केला गेला असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ब्राम्ही लिपीत अशोकाची तत्त्वे रेखित असून नागरी लिपीत संस्कृत लेखात चौहान राजा विग्रहराजा चौथा याच्या पराक्रमांची नोंद आहे.

4 comments

  1. PRADEEP WELANKAR's avatar PRADEEP WELANKAR

    very rare & valuable information….chinmaye..never thought d existance of such a rich heritage around d stadium….delhi is sush a vast & deep historical city….a vast information also can never b complete…..yr efforts r extremely valuable.

Leave a reply to aroundindiaghansham Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.