पांडवकालीन इंद्रप्रस्थ ते आजची नवी दिल्ली हा भारताच्या राजधानीचा प्रवास रोचक आहे. इतिहास म्हणून तो अर्धवट आणि सनावळ्यांच्या जंत्रीने शिकवला जातो. त्यातही मुघलकालीन गोष्टींना खूप महत्त्व दिले जाते आणि मग एकंदरीतच अनावश्यक माहिती म्हणून आपण इतिहासातील अनेक पानांप्रमाणे हे पानही उलटतो आणि विसरून जातो. दिल्लीत कधी पर्यटक म्हणून गेलोच तर घाईघाईत लाल किल्ला आणि कुत्ब मिनार पाहतो. अगदीच रस असलेले लोक हुमाँयू मकबरा किंवा लोधी उद्यानापर्यंत पोहोचतात. इतिहास आणि पुरातत्वाचा अभ्यास करत असताना artifact म्हणजे समकालीन मूर्त साधने एक महत्त्वाचा भाग असतो. आणि काहीही artifact म्हणजे समकालीन वास्तुरचना प्रचंड आकाराच्या इमारती असतात आणि शेकडो वर्षे जगत स्थित्यंतरातून गेलेल्या असतात. दहाव्या शतकातील तोमर राजवंशापासून आजपर्यंत दिल्लीत आलेल्या शासकांनी निर्माण केलेल्या इमारतींच्या अभ्यासातून आणि निरीक्षणातून हे स्थित्यंतर पाहता येतं आणि या ब्लॉग सीरिजच्या माध्यमातून मी ही गोष्ट तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. पांडवकालीन इंद्रप्रस्थ ते आजची नवी दिल्ली हा भारताच्या राजधानीचा प्रवास रोचक आहे. इतिहास म्हणून तो अर्धवट आणि सनावळ्यांच्या जंत्रीने शिकवला जातो. त्यातही मुघलकालीन गोष्टींना खूप महत्त्व दिले जाते आणि मग एकंदरीतच अनावश्यक माहिती म्हणून आपण इतिहासातील अनेक पानांप्रमाणे हे पानही उलटतो आणि विसरून जातो. दिल्लीत कधी पर्यटक म्हणून गेलोच तर घाईघाईत लाल किल्ला आणि कुत्ब मिनार पाहतो. अगदीच रस असलेले लोक हुमाँयू मकबरा किंवा लोधी उद्यानापर्यंत पोहोचतात. इतिहास आणि पुरातत्वाचा अभ्यास करत असताना artifact म्हणजे समकालीन मूर्त साधने एक महत्त्वाचा भाग असतो. आणि काहीही artifact म्हणजे समकालीन वास्तुरचना प्रचंड आकाराच्या इमारती असतात आणि शेकडो वर्षे जगत स्थित्यंतरातून गेलेल्या असतात. दहाव्या शतकातील तोमर राजवंशापासून आजपर्यंत दिल्लीत आलेल्या शासकांनी निर्माण केलेल्या इमारतींच्या अभ्यासातून आणि निरीक्षणातून हे स्थित्यंतर पाहता येतं आणि या ब्लॉग सीरिजच्या माध्यमातून मी ही गोष्ट तुमच्यासाठी घेऊन येतो आहे.
दिल्लीत आज जिथं पुराना किला आहे तिथं पुरातत्व सर्वेक्षण विभागाने उत्खनन केले होते आणि मातीची भांडी व इतर साहित्य सापडले होते. गुप्तकालीन मूर्ती, नाणी आणि इतर अनेक जुने दुवे दिल्लीची कहाणी सांगायला उपयुक्त आहेत पण या सिरीजमध्ये या गोष्टी डोकावणार असल्या तरीही आपण पाहता येतील अशा इमारतींवर लक्ष केंद्रित करत आहोत. त्यामुळे ही गोष्ट सुरु होते तोमरांच्या काळात. दहाव्या शतकात अनंगपाल तोमर राजाने बांधलेलं सूरजकुंड आणि अनंगपूर धरण आजही टिकून आहे. पण ही ठिकाणे दिल्लीबाहेर फरिदाबादला आहेत. पण तोमर काळाची साक्ष देणारी लालकोटची भिंत आजही कुत्ब मिनार जवळच्या मेहरौली भागात आजही पाहता येते. लालकोट हे दिल्लीचं पहिलं शहर

अल्लाउद्दीन खिलजीने कुत्ब मिनार भागात बरेच बांधकाम केले आणि मंगोल आक्रमकांच्या हल्ल्यांपासून दिल्लीचे रक्षण करण्यासाठी सिरी नावाचा एक किल्ला बांधून एक शहर निर्माण केले. दक्षिण दिल्लीत हौज खास भागात त्याने एक तलाव खोदला. शहापूर जाट भागात सिरी किल्ल्याचे काही अवशेष आपण पाहू शकतो. सिरी म्हणजे दिल्लीचे दुसरे शहर. मंगोल आक्रमकांना पकडून ठार करून त्यांची मुंडकी जिथं लटकवली गेली असा चोर मिनार या काळाची गोष्ट सांगतो.

