तुम्हाला समजा फॅमिली ड्रामा म्हणजे कौटुंबिक नाट्यपट पाहण्याचा उबग आला असेल तर बापजन्म अगदी आवर्जून पाहायला हवा … कारण अशा धाटणीचा कौटुंबिक मनोव्यापारांबद्दलचा चित्रपट मराठीत यापूर्वी झालेला नाही … आणि बापजन्म कोणत्याही फॉर्मुला काढायला उपयोगाचा नाही … आपल्याकडे व्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तिकेंद्रित दृष्टीकोन हा कुटुंबाला तोडणारा आहे असं मानलं जातं … अशावेळेला आपल्या मर्जीने दिलखुलास जगणारे नायक क्वचितच या शैलीत पाहायला मिळतात. इतरांसाठी त्याग करणारा नायक असा एक ठोकळेबाज प्रकार आपण पाहिलेला आहे. पण हा चित्रपट म्हणजे सचिन खेडेकर यांच्या सहज सोप्या अभिनयातून ताकदीने साकारलेल्या नायकाभोवती गुंफलेला निखळ मनोरंजन करणारा चित्रपट आहे … एकीकडे पुण्यातील मुंबईतील उच्च मध्यमवर्गीय जोडपी आणि त्यांच्या नात्यांतील कृत्रिम तणाव तर दुसरीकडे एकदम थेट गावात पोहोचलेले सैराट होऊ पाहणारे चित्रपट … दोन समीकरणांमध्ये मराठी सिनेमा अडकतोय की काय अशी भीती वाटत असताना दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीने पदार्पणातच सेंचुरी ठोकली आहे असं म्हणायला हरकत नाही.
ठराविक रुटीनमध्ये अडकलेला एक निवृत्त, एकटा माणूस … त्याच्या जवळ त्याचा सहायक माउली आणि लाडका लॅब टायगर सोडून कोणीच नाही … मुलं दूर निघून गेली आहेत …. दूर लांब कुठेतरी … आणि त्यांच्यासाठी ते मनानेही बाबापासून खूप दूर आले आहेत … त्यांच्यात खूप काळ कोरडेपणा आणि अंतर आहे! एकेकाळी हा बाबा चारचौघांसारखाच कुटुंबवत्सल होताही … पण आपल्या मुलांना तो खूप आनंदी आठवणी देऊ शकलेला नाही … हा शुष्क, कोरडा, औपचारिक व्यवहार आता सगळ्यांच्याच अंगवळणी पडला आहे … पण मग आपला नायक भास्कर पंडित … निवृत्तीनंतर हे सगळं निस्तरायचा प्रयत्न करतो .. आपल्या मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो … हे असं अचानक का घडतं? आणि पुढे हा संवाद कसा उलगडतो हे पाहणं खूप रोचक आहे … त्याबद्दल मी जास्त सांगणार नाही … पण दिग्दर्शक आणि कथाकाराने यात खुर्चीला खिळवून ठेवणारे भावनिक नाट्य उत्तम उभे केले आहे …
या चित्रपटाचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे पात्र-निर्मिती आणि चांगल्या अभिनेता निवडीची व पटकथा, दिग्दर्शन यांची त्याला जोड आहेच … पण भास्कर पंडित, माउली, आपटे ही पात्रं जशी आहेत तशी आहेत म्हणूनच गोष्टीत रस निर्माण होतो. वरवर शुष्क, कोरडा, व्यवहारी, भावनाशून्य, माणूसघाणा वाटणारा एखादा भास्कर पंडित आत कसा आहे याचा अनेकदा पत्ता लागत नाही … अगदी वर्षानुवर्षे पत्ता लागत नाही … कधी कधी गोष्टींना आहे तसे स्वीकारून जगू शकणारे स्थितप्रज्ञ (भगवंताचे लाडके) लोक इतरांना आत्मकेंद्रित, पाषाणहृदयी वगैरे वाटतात … पण त्यांचं भावविश्व कसं आहे हे इतरांना समजत नाही … थांग लागणार नाही इतके खोल असू शकतात असे लोक … आणि मग आयुष्याने गुगली फेकला तर मग त्यांनाही अचानक बदलणं कठीण होऊन जातं … इतकी वर्ष जो मुखवटा घालून ते वावरलेले असतात तो मुखवटा कधी ओळख बनून गेला हे समजत नाही … आणि मुखवटा खरा आणि माणूस खोटा असं होऊन बसतं … ही घालमेल सचिन खेडेकरांनी इतकी छान मांडली आहे की भास्कर पंडित या व्यक्तिरेखेला आपण अगदी सहज आपलं मानून टाकतो.
