प्रस्तावना

बऱ्याच दिवसांपासून याबद्दल लिहायचं मनात होतं.. पण विषय गुंतागुंतीचा असल्याने टाळत आलो आहे.. या विषयाला कितीतरी पैलू आहेत.. चाळीस वर्षांच्या आयुष्यात धारणांनी विविध वळणे घेतलेली आहेत.. सगळं काही लिहिलं तर लांबलचक निबंध व्हायचा.. न लिहावं तर लिखाण वरवरचं किंवा अपूर्ण होईल .. किंवा दीर्घ लिहिलं तरी त्यात सुसूत्रता येणार नाही अशीही भीती.. पण समर्थ रामदासांच्या दिसामाजी काहीतरी लिहावे ला स्मरून प्रयत्न करायला हरकत नाही.. फक्त काही विषय (किंवा हल्ली तर सगळेच) असे असतात की त्याला हात घातला म्हणजे कोणाच्यातरी भावना दुखावणार, वाद होणार याचे दडपण येतेच.. ते दडपण म्हणून घेतले नाही तरी मी स्वभावाने असंवेदनशील म्हणावा इतका मूर्तिभंजक विचारांचा माणूस नाही.. पण कितीही जपून लिहिलं बोललं तरीही भावुक माणसाच्या भावना दुखावतातच त्यामुळे व्यक्त होणे टाळण्यातही फार काही उपयोग आहे असं नाही.. त्यामुळे सुचेल तसं लिहीत जातोय..
पूर्वपीठिका
माझ्या घरी दोन्ही बाजूंचे आजोबा व्यवसायाने पौरोहित्य करणारे होते. पण आईवडील निरीश्वरवादी नसले तरीही अगदी काटेकोर कर्मकांडांचा आग्रह धरणारे कर्मठही नव्हते.. जसा भाव तसा देव या भावनेने ते त्यांच्या पद्धतीने उपासना करत आलेले आहेत. आजी आणि आईची गजानन महाराजांवर श्रद्धा होती.. त्यामुळे काही काळ मी ती पोथी वाचलेली आहे.. दर संकष्टीला अथर्वशीर्ष आवर्तन आणि अभिषेकही होत असे.. बाबा खगोल अभ्यासक होते आणि विज्ञान प्रचारक होते. काही काळ त्यांनी नेहरू तारांगणात काम केले आणि यथाशक्ती बृहन्मुंबई महानगपालिकेच्या शाळांमध्ये विज्ञान प्रचार प्रसाराचे काम केले.. मराठी विज्ञान परिषदेची मासिके घरी येत असत. बाबा माझ्याप्रमाणेच फलज्योतिषाला आणि प्रारब्ध वगैरे संकल्पनांना न मानणारे होते.. मी साधारणपणे सातवी आठवी पर्यंत मी या बाबतीत माझे डोके न चालवता घरचे जे काही म्हणतील ते करत असे.. आमच्या कडे देवपूजा रोज होत असे… घरातील नित्यकर्म म्हणून मी ती अनेकदा करत असे.. पण मुहूर्त पाहणे.. अडचण आली तर पत्रिका पाहून मार्गदर्शन घेणे.. अमावस्या ग्रहण वगैरेंना अशुभ मानणे असलं काही घरी झालं नाही.. माझा जवळचा आत्तेभाऊ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक आणि कार्यकर्ता आहे.. माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा तो काही काळ सहकारी सुद्धा होता. त्यांच्या घरी अनेकदा गणपतीला जात असे… त्यांच्याकडं सर्व जातींचे गणपतीला मानणारे लोक दरवर्षी येत असत.. एकत्र आरती प्रसाद होत असे.. आई बाबा दोघांचेही सर्व जाती धर्मांचे मित्र मैत्रिणी होते त्यामुळे हा अमुक तो तमुक असं काही कधी वाटलं नाही.. पण आठवी संपता संपता तीन लोकांचं लेखन माझ्या वाचण्यात आलं.. डॉ अब्राहम कोवूर, डॉ नरेंद्र दाभोळकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर.. त्याच वेळेला युरोपियन राज्यक्रांती बद्दल