तुघलक राजवंशाच्या राजांना वास्तुरचना आणि शहरे प्रस्थापित करण्यामध्ये खास रस होता. या राजवंशातील प्रथम राजा घियासुद्दीन तुघलकाने आजच्या दिल्लीत आग्नेयेला वसवलेलं शहर म्हणजे तुघलकाबाद. मेहरौली बदरपूर रस्त्यावर किंवा कधीकधी विमानातून दिल्लीत उतरताना तुघलकाबादचा प्रचंड किल्ला दिसतो. तुघलकाबाद हे दिल्लीचं तिसरं शहर

दक्षिण दिल्लीतील बेगमपूर गाव, विजय मंडल, आयआयटी दिल्ली वगैरे भागात सापडते मुहम्मद बिन तुघलकाने निर्माण केलेल्या जहाँपनाह शहराचे बांधकाम. हाच तो तुघलक राजा ज्याने काही काळ राजधानी देवगिरी-दौलताबादला हलवली होती. मंगोल आक्रमकांचा प्रश्न तेव्हाही तसाच भेडसावत होता त्यामुळे किला राय पिथौरा आणि सिरी शहराच्या मध्ये या शहराची निर्मिती झाली. जहाँपनाह म्हणजे जगाला आश्रय देणारी जागा. जहाँपनाह हे दिल्लीचे चौथे शहर

फिरोजशाह तुघलकाने दिल्लीच्या आजच्या क्रिकेट ग्राउंडच्या बाजूच्या भागात एक नवे शहर थाटले आणि नाव दिलं फिरोजाबाद. कोट या शब्दाचे दिल्लीकरण झाले कोटला आणि फिरोजशाह कोटला म्हणून हा रबल मेसनरी या दगड बांधणीच्या प्रकारातून बांधलेला दुर्ग उभा राहिला. फिरोजशाह कोटला हे दिल्लीचं पाचवं शहर

तुघलकांच्या नंतर आलेल्या लोधी घराण्याने काही मोठे मकबरे सोडता विशेष नागरी बांधकाम केलं नाही. नंतर हुमायून ने दिल्लीत दीनपनाह नावाचे शहर बांधायला सुरुवात केली. शेरशहा सूर या सूरवंशीय राजाने त्याचा पराभव केला आणि दिल्ली ताब्यात घेऊन दीनपनाह चे बांधकाम पुढे सुरु ठेवले. तिथंच शेरगढ नावाचा एक नवा किल्ला बांधायला घेतला. आज पुराना किला या भागात हे बांधकाम आपण पाहू शकतो. दीनपनाह आहे दिल्लीचे सहावे शहर

अकबराच्या काळात मुघलांनी राजधानी आग्ऱ्याला नेली आणि दिल्लीचे महत्त्व कमी झाले. त्यानंतर शाहजहान ने राजधानी पुन्हा एकदा दिल्लीला आणली आणि जिथं आज पुरानी दिल्ली आहे त्या भागात शाहजहानाबाद नावाचे शहर वसवले. दिल्लीमधील महत्त्वाचे विश्व वारसा स्थळ लाल किला आणि दिल्लीची जामा मस्जिद शाहजहानाबाद मधील मुख्य बांधकामे आहेत. ग्यानी दि हट्टी, परांठे वाली गली, कल्लू की निहारी, करीम्स अशी खवैय्यांची अनेक लाडकी ठिकाणे इथं आहेत. शाहजहानाबाद हे दिल्लीचे सातवे शहर

आज स्वतंत्र भारताची राजधानी असलेली दिल्ली म्हणजे ब्रिटिश स्थापत्यशास्त्री एडविन ल्युटेयन्सने २०व्या शतकात वसवलेली नगरी. इंडिया गेट, संसद भवन, राष्ट्रपती भवन, हैद्राबाद हाऊस अशी बांधकामे या काळात निर्माण झाली. नवी दिल्ली हे आठवं शहर

इतर अनेक महत्त्वाची बांधकामे दिल्लीत आहेत ज्यांचा समावेश कोणत्याही शहरात करता येत नसला तरीही दिल्लीच्या इतिहासात त्यांना महत्वाचे स्थान आहे. हुमायून चा मकबरा, सफदरजंग मकबरा, लोधी उद्यान, सुलतान गढी चा मकबरा, उग्रसेनची बावली, जहाज महल अशी अनेक. आणि त्यांचीही गोष्ट तुम्हाला ब्लॉग्समधून सांगूच. तर या मालिकेतील प्रथम ब्लॉग आहे लालकोट ते कुत्ब मिनार – दिल्लीच्या पहिल्या शहराची गोष्ट. नक्की वाचा आणि शेयर करा. आणि अभिप्राय जरूर कळवा