राजधानी दिल्लीला म्हणतात शहरों का शहर … गेल्या हजार वर्षांत विविध शासकांनी इथं शहरं वसवली. वेगवेगळी नावं .. विविध रचना आणि त्याचा रोचक असा इतिहास. या ब्लॉगमालिकेतून आपण दिल्लीच्या सात शहरांचा इतिहास जाणून घेणार आहोत. यापूर्वी या ब्लॉगवर शाहजहानाबाद आणि तुघलकाबाद बद्दल लिहीलं आहे. शाहजहानाबाद म्हणजे आजची पुरानी दिल्ली जिथं लाल किल्ला आणि जामा मस्जिद आहे… हे दिल्लीचं सातवं शहर … घियासुद्दीन तुघलकने वसवलेलं तुघलकाबाद हे तिसरं शहर ते सुद्धा या ब्लॉगवर तुम्हाला सापडेल. आज आपण वेध घेणार आहोत दिल्लीतल्या पहिल्या शहराचा. तोमर शासकांनी लाल खडकांच्या तटबंदीने उभा केला तो लाल कोट हा दिल्लीचा जुना ‘लाल किला’. किला हा फार्सी शब्द आहे. पूर्वी या ठिकाणाला दुर्ग राय पिठोरा म्हंटले गेले. आज या तटबंदीचे अवशेष मेहरौली, साकेत, कुत्ब कॉम्प्लेक्स वसंत कुंज या भागात पाहता येतात

.तोमर शासक अनंगपाल प्रथमने ७३१ CE मध्ये दिल्ली शहरात आपली राजधानी वसवली. त्याला पुढे तटबंदी निर्माण करण्यात आली शेवटचा तोमर शासक अनंगपाल दुसऱ्याकडून. पुढे चौहान शासकांनी तोमरांना पराभूत करून दिल्लीवर वर्चस्व निर्माण केले. लाल कोटाच्या तटबंदीत भर घालून किला राय पिथौरा बांधला गेला.

कुत्ब मिनारजवळच संजय वनमध्ये जाऊन हे अवशेष पाहणे शक्य आहे. भाग थोडासा दुर्गम आहे. त्यामुळे एकट्याने जाणे टाळावे. सकाळी बरेच लोक इथं धावायला येतात त्यामुळे वर्दळ असते. झुडपांतून जाताना किडे आणि सापांची काळजी घेतली पाहिजे. फुलपॅण्ट व बूट घालून जाणे उत्तम. एक मजला उंच आणि साधारण २० फूट रुंद असलेला तटबंदीचा अवशेष मी पाहिला. काही अंतर या तटबंदीवरच्या पायवाटेने चालत जाता येते. पलीकडे दिसतो कुतुब मिनार. ज्याची निर्मिती केली महमूद घुरी म्हणजे मुईझुद्दीन इब्न समच्या बरोबर आलेल्या व गुलाम घराण्यातील पहिल्या शासकाने म्हणजे कुतबुद्दीन ऐबकने.

मामलूक घराण्याच्या शासकांनी लगेच नवे शहर वसवले नाही. उलट लाल कोट भागातील बांधकामे, मंदिरे पाडून त्यांचं शहर वसवलं. साधारणपणे अल्लाउद्दीन खिलजीच्या काळापर्यंत या शहराला महत्त्व होते. कुत्ब मिनार परिसर पाहताना या संपूर्ण काळाचे दर्शन होते. ११९२ CE ला पृथ्वीराज चौहानचा पराभव करून दिल्लीवर मोहम्मद घुरीने राज्य स्थापन केले व आपला विश्वासू गुलाम कुतुबुद्दीन ऐबकला शासक म्हणून नेमले. पुढे १२०६ मध्ये मोहम्मदाच्या मृत्यनंतर ऐबकाने स्वतःला सुलतान घोषित केले व मामलूक म्हणजे गुलाम घराण्याची सुरुवात झाली. पुढे अल्लाउद्दीन खिलजीने सिरी शहराची बांधणी १३०३ च्या सुमारास केली. तोपर्यंतचा प्रवास विविध पुरातन वास्तूंच्या माध्यमातून पाहणे शक्य आहे.