मनोभावे भास्कर पंडितांची सेवा करणारा माउली आणि स्मृती हरवून बसलेले आपटे आपल्या नायकाच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू आपल्यासमोर आणतात … या दोन्ही पात्रांमध्ये निरागसता आहे, खरेपणा आहे … करुण रसाची झालर आहे … आणि भाबड्या हास्यरसाचं मनोरंजनही आहे … मानत राग साचलेल्या मुलांचं कामही कथेला पूरकच आहे. आणि कोरड्या भास्कर पंडिताच्या बायकोचं पात्र एकही संवाद नसूनही गाण्यातून खूप काही सांगून जातं … गंधारचं संगीत उत्तम आहे … श्रवणीय चाल आणि उत्तम प्रोडक्शन व वाद्यरचनेची त्याला जोड … शेवंतीचे फूल हे गाणं कथेला पुढे नेत राहतं … भूतकाळाशी जोडत राहतं … त्या मेलडीतून भास्करची रजनी कथेत डोकावत राहते.
हा चित्रपट काही वेगळी दृश्यभाषा मांडतोय असं नाही पण उगाचच लक्ष वेधून घेणाऱ्या सुंदर फ्रेम्स बनवणे ही कथानकाची गरजही नाही … तांत्रिक दृष्टीने अभिजीत अब्दे यांचा कॅमेरा सफाईदारपणे गोष्ट उलगडत नेतो … आणि अनेक क्लोजअप व कंपोसिशन अभिनयाला अधोरेखित करणारे आहेत … त्यामुळे अभिनय केंद्रित असला तरीही या चित्रपटात टीव्ही-नाटक पाहिल्याचा फील येत नाही (जे अनेकदा हल्लीच्या मराठी चित्रपटांत घडत असतं) सुचित्रा साठे यांनी संकलनातून कथेच्या गतीला जपलं आहे.
आता हा चित्रपट माझ्यासाठी खास का आहे तेही सांगतो … डिस्क्लेमर म्हणा हवं तर … बापजन्मचे costume माझ्या लाडक्या सायली सोमणने केले आहेत (मी तिचा मामा आहे) आणि तिचा होणारा नवरा व साउंडचा जादूगार अक्षय वैद्य याने या चित्रपटाच्या साउंडची जबाबदारी उत्तम पेलली आहे … आणि अगदी वस्तुनिष्ठपणे मी हे सांगू शकतो की सायली आणि अक्षयने त्यांच्या कामाने बापजन्मच्या परिणामकारकतेत भरच टाकली आहे … माझ्या फिल्मचं म्हणजे स्टिक टू ड्रीम्सचं मिक्सिंग अक्षय करतोय त्यामुळे त्याचं काम पाहिल्यावर मी नशीबवान आहे असंच म्हणेन … अर्थातच चित्रपट आणि सर्व कामाचं कौतुक करताना मी ते एक चांगल्या सिनेमाचं कौतुक करणारा सिनेमाप्रेमी म्हणून केलं आहे … अक्षय-सायलीचा मित्र म्हणून नाही. पण त्या दोघांचं नाव क्रेडिट रोलवर वाचताना मस्त वाटलं एकदम! आपण सिनेमा पाहतो कारण आपल्याला खऱ्या आयुष्याला सुट्टी देऊन काही वेगळे अनुभव दोन-अडीच तास जगायला आवडतं … बापजन्म असाच एक बाप अनुभव म्हणून पाहायला हवा …