देव आहे की नाही मला ठाऊक नाही आणि मला व्यक्तिशः त्याच्या असण्या-नसण्याने फरक पडत नाही, म्हणजे व्याख्या करायची असेल तर मी अज्ञेयवादी आहे. देव नाहीच्च असं म्हणणारे निरीश्वरवादी आणि देव आहे म्हणणारे सश्रद्ध किंवा सेश्वरवादी. आस्तिक आणि नास्तिक हे शब्द मूलतः खूपच सरळधोपट आणि चुकीच्या पद्धतीने वापरले जातात.. आस्तिक म्हणजे वेदांचे शब्दप्रामाण्य आणि अपौरूषत्व मानणारा आणि तसे न मानणारा म्हणजे नास्तिक. बरेचदा संस्कृती म्हणजे सश्रद्ध असणे आणि धार्मिक कर्मकांड अशी अतिसुलभ समजूत असणारी मंडळी गल्लत करत असतात आणि तसं ते फार आग्रहीपणे करतात.. सणवार असले म्हणजे दोन्हीकडील आग्रही मंडळींना ऊत येतो आणि त्यातून एकमेकांना लेबले लावण्यापलीकडे फारसं काही साधत नाही. बरेचदा सेश्वरवादी मंडळींची तक्रार असते की सण आला म्हणजे निरीश्वरवादी मंडळी उद्दामपणा करतात, मुद्दाम काहीतरी प्रोव्होक करणाऱ्या गोष्टी करतात स्वतःच्या मान्यतेचा मानभावीपणे बडेजाव करतात इत्यादी इत्यादी. अजून एक म्हणणं असं आहे की यांच्या स्वतःच्या श्रद्धा-विश्वास असतात आणि त्यात गोंधळ असतो… हे सगळेच आक्षेप मला मान्य आहेत. अशी मंडळी आहेत हे खरेच आहे. १२वी आर्टस् केलेले लोक इसरोच्या वैज्ञानिकांना बुद्धिप्रामाण्यवादाचे धडे देतात हा बावळटपणा आहे असाही एक मुद्दा आला. माझं म्हणणं इतकंच की अगदी याच या नि इतक्याच उद्दाम पद्धतीने वागणारे सेश्वरवादी मी ४३ वर्षांच्या आयुष्यात पाहिलेले आहेत… आणि श्रद्धाळू मंडळींच्या भावनांना जपायचं म्हणून आपल्या तत्वांना मुरड घालून त्यांच्याशी जुळवून घेणारे निरीश्वरवादीही खूप आहेत. मी सहसा या चर्चेकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो पण काल मला कौटुंबिक ग्रुपवर एक अचाट मेसेज आला.. आणि नंतर विभावरी ताईंची पोस्टही वाचली त्यामुळे दुसरी बाजू मांडावी असं वाटलं..


मेसेजचा गोषवारा असा की आपल्या सश्रद्ध बायकोच्या भावना पायदळी तुडवून एक निरीश्वरवादी माणूस देवघर रिकामे करून देव नदीत बुडवायला निघालेला असतो.. तो बंगल्याबाहेर पडणार इतक्यात त्याची मुलगी रडत रडत घरी येते आणि सांगते की तिने घडवलेला मातीचा बाप्पा कुण्या द्वाड मुलाने तोडून टाकला.. आपल्या मुलीचे दुःख दिसल्याने त्या निरीश्वरवादी माणसाला देवाच्या शक्तीची प्रचिती आली आणि तो सुधारला.. निरीश्वरवादी माणूस म्हणजे प्रचंड असहिष्णू उद्दाम सतत काहीतरी तोडफोड करायला निघालेला, विचारांमध्ये स्पष्टता नसलेला, नकारात्मक धारणांनी लिप्त आणि नात्याची सत्ता गाजवणारा आणि स्वतःला काहीतरी भयंकर विलक्षण अनुभव आल्यावर किंवा आव्हान पुढे ठाकल्यावर अचानकपणे यू-टर्न घेणारा माणूस असं एक स्टिरिओटिपिकल चित्र मांडलं जातं. याच्या वरचा एक निष्कर्ष म्हणजे निरीश्वरवादी असल्याने यांची नैतिक बैठक पक्की नसते हा सुद्धा आहे.. अशाप्रकारचे दुराग्रही ‘नास्तिक’ आजूबाजूला दिसतात यात वाद नाही.. पण हे एक stereotypical generalisation आहे.

वस्तुतः कोणाची ईश्वरावर श्रद्धा असेल, त्यातून त्याला काही सकारात्मक मानसिक शक्ती मिळत असेल, मांगल्यपूर्ण अनुभूती मिळत असेल आणि ती व्यक्ती समकालीन मानवी कायदे, नैतिकता आणि विवेकाच्या चौकटीत वागत असेल.. इतरांच्या विचारस्वातंत्र्याचा आदर करत असेल तर कोणालाही आक्षेप असण्याचे काहीही कारण नाहीए. जिम कॉर्बेटने एका गोष्टीत लिहिलं आहे की त्याच्याबरोबर शिकारीला येणाऱ्या कुमाऊंनी, गढवाली मंडळींच्या काही श्रद्धा असत.. त्या सगळ्याच पटत नसल्या तरीही त्यांची मनःस्थिती ठीक राहावी आणि कार्यसिद्धी व्हावी यासाठी तो कोणतीही आडकाठी करत नसे. इसरोच्या बालाजीचेही तेच आहे असे मला वाटते. लोकांना क्लिनिकल बुद्धिप्रामाण्यवादी बनवणे हे इसरोचे प्राथमिक ध्येय नसून रॉकेट-सॅटेलाईट या क्षेत्रात भरीव कामगिरी करून भारताच्या विकासात योगदान देणे, त्यासाठी कमीत कमी निधीत जास्तीत जास्त गोष्टी साध्य करणे हे इसरोचे मुख्य काम आहे आणि ते उत्तम पार पाडले जात आहे. दुसरे उत्तम उदाहरण भारतीय सैन्याचे विशेषतः इन्फन्ट्रीचे देता येईल. गोरखा रायफल्समध्ये एखादा अहिंदू किंवा निरीश्वरवादी गेला तरीही त्याचा युद्धघोष जय महाकाली आयो गोरखालीच असणार आहे… तेव्हा आपापल्या तात्विक भूमिकांचे स्तोम किती माजवायचे याचा विवेक प्रत्येकाला हवा. हा विवेक श्रद्धाळू मंडळींच्या बाबतीत जास्त असतो असं मला कधीही जाणवलेलं नाही.
नात्यातील सत्ता वापरून इतरांना आपल्या मान्यतेप्रमाणे वागायला भाग पाडणे.. त्या गोष्टी घराच्या शिस्त परंपरेचा भाग आहे म्हणून सगळ्यांवर लादणे.. कालबाह्य झालेल्या आणि आजच्या दृष्टीने अनैतिक रूढी परंपरांना घट्ट चिकटून बसणे आणि प्रसंगी त्यांना आव्हान दिले जात असेल तर आकांड-तांडव करणे असं वागणारे कित्येक सेश्वरवादी ज्येष्ठ घरोघरी आहेत. स्त्रियांच्या मासिक धर्माला विटाळ मानणे, सवाष्ण-विधवा भेद मानणे.. सणाच्या-संस्काराच्या मूळ गाभ्याला समजून न घेता प्रतीकात्मक कर्मकांडाच्या अचूकतेचा दुराग्रही अभिमान बाळगणे.. मग पुढं जाऊन आम्ही करतो ती खरी पूजा इतर करतात ते कम-अस्सल असा अहंकार बाळगणे याची उदाहरणे कमी नाहीत.
मला हिंदू धर्मातील विशेषतः भगवद्गीतेतील दोन सूत्रे फार महत्वाची वाटतात.. एक म्हणजे प्रारब्ध-नियती आणि फलप्राप्तीपेक्षा कर्म आणि पुरुषार्थावर भर आणि फळाची आसक्ती न बाळगता तुम्ही धारण केलेला धर्म (purpose) साध्य करणारी कर्मे जीवित आहोत तोवर करत राहणे हे अतिशय साधे पण सशक्त तत्वज्ञान आणि दुसरे म्हणजे लोकसंग्रह करण्याला दिलेले महत्व. पण बहुतेक ‘सेश्वरवादी’ मंडळींनी स्वतःचा असा काहीच अध्यात्मिक विचार केलेला नसतो. कोणीतरी सांगितलं आम्ही ते केलं हे डोळे मिटून अनुकरण करत राहण्याच्या श्रद्धेचे त्या गोष्टीला rigidly करत राहण्याच्या अभिनिवेशात कधी रूपांतर होते हे त्यांना समजत नाही.
