डॉक्टर बाबासाहेब आंबेड्करांच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांच्या विचारांना जाणून घेण्याचं, त्यामागील भूमिका समजून घेण्याचं प्रचंड कुतूहल आहे. एक कायदेपंडित, अर्थतज्ज्ञ, शिक्षक, अभ्यासक, राजकारणी, सामाजिक क्रांतीचा आणि जागृतीचा नेता आणि एक प्रखर देशभक्त कसा घडला हे जाणून घेण्याची खूप इच्छा होती. शाळेत आणि नंतर पत्रकारिता शिकत असताना या मूकनायकाचे ओझरते दर्शनही झाले. पण अनेक दिवसांपासून त्यांच्याबद्दलचा चरित्रात्मक ग्रंथ वाचून काढायचं मनात होतं. धनंजय कीरांचं पुस्तक आणूनही बरेच दिवस झाले. शेवटी आज आंबेडकर जयंतीपासून सुरुवात करत आहे. हे ६५७ पानी चरित्र संपवायला मला किती वेळ लागेल माहिती नाही परंतु प्रारंभ करतो. आणि ब्लॉगच्या माध्यमातून हा अनुभव तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही करतो आहे.

पंडित नेहरूंचे पहिले मंत्रिमंडळ – डॉ बाबासाहेब बसलेल्यांपैकी डावीकडून पहिले
हे चरित्र कसं असेल? मला बाबासाहेबांच्या बद्दल वस्तुनिष्ठ दृष्टीने माहिती मिळेल का असं मनात होतं. धनंजय कीरांनी आदरणीय बाबासाहेबांच्या बरोबरच महात्मा जोतीबा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी या विविध विचारसरणीच्या लोकांबद्दल लिहिलं आहे हे वाचून वाटतं आहे की कोणत्याही राजकीय अभिनिवेशातून हे चरित्र लिहीलेलं नसणार म्हणजे वस्तुनिष्ठ असण्याची शक्यता आहे. सुरुवात केल्यावर पुस्तकाचे सार एका परिच्छेदात लिहीलेले दिसले.
एवढी प्रतिकूलता कोणाच्याही वाट्याला कधीमधी येते पण जन्माबरोबर प्रतिकूलता डोंगरासारखी पुढ्यात हजर असलेल्या माणसाने काय करावे? डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या जीवनात प्रतिकूलतेने जे तांडव घातले ते पचवून बाबासाहेब माणूस म्हणून प्रस्थापित झाले. चैतन्याने लक्षलक्ष उजळून निघाले. ती दीप्ती अशी अभिनव होती तिने बाबासाहेबांच्या कोटीकोटी बांधवांना जागृत करून मदयत्तं तु पौरुषम् चा मंत्र त्यांच्या प्राणात भरला आणि त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवले. ती अद्भुत कहाणी प्रत्यक्षात कशी घडली याची रोमांचकारी हकीकत या महाचरित्रात संयमशील समरसतेने सांगितली आहे. चरित्रनायकाचे प्रसादपूर्ण दर्शन झाल्याचे समाधान चरित्रकार धनंजय कीर यांच्या शब्दांतून मिळते.
हे चरित्र कसे असेल, कोणती पद्धती आणि दृष्टीकोन त्यासाठी वापरला असेल याची काही कल्पना प्रथम आवृत्तीच्या प्रस्तावनेतून आणि प्रकाशक रामदास भटकळ यांनी लिहिलेल्या सातव्या आवृत्तीबद्दलच्या निवेदनातून येते. या पुस्तकात २७ प्रकरणे आहेत, तेव्हा आठवड्याला एक प्रकरण या गतीने सहा महिन्यात चरित्र वाचून आणि सार लिहून पूर्ण करायचे असा मनोदय आहे. तर हा दर शनिवारचा संकल्प.