वाचलं.. प्रोटेस्टंट-कॅथलिक संघर्षाबद्दल वाचलं.. युरोपात झालेली विज्ञानाची प्रगती आणि त्याबरोबर झालेली राहणीमानातील सुधारणा.. विज्ञान तंत्रज्ञान विकास औद्योगिक क्रांती याबद्दल वाचलं.. एकेकाळी खगोलविज्ञान आणि गुंतागुंतीच्या मेटलर्जीत सुद्धा पारंगत असलेल्या भारताचा आक्रमक मंडळींनी कसा पराभव केला तेही लक्षात यायला लागलं.. मध्ययुगीन काळात काहीतरी गडबड झाली एवढं नक्की… पण तोफखाना नाही.. बंदुका नाहीत.. दारुगोळा नाही.. जहाजबांधणीचे कौशल्य विस्मृतीत गेलेले.. युरोपियन प्रवाशांप्रमाणे जगभर हिंडून ज्ञान गोळा करण्याची व्यापार करण्याची महत्त्वाकांक्षा अभावाने आढळणे.. हे सगळं जाणवायला लागलं.. आणि अनेक प्रश्न पडू लागले.. एक गोष्ट पाश्चिमात्य आणि पौर्वात्य विचारकांमध्ये समान वाटली ती म्हणजे कोणीतरी काहीतरी सांगितलं आहे म्हणून श्रद्धा ठेवू नका.. स्वतःच शोध घेऊन आपल्या धारणा ठरवा.. त्यासाठी शक्य असेल तिथं प्राथमिक साधने स्वतः तपासा.. मग विश्वास ठेवा.. काहीतरी स्वीकारण्यापूर्वी किंवा नाकारण्यापूर्वी त्या विषयाची सखोल माहिती घेतली पाहिजे.. हे मात्र नक्की पटले…गीतेची रचना विविध वेद उपनिषदे पुराणे यांचे सार एकत्र आणून हिंदू दर्शने लोकाभिमुख व्हावी यासाठी संवादरूपात झाली.. विषादयोगात अडकलेल्या माणसाला मार्गदर्शन करणे हा त्याचा संवाद मार्ग आणि कर्मयोग मुख्य आशय … पण तरीही मूळ गीता संस्कृत… समजायला कठीण.. संत ज्ञानेश्वरांनी गीतेचे सार मराठीत त्यासाठीच तर आणले.. त्यामुळे कर्मकांड म्हणून पूजा अर्चना करण्यापेक्षा वाचन आणि विचारांच्या मार्गाने जाणे मला जास्त श्रेयस्कर वाटू लागले..
विचार करायला लावणाऱ्या काही घटना –
१) आई बरोबर राजस्थानमधील एका नामांकित देवळात पहाटेच्या दर्शनाला गेलो होतो.. स्त्री पुरुषांची रांग वेगळी होती.. आमच्या रांगेत माझ्या पुढे दर्शनाला आलेला माणूस कडेवर दोन दीड वर्षाच्या मुलाला घेऊन उभा होता.. तिथं देव उठला की काही वेळासाठी मंदिराची दारे उघडली जातात आणि तेवढ्या वेळात पटकन दर्शन घ्यावे लागते असं काहीसं आहे.. त्यामुळे दरवाजा उघडल्यानंतर मंडळी धावत सुटली आणि चेंगराचेंगरी होऊ लागली.. माझ्या पुढं असलेला माणूस पाय अडकून त्याच्या मुलासकट खाली पडला आणि आम्ही त्याला उभं राहूदेत म्हणून थांबलो तर मागून येणाऱ्या लोंढ्याने धक्काबुक्की सुरु केली त्यात अजून दोघेजण पडले.. त्या सगळ्यांना पायदळी तुडवून लोक धावत होते.. दर्शन मिळावं म्हणून.. कसंबसं गर्दीला थांबवून बापलेकाला पोलिसांनी बाहेर काढले आणि उपचाराला नेले.. मी दर्शन घेतले.. दर्शन घेतले म्हणजे मंदिरातील माणसाने माझे डोके गाभाऱ्या समोरच्या बार वर आपटले आणि पुढं ढकलले.. तिथल्या भक्तीत न मला विवेक दिसला ना त्या ठिकाणी काही मांगल्य आहे असं वाटलं.. सेश्वरवादी माणूस हा निरीश्वरवादी माणसापेक्षा जास्त विवेकशील आणि विनयशील असतो असं नेहमी सांगितलं जातं .. तिथं काही तसं दिसलं नाही..