सतराव्या वर्षी नाथद्वारा येथे श्रीनाथजी मंदिरात गेलो होतो. पहाटेच्या वेळेला दर्शनाची वाट पाहत स्त्री पुरुष रांगा थांबल्या होत्या. माझ्या पुढे कडेवर 3 वर्षांच्या मुलीला घेऊन तिचा बाबा उभा होता. तिथं पंधरा वीस मिनिटे फक्त दर्शन होत असे मग पुन्हा बंद.. दार उघडले आणि रांगेची शिस्त सोडून लोक धावत सुटले. हा माणूस पाय घसरून पडला आणि त्याची मुलगी सुद्धा पडून रडायला लागली. मी आणि दोघे तिघे जण सोडून सगळे याची पर्वा न करता अरुंद जागेतून त्या दोघांना तुडवत पुढे गेले. त्याला सावरून उभे केल्यावर आम्ही दर्शनाला गेलो. पुजाऱ्याने घाईघाईने आमचे डोके समोरच्या लाकडी दांडीवर आपटले आणि पुढे ढकलले. अशा ठिकाणी श्रद्धाळू लोकांचे सर्व कर्मकांड नियम काटेकोरपणे पाळूनही देवाचे वास्तव्य असेल असं मला तरी वाटत नाही. केशवराजच्या विष्णू मंदिरात जे मांगल्य, मनःशांती मी अनुभवली आहे ती मला तिथं जाणवली नाही. कदाचित माझीच कमतरता असेल. विषादयोगात अडकलेल्या अर्जुनाला तू तुझ्या धर्माचे पालन कर, फळ-परिणाम माझ्यावर सोड म्हणणारा भगवान श्रीकृष्ण, सत्यनारायण झाल्यावर प्रसाद खा नाहीतर वाईट परिणाम होतील अशी धमकी देणारा मतलबी कसा होईल? प्रजेचे वादळ पावसापासून रक्षण करायला गोवर्धन पर्वत उचलणाऱ्या श्रीकृष्णाला केवळ १५ मिनिटांत दर्शन घ्यायचं आहे म्हणून लोकांना पायदळी तुडवून जायबंदी करून बेदरकारपणे पुढे जाणे पटेल?
आणि जेव्हा एकाच कुटुंबात सेश्वरवादी आणि निरीश्वरवादी अशी दोन्ही प्रकारची मंडळी असतात तेव्हा बहुतेक ठिकाणी सामायिक गोष्टींमध्ये सेश्वरवादी लोकांचे आग्रहच वरचढ ठरतात. देव मानणे हा प्रत्येकाचा संवैधानिक हक्क आहे.. पण त्याच्या पुढे फलज्योतिष, मुहूर्त, विटाळ, सवाष्ण वगैरे प्रकार लोकांवर लादले जायला लागतात तेव्हा सगळं अट्टाग्रही आणि लोकसंग्रहाला आणि पर्यायाने हिंदू धर्माला हानिकारक होऊ लागतं. यात तुमच्या आयुष्याचा धर्म काय? purpose काय वगैरे महत्वाच्या गोष्टी बाजूला राहतात. युद्धाच्या आधी कोणी पूजा करून निघत असेल तर ठीकच आहे.. पण लढाईला सामरिक दृष्टीने अनुकूल वेळ पाहण्यापेक्षा कोणी जर पत्रिका घेऊन मुहूर्त पाहत बसला तर शत्रू कधी तुम्हाला चोप देऊन जाईल हे कळणारही नाही.. हल्ली तर अनेक हिंदुहितवादी लवचिकपणा सहिष्णुता ही हिंदू धर्माची बलस्थाने आहेत हे विसरून अब्राहमी धर्मांच्या कट्टरतेने हिंदूने वागावे हा आग्रह धरू लागले आहेत.. बरं त्याचा त्रास हिंदू बहुसंख्य देशात हिंदू माणसालाच जास्त होतो हेही यांना कळत नाही. आमच्या परिसरात जिथं पूर्वी २ मंडळे होती तिथं आता ६ आहेत.. .. गल्ली तितकीच छोटी पण मूर्त्या मोठ्या झाल्या आहेत.. तिथं हॉस्पिटल आहे हे विसरून रात्रीबेरात्री डीजे आणि फटाके वाजवणे सुरु असते.. तेव्हा या सेश्वरवादी मंडळींचा विवेक कुठं गेलेला असतो? नैतिकता कुठे असते? देव मानणे किंवा न मानणे याचा माणूस नैतिक वागतो की नाही याच्याशी काहीही संबंध नाही. वाईटात वाईट फौजदारी गुन्हे केलेली मंडळी निरीश्वरवादी किंवा श्रद्धाळू कोणीही असू शकतात.
