
Dhamek Stupa
भगवान बुद्धाची ज्ञानयात्रा सुरु झाली ते ठिकाण आज आपण पाहणार आहोत. सारनाथ हे हजारो वर्षे जुन्या संस्कृतीच्या केंद्राजवळ म्हणजे वाराणसीजवळ वसलेलं एक गाव. बुद्धासारख्या महात्म्याने धम्माची दीक्षा द्यायला हे ठिकाण निवडले आणि इतिहासाच्या नकाशावर सारनाथला अढळपद मिळाले. ही भूमी संत-महंतांचीच असावी कारण जैन धर्माचे अकरावे तीर्थांकर श्रेयांसनाथही जवळच्या सिंघपूरचे. गौतम बुद्धाने या जागेला इसीपट्टण म्हणून संबोधले आहे आणि या स्थानाला एक महत्त्वाचे तीर्थस्थान बौद्धधर्मीय मानतात. चला तर पाहू सारनाथचा चित्र रिपोर्ताज
बोधगयेतून भगवान बुद्ध सारनाथला आले आणि पहिल्या पाच शिष्यांना इथं धम्माची दीक्षा त्यांनी आपल्या कथनातून दिली … याचे वर्णन एका कुशाण काळातील एका लेखात सापडते. बौद्ध धर्मातील चार मुख्य कालातीत सत्यांबद्दल बुद्धांनी मार्गदर्शन केले. पहिले म्हणजे दुःख आणि आपल्या जगात ते आहे याचा स्वीकार … दुसरे म्हणजे दुःखाच्या उत्पत्तीची कारणे … तिसरं म्हणजे दुःखाला संपवायचे कसे आणि चौथं म्हणजे मोक्ष किंवा निर्वाणाकडे नेणारा अष्टांग मार्ग. इथंच बुद्धाने प्रथम संघाची स्थापना केली. यश नावाचा वाराणसीच्या एका श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा आणि त्याचे ५४ अनुयायी या पाच शिष्यांना येऊन मिळाले आणि ६० भिक्खू मिळून संघ निर्माण झाला.

Circular shrine
सारनाथच्या इतिहासात मागे जाण्यापूर्वी या स्थानाचा आपल्या वर्तमानाशी काय संबंध आहे हे जाणून घेऊया …. आपल्या भारत सरकारचे बोधचिन्ह असलेला अशोकस्तंभ हा इथल्याच एका स्तंभावरील शिल्पावरून घेतला गेला आहे. सम्राट अशोकाच्या काळात बांधला गेलेल्या या स्तंभावरील चार सिंह, अशोक चक्र आणि सोबत असलेले घोडा आणि बैल. इथल्या पुरातत्व खात्याच्या संग्रहालयात हा स्तंभ नीट पाहता येतो.

Dharmarajika Stupa
इथे पूर्वी धर्मराजिका स्तूप नावाचा प्रचंड स्तूप होता … जगत सिंह दिवाणाने बांधकामाचे सामान मिळावे म्हणून तो तोडला अशी नोंद सापडते … तिथं कनिंगहॅमने केलेल्या उत्खननात अनेक गोष्टी सापडत गेल्या … सगळीकडे विहार आणि छोटे स्तूप होते. सम्राट अशोकानंतर विविध काळांमध्ये इथल्या बांधकामांचा विस्तार होत गेला. मी ज्या दिवशी सकाळी तिथं गेलो त्या दिवशी खूप धुके होते आणि मी पुन्हा संध्याकाळी काम संपवून यायचे असं ठरवलं. इतक्या महत्त्वाच्या पुरातत्व अवशेषांचे फोटो काढत असताना पूर्ण दिवस द्यायलाच हवा कारण सूर्यप्रकाशाची दिशा आपल्या फोटोंमध्ये विविधता आणत राहते … त्या वास्तूलाही विविध प्रकाशयोजनेतून पाहता येतं.

Mulagandha Kuti and votive stupas
धर्मराजिका स्तूपानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणचे मुख्य प्रार्थनास्थान ते म्हणजे मूलगंधकुटी नावाच्या वास्तूचे अवशेष. चिनी प्रवासी युआन श्वांगच्या वर्णनाप्रमाणे या प्रचंड वास्तूची उंची ६० मीटर म्हणजे जवळजवळ २०० फूट होती. या स्थानाच्या दक्षिणेला गुप्त काळातील गौतम बुद्धाची उभी असलेली एक मूर्तीही सापडली. आज एका नवीन मंदिराला मूलगंध कुटी नाव दिले गेले असून पूजा अर्चा तिथेच होते.
सारनाथला आजही बऱ्यापैकी सुस्थितीत उभी असलेली वास्तू म्हणजे धामेक स्तूप … किंवा धर्मचक्र स्तूप… २८.५ मीटर व्यासाचा व ४२ मीटर उंचीचा हा स्तूप आजही बौद्धधर्मियांचे श्रद्धास्थान आहे. स्तूपाच्या भिंतीवरचे कोरीवकाम वेगळ्या भौमितीय शैलीचे आणि लक्ष वेधून घेणारे आहे.

Ornate pillars

Gupta carvings on the Dhamek Stupa
कनिंगहॅमने स्तूपाच्या उभ्या अक्षात एक बोअर करून काही सापडते का याचा शोध घेतला. आत एक स्लॅब सापडली ज्यावर काही लेख होते. पुढे अभ्यास पूर्ण झाल्यावर ही स्लॅब पुन्हा आत सरकवली गेली असे दिसते. सारनाथच्या धामेक स्तूपावरील कोरीव काम स्तूपाला झाकणाऱ्या देवदूष्य कापडाची कल्पना करून कोरले गेले आहे. गुप्तकालातील शिल्पकारांच्या उच्च कौशल्याचा हा पुरावा आहे असं म्हणता येईल.

Chaukhandi Stupa
धामेक स्तूपापासून काही अंतरावर एक प्रचंड स्तूप आपलं लक्ष वेधून घेईल … त्यावर एक अष्टकोनी शिखर दिसते. हा आकारबंध मला खूपच वेगळा वाटला. हा आहे गुप्तकाळात बांधला गेलेला चौखंडी स्तूप.
पण या स्तूपाच्या शीर्षस्थानी असलेला अष्टकोनी मनोरा मात्र मुघलकालीन आहे. राजा तोडरमलाचा मुलगा गोवर्धन याने हुमायून तिथं येणार होता म्हणून त्याच्या स्वागतासाठी हा बांधून घेतला. एकेकाळी हे बौद्ध मंदिर होतं आणि प्रत्येक स्तरावर बुद्धमूर्ती आणि कोरीव कामे असावीत असं वाटतं.
2016 सालच्या सुरुवातीचा म्हणजे जवळजवळ दोन वर्षांपूवीचा हा प्रवास आहे. तेव्हा संग्रहालयात घेतलेले माहिती पुस्तक आणि हार्ड-डिस्कमधील फोटो दोघे खुणावत होते की आतातरी आम्हाला ब्लॉगवर पोहोचवा .तेव्हा आज सारनाथ मार्गी लागले.. .. सांची आणि भीमबेटकाही खोळंबले आहेत पुढच्या वेळेला हिंदुस्तान का दिल देखो …
संदर्भ – भारतीय पुरातत्व सर्वेक्षण माहिती पुस्तिका
Pingback: सारनाथची धम्मभूमी — Chinmaye – गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही
Check the dates and the details. Was. Humayun alive in 1588?
Thanks corrected