Chinmaye

नरेंद्र मोदी २०१९ का जिंकले?


20190302_LDD001_1
२३ मे रोजी लोकसभा निवडणूकीचा निकाल लागला आणि नरेंद्र मोदी भाजप एनडीए प्रचंड बहुमताने विजयी झाले. पुन्हा भाजप एनडीए चे सरकार येईल असं माझंही आकलन होतं पण २०१४ पेक्षा अधिक जागा मिळतील अशी कल्पना नव्हती. आणि अधिक जागा मिळाव्यात तरी कशा? कारण गुजरात राजस्थान सारख्या राज्यात २०१४ ला भाजपने सर्व जागा जिंकल्या होत्या आणि तिथून सुधारणा झालीच तर फक्त वोटशेयर मध्येच होणे शक्य होते. पण हा अभूतपूर्व विजय टीम मोदी आणि भाजपला मिळाला त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. निकाल लागल्यावर आठवड्याभरातच या निकालाची कारणमीमांसा करणारे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. इतक्या गुंतागुंतीच्या घटनेचे ज्याला अनेक घटक, पैलू, कारणे, पार्श्वभूमी आहे त्याचे विश्लेषण इतक्या लगेच लोक कमाल आत्मविश्वासाने आणि किमान माहितीच्या आधारावर कसे करतात हे मजेशीर आहे. मला नाही वाटत की देशाच्या विविध भागांमध्ये detailed माहिती घेऊन हजारो तपशीलवार मुलाखती घेऊन, निरीक्षण करून जोखल्याशिवाय या निकालाचे संपूर्ण आकलन करणे शक्य आहे. असले अवैज्ञानिक क्लेम ज्यांना करायचे आहेत त्यांना करुदेत. मी मला काय दिसलं, मी काय अनुभवलं तेवढंच मांडू शकतो …

या निकालामुळे संतापलेल्या लोकांनी याला धार्मिक उन्मादाचा, ध्रुवीकरणाचा विजय म्हणून टाकले. सवर्ण हिंदूनी एकत्र येऊन भाजप-मोदींच्या वर्चस्ववादाला लोकशाहीने निवडून दिले आणि हा माझा लाडका भारत नव्हे असे सरळधोपट, उथळ, घाईचे निष्कर्ष २०१४ मध्येही निघाले होते, त्यानंतर अनेक राज्य विधानसभा निवडणूक निकालांनंतरही निघाले होते आणि २०१९ मध्येही निघत आहेत. ते चूक की बरोबर ते सोडा … पण मतदारांना दोष देऊन आणि अतिशी विरुद्ध साध्वी असल्या अतर्क्य तुलना करून भाजप हरणे शक्य नाही. आपण निकालाचे काही आकडे पाहू

  • महानगरांमध्ये असलेल्या ३९ मतदारसंघापैकी ३० मध्ये एनडीए ला यश मिळाले, युपीए ला ६ तर इतरांना ३ जागा मिळाल्या
  • ग्रामीण भागांतील २२० जागांपैकी १५६ एनडीए ला २८ युपीए ला ६ महागठबंधनला आणि ३२ इतर पक्षांना मिळाल्या – इथं भाजपने ८ सीटची सुधारणा केली
    म्हणजे ग्रामीण भागात आणि शहरात दोन्हीकडे भाजप एनडीएला यश मिळालं.
  • दलितांची संख्या ३०% पेक्षा अधिक आहे अशा ७३ जागांपैकी ४५ एनडीए ला ११ युपीए ला २ महागठबंधनला आणि १५ इतर पक्षांना मिळाल्या
  • आदिवासींची संख्या ३०% पेक्षा अधिक आहे अशा ३५ जागांपैकी २७ एनडीए ला २ युपीए ला आणि ६ इतर पक्षांना मिळाल्या.
  • मुस्लिम मतदारांची संख्या ३०% पेक्षा अधिक आहे अशा ५८ जागांपैकी २० एनडीए ला २० युपीए ला ७ महागठबंधनला आणि ११ इतर पक्षांना मिळाल्या
  • शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या २६७ जागांपैकी २०१ एनडीए ला १८ युपीए ला ८ महागठबंधनला आणि ४८ इतर पक्षांना मिळाल्या
  • जिथं रोजगाराची कमतरता आहे अशा २२६ जागांपैकी १७५ एनडीए ला ३४ युपीए ला १५ महागठबंधनला आणि २ इतर पक्षांना मिळाल्या
  • शेड्युल कास्ट साठी ८४ राखीव मतदार संघांपैकी ५४ एनडीए ने जिंकले
  • आदिवासींसाठी राखीव ४७ मतदारसंघांपैकी ३५ एनडीएने जिंकले
    अशा विविध सामाजिक-आर्थिक मतदार समूहातून कोणत्याही पक्षाला-आघाडीला एका कारणातून यश मिळणे शक्य नाही. भौगोलिक बाबतीत म्हणायचं तर दक्षिण भारत सोडून इतर सर्व ठिकाणी भाजप-एनडीए ला यश मिळालं आहे. तिथंही कर्नाटक आणि तेलंगणा मध्ये नवीन सीट जिंकून भाजपने व्याप्ती वाढवली आहे. पूर्वेला ओडिशात ८ आणि पश्चिम बंगालमध्ये १८ जागा जिंकून भाजपने नवी आघाडी उघडली आहे.