प्रकरण पहिले – पंचवीसशे वर्षांची पूर्वपीठिका –
या प्रकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या समाजात जन्माला आले. त्या महारांची, अस्पृश्य समाजाची परिस्थिती कशी होती याचा आढावा घेतलेला दिसतो.
काही ठळक मुद्दे –
महार ही अस्पृश्य मानल्या गेलेल्या अनेक हिंदू जातींपैकी एक जात.
त्यांची सावली अशुद्ध आणि वाणी कानावर पडणे अपवित्र मानले जात होते.
सार्वजनिक पाणवठा, शाळा आणि मंदिरे इथं प्रवेश बंद होता.
अगदी न्हावी आणि धोबी सुद्धा महार-मांगांचा विटाळ मानत असत.
हलकीसलकी कामे किंवा शेतमजूरी हे कामाचे स्वरूप होते.
जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता कशी निर्माण झाली हे अजूनही एक कोडे आहे असं लेखक म्हणतो.
श्रम विभागणीच्या तत्वाप्रमाणे बनलेला चातुर्वर्ण्य पुढे जातीवाचक होऊन जन्माने जात धरू लागली.
गौतम बुद्धाने अनेक अस्पृश्यांना आपल्या धर्मात स्थान दिले आणि भिक्खू पंथात समाविष्ट केले.
११व्या शतकात रामानुजाचार्यांनी मंदिरे अस्पृश्यांना खुली केली आणि त्यांचा एक महत्त्वाचा शिष्यही अस्पृश्य समाजातून आलेला होता. कर्नाटकात बसवेश्वर या विशाल दृष्टीच्या प्रधानाने अस्पृश्यता दूर करण्याचं काम केलं.
परंतु साधुसंतांच्या भूमिकेचा परिणाम भक्तिक्षेत्रापलीकडे नाही झाला. ते त्यांचं उद्दिष्टही नव्हतं.
हिंदू सम्राटांनीही याबाबतीत हस्तक्षेप केला नाही .
बंगालमध्ये राजा राममोहन रॉय आणि महाराष्ट्रात जोतीबा फुलेंनी अस्पृश्यता बंद करण्याची चळवळ सुरु केली.
बंगालमध्ये शशिधर बंद्योपाध्याय यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.
भारतीय संस्थानिकांपैकी सयाजीराव गायकवाड यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढली. पण त्यासाठी स्पृश्य हिंदूनी विरोध केला म्हणून सयाजीरावांनी मुस्लिम शिक्षक नेमावे लागले (महाराष्ट्रीय धनकोश विभाग ७ पृष्ठ ६४४)
दलित समाजाचे नेते गोपाळ बाबा वलंगकर यांनी प्रथम अस्पृश्यता देव-निर्मित नसून मानवनिर्मित आहे असे प्रतिपादन केले.
सुरुवातीच्या काळात ब्राम्हण वर्गाला न दुखावण्याचे ब्रिटिश धोरण होते.
१८२० मध्ये पुण्यात ब्राम्हणांसाठी संस्कृत अध्ययन करायला ब्रिटिशांनी पाठशाळा काढली होती. तीस वर्षांनी त्यात अब्राम्हण लोकांना प्रवेश द्यायचे ठरले. तेव्हा ब्राम्हण वर्गाने याचा विरोध केला आणि सर्व अध्यापकांनी राजीनामे दिले (ज्ञानोदय २ऑगस्ट १८५३)
अस्पृश्यांना शिक्षण देण्याची मागणी निराधार आणि अनाठायी आहे अशी साक्ष म. मो. कुंटे यांनी हंटर आयोगासमोर दिली.
याच काळात ख्रिस्ती धर्म प्रसारकांनी अतिशूद्रांच्या शिक्षणाचा प्रश्न हाती घेतला त्यांच्या भूतदयेचा परिणाम शूद्रांवर होऊ लागला.