कुत्ब मिनार आता मेट्रो स्टेशन आहे तिथून बॅटरीवली रिक्षा १० रुपयांत आपल्याला कुत्ब संकुलाजवळ आणून सोडते. तिकीट काढून आत शिरताच आपल्याला एक सुंदर दार दिसते. ते मंत्र मुघल काळात बांधलेले आहे. पुढे आल्यावर आपण प्रवेश करतो एका मशिदीच्या प्रांगणात. कुवत-उल-इस्लाम म्हणजे इस्लामचं सामर्थ्य असे नाव या मशिदीला ऐबकाने दिले. गमतीचा भाग असा की जवळजवळ २७ हिंदू व जैन मंदिरे पाडून जी साधन सामग्री मिळाली ती एकत्र करूनच इस्लामच्या सामर्थ्याला जन्म दिला गेला. त्यामुळे एकाच ठिकाणी शैव/ वैष्णव/ जैन सर्व प्रकारचे कोरीव काम पाहता येते. काही ठिकाणी जुन्या शिल्पांमध्ये जिथं मानवी आकृत्या होत्या त्या मुद्दाम विद्रुप केलेल्या दिसतात.
ऐबकाचा बखरकार हसन निझामी म्हणतो – मूर्तिपूजक आणि मूर्तींना ध्वस्त करण्याच्या संकेताला धरून ऐबकाने मंदिरे पाडली आणि जेत्याप्रमाणे एक ईश्वर (अल्लाह) मानणाऱ्या लोकांची मशीद उभी राहिली (पृष्ठ ५२ पुरातत्व विभाग विश्व वारसा मालिका माहितीपुस्तक)
या खांबांची भूमिती भुरळ पडावी इतकी आकर्षक आहे. त्यात विविध कोनातून डोकावणारे प्रकाशकिरण आणि सावल्या अजून गंमत निर्माण करतात. पुढे आपण येतो ऐबक आणि शमसुद्दीन इल्तुतमिशने बांधलेल्या स्क्रीनकडे. ही दोन बांधकामं विविध काळातील विविध रचनाशैलींबद्दल आपल्याला बरंच काही सांगतात आणि हिंदू-मुस्लिम रचनापद्धतीचा विकास कसा झाला याची कल्पना आपल्याला येते.



कुतुबुद्दीन ऐबकाने बांधलेल्या कमानींवरील कोरीव काम हिंदू कारागिरांनी इस्लामी मुकादमांच्या हाताखाली बांधलेले आणि कोरलेले आहे. त्यामधील सर्पाकृती वेलबुट्टी हिंदू तर त्यातून बहरलेली फुले इस्लामी धाटणीची आहेत. अरेबिक लिपीत कोरलेल्या आयतीसुद्धा अगदी सरळ साध्या पद्धतीने कोरलेल्या दिसतात.






इल्तुतमिशच्या काळात झालेल्या कोरीवकामावर इस्लामी शैलीची छाप जास्त स्पष्टपणे दिसते. कूफिक आणि तुघरा या दोन्ही शैलीची कॅलिग्राफी आणि भारताच्या पश्चिमेला पार स्पेनपर्यंत दिसणाऱ्या सारासेनिक वळणाचे कोरीव काम आपल्याला इथं दिसून येईल. असा दावा केला जातो की भारतात कमानी बांधायला किस्टोन आणि विशिष्ट आकाराच्या दगडांची रचना केली जात नसे त्यामुळे त्या कमानी कॉर्बेल पद्धतीने बांधल्या जात – ज्यात दगड पायऱ्यांप्रमाणे रचून मग गोल आकारात कोरले जात. कुतुब मिनारजवळ मेहरौलीत बल्बनच्या मकबऱ्यात प्रथम खऱ्या कमानीचा वापर केला गेला असा दावा काही अभ्यासक करतात. काही याला चूक मानतात… दोन्ही बाजूंचे पुरावे पाहणे मजेशीर ठरेल. इल्तुतमिश आणि खिलजी दोघांनी या मशिदीचा विस्तार केला आणि मग कुत्ब मिनारही कुव्वत उल इस्लामच्या सीमेच्या आत आला.



इल्तुतमिश आणि ऐबकाच्या स्क्रिनसमोर आपल्याला दिसतो एक काळा लोखंडी स्तंभ. चौथ्या शतकात हा स्तंभ एखाद्या विष्णूच्या मंदिराचा भाग म्हणून बांधला गेला असावा आणि विष्णूचे वाहन गरुड त्यावर स्थापित करण्यात आले असावे असा कयास बांधता येतो. या स्तंभावर गुप्त शैलीच्या लिपीत कोरलेल्या लेखावरून स्पष्ट होते की चौथ्या शतकात चंद्रगुप्त दुसरा या राजाच्या काळात विष्णुपद नावाच्या ठिकाणी हा ध्वजस्तंभ उभा केला गेला असावा. अनंगपाल तोमरने हा दुसऱ्या स्थानातून इथे आणला अशी मान्यता आहे कारण इतर कोणतेही समकालीन गुप्त अवशेष कुतुब परिसरात दिसत नाहीत. अनेक शतकं लोटलेली असूनही हा स्तंभ गंजला नाही. सर रॉबर्ट हाडफिल्ड यांनी केलेल्या रासायनिक तपासणीप्रमाणे या स्तंभात ९९.७२०% शुद्ध लोखंड आहे. वैज्ञानिकांनी असाही निष्कर्ष काढलाय की हे काम साच्यातील नसून फोर्ज केलेल्या लोखंडाचे आहे – संदर्भ जे पेज गाईड टू कुत्ब आणि ASI माहिती पुस्तक पण क्रमांक ५७ थोडक्यात काय तर चौथ्या शतकात भारतात उत्कृत्ष्ट दर्जाचं लोखंड ओतलं जाऊ शकत होतं. भारतीय पारंपरिक विज्ञानात शिकण्याजोगं बरंच काही आहे पण त्यासाठी वैदिक विमाने उडवण्याऐवजी असे चोख पुरावे एकत्र करावे लागतील. नाहीतर तेजोमहालयाच्या भाकडकथांसारखं व्हायचं!


