न्यूटनचा ट्रेलर पाहिला तेव्हाच नक्की केलं की लवकरात लवकर अगदी पहिल्याच दिवशी ही फिल्म पाहायची. आणि संध्याकाळी न्यूटन ऑस्करच्या बेस्ट फॉरेन फिल्मच्या स्पर्धेत भारताची अधिकृत फिल्म म्हणून जाणार असल्याची बातमी वाचली आणि उत्सुकता अजूनच वाढली. श्वास चे दिग्दर्शक संदीप सावंत यांची ७-८ वर्षांच्या अथक परिश्रमातून साकार झालेली फिल्म नदी वाहते दुपारी पाहणार होतो पण काही तांत्रिक कारणांमुळे शो रद्द झाले आणि थिएटरहून परतावं लागलं … नाहीतर आजचा दिवस दोन प्रभावी फिल्मनी सत्कारणी लावला असता … अर्थात मराठी फिल्म पाहायची बाकी असली तरी न्यूटन मराठी दिग्दर्शकाची फिल्म आहे यातही आनंद आहेच!
कोणत्याही चांगल्या फिल्मबद्दल लिहीत असताना मला संभ्रमात पडायला होतं. कितपत तपशीलवार लिहायचं … किती वर्णन करायचं? आणि काय सांगायचं नाही? कारण फिल्ममध्ये जरी सस्पेन्स नसला तरीही फिल्म पाहणं हा एक वैयक्तिक अविष्कार असतो आणि खूप जास्ती सांगितलं तर कोऱ्या पाटीने फिल्मचा आनंद घेता येत नाही. ती उस्फूर्तता टिकून राहावी पण आपल्याला फिल्मचं कौतुकही करता यावं ही तारेवरची कसरतच!
पात्रांची निवड किंवा कास्टिंग या फिल्मचं बलस्थान आहे असं मला वाटतं. हट्टी पण प्रामाणिक असलेला नवा सरकारी बाबू राजकुमार रावने अगदी सहजपणे उभा केला आहे … त्याची डोळे मिचकवण्याची लकब लक्ष वेधून घेते … त्याचा आत्मा सिंग नामक सुरक्षा अधिकाऱ्याबरोबर सतत संघर्ष होत राहतो … फक्त ७६ मतदारांच्या बूथसाठी एवढे प्रयत्न कशाला करायचे असा स्पष्ट विचार आणि त्यातून आलेला निराशावाद याच्याशी न्यूटनचा सतत संघर्ष सुरु असतो …
पंकज त्रिपाठीने हा खलनायकाकडे झुकणारा पण तरीही खलनायक नसलेला अधिकारी छान रंगवला आहे … संजय मिश्राच्या वाट्याला छोटीशीच पण महत्त्वाची भूमिका आहे … हार्दिक पंड्याची कॅमिओ कशी असते तशीच… न्यूटनच्या स्वभावाचे कंगोरे सुरुवातीलाच अलगद उगडण्याचं काम हे पात्र करतं … अंजली पाटीलने साकारलेली आदिवासी शिक्षिका खूपच ताजीतवानी आणि प्रामाणिक व्यक्तिरेखा वाटते … तिच्या निरागस स्मितहास्यातून परिस्थिती बदलू पाहणारा, न्याय्य वागण्याचा आग्रह धरणारा नायक तिच्यासाठी एक नवा अनुभव आहे हे व्यक्त होतं. रघुबीर यादव म्हणजे दादा माणूस पण अशा अभिनेत्याला वाव मिळेल असा रोलही असायला हवा … पटकथाकाराने हे पीच अगदी उत्तम तयार केलंय … साठीला आलेला बोलघेवडा, मिश्कील, निर्ढावलेला आणि निवृत्तीपूर्वी असली धोकादायक निवडणूक ड्युटी आपल्या वाट्याला का याने वैतागलेला लोकनाथ बाबू उभा करत असताना रघुबीर यादव अभिनय करत आहेत असं वाटतच नाही
स्वप्नील सोनवणेचा कॅमेरा बोलका आहे … निर्मनुष्य, धोकादायक पण शांत जंगलाची दुनिया त्याने कौशल्याने उभी केली आहे .. लक्ष वेधून घेणाऱ्या सुंदर फ्रेम्स बनवण्यापेक्षा दृश्य भाषेचा वापर करत दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेली कहाणी स्क्रीनवर आणायचे काम स्वप्नीलने केले आहे. क्लोज अपमध्ये आपल्याला दिसतात महत्त्वाच्या पात्रांचे मनोव्यापार आणि आजुबाजूच्या माहौलात ते कसे वागतात याचं दर्शन … त्यांच्या सभोवताली असलेल्या स्थितीशी त्यांचं नातं नेमकं कसं आहे हे त्या क्लोजप मधून हलकेच उलगडत जाते
कथा ओघवती आहे … एडिटिंग त्याला साजेसं आहे … गोष्ट वेगाने पुढं जात नाही … पण आपल्या आयुष्यात तरी कुठं सगळं काही वेगाने बदलतं … पण फिल्मचा वेग कमी असला तरी तिचा संदेश सतत भिडत राहतो …या फिल्मचं राजकीय विश्व आपल्याच देशातलं तरीही वेगळ्या ग्रहावरचं वाटेल असं … फिल्मच्या ऑडिओ ट्रॅक मधली ऐकण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यातली शांतता … उगाच नाट्यमय संगीत नाही … साउंड इफेक्ट नाहीत … ती शांतताच आपल्याला अलगद कथेच्या डोहात डुबकी घ्यायला भाग पाडते …
दिग्दर्शक अमित मसुरकर ने या चित्रपटात कोणताही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला नाही … पण आपल्याला तो विचार करायला भाग पाडतो … राजकारणाबद्दल, प्रगतीबद्दल, न्याय्य जगण्याच्या हक्काबद्दल … राजकीय जागरूकता, नियम, भ्रष्टाचार, … कोण प्रगत कोण आदिवासी … कोण मालक कोण उपरा … आणि या सर्व प्रश्नांचा संदर्भबिन्दू म्हणजे ७६ मतदारांचा तो बूथ!
नूतन कुमार हे नाव न आवडल्याने आपला हिरो नाव बदलून न्यूटन ठेवतो …. यापलीकडे न्यूटन आणि या कथेचा काहीतरी संबंध आहे का? न्यूटनच्या दोन नियमांचा विचार करूया … पहिल्या आणि तिसऱ्या … आणि तेच संदर्भ सामाजिक बदलाच्या बाबतीत लावून पाहूया … कोणताही बदल हवा असेल तर जुन्या विचारांचं जोखड आणि निराशावाद सोडून मेहनत करायला हवी आणि दुसरं म्हणजे जर आपल्याला बदल हवाय तर त्याविरोधात प्रतिक्रिया येतीलच … आपल्या कृतीला प्रतिक्रिया येणारच … त्यामुळे जो बदल हवाय त्यासाठी किंमत मोजायची तयारी हवी … पण न्यूटन कितीही हुशार असला तरीही तो लाजाळू आणि आत्ममग्न होता … त्याला प्रेरणा देणारा एडमंड हेली त्याच्या आयुष्यात नसता तर न्यूटनच्या कामाला मान्यता नसती मिळाली… हेच काम मालको २१ व्या शतकातील न्यूटनसाठी करते! लीलया केलेला अभिनय … वास्तवदर्शी पण मनोरंजक कथा यासाठी न्यूटन पाहायलाच हवा!