हे आहे जगातील सर्वात मोठे शिवलिंग. पुरातत्व खात्याच्या मोजणीप्रमाणे २२ फूट उंच. चला तर आज जाऊया भोजपूरच्या भोजेश्वराच्या दर्शनाला. भोपाळपासून आग्नेय दिशेला ४० किलोमीटर अंतरावर हे छोटेसे नगर आहे. भोजेश्वराचे शिवमंदिर साधे तरीही अचंबा वाटेल असे. अनेक मजेशीर गोष्टी इथं पाहायला मिळणार आहेत. मग घेऊन जाऊया आपले टाइम मशीन अकराव्या शतकात

Kaliasot – a tributary of Betwa river
कधीकधी घाईघाईच्या कामाच्या प्रवासातही नशीब साथ देते आणि अशी जागा पाहण्याची संधी मिळते. भोपाळजवळ ग्रामीण भागात काही कामानिमित्त आलो होतो. सोनसळी उन्हाच्या एका सकाळी भोपाळ विमानतळावर उतरलो आणि फील्डवर्कला थोडा वेळ होता म्हणून तिथंच भोजेश्वराचं दर्शन घ्यायचं ठरवलं. बेटवा नदीच्या काठी भोजपुर गाव आहे. पण हे मंदिर आणि त्यामागचा इतिहास जाणून घेण्याआधी एक कप चहा घेऊ आणि स्थानिक काय सांगतात ते पाहू. इथल्या दंतकथेप्रमाणे हे मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधलं होतं … आणि कर्ण तान्हे बाळ असताना इथेच कुंतीने बेटवा नदीच्या काठी त्याला सोडून दिलं … बेटवा नदीची उपनदी कलियासोट आज शांत होती आणि एक स्थानिक शांतपणे मासे पकडत बसला होता.
दंतकथांकडून आता ऐतिहासिक माहितीकडे वळूया … अकराव्या शतकाच्या मध्यकाळात परमार राजा भोजदेव याने भोजेश्वर मंदिराचे बांधकाम केले. हे भव्य मंदिर अपूर्ण आहे … ते अपूर्ण का राहिले याबद्दल काहीही ठोस माहिती उपलब्ध नाही … आणि बांधकाम पूर्ण न झाल्याने याच्या निर्मितीसंबंधित काही शिलालेखही इथं सापडला नाही. पण इतर शिलालेख पाहता मंदिर बांधले गेले तेव्हा या स्थानी भोजदेवाचे (१०१०-५५CE ) राज्य होते हे स्पष्ट आहे. भोजदेव हा व्यासंगी राजा आणि कला-अभिकल्पना व वास्तुरचनेचा भोक्ता. याने स्वतः ११ ग्रंथांची निर्मिती केली. त्यापैकी एक म्हणजे समरांगण सूत्रधार … हा भारतीय वास्तुरचनेवरील ८३ भागांचा मोठा ग्रंथ … अशा राजाने बांधलेल्या मंदिराजवळ वास्तुकलेबद्दल अजून काहीतरी खास सापडणार हे काही नवल नाही. ते काय हे आपण ब्लॉगच्या शेवटच्या भागात पाहूच.
१०६ फूट लांब, ७७ फूट रुंद आणि १७ फूट उंच अशा एका भव्य चौथऱ्यावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. ४० फूट उंचीच्या ४ खांबांवर गर्भगृहाचे छत पेलले गेले होते. तिथे १२ पिलास्टर म्हणजे दर्शनी खांबांची रचनाही दिसते.
दरवाजाच्या दोन्ही बाजूंना गंगा आणि यमुना शिल्परूपात उभ्या आहेत. अजूनही अनेक शिल्पं दर्शनी भागात दिसतात पण त्याबद्दल तिथं काही नीट माहिती उपलब्ध नव्हती. दाराजवळ लाकडी पायऱ्यांची रचना आहे पण त्यामुळे काही शिल्पं झाकली गेली आहेत. हत्तीवर हल्ला करणारा वाघ किंवा सिंह हे असंच एक शिल्प.
दर्शनी भाग सोडला तर बाकी तिन्ही भिंती अगदी साध्या आहेत… त्यांच्यावर काहीही कोरीव काम किंवा शिल्पं नाहीत. तिन्ही बाजूंना असलेले झरोके फक्त शोभेचे आहेत. पूर्वी तिथं परमार कुळातील देवतांना स्थान होते असं काही संशोधक मानतात.
या मंदिरात अनेक सुंदर शिल्पं आहेत. पण पुरातत्व खात्याने त्यांच्याबद्दल काही खास माहिती दिलेली नाही. तिथल्या फलकावर उमा-महेश्वर, लक्ष्मी नारायण आणि ब्रह्म-सावित्रीची शिल्पं या मंदिराच्या गाभाऱ्यातील स्तंभांवर आहेत असा उल्लेख असला तरीही या मोघम माहितीमुळे शिल्पं ओळखायला काहीच मदत होत नाही. ब्लॉग वाचून जर तज्ज्ञ लोकांनी अधिक माहिती दिली तर मी मूर्तींना नावं देऊ शकेन!