२) आमच्या नात्यातील एका लग्नाला गेलो होतो… मुलाचे वडील लहानपणी गेले.. आईने एकटीने दोन मुलांचे समर्थपणे पोषण संगोपन केले होते.. पण विवाह विधी मात्र तिने केले नाहीत.. मुलाच्या काका काकूनी केले.. का तर या विधवा होत्या म्हणून.. याला नेमका आधार काय असं गुरुजींना विचारलं तर हे शास्त्र आहे, परंपरा आहे.. नसत्या शंका विचारू नको अशी उद्धट उत्तरे मिळाली फक्त.. विवाह होऊन नवरा जीवित असलेली स्त्री अशी वेगळी श्रेणी बनवून काहीतरी सणसमारंभ का असावेत.. याला तार्किक उत्तरे मिळाली नाहीत..
३) मासिक पाळी सुरु असताना त्याला विटाळ मानणे वगैरे अनुभव तर अनेकदा पाहिले आहेत.. त्याला आधार काय? उत्तर नाही..
या सगळ्यात मला हिंदू धर्मात अभिप्रेत नसणारी कट्टरता आणि लवचिकपणाचा अभाव दिसत होता.. लोकसंग्रह या कर्माच्या मूळ हेतूला हरताळ फासणारे हे स्वरूप काय कामाचे असा प्रश्न मला पडायला लागला..
४ लोक एकत्र येऊन जिथं काही करतात.. तिथं वेगवेगळे विचार, धारणा असणारच.. त्यात सहभागी होणाऱ्या विविध विचारांचा आदर होऊन सामायिक काही आयोजन व्हावं.. त्याला कालसुसंगततेची कास असावी असं वाटायला लागलं.. त्या बाबतीत ज्ञानप्रबोधिनीचा विचार मला पटला.. गाडगेबाबा, सावरकर यांनी मांडलेले विचार मनाला भिडणारे वाटले..
पण आपल्याला सगळ्यांना सवयीची असलेली अनेक वाक्य नित्यनेमाने कानावर पडत असत
१) कशावर तरी श्रद्धा हवी
२) जिथं विज्ञान संपते तिथं आध्यात्म सुरु होते
३) फक्त हिंदू धर्मातलेच दोष दिसतात का
४) अमका देव आम्हाला लाभत नाही
५) त्या लोकांना आपल्या सारखं व्यवस्थित जमत नाही (इतर जात धर्म भाषा पोटजात कुटुंब वाट्टेल ते लागू आहे)
डावीकडे घेतलेलं वळण
माध्यमांचे शिक्षण घेत असताना समाजवाद, मार्क्सवाद याचे आकर्षण वाढले.. पी साईनाथांचे पुस्तक वाचले त्याचा खूप परिणाम झाला.. मीडियात काम न करता एखाद्या एनजीओत जावे असं वाटायला लागलं.. डाव्या साच्यातील ठराविक काही गोष्टी (शैक्षणिक थापा) पटू लागल्या उदाहरण द्यायचं तर –
१) सगळे धर्म सारखेच असतात
२) भारताची प्रगती फक्त विज्ञानानेच साध्य होऊ शकते
३) उत्पादनाची सगळी साधने सरकारकडे असावीत आणि केंद्रीकरण नियोजन करून देशाची प्रगती साधावी
४) खासगी उद्योजक म्हणजे फसवणूक
५) इसरो च्या वैज्ञानिकांनी बालाजी वगैरेला कशाला जायला हवे
६) धर्म नाकारून माणसाने संस्कृतीहीन व्हावे कारण धर्म ही अफूची गोळी आहे
नोकरी करायला सुरुवात केली तेव्हा आयडियॉलॉजी पलीकडचे जग दिसायला लागले.. सामान्य लोक भेटायला लागले.. डावी मंडळी सांगतात ते प्रॉब्लेम्स तर दिसत होते पण ते प्रश्न कोणी सोडवले आहेत किंवा त्याचा मार्ग डाव्यांनी चालवलेल्या प्रदेशात निघालाय असं काही दिसेना.. १९९९ आणि २००४ या दोन्ही लोकसभा निवडणुकांच्या वेळेला मी काही कारणाने कलकत्त्याला होतो.. तेव्हा तिथं कम्युनिस्ट शासन होते.. निवडणूक आहे म्हणजे बाहेरच पडायचं नाही.. प्रवास करायचा नाही.. असं एकंदर वातावरण मला दिसलं.. २००४ ला तर मला आणि वर्गमित्राला धक्काबुक्की सुद्धा झाली होती. त्या दिवशी कोलकत्यात अनेक ठिकाणी देशी बॉम्ब सुद्धा फुटले… मुंबईच्या मानाने हा प्रकार वेगळाच वाटला आणि डाव्या मंडळींचा खरा अवतार दिसला.. पुढं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत २०१९ ला केरळमध्ये घेतलेले अनुभवही तसेच आहेत.
पुन्हा मध्याकडे
भारत आजही श्रीमंत देश नाही.. विकसित देश नाही… हे बदललं पाहिजे आणि लोक एकत्र येऊन चळवळ झाली तर हे बदलेल अशी आशा विशीत होतीच.. आर्थिक विषमता, जातीय विषमता हे अतिशय खरे आणि मोठे प्रॉब्लेम आहेत.. आणि बदल व्हायला हवा ही कोणत्याही देशप्रेमी माणसाला वाटणारी इच्छा असू शकते. पण फक्त प्रश्न विचारून काय होणार त्यांना उत्तरे पण द्यावी लागतात.. पण समाजातील विषमतेचे आणि राजकारणाचे विदारक चित्र मांडणारी डावी मंडळी ते कसं सोडवतात हे दिसत नव्हतं. मी सरकार अनुदानित मराठी शाळेत शिकलो.. १०० वर्षे जुन्या या शाळेची पटसंख्या घटत गेली पण कोणत्याही पक्षाच्या सरकारांनी हे चित्र बदलण्यासाठी ठोस काही केलेलं दिसलं नाही.. गाव तिथं एसटी हे दिसलं.. पण या एसटीचा आर्थिक डोलारा नेहमी विस्कट्लेलाच असतो आणि त्यात कालानुरूप सुधारणा होत नाहीत हेही दिसत होतं.. उद्योजक मंडळी नोकऱ्या निर्माण करतात त्यातून अनेक कुटुंबांना नवीन संधी मिळतात, उत्कर्ष साधतो हे दिसत होतं.. अनेक उद्योजक तर शून्यातून सुरुवात केलेले.. या सगळ्याला सरसकट नावे ठेवणे पटेनासे झाले… आंदोलने महत्वाची असतात हे मला मान्यच आहे… पण काहीतरी थांबवण्यापेक्षा जास्त महत्व काहीतरी घडवण्याला मिळायला हवं असं वाटायला लागलं. सुदैवाने कामानिमित्त संस्कृती रेखन आणि मानसशास्त्र या दोन विषयांची ओळख होत गेली आणि माणसांना सतत बुद्धिप्रामाण्यवादी चौकट लावून जोखत राहणे बावळटपणाचे आहे असं मला जाणवलं. या बाबतीत जिम कॉर्बेटची एक गोष्ट आठवते.. त्याच्या बरोबर शिकारीला येणाऱ्या मंडळींच्या काही अंधश्रद्धा होत्या.. पण त्याला लक्षात आलं की मानसशास्त्राच्या दृष्टीने त्यांची खिल्ली उडवून काम बिघडवण्यापेक्षा त्यांना त्यांचं काय ते ठरवू देत.. इसरोच्या वैज्ञानिकांनी रॉकेट सोडत असताना काय होतं आहे हे लक्षात आलं.. अशा प्रोजेक्ट वर हजारो लोक काम करतात.. सगळे तंत्रज्ञ, कर्मचारी काही क्लिनिकल बुद्धिप्रामाण्यवादी नाहीत.. एकाकडूनही मानसिक दडपणातून जर छोटीशी चूक झाली तरी सगळंच बंगालच्या उपसागरात बुडेल असं त्या कामाचं स्वरूप आहे.. ही मंडळी वैज्ञानिक असली तरी लोकांना निरीश्वरवादी करत सुटणे हे त्यांचे काम आणि जबाबदारी नाही.. त्यासाठी ते किंवा इतर कोणी काम करूच शकते आणि डॉ जयंत नारळीकरांसारख्या लोकांनी हे अनेक ठिकाणी केलं सुद्धा आहे. त्यांचं कर्म नीट स्पेस प्रोग्रॅम चालवणं आहे… रॉकेट सोडायची वेळ ते फलज्योतिषाला विचारून बदलत नाहीएत ना? मग बालाजीचे आशीर्वाद घेण्याची एक गोष्ट ते करत असतील तर ते काहीतरी चांगले करू पाहताना केलेली मांगल्याची उपासना आहे म्हणून सोडून देता येईल… ते न पटण्याचा आदर आहेच.. पण फोकस चांद्रयान किंवा त्यातील गुंतागुंतीच्या रॉकेटरी वर न ठेवता यावर चर्चा करत बसून काही वेगळं वैज्ञानिक शिक्षण मिळेल असं नव्हे..
