मुंबई आणि पुण्याच्या मध्ये लोणावळ्याजवळ आहे एक छोटेसे गाव. मळवली त्याचे नाव. हे गाव खरंतर ट्रेकर्स मध्ये लोहगड विसापूर गाठण्यासाठीचे रेल्वे स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. पण अजून एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा इथल्या भाजे गावाला लाभला आहे. तो म्हणजे इसवीनपूर्व दुसऱ्या शतकातील भाजे लेण्यांचा. चला तर आता अनंत चतुर्दशी जवळ आलेली आहे आणि पावसाळा ओसरतोय आणि ही लेणी आपल्याला भटकंतीचे आमंत्रण देत आहेत.
सुमारे ५० पायऱ्या चढल्यानंतर समोर उजव्या बाजूला लोहगड किल्ला आणि डावीकडे त्याचा जोडीदार स्पष्ट दिसू लागतो आणि आपण भाजे गावातील हिरवळ पाहत क्षणभर विश्रांती घेऊन पुढे चालू लागतो.
भाजे गावातून पायऱ्यांची वाट चढून सुमारे तीस मीटर किंवा दीडशे फूट चढले की पुरातत्व विभागाचे तिकिटघर लागते. तिथून डावीकडे विसापूर किल्ल्याकडे वाट जाते. आपण मात्र तिकीट काढून भाजे लेणी गाठायची आहेत. जेमतेम १५-२० मिनिटात आपण लेण्यांच्या स्थानी पोहोचतो. सगळ्यात आधी आपले लक्ष वेधून घेते ते गुफा क्रमांक १२ मधील प्रचंड मोठे चैत्यगृह. सुमारे दहा मीटर उंच आहे हे चैत्यगृह.
कमानींच्या vault ची रचना आपण इथे पाहू शकतो. इथं असलेल्या लाकूड रोवण्याच्या भोकांवरून लक्षात येते की प्राचीन काळी या चैत्याच्या दर्शनी भागात लाकडी स्क्रीन असावा. या चैत्याची रुंदी ८ मीटर आहे तर एकंदर खोली १७ मीटर आहे. ही लेणी पश्चिम मुखी असल्याने दुपारनंतर इथं जाणे उत्तम. २७ खांबांच्या दोन मालिका इथं आपल्याला दिसतात. हे स्तंभ अष्टकोनी आहेत. स्तूपाचा व्यास जवळजवळ ३ मीटर आहे. दर्शनी भागात काही छोटी पॅनेल्स आहेत जिथं जोडप्यांच्या आकृती कोरलेल्या दिसतात. या गवाक्षातून जणू पाहत आहेत अशा पद्धतीने अर्ध्याच दिसतात.
चैत्यगृहाच्या डाव्या बाजूलाही काही गुंफा आहेत. पण खूप पाहण्यासारखे तिथं खास नाही. एका गुफेत शिवलिंग दिसले ते नंतर कोरले गेले असावे असे दिसते. जुन्या खोदीव टाक्यांमध्ये पाण्याचा संचय झालेला दिसत होता आणि त्या काळातील जलव्यवस्थापनाची कल्पना येत होती.
इथे पुढे आहे गुफा क्रमांक १३. हा एक चौकोनी विहार आहे. पुरातत्व विभागाने संवर्धन केलेल्या पायऱ्या पूर्वीप्रमाणे वरील विहारांमध्ये किंवा विश्रामगृहांमध्ये घेऊन जातात. ज्या इथे येणाऱ्या पाहुण्या-प्रवाशांसाठी असाव्यात असा कयास आहे.
इथं टाक्याजवळ मला एक कोरलेला शिलालेख दिसला. याचे भाषांतर मला पंकज विजय समेळ या एका भटक्याच्या ब्लॉगवर मिळाले. महारठीस कोसिकीपुतस विण्हुदत्तस देयधम पोढी
भाषांतर: महारठीस कोसिकीपुतस विण्हुदत्त (विष्णूदत्त) याने धर्मासाठी दिलेली टाके (पोढी)
https://pankajsamel.wordpress.com/
हा ब्लॉग जरूर भेट देण्यासारखा आहे मित्रांनो. किल्ले, लेणी, मंदिरे यांची अभ्यासपूर्ण भटकंती असलेला.
विसाव्या गुफेत एकंदर १४ स्तूप आहेत. काही ठिकाणी त्यांच्यावर काही अक्षरे किंवा नावे कोरलेली दिसतात. विविध लोकांच्या स्मृती-पूजना साठी यांची योजना केली गेली असावे असे अभ्यासक मानतात.
आता आपण आलो आहोत गुफा क्रमांक २२ पाहायला. सहा स्तंभ इथे आहेत आणि मधल्या प्रवेशद्वारातून आपण आत पोचतो. इथं व्हरांड्यात वर पाहिले की विशिष्ट प्रकारची छताची रचना लक्ष वेधून घेते.
आपल्याला दिसतात या गुंफेचे रक्षणकर्ते. एका सैनिकाच्या हातात धनुष्य आहे तर दुसऱ्याच्या हातात भाला. कोपऱ्यातील स्तंभावरही काही मानवी आकृती दिसतात. त्याच ठिकाणी खाली अजून मानवी आकृतींची नक्षी आहे. घोड्यावर स्वार सैनिकांचे हे कोरीवकाम अजूनही स्पष्ट दिसते.
तिथे आत एक मोठी खोलीसुद्धा आहे. तो विहार असावा.
उजव्या बाजूला दोन कोरीव आकृत्या खूपच मोहक आहेत. त्यांचा संपूर्णतः अर्थ लावणे अजूनही शक्य झालेले नाही असे जॉर्ज मिशेल त्यांच्या पुस्तकात लिहीतात.
डाव्या बाजूला आपल्याला दिसतो चार घोड्यांच्या रथावर असलेला योद्धा आणि त्याबरोबर खास मुकुट किंवा शिरपाव धारण केलेली एक स्त्री आणि रथाखाली एका दैत्याला मारणारा सारथी. एक चक्रही या नक्षीत आहे, जे धम्मचक्र असावे.
उजव्या बाजूच्या आकृतीमध्ये बलाढ्य हत्तीवरील योद्धे दिसतात. या हत्तीने उखडलेला एक वृक्ष त्याच्या सोंडेत आहे. आणि त्याच्या पायाशी तो अजून एक वृक्ष चिरडत असताना छोट्या मनुष्याकृती पाहत आहेत. काय आहे यांचा अर्थ? बौद्ध तत्वज्ञानाचा विजय? की ठाऊक नसलेल्या एखाद्या जातक कथेचा तपशील? इतिहास म्हंटलं की काही प्रश्नच अनुत्तरित असतात… आणि म्हणूनच इतिहास संशोधकांना नवीन आव्हाने मिळत असतात.
जाताजाता विसापूर किल्ल्याच्या लांबलचक तटबंदीला सलाम केला आणि पुढच्या वेळी येण्याचा संकल्प सोडून निघालो. परिसरात जवळच अर्ध्या तासावर बेडसे लेणी आहेत. तिथं पुन्हा केव्हातरी.