मला नेहमीच बंगाली मंदिरांच्या स्थापत्याबद्दल आकर्षण वाटत आलं आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून बिष्णुपूरची मंदिरे पाहण्याची खूप इच्छा होती. असं म्हणतात की इथल्या बांधकामाला सुरुवात केली मल्ल राजा बीर हंबीरने सतराव्या शतकाच्या सुरुवातीला जो एक क्रूर आणि निर्दयी शासक म्हणून ओळखला जात असे आणि मग नंतर श्री चैतन्यांच्या कडून वैष्णव मार्गाची दीक्षा घेतल्यावर तो विनम्र आणि प्रजाहितदक्ष राजा झाला. मदनमोहनाची पूजा करणाऱ्या या राजाने पिरॅमिडच्या आकाराचे शिखर असलेला रासमंच बांधला १६०० CE मध्ये आणि पुढे राजा रघुनाथाच्या काळात बिष्णुपूर एक कला केंद्र म्हणून नावारूपाला आले. त्याच्या मुलाने म्हणजे बीर सिंघाने या नगरीला संरक्षण मिळावे म्हणून किल्ला बांधला त्या किल्ल्यात आज आपण फेरफटका मारणार आहोत.

Dwarakeshwar river
द्वारकेश्वर नदी ओलांडताना एक अविस्मरणीय सूर्योदय पाहून सकाळीच कोलकातापासून २०० किलोमीटर दूर बिष्णुपूरला पोहोचलो. तिथला मुख्य रस्ता सोडून बाकी रस्ते इतके छोटे आहेत की गाडी सोडून पायीच निघालो. पाण्याचा साठा करण्यासाठी मल्ल राजांनी बांधलेले बांध किंवा तलाव आणि दगडी रथ पाहून किल्ल्याच्या परिसरात आलो. विटांचे बांधकाम आणि लॅटेराइट या अग्निजन्य खडकातील सुंदर काम पाहायला आम्ही उत्सुक होतो. दगडी रथ एकप्रकारे तिथल्या मंदिर स्थापत्याची आणि शैलीची चुणूक दाखवणारे मॉडेलच होते असं म्हणता येईल. हा लॅटेराइटचा रथ सतराव्या शतकातला आहे. खालचा स्तर रासमंचासारखा तर वरचे स्तर एकरत्न मंदिर शैलीची प्रतिकृती म्हणता येईल. तिथून पुढे दोन दरवाजे ओलांडत किल्ल्यात प्रवेश गेला. त्यातला मोठा दरवाजा पाहण्याजोगा आहे.

Small gateway

Stone chariot

Bandh or lake

Dome over large gateway

typical arch

Large gateway from inside
हा खडक काही संगमरवराप्रमाणे गुळगुळीत नाही आणि चमकदारही नाही. पण ज्याप्रकारे विशिष्ट आकारांची रचना करत बिष्णुपूरच्या कलाकारांनी शिल्पं उभी केली आहेत ते थक्क करून टाकणारं आहे. बिष्णुपूरमध्ये विविध शैलीत बांधलेली जवळपास ३० मंदिरे आहेत. त्यात देऊळ शैली, चाला शैली आणि रत्न शैली असे प्रकार दिसतात. रासमंच हा एक वेगळाच अविष्कार आहे, त्याला कोणत्याही शैलीच्या चौकटीत बांधणे कठीण आहे. पण रासमंचापर्यंत पोहोचण्यापूर्वी बिष्णुपूरमधील अनेक बांधकामे आणि भग्नावशेष आपलं लक्ष वेधून घेतात.

Malleshwar temple
देऊळ शैलीत बांधलेलं इथलं पहिलं मंदिर मल्लेश्वराचं आहे. जे १६२२ CE मध्ये रघुनाथ सिंहाने बांधलं आणि शिवाला समर्पित केलं. याला पूर्वी रेखा शिखर होतं त्याजागी नंतर अष्टभुजा शिखर बांधलं गेलं. याच शैलीत बांधलेल्या कृष्ण बलराम मंदिराचे भग्न अवशेष पुढे दिसतात. मल्लेश्वर मंदिराचा गाभारा चौरस असून ६.९ मीटर एका बाजूची लांबी आहे. मंदिराची उंची १०.७ मीटर आहे.
कृष्ण बलराम मंदिराच्या मागे दिसतो वनराईने आपल्या कवेत घेऊन लपवलेला बिष्णुपूर किल्ला. त्याच्या टॉवरला झाडांनी वेढा घातलेला दिसला. पण माणसांच्यासाठी भग्नावशेष असलेल्या या जागेत निसर्गाने आपला संसार थाटलेला दिसला. मग पुढे पुन्हा मुख्य रस्त्याच्या दिशेने निघालो.

Bishnupur fort ruins

Krishna Balaram temple

Termite hills

Mahaprabhu temple ruins

Gumghar
मुख्य रस्त्याजवळ महाप्रभु मंदिराचे भग्नावशेष दिसतात हे मंदिर जोर-बांगला मंदिराप्रमाणे आहे जे आपण स्वतंत्र ब्लॉगमध्ये पाहू … आणि मग विटांची एक चौकोनी रहस्यमय इमारत दिसते … याला म्हणतात गुमघर … मल्ल काळात गुन्हेगारांना थर्ड डिग्री देण्याचं हे ठिकाण असावं.

Dalmdal cannon
या बिष्णुपूर किल्ल्यावर बंगालच्या मोहिमेत रघुजी भोसलेंच्या सरदाराने म्हणजे भास्कररामाने हल्ला केला असं म्हणतात … म्हणजे आपले मराठे इथं आक्रमक की … तर त्यावेळचा राजा गोपाल सिंह किल्ल्याच्या आश्रयाला गेला आणि त्याने मदनमोहनाचा धावा सुरु केला … तेव्हा स्वतः कृष्णाने दलमदाल नावाची प्रचंड तोफ मराठ्यांवर डागली अशी आख्यायिका आहे. ती आजही पाहता येते. या तोफेची लांबी ३.८ मीटर आहे आणि नळीचा व्यास ३० सेंटिमीटरच्या आसपास असावा. भारतीय स्थापत्यात पिरॅमिडचा वापर केलेलं बांधकाम आणि या भौमितिक आकारबंधाशी बंगाली मंदिर शैलीचा संगम म्हणजे रासमंच. बिष्णुपूरच्या मंदिरांपैकी हे सगळ्यात जुनं बांधकाम आणि कदाचित सर्वात आकर्षकही …
रासमंच हे कृष्णाच्या उपासनेशी संबंधित महत्त्वाचे स्थान मानता येईल. इथं आजूबाजूच्या मंदिरांतील मूर्ती आणून रास उत्सव साजरा केला जात असे. याच्या चौरस चौथऱ्याची लांबी २४.५ मीटर आहे तर उंची १०.७ मीटर आहे. विशिष्ट आकाराच्या कमानी आणि विटांमधले कोरीव काम आपले लक्ष वेधून घेते. गाभारा तीन बाजूंनी बंदिस्त आहे.

Bishnupur arches

Chala shaped roof

Light and shadow

Terracotta arches
लॅटेराइट खडक आणि विटांचे काम अशी दोन्ही मटेरियल आपल्याला इथं वापरात आणलेली दिसतात. बिष्णुपूर परिसरात पाहण्यासारखं अजून बरंच काही आहे. केष्टोराय आणि पंचरत्न ही दोन सुंदर कोरीव काम असलेली मंदिरं आहेत .. एकरत्न शैलीतली लॅटेराइटची मंदिरं आहेत … पुढच्या ब्लॉगमध्ये पाहूच!