Gandharvas perhaps?
मंदिराच्या भिंती बाहेरून जितक्या साध्या दिसतात तितकंच बारीक कोरीवकाम गाभाऱ्याच्या भिंतीवर, छतावर आहे. पूर्वी हे छत नव्हते आणि एक मोठा दगड कोसळून शिवलिंगाचेही नुकसान झाले. नंतर पुरातत्व खात्याने छतामधील फटी बुजवल्या व शिवलिंगही नीट जोडले. छताच्या गोलाकार नक्षीत गंधर्व असावेत असं वाटतं. अशा ठिकाणी माहितीचे नुसते फलक लावण्यापेक्षा आकृत्या काढून नीट माहिती पुरवली तर जास्त उपयोगी ठरेल असं वाटतं.
इतकं प्रचंड बांधकाम जेव्हा केलं जात असे तेव्हा त्यामागे कोणती वैज्ञानिक, अभियांत्रिकी सूत्रे व यंत्रे वापरली जात याबद्दल कुतूहल वाटतेच. इतक्या मोठ्या शिळा जवळजवळ ४० फूट उंचीवर क्रेन वगैरे नसताना कशा चढवल्या असतील? हे मंदिर अपूर्ण असल्याने इथं त्याबद्दल काही माहिती मिळते.

Ramp
इथं दगडांचा एक प्रचंड उतार बांधलेला आहे ज्यावरून ७० एक टन वजनाचे प्रचंड खडक अनेक कामगार व कदाचित बैल/ हत्ती यांसारखे प्राणी ओढून वर नेत असावेत. सॅटेलाईट फोटोमध्ये हा उतार स्पष्ट दिसतो.
या मंदिराच्या परिसरातली एक खास गोष्ट म्हणजे इथं दगडावर कोरून काढलेले वास्तुरचनेचे नकाशे … अनेक मंदिरांचा तलविन्यास, शिखरांचा आराखडा, नक्षीकामाचे नमुने इथं जमिनीवर कोरलेले दिसतात. दगडावर काढलेली ब्लूप्रिंट म्हणा ना! काही कोरीव रचना पूजा अर्चनेसाठी निर्माण केलेल्याही आहेत.

Cyclopean dam at Bhojpur
मंदिराजवळ असलेली अजून एक अद्भुत गोष्ट म्हणजे अकराव्या शतकात बांधलेला बांध. एकावर एक दगड ठेवून चुना किंवा इतर कोणतीही सामग्री न वापरता हा बंधारा बांधला गेला. आजही या भिंती मजबूत उभ्या आहेत. होशंग शाहने हा बंधारा तोडला असं सांगितलं जातं.
मंदिर परिसरात एक छोटेसे संग्रहालय आहे पण दुर्दैवाने मी गेलो तेव्हा ते दुरुस्तीसाठी बंद होते. आजूबाजूला अनेक अवशेष तसेच उघड्यावर पडलेले होते हे मात्र फारसं रुचलं नाही. भोपाळ च्या आजूबाजूला पाहण्यासारखं खूप काही आहे. पुढच्या वेळेला पाहू विश्व वारसा असलेल्या भीमबेटकाच्या गुफा
चिन्मय सर, नेहमीच आपल्या पोस्ट माहितीपूर्ण असतात. या अशा वास्तुव्दारेच आपली संस्कृती, परंपरा याच्या आपण जवळ जाऊ शकतो