हा स्तंभ मध्य प्रदेशातील विदिशाजवळ असलेल्या उदयगिरीहून आणला गेला असावा असं काही अभ्यासक मानतात. हा जग जिंकणाऱ्या राजाचा विष्णुभक्त राजाचा कीर्ती-स्तंभ आहे हे वाचून अल्लाउद्दीन खिलजीसारख्या महत्त्वाकांक्षी सुलतानाने काय विचार केला असेल असा प्रश्न पडतो.
अफगाण सुलतान जिथून आले त्या गझनीजवळ कुतुब मिनारासारखेच मिनार आहेत. पश्चिम अफगाणिस्तानात जामचा मिनार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिनार कुतुब मिनारच्या 10 वर्षे आधी बांधला गेला असावा आणि त्यातूनच कुतुबुद्दीन ऐबकाला कुत्ब मिनार बांधण्याची कल्पना सुचली असावी असं म्हणता येईल. जामचा मिनार गझनवीद राज्यावर विजय मिळाला म्हणून बांधला गेला आणि त्याची उंची ६० मीटर आहे. हा मिनार घुरींना पृथ्वीराजवर विजय मिळाला म्हणून बांधला असेही काही ब्रिटिश पुरातत्ववेत्ते मानतात.
७० मीटरपेक्षा अधिक उंचीचा कुत्ब मिनार दक्षिण दिल्लीत अनेकदा क्षितिजावर दिसतो. ११९९ CE मध्ये बांधकामाला सुरुवात केली कुतुबुद्दीन ऐबकने तर पूर्ण झाला असावा अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात … खिलजीने स्वतः असा अजून एक मिनार बांधायचा प्रयत्न सुरु केला ज्याचं नाव होतं अल्ला-इ-मिनार. पण सुमारे २५ मीटर बांधकाम झाल्यावर खिलजी मरण पावला असावा आणि मग हा प्रकल्प गुंडाळून ठेवला गेला.

या मिनारच्या तीन टप्प्यांवर कोरीव काम आणि बाल्कनी आहे.stalactite vaulting (ज्याला अरेबिकमध्ये मोकाराब किंवा मुकारना म्हणतात) या पद्धतीचा वापर करून हे छज्जे बांधलेले आहेत. पुढे तीनदा या मिनारावर वीज पडली व पुन्हा पुन्हा अगदी फिरुज शाह तुघलकच्या काळापर्यंत याची दुरुस्ती करावी लागली. लोधी शासकांच्या काळातही दुरुस्ती केली जाऊन संगमरवरासारखे नवे पैलू जोडले गेले असावेत.





मिनारच्या कोरीवकामात आपल्याला नक्ष पद्धतीच्या अक्षरांची सजावट दिसते. पूर्वी या मिनारच्या शीर्षावर असलेल्या जुन्या कपोलाचे (शिखराच्या डोमचे)१८०३ CE मध्ये झालेल्या भूकंपात नुकसान झाल्यामुळे मेजर स्मिथने कपोला बांधला. तेव्हा १७००० रुपयांचे बजेट त्यासाठी देण्यात आले. पण इंडो-सॅरसेनिक शैलीच्या मिनारावर हा बंगाली छत्री पद्धतीचा कपोला विजोड वाटू लागला आणि लॉर्ड हार्डिंजने तो कपोला काढून बसवला बागेत. त्याला आज स्मिथची फॉली (चूक) म्हणून ओळखले जाते.




शमसुद्दीन इल्तुतमिशचा मकबराही याच आवारात आहे. सुंदर कोरीवकाम पण घुमट कोसळल्याने खुल्या आकाशाखाली असलेली कबर असा इथला देखावा. या मकबऱ्याला तीन मेहराबी आहेत. अरेबिक पद्धतीची फुलांची नक्षी सर्व भिंतींवर कोरलेली दिसते आणि काही ठिकाणी हिंदू शैलीचे मोटिफ असणारी वेलबुट्टीही दिसते. squinch पद्धतीच्या कमानी हे या मकबऱ्याचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येईल.






