
दमणमध्ये काढलेला फोटो
कधीकधी तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता … गोष्टी क्लिक होतात आणि तुम्हाला लगेच पुन्हा भेटावंसं वाटतं … गप्पा संपूच नयेत असं वाटतं … रोजच्या रोज त्या व्यक्तीला प्रत्येक छोटी मोठी वेडी शहाणी गोष्ट-घटना सांगावीशी वाटते. अशा व्यक्ती आपल्याला नेहमी भेटत नाहीत … पण मानसी आणि मी भेटलो आणि भेटतच राहिलो. आम्ही दोघे एकाच शाळेत शिकलो पण शाळेत कधीच भेटलो नाही. आणि आमच्या दोघांचा स्वभाव इतका वेगळा की (मानसी अभ्यासू सालस वगैरे आणि मी शेवटच्या बाकावरचा) तुमचं कसं काय लग्न झालं हा प्रश्न आश्चर्याने बरेच जण आम्हाला दोघांना (जास्ती करून तिला) विचारतात!

२६ फेब्रुवारी २०११ – आमच्या लग्नाचा दिवस
opposites attract हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरं आहे की हे वेगळेपण अनेकदा ठिणग्या पडायला कारणीभूत ठरत असतं. पण आमच्या सात वर्षांचा प्रवास पाहिला की जाणवतं की कितीतरी क्षण इतके जिवंत होऊन वेड्यासारखं जगणं हे फक्त मानसीबरोबरच मला शक्य झालं असतं. फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करताना मानसी खूप तळमळीने अगदी वाहून घेऊन काम करते. तिच्या पेशंटना बरं वाटलं, त्यांच्या वेदना दूर झाल्या, त्यांना मानसिक आधार मिळाला की त्याबद्दल बोलताना मानसीच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं … ते अगदी भारावून टाकणारं असतं … त्या क्षणात ती जगातली सगळ्यात आनंदी व्यक्ती असते हे मी खात्रीने सांगू शकतो. मानसी भरतनाट्यम शिकली आहे … संगीताची तिला आवड आहे … कवितांची जाण आहे …. जर तिने मनात आणलं तर पुस्तक संपवायला तिला अजिबात वेळ लागत नाही … प्रवासाच्या बाबतीत ती शूरवीर नसली तरीही नवीन जागा मानसीबरोबर पाहण्याचा explore करण्याचा आनंद मला खूप दिवस पुरणारा असतो.
मला खरंतर तिचं खूप कौतुक करायचं असतं! पण मला शब्द सापडत नाहीत … आणि अनेकदा योग्य वेळी व्यक्त होण्याचं भान नसतं हेही खरंच! कधीकधी चार साध्या शब्दात हे कौतुक ओठांवर येणं नवरा-बायकोच्या नात्यासाठी खूप गरजेचं असतं कारण हे नातं असं आहे की आपण एकमेकांना खूप गृहीत धरत असतो. पण काही भावना खूप उत्कट असल्या तरी त्या अमूर्त असतात … सगळ्याच अनुभवांचं वर्णन करायला शब्द सापडतात असं नाही. म्हणून चित्रांची, फोटोंची मदत घेऊन मी मानसीबरोबरचे काही क्षण पुन्हा जगण्याचा प्रयत्न करतो आहे.

