
पुराना किल्ल्यात आपले स्वागत करतो तो बडा दरवाजा. त्यावर दिसतात झरोके आणि छत्री. दिल्लीच्या इतिहासातील सहावं शहर म्हणजे शेरगढ किंवा पुराना किला. असं म्हणतात की पांडवकालीन इंद्रप्रस्थ हे नगर या किल्ल्याच्या स्थानी होतं. शेरशहा सुरीने या किल्ल्याची निर्मिती केली ती हुमायून ने बनवलेल्या दीनपनाह शहराला नष्ट करून.



१९१२-१३ च्या सुमारास जेव्हा या ठिकाणी उत्खनन झाले तेव्हा इंद्रपत नावाचे गाव इथे सापडले पुढे १९६० च्या दशकात झालेल्या उत्खननात ३००० BCE च्या सुमारासची भांडी इथं सापडली. मौर्यकालीन, सुंगकालीन, शक-कुशाण कालीन, गुप्त-कालीन, राजपूत आणि मग दिल्ली सुलतानच्या कारकिर्दीतील अवशेषही सापडले. इतकी जुनी पार्श्वभूमी या जागेला असल्यामुळे इंद्रप्रस्थच्या कथेत दम आहे असं अनेक लोक मानतात.









या ठिकाणी अजूनही मजबूत अवस्थेत असलेली वास्तू म्हणजे किला-ई -कुहना मशीद. पाच कमानींचा दर्शनी भाग त्यातील मध्य कमानीच्या आजूबाजूला सुंदर कोरीव काम आणि वर घुमट अशी या मशिदीची रचना आहे. लोधी ते मुघल काळातील शैली-संक्रमण आपल्याला या ठिकाणी दिसते. जमाली-कमाली मशीद आणि बडा गुम्बद मशीद यातून अनेक वैशिष्ट्ये या वास्तूत आली आहेत. या मशिदीची निर्मिती १५४१ CE ला शेरशहा सुरीने केली. ५१ मीटर बाय सुमारे १५ मीटरचे प्रार्थनागृह आणि कमळाच्या कळ्यांचे नक्षीकाम असलेल्या मेहराबी. मशिदीच्या इमारतीच्या कोपऱ्यात असलेले टॉवर हेही अजून एक विशेष.

शेरशहा सुरीने मनोरंजनासाठी बांधलेले अष्टकोनी व मध्यभागी छत्री असलेले शेर-मंडल ही पुराना किल्ल्याची ओळख म्हणता येईल. कोरलेल्या कमानी व प्लास्टरने काढलेली नक्षी याचे सौंदर्य वाढवते. हुमायून याचा पुस्तकालय म्हणून वापर करीत असे आणि इथूनच पडून त्याचा १५५६ CE साली मृत्यू झाला असं इतिहासकार मानतात.

शेरमंडला समोर आहे हमाम. गरम-थंड पाण्याच्या तोट्या आणि वाफेच्या स्नानाची सोय असा इथला थाट. साधारणपणे सव्वातीन चौरस मीटर आकाराचा हा हमाम आहे.

दिल्लीत अनेक बावल्या आहेत … इथली विहीर ८९ पायऱ्या उतरून २२ मीटर खोल जाणारी आहे. पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी खास रचना इथं केलेली दिसते.


दक्षिण दिशेला हुमायूनी दरवाजा आहे. या दुमजली दरवाज्याची दुरुस्ती हुमायूनने केली असं म्हणतात. आज इथे लाईट आणि साउंड शोची जागा आहे.


उत्तर टोकाला असलेला तलाकी दरवाजा दुमजली आणि वर छत्री असलेला आहे. या नावाचा शब्दश: अर्थ वापरायला बंदी असलेला असा होतो. हा दरवाजा वापरायला का बंदी होती हे स्पष्ट करु शकतील अशी साधने मात्र उपलब्ध नाहीत.
- Khairul Manzil masjid



किल्ल्याशी संबंधित दोन वास्तू पाहायला आपल्याला किल्ल्याच्या मुख्य दारासमोरच्या रस्त्यापलीकडे जावं लागतं. सर्वप्रथम समोरच दिसते ती खैरुल मंजिल मशीद. मधल्या कमानीच्या दर्शनी भागावर कोरलेल्या लेखानुसार ही बांधली माहम अंगानी म्हणजे अकबराच्या दूध आईने. जर जोधा अकबर चित्रपट पाहिला असेल तर इला अरुणने हे पात्र रंगवलं आहे. मशिदीला लागून जे बांधकाम दिसते ते मदरशाचे आहे. तिथूनच पुढे गेल्यावर दिसतो शेरशहा दरवाजा किंवा लाल दरवाजा. पण सध्या त्याची डागडुजी सुरु असल्याने तो पर्यटकांना खुला नाही.


किल्ल्यासमोर एक छोटासा तलाव आहे तिथून तटबंदीचे सुंदर दृश्य दिसते आणि बुरुजांवरच्या छत्र्या नीट दिसतात. पुढच्या वेळेला जाऊ दिल्लीच्या पाचव्या शहरात म्हणजे फिरोजशाह कोटला किल्ल्यात. मी क्रिकेट मॅचच्या प्रक्षेपणाचं काम करायला तिथं अनेकदा गेलो आहे पण ते मैदानात! किल्ल्याला भेट देणं बाकी आहे अजून! पुढच्या दिल्ली दौऱ्यात नक्की …
Pingback: टाइम मशीनमधून दिल्लीचा प्रवास | Chinmaye