अभिनयासाठी म्हणून काही सिनेमे जरूर पाहावेत, त्यापैकी एक म्हणजे डॉ काशिनाथ घाणेकर यांचा जीवनपट असलेला हा सिनेमा. आणि जरी या सिनेमात बरेच मोठे नट असले तरीही पात्रनिवड चांगली असल्याने उत्सुकता आणि मजा अजून वाढते. यासाठी हर्षदा मुळेंना फुल्ल मार्क्स … आधी एक डिस्क्लेमर मात्र जरूर टाकला पाहिजे की माझे आवडते अनेक जण या सिनेमात असल्यामुळे मी काही वस्तुनिष्ठ परीक्षण वगैरे करेन असं मला वाटत नाही. पण हा चिपत्रपट पाहण्याचा माझा अनुभव कसा होता हे सांगण्याचा प्रयत्न करतो.
डॉ काशिनाथ घाणेकर उभे करत असताना सुबोध भावेने इतकं जीव तोडून काम केलं आहे की त्याला विक्रांत सरंजामे साठी माफ करून वर पुण्य द्यायला हरकत नाही. एक मनस्वी माणूस आणि कलाकार म्हंटलं की कधीच एक निर्दोष व्यक्तिमत्व डोळ्यांसमोर येत नाही आणि जीवनपट उभा करत असताना नायकाच्या दोषांवर वर्ख चढवण्याचा मोह बरेच दिग्दर्शक टाळू शकत नाहीत. पण या सिनेमाची जमेची बाजू म्हणजे एक गुंतागुंतीचे, आत्ममग्न, स्वच्छंदी, सच्चे, व्यसनाच्या आहारी गेलेले आणि कधीकधी बालिश होणारे डॉ काशिनाथ घाणेकरांचे व्यक्तिमत्व लेखक-दिग्दर्शक आणि सुबोधने फार छान रंगवलं आहे. वादळासारख्या जगलेल्या आणि यश-अपयशाचे टोक पाहिलेल्या मराठी रंगभूमीच्या सुपरस्टारचे आयुष्य पाहणे रंजक ठरते.
नंदिता पाटकर माझी कॉलेजमधील मैत्रीण. एकदम बिनधास्त गो-गेटर आणि एनसीसी कॅडेट जसा असला पाहिजे तशी. पण इरावती घाणेकरांच्या पात्राची घालमेल, तिचं भावविश्व आणि वावटळीसारखं जगणाऱ्या नवऱ्याला आई होऊन जपण्याची तिची तळमळ नंदिताने छान उभी केली आहे. खरंतर सगळा झोत डॉ काशिनाथ यांच्यावर, प्रेक्षकांची सहानुभूती त्यांनाच … तरीही इराच्या भावविश्वाशी आपल्याला जोडणारा सशक्त अभिनय नंदिताने केला आहे. लक्षात राहण्याजोगा हा रोल आणि अभिनय आहे असं मी म्हणेन. त्यांची दुसरी पत्नी कांचन म्हणून येते वैदेही परशुरामी… तिचं निरपेक्ष प्रेम, नायकाला ओळखणं … हेही छान जमून आलं आहे. सुलोचना दीदी हे शिवधनुष्य सोनाली कुलकर्णीने सक्षमपणे पेललं आहे.
या सुपरस्टार चा दोस्त प्रभाकर पणशीकर … प्रसाद ओकच्या अभिनयाला दाद द्यावी तितकी कमी आहे. एक अभिनेता आणि निर्माता म्हणून पणशीकरांची उंची फार मोठी. पण एक मित्र म्हणून ते कसे असतील हे कुतूहल होतं … मनापासून प्रेम करणारा, अडचणीत साथ देणारा… संधी देणारा… गुण ओळखणारा… प्रोत्साहन देणारा मित्र … कधी आरसा दाखवणारा … अपयशाच्या गर्तेतून खेचून आणणारा मित्र … स्वतःच रंगभूमीवर एक स्थान असूनही मित्रत्वाला जपणारा प्रभाकर पणशीकर काही ठिकाणी हिरोपेक्षा अधिक उजवा वाटतो. वसंत कानेटकरांच्या लेखणीतून उभा राहिला रायगडाला जेव्हा जाग येतेचा संभाजी (छत्रपती संभाजी महाराज) आणि अश्रूंची झाली फुलेमधील अजरामर लाल्या … पण डॉ काशिनाथ आणि वसंत कानेटकरांचे कडू-गोड नाते रंगभूमी मागचे नाट्य दाखवून जाते. आनंद इंगळेच्या अभिनयातून मानी पण दिलखुलास कानेटकरांची व्यक्तिरेखा उभी राहते.
रंगमंचावरील स्टार आणि त्याच्या भोवती असलेलं वलय म्हंटलं की स्पर्धाही आलीच. डॉ काशिनाथ घाणेकरांचे द्वंद्व झाले ते एका वेगळ्या शैलीच्या सशक्त अभिनेत्याशी … ते म्हणजे दुसरे डॉक्टर … डॉ श्रीराम लागू. देहबोली, डोळे, अभिनय … सुमित राघवन ला क्या बात है म्हटल्याशिवाय राहवत नाही.
मोहन जोशींनी साकारलेले भालजी पेंढारकर असोत किंवा सुहास पळशीकरांनी साकारलेले मास्टर दत्ताराम…. डॉ काशिनाथ घाणेकरांना घडवणारे लोक कोण होते … त्यांच्या काळाचा context काय होता हे छान उलगडते. पण नायकाची अगदी खासगी, हृदयस्थ तगमग उभी राहते १०० व्या प्रयोगात जेव्हा वडील नाटक पाहायला येतात … तिथं प्रदीप वेलणकरांनी जे पिंच हीटिंग केलंय ते लाजवाब आहे.
तांत्रिक दृष्टीने सिनेमा व्यवस्थित आहे. काही ठिकाणी चुका आहेत पण एकंदर काळ उभा राहतो. वेशभूषा आणि मेकअप मात्र नक्कीच अजून सफाईदार हवी होती. काही ठिकाणी आपण गुंगून गेलेलं असताना जागे होतो, तसं होऊ नये. सुधीर पळसानेंचा कॅमेरा आणि अपूर्व मोतीवाले – आशिष म्हात्रे यांचं संपादन परिणामकारक आहे. मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या एका सुनामीचा प्रवास या चित्रपटातून आपल्याला अनुभवता येतो. त्या काळातील नाट्यसृष्टी डोळ्यांसमोर आकार घेते. हे मोठ्या पडद्यावर एकदातरी अनुभवावं असं मी म्हणेन. शिवाय दिग्दर्शक अभिजित देशपांडे पार्ले टिळकवाले म्हणून विशेष स्नेह!