१८५८ साली ब्रिटिशांनी निर्णय घेतला की सर्व सरकारी शाळांमध्ये सर्व जातीच्या मुलांना प्रवेश दिला जाईल. (डॉ गोविंद सदाशिव घुर्ये कास्ट अँड रेसेस इन इंडिया पृष्ठ १६६)
महाराष्ट्रात नव्या विचारांचे वारे वाहत होते.
सामाजिक सुधारणा आधी की राजकीय आधी यावर मोठा वाद सुरु होता.
एका बाजूला उदारमतवादी आणि थोर विचार प्रवर्तक होते, तर दुसऱ्या बाजूला सनातनी प्रवृत्तीचे पण राजकारणात प्रभावी आणि त्यागी बाण्याचे वीरमणी होते.
लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी समाजाच्या सर्व घटकांना गुणविकासाची संधी लाभावी, न्याय्य आणि विशाल तत्त्वांच्या पायावर समाजाची पुनर्रचना व्हावी अशी विचारसरणी मांडली.
महात्मा फुले यांची विचारसरणी अधिक मूलगामी आणि क्रांतिकारी होती. त्यांनी जातिभेद मोडून नवीन समाजरचना व्हावी – तिचा पाया बुद्धिप्रामाण्य, न्याय आणि समता असावा म्हणून बंड केले.
आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य विषयक विचार तेजस्वीपणे मांडले.
डॉ भांडारकर आणि न्यायमूर्ती तेलंग या विद्वानांनी सुधारक विचारांना प्रोत्साहन दिले.
राजकीय सुधारणावादी आणि त्यांचे अग्रणी असलेले टिळक पराक्रमी व पंडितवर्य होते. पण राजकीयदृष्ट्या प्रभावी असले तरी सामाजिकदृष्ट्या या गटाचा सुधारणेला बगल देण्याकडे कल होता. अंतर्गत यादवी टाळून आधी राजकीय सुधारणा व्हाव्यात असा या पक्षाचा आग्रह होता.
राजकीय आणि सामाजिक सुधारणा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे राजकीय सुधारणवाद्यांच्या कदाचित लक्षात आले नसेलही किंवा आपल्याला मिळणारी जन्मजात प्रतिष्ठा आणि विशेषाधिकार नवसमाजात मिळणार नाही अशीही त्यांना भीती वाटत असे.
काँग्रेस स्थापन होऊन सात वर्षे झाली असतील… ठराविक मागण्या ब्रिटिशांकडे करून काँग्रेस संमेलनाचे अधिवेशन संपत असे.
अशी होती आंबेडकर पूर्व महाराष्ट्रातील स्थिती
हे विलक्षण आहे. अत्यंत मुद्देसूद, गोळीबंद विवेचन लिहितोस तू.
ब्रिटिश कारकीर्द समयीच्या ब्रिटिश व ब्रिटिश पुरस्कृत शिक्षण घेउन तथाकथित एतद्देशीय विद्वानांच्या मतांचे मूल्यमापन अतिशय सावध राहूनच करावयास हवे । कारण ब्रिटिशांचे क्रौर्य व कुटिलता विसरता येत नाही । तत्पूर्वी हिंदु समाज निरक्षर नव्हता । ब्रिटिशांनी देशाचा कबजा घेताच प्रथमतःसर्व खेड्या पाड्याच्या शाळा बंद पाडल्या ठिकठिकाणचे गुरूकुल बंद पाडले ।40/50वर्षा नंतर फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी शाळा सुरू केल्या त्यांनी आखंन दिलेल्या आराखड्या प्रमाणे ।मोठ्या प्रमाणावर निरक्षरताचे हे मूळ कारण आहे । एकीकडे एका वर्गाला प्रोत्साहन देऊन आपल्या मुलकी व्यवसायांत गुंतवले तर काहींचा बुद्धीभैद करवून दुही माजवली । हे पण ल्क्षांत असावे ।अस्तु आपला उपक्रम स्तूत्य आहे ।पूर्णत्वास जावो ।