सिनेमा म्हणजे करमणूक, मनोरंजन … वीकएंड च्या दिवशी रोजच्या जगाच्या तणावातून सुटका … एस्केप … काही तास आपलं जग विसरून दुसऱ्या जगात दुसऱ्या लोकांबरोबर जगायचं … पण भयकथा किंवा हॉरर पाहायला जाणे म्हणजे मुद्दाम तणावाने भरलेल्या भीतीप्रद कल्पनाविश्वात स्वतःहून काही तास जगायला जाणं. आणि मग अंतर्मनावर कोरल्या जाणाऱ्या त्या जगातील प्रतिमा. ट्रेलर पाहूनच तुंबाड क्षणोक्षणी भीतीचे बोट धरून चालायला लावणारा चित्रपट असणार आहे असं वाटलं होतं आणि ते तसंच आहे. पण अगदी एखाद्या जॉनर मध्ये तुंबाड ला टाकायचं असेलच तर मी त्याला हॉरर पेक्षा फॅन्टसी जास्त म्हणेन. काळोख्या जगातील एक फॅन्टसी. आणि या फॅन्टसीची भुरळ पडते ती जे चित्रविश्व राही अनिल बर्वेने त्याच्या दिग्दर्शनातून आणि पंकज कुमारने त्याच्या कॅमेराने उभं केलं आहे त्यामुळे.
तुंबाड नावाचं गाव कोकणात सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि जगबुडी नदीच्या काठाजवळ आहे. तुंबाडचे खोत ही श्री ना पेंडसेंची कादंबरी अशीच अनेक पिढ्यांची कहाणी पण नावापलीकडे चित्रपट आणि या कादंबरीचा काही संबंध नाही. नारायण धारपांच्या लेखनातून दिग्दर्शकाने प्रेरणा घेतली आहे हे क्रेडिट रोलमधून समजते. या सिनेमाला मी वेगळा प्रयोग, हटके वगैरे नाही म्हणणार या असल्या विशेषणांच्या मुळे उगाचच चांगले चित्रपट एका वेगळ्या श्रेणीत टाकले जातात… सिनेमा जसा असला पाहिजे तसा तो आहे.. अप्रतिम दृश्यभाषा… तांत्रिक सफाईदारपणा… टोकदार संवाद… नेमकी वेशभूषा ….सतत उत्सुकता आणि ताण टिकवून ठेवणारी पटकथा तसेच एडिटिंग. चित्रांना पूरक आणि त्यांच्या जगात ओढून घेणारा साउंड. ..आणि उत्कृष्ट अभिनय. पण तो साच्यातील सिनेमा नाही. त्याचा स्वतःचा एक आलेख आहे म्हणून तो हिंदी सिनेमासाठी एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. असं मला वाटतं.
ज्योती मालशेंनी साकारलेली ब्राम्हण विधवा स्त्री आणि तिची दोन गोंडस मुले … त्यांच्या भोवतालचं काळेकुट्ट जग … त्यातील घालमेल … आणि घरातच असलेलं भय आणि तणावाचं एक गुपित. एकटी, परिस्थितीने दबलेली पण करारी आई ज्योती मालशेने फार संयतपणे साकारली आहे. सतत कोसळणारा पाऊस आणि पावसाच्या दिवसात ग्रे आकाश पाहून होणारी घुसमट यांचा वापर दिग्दर्शकाने खूपच परिणामकारकपणे केला आहे. आणि आपला नायक त्याच्या लालसेची चुणूक अगदी संकटाच्या उंबरठ्यावरच दाखवून जातो.
सोहम शाहने साकारलेला साहसी आणि हावरा विनायक, चेतन दामलेने साकारलेला सावकार मित्र आणि मोहम्मद समदने फारच उत्तम साकारलेला विनायकचा मुलगा या सगळ्यांनीच उत्तम अभिनय केला आहे. प्रत्येक जण आपापल्या पात्रासाठी योग्य आहे आणि परिणामकारक सुद्धा आहे. अचानक धक्का देणारा, दचकवणारा, सतत किळसवाणा वाटेल असा भयाचा चेहरा या फिल्ममध्ये फारसा दिसणार नाही. पण सुरवातीपासून जवळजवळ शेवटच्या फ्रेमपर्यंत भयाचं आणि ताणाचं जे सावट कथेत गुंफलं गेलं आहे ते अनुभवण्यासारखं आहे.