या सगळ्या गोष्टी पाहताना मला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न महामहोपाध्याय पा वा काणे यांची मांडणी इंटरेस्टिंग वाटते. सावरकर लिहितात –
कोणत्या हेतूने वा हेतूवाचून हे जगड्व्याळ विश्व प्रेरित झाले ते मनुष्याला तर्किता देखील येणे शक्य नाही. जाणता येणे शक्य आहे ते इतकेच की, काही झाले तरी मनुष्य हा ह्या विश्वाच्या देवाच्या खिसगणतीतही नाही, जशी कीड, मुंगी, माशी, तसाच ह्या अनादि अनंत कालाच्या असंख्य उलाढालीतील हा मनुष्यही एक अत्यंत तात्पुरता आणि अत्यंत तुच्छ परिणाम होय. त्याला खायला मिळावे म्हणून धान्य उगवत नाही, फळे पिकत नाहीत. कोथिंबीर खमंग झालेली नाही. धान्यपिकते म्हणून तो ते खाऊ शकतो, इतकेच काय ते. त्याला पाणी मिळावे म्हणून नद्या वाहत नाहीत. नद्या वाहतात म्हणून पाणी मिळते इतकेच काय ते. पृथ्वीवर जेव्हा नुसत्या प्रचंड सुसरीच सुसरी नांदत होत्या नि मनुष्याचा मागमूसही नव्हता तेव्हाही नद्या वाहत होत्या, झाडे फुलत होती, वेली फुलत होत्या, मनुष्यावाचून तर काय, पृथ्वी नव्हती तेव्हांही हा सूर्य असाच आकाशात भटकत फिरण्यास भीत नव्हता, आणि या सूर्यही जरी त्याच्या सार्या ग्रहोपग्रहांसुद्धा हरवला तरी, एक काजवा मेला तर पृथ्वीला जितके चुकलेसे वाटते तितके देखील या सुविशाल विश्वाला चुकलेसे वाटणार नाही. ह्या विश्वाच्या देवाला ओक पलाचेही सुतक, असे शंभर सूर्य एखाद्या साथीत एका दिवीसात जरी मरू लागले तरी धरावे लागणार नाही! पतित पावन मंदिर प्रवेशाच्या वेळेला काशीच्या पंडितांनी पुराणोक्ताचा आग्रह धरल्यावर सावरकरांनी घेतलेली भूमिका रोखठोक होती.
“तुम्ही मंडळींनी वेदोक्त विधी करू म्हणून मान्य केल्याचे पत्री आम्हाला कळविले. मी माझ्या पत्रात वेदोक्ताचा अर्थ स्पष्ट कळवला होता. त्यावर आक्षेप न घेता आपण काशीसारख्या अंतरावरून इथं आलात. मला जन्माने ब्राम्हण तो पुरोहित हे तत्वही मान्य नाही. पण कीर शेठजींची इच्छा ब्राम्हण हवेत म्हणून अडलो. पण आपण जर आता नाकाराल तर आजचा मुहूर्त टळून कार्य रद्द होईल असे जर कोणी अडवू म्हणत असेल तर ते कदापि घडणार नाही… हा जो इथं मराठा, महार, चांभार, भंडारी, ब्राम्हण, भंगी अखिल हिंदुसमाज दाटलेला आहे त्या शतावधी धर्मबांधवांसह आम्ही ही देवमूर्ती अनंत हस्ती उचलून जय देवा असे गर्जून स्थापणार. हाच आमचा विधी! हिंदू धर्म की जय असे हजारो कंठांतून निघणारे जयघोष हाच आमचा वेदघोष आणि भावे हि विद्यते देव: हाच आमचा शास्त्राधार. पण तरीही काशीच्या पंडितांनी हे कार्य पार पाडले नाही. मसूरकर महाराजांच्या आश्रमातील वेदशास्त्र संपन्न गणेश शास्त्री मोडक यांनी वेदोक्त विधीने यथाशास्त्र पूजा सांगून कीरांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
हिंदू धर्मशास्त्राचा सखोल अभ्यास करून त्याचे सार ६ हजार पानी ग्रंथात आणणारे महामहोपाध्याय काणे दिवसाला फक्त २ मिनिटे देवपूजेला देत असत. अंघोळी नंतर घरातील देवासमोर उभे राहून नमस्कार करणे आणि जेवताना चित्राहुती देणे एवढेच त्यांचे दैनंदिन कर्मकांड. त्यांच्या मुलाने पुनर्विवाह करत असताना एका विधवेशी लग्न केले आणि तेही मर्यादित विधी आणि नोंदणी करून.. त्यालाही साक्षीदार म्हणून सही करून मान्यता द्यायला ते सहभागी झाले. पुढं धर्म-निर्णय मंडळासारख्या संस्थांनी सर्व विधी-कर्मकांडांचा अभ्यास करून काही सुधारणा आणल्या ज्या आज ज्ञानप्रबोधिनी पद्धत म्हणून प्रचलित आहेत. पंढरपूर देवालयाच्या मुख्य अर्चकाने केशवपन न केलेल्या विधवांच्या दर्शनावर मर्यादा आणली तेव्हा व्यथित झालेल्या एका महिलेने महामहोपाध्याय काणेंशी संपर्क केला.. त्यांनी त्या महिलेची केस घेतली. मुद्दा पुरावे अन संदर्भांवर आला तेव्हा त्या मुख्य अर्चकासाठी पूज्य अशा त्याच्या वडीलांच्या पुस्तकातील अभिप्राय काणेंनी समोर मांडला कारण त्या मुख्य-अर्चकाच्या मते त्याच्या वडीलांचा शब्द न शब्द त्याच्यासाठी निर्णायक होता. .. पुस्तक खरे आहे हे सर्वानी मान्य केल्यानंतर काणेंनी मजकूर वाचला की केशवपन केले असो किंवा नसो, विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी विधवा स्त्रीवर इतर सामान्य भक्तांपेक्षा कोणतेही वेगळे निर्बंध लागू नाहीत आणि तिला दर्शन मिळू शकते. इथं केस संपली आणि त्या विधवा स्त्रीला अपेक्षित दर्शन मिळाले. इथं दिसतं की या मुख्य अर्चकाने स्वतः त्याच्यासाठी गुरुस्थानी असलेल्या विद्वानाचा ग्रंथ वाचला नव्हता पण महामहोपाध्याय काणेंनी तो वाचला होता कारण त्यांचे आयुष्यच हिंदू धर्मशास्त्राच्या अभ्यासाला वाहिलेले होते.
तुम्ही ‘आस्तिक’ असा किंवा ‘नास्तिक’ तुम्ही कितपत डोळस आणि स्वतंत्र विचार करून स्वतःचा शोध घेऊन तिथवर पोहोचलात हे महत्वाचं आहे.. नाहीतर तुमची वागणूक अंध-अभिनिवेशी, अविवेकी आणि उथळ असणार हे फारसं आश्चर्यकारक नाही. मला विचाराल तर नास्तिक असल्याचा अहंकार बाळगून इकडेतिकडे खिल्ली उडवत फिरणारे आणि इतर धर्मांची समीक्षा करायची वेळ आल्यावर शेपूट घालणारे.. आणि आपण देव मानतो आणि आपल्या घरात विविध कर्मकांडे किती काटेकोरपणे पार पडतात याचा अहंकार बाळगून इतरांच्या मतांना कम-अस्सल मानणारे आपले विचार त्यांच्यावर लादू पाहणारे दोघेही अविवेकी आणि तापदायकच!