मोदी भाजप एनडीए बद्दल माझ्या दृष्टीने सकारात्मकता असल्याची कारणे थोडक्यात मांडायची तर पुढीलप्रमाणे –
१) एलपीजी, पक्के घर, आरोग्य आणि मुद्रा कर्ज अशा अनेक योजनांचा कोट्यवधी मतदारांना थेट लाभ
२) सरकारने काही मेजरेबल टार्गेट ठेवून प्रामाणिकपणे काम केले आणि बदल घडवण्याची इच्छा लोकांपर्यंत पोहोचली
३) स्वच्छ भारत सारख्या योजनांमधून परिसरात होत असलेले बदल लोकांना जाणवले
४) महामार्ग आणि जलमार्ग या बाबतीत प्रचंड काम झाले आहे, ग्रामीण रस्ते, किनाऱ्याला बंदरांना जोडणारे रस्ते सुधारले आहेत
५) रेल्वेने प्रवास करण्याच्या अनुभवात पूर्वीच्या तुलनेत बरीच सुधारणा आहे, तक्रारींची दखल घेतली जात आहे.
६) मुंबईसारख्या महानगरात पूर्वीपेक्षा वेगाने लोकल ट्रेन व्यवस्थेत सुधारणा आणि मेट्रो नेटवर्क तयार करण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे
७) युपीएच्या काळात नागरी भागात होणारे अतिरेकी हल्ले झाले नाहीत.
८) पठाणकोट, उरी, पुलवामा सारख्या घटना घडल्या पण त्याला सरकारचा रिस्पॉन्स वेगळा आणि परिणामकारक होता
९) डोकलाम मध्ये भूतानच्या बाजूने भारतीय सैन्य ठामपणे उभे राहिले आणि चीनच्या दटावणीला भीक न घालता ज्या assertion ची गरज होती ते केलं
१०) क्रीडा मंत्रालयात कर्नल राज्यवर्धन राठोड सारख्या ऑलिम्पिक पदक विजेत्याने बदल केले, तत्परता आणली. खेलो इंडिया सारखे उपक्रम सुरु झाले
११) १० वर्षे भिजत घोंगडे झालेले राफेल योग्य ती निर्णयक्षमता दाखवत घेतले आणि किमान दोन स्क्वॉड्रन मिळतील अशी व्यवस्था केली
१२) वायुसेनेनेच्या फायटर स्ट्रीममध्ये महिलांचा प्रवेश सुकर केला, मिलिटरी पोलिसमध्येही जवान म्हणून महिला घेण्याचा निर्णय झाला
१३) वन रँक वन पेन्शन लागू करून अनेक माजी सैनिकांना न्याय दिला
१४) सांस्कृतिक क्षेत्रात नॅशनल वॉर मेमोरियल असो किंवा मुंबईतील म्युझियम ऑफ सिनेमा असो अनेक जुनी प्रोजेक्ट्स पूर्णत्वाला नेली.
१५) मेक इन इंडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी नवीन कारखाने कार्यान्वित झाले. मेट्रोचे रेक्स असोत किंवा उच्च क्षमतेची डिझेल-इलेक्ट्रिक इंजिन इथं बनू लागली
१६) अनेक शासकीय प्रक्रिया ऑनलाईन आणि सोप्या झाल्या आणि दलाली-लाचखोरी बंद झाली – अगदी फिल्मसाठी सेन्सर प्रमाणपत्र मिळवणे सुद्धा ऑनलाईन होते
१७) अनेक सरकारी गोष्टींची कागदपत्रे करण्याची प्रक्रिया सुलभ झाली, कर परतावा वेगाने मिळू लागला
१८) जीएसटी सारखा महत्त्वाचा निर्णय सर्व सहमती निर्माण करून, राज्यांचे आक्षेप विचारात घेऊन अंमलात आणला

एकंदरीत देशात या सरकारला अजून एक संधी आणि continuity मिळावी असं वातावरण आहे. याचा अर्थ भाजप-मोदी-एनडीए निर्दोष आणि अचूक आहेत असा नव्हे. शेतीची समस्या असेल, प्राथमिक शिक्षण असेल, परवडेल अशी आरोग्य व्यवस्था असेल अशा अनेक आघाड्यांवर मोदींना पुष्कळ काम करायचं आहे आणि त्यांना त्यासाठी जबाबदार धरलं गेलं पाहिजे. आणि पुढची ५ वर्षे त्या दृष्टीने खडतर आणि महत्वाची असणार आहेत.

ज्यांना भाजप-मोदी देशासाठी योग्य नाहीत त्यांना तसं वाटण्याचा पूर्ण अधिकार आहे पण फक्त तेवढं वाटून उपयोग नाही. रोज मोदींना विरोध करण्यासाठी बीफ जनता पार्टी वगैरेचे फॉरवर्ड करण्यापेक्षा एक सक्षम राजकीय पर्याय उभा करण्यात ऊर्जा खर्च करणे अधिक उपयुक्त ठरेल.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: