Chinmaye

महाराष्ट्रातील संतांचे कार्य


बहामनी काळात मराठे क्षात्रधर्म विसरले होते आणि ब्राम्हण श्राद्धपक्ष, व्रतवैकल्ये तीर्थयात्रा, प्रायश्चित्तविधी यांनाच धर्म मानू लागले होते. अशा वेळेला संत परंपरेचा उदय झाला आणि महाराष्ट्रात त्यांनी महत्त्वाचे काम केले. संतांनी आपल्या वाणीने, लेखणीने कर्तृत्वाने वैदिक धर्माचे, गीता धर्माचे पुनरुज्जीवन केले. या संतांचे कार्य आणि त्यांची आध्यात्मिक दृष्टी काय होती ते जाणून घेऊया.

eknath

Saint Eknath – Dinanath Dalal

परमेश्वर निर्गुण आणि निराकार असतो आणि तो चराचराला व्यापून आहे. मूर्तीमध्ये परमेश्वर नसतो ते उपासनेचे साधन आहे. त्यात परमेश्वर मानणे म्हणजे अनंताला संकुचित करणे. अशी संत परंपरेची धारणा होती. (महाराष्ट्र संस्कृती – डॉ पु ग सहस्त्रबुद्धे पृष्ठ ३०५)
खरी भक्ती म्हणजे काय हे संतांच्या नजरेतून पाहिले असता पुढील वचने समोर येतात.

सर्वभूती भगवंत पाही, भूते भगवंताचे ठायी, भक्तांमाजी तो अतिश्रेष्ठ – संत एकनाथ

हे समस्तही श्री वासुदेवो
ऐसा प्रीतिरसाची वोतला भावो
म्हणोनि भक्तांमाजी रावो आणि ज्ञानिया तोचि – संत ज्ञानेश्वर

सर्व भूतांच्या ठायी भगवंत असल्याने त्यांची सेवा, त्यांचे दुःख दूर करणे हीच भक्ती अशी संकल्पना संतांनी मांडली.
जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा
असं तुकोबा सांगतात.
तर भक्ती म्हणजे काय तर आपली कर्मे करत राहणे. केवळ नामस्मरण किंवा फुलाफळांनी पूजा करणे नव्हे.

तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्मकुसुमांची वीरा,
पूजा केली होय अपारा, तोषा लागी (१८-९१७)
इथं संत ज्ञानेश्वर स्वतःचे कर्म करणे हीच पूजा असल्याचे सांगत आहेत.

पण स्वधर्म आणि कर्माचा आग्रह का? तर लोकसंग्रहासाठी
पुढपुढती हे पार्था हे सकळ लोकसंस्था
रक्षणीय सर्वथा म्हणोनिया (३-१७०)
आपापली कर्मे करून समाजाचे रक्षण करणे. लोक एकत्र आणणे हा धर्म ही भक्ती असे संत सांगतात.

निवृत्तिवादापेक्षा ऐहिक जीवन नीट पार पडणे म्हणजे प्रवृत्तीवादी दृष्टीने संत पाहतात.
न लगे लौकिक सांडावा व्यवहार, घ्यावे वनांतर भस्मदंड. म्हणजे संसारात राहूनही नित्य नामस्मरण करत राहिल्याने परमेश्वर प्राप्ती होते असे तुकाराम महाराज सांगतात.
कर्म करत राहण्याची महती सांगताना संत ज्ञानेश्वर म्हणतात …
कि प्राप्तकर्म सांडिजे, येतुलेनी नैष्कर्म्य होईजे
हे अर्जुना वाया बोलिजे, मूर्खपणें
ब्रम्ह तेचि कर्म, ऐसे बोधा आले जयासम
तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा (४.१२१)
सर्व कर्मे ही ब्रम्होपासना आहे असे स्थितप्रज्ञ सम बुद्धीने जो मानतो त्याचे कर्तव्य, त्याचे सर्व उद्योग म्हणजे नैष्कर्म्य होय

संत कर्मकांडांबद्दल काय सांगतात?

निष्कामकर्म, त्यागबुद्धी, स्थितप्रज्ञता, मनोनिग्रह, वासनाजय हा खरा धर्म होय असा संतांचा निश्चय होता. लोकसंग्रह, विश्वाची सेवा, रंजल्यागांजलेल्यांना हृदयाशी धरणे, दया, क्षमा, शांती, भूतांचे पालन, कंटकांचे निर्दालन हा शुद्ध भागवत धर्म होय असा त्यांचा ठाम सिद्धांत होता. त्यामुळे कर्मकांडाचा जागोजागी निषेध करून त्यांनी नीतीला – सत्य चारित्र्य आणि निस्पृहतेला धर्मविचारात अग्रस्थान दिलं. (महाराष्ट्र संस्कृती – डॉ पु ग सहस्त्रबुद्धे पृष्ठ 312)

ज्ञानेश्वर म्हणतात –
तुम्ही व्रत नियम न करावे, शरीराते न पीडावे
दूरी केही न वचावे, तीर्थासी गा
योगादीक साधने साकांक्ष आराधने मंत्रतंत्र विधाने झणी करा
तर तुम्ही स्वधर्मरूप यज्ञाने आराधना करावी.
नागपंचमीला नागाची पूजा, चतुर्थीला गणेशाची पूजा, एकादशीला विष्णूची आराधना, या सर्वांपुढे नवसायास करणे, हे करून शिवाय तीर्थयात्रेला जाणे. या सर्व अवडंबराची… जड काम्यकर्मांची (कर्मकांडाची) ज्ञानेश्वरांनी निर्भत्सना केली आहे.
संत नामदेवही व्रतवैकल्यावर टीका करतात.
व्रततप नलगे करणे, नलगे तुम्हां तीर्था जाणे
आपुलेचि ठायी असा सावधान, करा हरिकीर्तन सर्व काळ
यात्रा, व्रते, कर्मकांडे यांचा निषेध करून नामदेव फक्त आत्म जागृती प्राप्त करण्याचा संदेश देतात.
समतेचा संदेश देताना ते सांगतात … सर्वांभूती सम दृष्टी, हेचि भक्ती गोड मोठी असा संदेश ते देतात. थोडक्यात आपले कर्म करत राहणे आणि शुद्ध चर्या एवढी भक्ती मोक्षप्राप्ती साठी पुरेशी आहे असं संत सांगतात.

मग महाराष्ट्रात हे कर्मकांड आले कुठून याचा शोध घेऊ पुढील लेखात …

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.