खरी गंमत झाली ती इतिहासामुळे! शिवाजी कोण होता हे कॉम्रेड पानसरेंचे पुस्तक मी वाचले होते.. आणि मला ते भावले होते… एक कनवाळू शासनकर्ता या दृष्टीने मी शिवरायांना त्यात पाहिले.. पण ते दुसऱ्यांदा वाचले तेव्हा जाणवले ही ठराविक डाव्या फ्रेमवर्क्स चा वापर करून करून छत्रपती शिवाजी महाराजांची मांडणी केली होती.. त्या छोट्याशा पुस्तिकेत प्राथमिक संदर्भ पाहून लिखाण केले आहे असं दिसलं नाही. निधर्मीवाद, लोकशाहीवादी विचार वगैरे हल्लीच्या संकल्पना वेळेच्या उलट जाऊन शिवरायांवर लादण्याची मखलाशी त्यात आहे असं वाटलं. एकंदरीतच डावे इतिहासकार वाचत गेल्यावर वस्तुनिष्ठ पद्धती फाट्यावर मारून आजच्या राजकारणाच्या दृष्टीने मांडणी करण्याची वृत्ती दिसली.. समाजवादी दृष्टीने आखलेल्या शिक्षण प्रणालीत भारत म्हणजे दिल्लीकेंद्रित इस्लामी शासक आणि मौर्य गुप्त वगैरे २-३ राजघराणी एवढंच शिकवलं गेलं.. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहासही पूर्णतः काँग्रेसकेंद्रित होता आणि इतर प्रवाहांना पुरेसे स्थान नाही हे जाणवायला लागलं.
पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला टोकाच्या डाव्या आणि कर्मठ मंडळींमध्ये बरीचशी साधर्म्य असलेली वाटली ती म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्य या संकल्पनेला असलेला एकंदर विरोध. प्रश्न विचारायचे नाहीत.. आपापले वैचारिक कंपू बनवून लोकांना गप्प बसवत राहायचे, लेबले लावायची ही गोष्ट दोन्हीकडे सारखी होती. कोणत्याही गोष्टीच्या खोलात न शिरता वरवरच्या माहितीवर टोकाची आणि घट्ट मते बनवायची असा खाक्या दिसला.. कर्मठ मंडळींचा प्रारब्धवाद एकीकडे तर सगळं अमुक एका कालातीत फ्रेमवर्क प्रमाणेच घडणार हा डावा deterministic पवित्रा दुसरीकडं.. एकाला झाकावा दुसऱ्याला काढावा.. एकाचा प्राधान्यक्रम धर्माला तर दुसऱ्याचा राष्ट्र या संकल्पनेलाच विरोध.. आणि आपल्याला विरोध करणाऱ्या मंडळींच्या बाबतीत विविध पातळीची असहिष्णुता दोन्ही बाजूला दिसत होतीच.. एका बाजूला असलेले लोक अमुक व्यक्ती शेख, फर्नांडिस, कांबळे, भोसले आहे म्हणून त्याबद्दल पूर्वग्रह बाळगणार तर दुसऱ्या बाजूचा माणूस कोणी शर्मा, मिश्रा, पंडित, भावे, ठाकूर, सिंह आहे म्हणून पूर्वग्रह बाळगणार..या दोन्ही टोकांवर माणुसकी आणि व्यक्तिविकास या मूल्यांना फारशी किंमत नाही हे सन्माननीय अपवाद सोडले तर दिसत होते.
अभिकल्पना आणि संस्कृतीच्या विश्वात
मला भ्रमंतीची प्रचंड आवड आणि फोटोग्राफीची सुद्धा.. सृष्टीमध्ये बहू लोक.. परिभ्रमणे कळे कौतुक या समर्थ रामदासांच्या तत्वाचा मी पाईक आहे. २०१२-१४ डिझाईन चे शिक्षण घेतले तेव्हा वास्तुरचना आणि इतिहास या विषयांबद्दल कुतूहल आणि आस्था निर्माण झाली. आणि त्यामुळे भारतविद्येशी संलग्न पुस्तके वाचायला सुरुवात केली. ताजमहाल सुंदर आहे पण हुमायून चा मकबरा त्यापेक्षा कदाचित जास्त ग्रँड भासू शकतो.. वेरूळ, हंपी सारखी ठिकाणे कदाचित जास्त सुंदर वाटू शकतात असं दिसायला लागलं.. अनेक ठिकाणी मूर्तींचे चेहरे तोडफोड केलेले होते हेही लक्षात आलं.. पण दुसरीकडं हेही दिसलं की ताजमहाल पेक्षा हंपी सुंदर आहे असा दावा करणारी मंडळी इंटरनेट वर सापडलेला मोढेरा सूर्यमंदिराचा फोटोही हंपी म्हणून फॉरवर्ड करतात.. थोडक्यात काय तर श्रद्धा-अभिमान आहे.. पण माहिती नाही.. आणि कोणत्याही विचारसरणीच्या माणसाला हे कसे पटू शकते हे मला कळत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी दैवत आहे असं म्हंटलं तरी माझा अज्ञेयवाद त्याच्या आडवा येत नाही. शिवरायांची आरती मला भावते.. रायगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्गावर गेलं की मला काशीविश्वेश्वर किंवा जगन्नाथपुरी पेक्षा जास्त दिव्यत्वभाव जाणवतो.. पण शिवराय आमचे देव आहेत एवढं उच्चारून उपयोग काय? ती सुरुवात असू शकते पण पुढं जाऊन विविध शिवचरित्रे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू शिकायला हवेत.. आग्र्याहून सुटका, अफझलखान, शाहिस्तेखानाची बोटे आणि गड आला पण सिंह गेला पलीकडं माहिती घ्यायला हवी.. त्यांची पत्रे काय सांगतात… समकालीन साधने काय सांगतात हे जाणून घ्यायला हवं.. आणि देवत्वापलीकडे एक रणझुंजार स्वतंत्र वृत्तीचा स्वयंप्रकाशी माणूस म्हणून त्यांना जाणून घ्यायला हवं..
धर्माच्या बाबतीतही मला हेच आज वाटते.. हिंदू धर्माची खासियत ही आहे की तो मूलतः लिबरल आहे.. जातीच्या उतरंडीचे आणि त्यातून निर्माण झालेल्या शोषक व्यवस्थेचा डाग सोडला तर तो विविध मतप्रवाहांना सामावून घेणारा आहे… विविध भाषिक संस्कृतींना आपापले हिंदू रूप घडवण्याची त्यात जागा आहे.. माझ्यासारख्या ईश्वरावर श्रद्धा नसलेल्या आणि वेदांना कालातीत आणि अपौरुषेय न मानणाऱ्या मंडळींनाही त्यात जागा आहे. प्रथांना नवीन रूप देण्याचा खुलेपणा आहे. अमुक एक ग्रंथाचं म्हणणं डोळे झाकून पाळा ही सक्ती नाहीए.. मग आपण हे का करायचं? आपल्याला कट्टरपणाच्या बाबतीत अब्राहमी धर्मांचे अनुकरण करण्याची इतकी तीव्र इच्छा का होते? आपल्या घरांतील वडीलधारी मंडळी आजही प्रश्न विचारण्याला विरोध का करतात? आणि अगदी खोलात नाही शिरलं तरी हिंदू दर्शनाचे सार असलेल्या गीतेला समजून आचरणात आणण्यात आपण कमी का पडतो?
सगळी कर्मकांडे, परंपरा महत्वाच्या आहेत.. पण भारतीय संस्कृतीचा आणि अध्यात्मिक विचारांचा आवाका त्यापेक्षा बराच मोठा आहे.. त्याबद्दल जाणून घेऊन मग आपल्या अभिमान आणि आत्मीयतेला ज्ञानाची जोड देण्याची इच्छा.. मेहनत आपल्याकडं का नाही? एखाद्या व्यक्तीला वेगळा विचार करायचा असेल तर त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करून आपण नवीन काही घडवायला पुरेसे उत्सुक का नाही?
आपण जे धारण केलं आहे तो धर्म आहे… आपल्या आयुष्याचे ध्येय म्हणजे धर्म.. उपासना मार्ग ही वेगळी गोष्ट झाली.. आज देश विकसित होण्याकडे वाटचाल करतोय विविध क्षेत्रांमध्ये पुढं जातोय याचा अभिमान हवाच.. पण आजही आपण एक मिडल इन्कम अर्थव्यवस्थाही नाही.. तिथं पोहोचायला अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी आपण एकतेतील वैविध्य जपत मोठे लक्ष्य समोर ठेवायला हवे.. माणूस म्हणून माणसाशी संवेदनशील वृत्तीने वागताना कोणती परंपरा प्रथा आडवी येऊ नये.. आणि भक्तीला rigidity चे कर्मठपणाची चौकट नसावी.. इतपत मला आज वाटतं.
चिनोबा भावे