या चित्रपटाचं यश अवलंबून होतं निर्मितीच्या तांत्रिक बाजूवर .. आणि प्रोडक्शन डिझाईनमध्ये नितीन जिहानी चौधरी आणि राकेश यादव यांनी कमाल केली आहे. हे जग फॅण्टसीचे आहेच. पण बाहुबलीप्रमाणे कल्पनाविलास नाही. खरा वाडा …त्याचं खरं खुरं जुनेपण आणि त्यातून निर्माण होणारी फँटसी .. फिल्म चा काळ साधारणपणे १९१८ ते १९५० असा धरला तर ही कालनिर्मिती उत्तम झाली आहे. कुठेही इफेक्ट्स किंवा डिझाईन केलेले सेट कथेच्या पुढे मिरवायला येत नाहीत. डिझाईन चं काम काटेकोरपणे केलं आहे पण ते स्वतःचा फॉर्म पुढे न आणता कथेला अधोरेखित करतं. अनेक शॉटमध्ये भूमितीय रेषा एक वेगळा आभास निर्माण करतात … त्यातून प्रकाश व सावल्यांची दालने उघडत जातात आणि आपण तुंबाडच्या जगात गुंतत जातो.
सांस्कृतिकदृष्ट्या सगळी महत्त्वाची पात्रे कोकणस्थ ब्राम्हण आहेत. कपडे, दागिने, गोरे-घारे असणे आणि त्यातील एक बिलंदरपणा टिपणारे एक्सट्रीम क्लोजअप सगळेच विलक्षण.
मला पंकज कुमारच्या छायाचित्रणात सगळ्यात जास्ती काय आवडले असेल तर अप्रतिम कंपोझिशन. एकेक फ्रेम विचार करून बनवली आहे. उगाच कुठेही अनावश्यक कॅमेरा मूव्हमेंट नाही. प्रत्येक महत्त्वाच्या शॉटमध्ये अभिनेता त्याच्या कॉन्टेक्स्ट किंवा परिसरात दिसतो. शब्दांपेक्षा चित्रांनी उलगडत जाणारी ही कथा आहे म्हणूनच सिनेमा म्हणून हा एक वेगळा, अनन्यसाधारण अनुभव ठरतो. काही शॉट तर अक्षरशः काव्य असल्यासारखे आहेत. त्यात थेट संदेश आहे आणि योग्य तितकं अमूर्त सांगणं सुद्धा आहे.
मध्यंतरानंतर गोष्ट थोडी रेंगाळते किंवा हळू होते पण बाकी संयुक्ता काझा चे एडिटिंग आपल्याला चित्रपटाच्या विळख्यातून बाहेर पडू देत नाही. आणि अजय-अतुलच्या गीतांबरोबर जेस्पर किडच्या पार्श्वसंगीताने तुंबाडच्या भीतीचा ताल संपूर्ण दोन तास पकडून ठेवला आहे. कुणाल शर्माच्या साउंड डिझाईनचेही कौतुक करावे तितके कमी आहे. लक्षात फ्रेम्स राहतात … पण साउंडचा दुवा पक्का नसेल तर पाहणारा चित्रविश्वात हरवत नाही. तो जागा होत राहतो आणि चित्रपटाचा परिणाम कमी होतो. तुंबाडचा ध्वनि त्याच्या दृष्यांइतकाच मोहिनी घालणारा आहे.
ही एक वेगळी भयकथा आहे कारण आपल्या नायकाला तुंबाडच्या शापातून बाहेर पडायचं नाही. हाव आणि लालसा हेच त्याच्या जीवनाचे मूळ आहे. तोच विनायकाचा शाप आहे आणि वरदानही. असं म्हणतात की आईचा गर्भ ही जीवनासाठी सर्वात सुरक्षित जागा असते. पण त्या गर्भातच भीतीचं आणि वासनेचे बीज रुजले असेल तर? याचं उत्तर अनुभवायचं असेल तर तुंबाड पाहायलाच हवा.
He vachun mala tumbad pahaychi echha zali…nakki pahin😍
Your website is very informative and I have learnt a lot about Indian Heritage. I like to know how I can read it in English or Hindi. Thank you for all your efforts to put all this wonderful information.
Thank you
Regards