इथं असलेला अजून एक मकबरा म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीचा मकबरा व त्याला जोडून असलेला मदरसा. मुख्य मकबऱ्याचा घुमट कोसळलेला दिसतो पण मदरशावरील घुमट शाबूत आहेत. हिंदू शैलीच्या कोनिकल डोमपेक्षा हे घुमट गोल पेंडेंटिव्ह पद्धतीने बांधलेले असल्याने वेगळे दिसतात.. या इस्लामिक शैलीचा वापर इथून पुढे अनेक ठिकाणी दिसतो. खिलजीच्या मकबऱ्याचे काम सेलजुक पद्धतीने झाले असे तज्ज्ञ मानतात. मध्य आशियातील सेलजुक घराणे असत झाल्यावर भारतात तुलनेने स्थिर परिस्थिती असल्याने ते कारागीर कामाच्या, आश्रयाच्या शोधात आले अशी मान्यता आहे.







इमाम जमीनचा मकबरा हा या परिसरातील तिसरा मकबरा. पण हा पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला सिकंदर लोधीच्या कारकिर्दीत बांधला गेला असावा. तुर्कस्तानहून आलेल्या इमाम जमीन उर्फ मोहम्मद अली कडे कुवत-उल-इस्लाम मशिदीमधील महत्त्वाचे अधिकारपद असावे म्हणून त्याच्या कबरीला तिथं जवळ स्थान मिळालं असावं असा कयास आहे. स्टुको किंवा जाळीकामाचे सुंदर नमुने आपल्याला तिथं पाहता येतात. लाल वालुकाश्म आणि संगमरवर यांचा मिलाफ आपल्याला दिसतो.



उंच कुतुबमिनार प्रसिद्ध आहे त्याच्या पायथ्याशी असलेल्या दरवाजाकडे लोकांचं लक्ष तितकंसं जात नाही. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात हा दरवाजा बांधण्यात आला म्हणून याचे नाव अल्लाह-इ-दरवाजा. या दरवाजाचे कोरीव काम इतके सुंदर आहे की फक्त हा दरवाजाच एक पुरातन वास्तू म्हणून अभ्यासावा लागेल. इस्लामिक रचनापद्धतीची कलाकुसर, समतोलता, भौमितीय अचूकपणा आणि त्याच्या जोडीला हिंदू-जैन पद्धतीचे मोटिफ. कमळाच्या कळ्यांचे तोरण दरवाजाच्या सर्व कमानींना सजावट देते. दरवाजाच्या आतील व बाहेरील कोरीवकाम खरोखर शब्दांच्या पलीकडचं आहे.







कुतुब मिनारची कुवत उल इस्लाम मशीद बांधताना हिंदू-जैन मंदिरे पडून त्याचे स्तंभ वापरले गेले हा अधिकृत इतिहास आहे .. पण तरीही वास्तू म्हणून किंवा मटेरियल कल्चरच्या दृष्टीने कुतुब मिनार हा महत्त्वाचा वारसा आहेच भारताचा. वेरूळचे दशावतार लेणे बौद्ध गुंफेला वापरून कोरले गेले या आधारावर आज वेरूळला नावं ठेवणार का? जरी गोव्यातील देवालये तोडून चर्चेस बांधली गेली तरीही ओल्ड गोवा चर्चेज हा भारताचाच काय विश्व वारसा आहेच. उद्या इंडोनेशिया मुस्लिम बहुल आहे म्हणून तिथल्या हिंदू मंदिरांचा विरोध केलेला किंवा कंबोडियात कशाला मंदिर पाहिजे म्हणून अंगकोर वाटचा विरोध केला तर आपल्याला पटेल का? इतिहास तर वस्तुनिष्ठपणे अभ्यासायला हवाच पण पुरातन वास्तू म्हणजे काही फक्त ऐतिहासिक वारसा नव्हे … तो आपल्या देशाचा डिझाईनचा, कलेचा, मूर्त संस्कृतीचा वारसा आहे आणि तो कोणत्याही उपासना पद्धतीशी जोडलेला असला तरीही जपायला हवा असं मला वाटतं … याची दुसरी बाजू ही फक्त मुघल गोष्टींना हाइप केले जाणे ही सुद्धा आहे. हिंदू सोडा दिल्लीत अनेक इतर मुसलमान शासकानी बांधलेल्या अनेक इमारती आहेत पण त्या दुर्लक्षित आहेत त्याचा शोध घेताना पुढच्या वेळेला आपण जाऊ शेरशहा सूरच्या काळात शेरगढ शहर पाहायला.
Achat kalabaji
Pingback: टाइम मशीनमधून दिल्लीचा प्रवास | Chinmaye