उदयपूरच्या फतेह सागरला काढलेला फोटो – फेब्रुवारी २०१७
या वर्षी आम्ही खूप दिवसांनी एक मोठी ट्रिप काढली. दहा दिवस राजस्थान … उदयपूर, जोधपूर, जैसलमेर आणि बिकानेर. आम्ही दोघांनी सगळी monument विविध कार्यक्रम, प्रवास, सगळ्या प्रकारचं जेवण … शॉपिंग सगळ्याचची मजा घेतली … प्रवासात इतकी मजा क्वचितच येते … आम्हाला दोघांना राजस्थान एकत्र पाहायचा होता. We explored it like wanderers!
दसऱ्याच्या दिवशी २००९ ला काढलेला हा फोटो आहे. मी मानसीचा काढलेला पहिला फोटो! असं म्हणतात की फोटो तुम्हाला भूतकाळ आणि आठवणी जपून ठेवायला मदत करतात. फोटो खूप छान काढलेला नसला तरी त्या दिवशी कॅफे कॉफी डे मध्ये जवळजवळ दोन तास मारलेल्या गप्पांची ही आठवण
मानसी आणि माझे दोघांचे एकत्र असे खूप छान फोटो कमी आहेत! अर्थात कारण मी फोटोजेनिक नाही आणि ते फोटो मी काढलेले नसतात. वर आहे तो आमचा पहिला एकत्र फोटो! आश्लेषाच्या साखरपुड्याला काढलेला! दुसऱ्या फोटोमागे गमतीशीर गोष्ट आहे! अनेक दिवस मागे लागल्यानंतर मानसी फोटो काढायला तयार झाली. पार्ल्यातल्या आमच्या घराच्या गच्चीवर फोटो काढायचं ठरलं … नेमका त्याच दिवशी माझा एक मोठा भाऊ घरी आला होता! मानसीला जॉब प्रोफाइल साठी फोटो काढून द्यायचे आहेत असं सांगून गच्चीवर सटकलो होतो.
मानसी सारखं मनसोक्त स्मितहास्य कोणाचंच नाही … मला आठवतंय २०११ च्या गुढीपाडव्याला आम्ही सकाळीच गुढी उभारून फोटो काढायला बाहेर पडलो होतो … खूप भटकलो … धमाल केली होती … जेव्हा मानसी असं निखळ हसत असते तेव्हा मला कसलीच चिंता वाटत नाही … अर्थात लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात … त्यात माझं कामासाठी सतत बाहेरगावी जाणं … लग्नानंतर नोकरी सोडून आयआयटी मुंबईत शिक्षण घेण्याचा निर्णय … या सर्व गोष्टी तिने निभावून नेल्या आहेत. ती जवळच्या काही लोकांमध्ये जास्त रमते तर मी फोटोग्राफी, भटकंती, वाचन अशा गोष्टींमध्ये जास्त आनंद घेतो … लग्न चांगलं की लिव्हइन अशा चर्चा आपण अनेकदा ऐकत असतो … मला वाटतं आपल्याकडच्या ठराविक सासर-माहेर, सूनेच्या जबाबदाऱ्या वगैरे गोष्टींना फाटा दिला तर सहजीवन किती सोपं होईल … कारण आता आपलं लग्न झालं आहे म्हणून नवरा-बायको दोघांनाही अचानक वेगळं नाही वागावं लागणार … गोष्टी आणि नाती खूप उस्फूर्त होतील … आमच्या लग्नाच्या थोडेच दिवस आधी मानसीचं हास्य हरवेल अशी घटना घडली होती … सगळ्या गोष्टी मानसीने मनापासून निभावून नेल्या. कोणतीही जबाबदारी मानसीने बाजूला ठेवली नाही.
मानसी नेहमी दुसऱ्यांचाच विचार करते. खरं तिला खूप गोष्टी करायच्या आहेत … हव्या आहेत. पण काही लोक नेहमी दुसऱ्यांना काय पाहिजे ते आधी पाहतात… स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही … आमच्या घरी असेल किंवा तिच्या … दोन्हीकडे सगळ्यांना काय पाहिजे, काय आवडतं याची आठवण ठेवून ती गोष्टी मनापासून करते. आमचं लग्न झालं तेव्हा नवीन घर तयार नव्हतं त्यामुळे आम्ही एका छोट्या घरात राहत होतो … काही दिवसांचा प्रश्न असेल असं आधी वाटलं पण पुढे ताबा मिळणं जवळजवळ तीन वर्षांनी लांबलं … तरीही मानसीने कधी तक्रार केली नाही … नंतर आम्ही घाटकोपर ला राहायला लागलो … तिचं हॉस्पिटल हाजी अलीला, क्लिनिक पार्ल्यात आणि घर घाटकोपर … असा प्रवासाचा त्रिकोण गेली चार वर्षं तिने रोज विनातक्रार केला आहे … मुंबईत राहणाऱ्यांनाच फक्त या दगदगीची कल्पना येईल.

आम्ही दोघे खवैय्ये

आम्ही दोघे – एक वेडा एक शहाणी
बाकी आम्ही कितीही वेगळे असलो तरी आमचं एकमत होतं ती गोष्ट म्हणजे खाणंपिणं! आम्ही दोघेही प्रचंड फूडी आहोत. तिच्या बरोबर मी नव्या पदार्थांचा आनंद घेणं मी जितकं एन्जॉय करतो तितकं कोणाहीबरोबर एन्जॉय करत नाही. आम्ही दोघांनी केरळला सुद्धा खूप धमाल केली होती. मला आठवतंय एरवी प्रवासात मानसीला भीती वाटते आणि मी तिला धीर देत असतो … पण मुन्नारच्या लेकमध्ये आम्ही स्पीड बोटिंग केलं तेव्हा मी जाम घाबरलो होतो आणि मानसीने मनसोक्त आनंद घेतला होता … आमच्या दोघामंध्ये आर्चरीचा मुकाबला झाला तो सुद्धा ती जिंकली … कलारीपायट्टूच्या आखाड्यात आम्ही दोन हात केले … फक्त तिथे खऱ्या तलवारी होत्या त्यामुळे लगेच तह करून मोकळे झालो!
गेल्या वर्षभरात तणावाचे आव्हानांचे अनेक क्षण आले … पण मानसी आहे म्हणून गोष्टी ठीक आहेत … ती नेहमीच असते … हे नेहमीच असणं गृहीत धरलं जातं … पण ते खूप महत्त्वाचं आहे … खूप खास आहे याची जाणीव आहे …. ती जाणीव व्यक्त होणंही गरजेचं आहे … जे अनेकदा राहून जातं … माझ्या पहिल्या फिल्मचं एडिट मी मानसीला जेव्हा दाखवलं तेव्हा तिने केलेले कौतुक माझ्या कामाची आजवरची सगळ्यात मोठी पावती आहे … बाकी सगळ्यांनी कौतुक केलं की आवडतंच पण बायकोनी केलेलं कौतुक जास्त आवडतं कारण तुम्ही घेतलेल्या कष्टांत तिचाही सहभाग असतो … ती कामाचं कौतुक करते तेव्हा त्या कष्टांचं तिलाही समाधान आहे आणि आपण एकटेच वेडेपणा करत नाही अशी जाणीव होते.
मानसी सगळ्याच नात्यांच्या कसोटीवर २००% टक्के मेहनत करत असते … पण फिजिओथेरपिस्ट म्हणून ती अजून खूप काही करू शकते … लोकांच्या वेदना दूर करणं तिचं मिशन आहे. मी नवरा म्हणून हे म्हणत नाही … खरोखर मानसी प्रचंड sincere आणि passionate आहे! तिच्या आजूबाजूच्या वर्तुळात तिच्या टॅलेंट ला पूर्ण grow व्हायला वाव नाही आहे असं मला खूपदा वाटतं … पण मला खात्री आहे की या सगळ्या आव्हानांना पेलून मानसी मोठी झेप घेईल!
सुंदर लिखाण केले आहेस चिन्मय। तुमचे हे प्रेम असेच वर्षानुवर्षे वाढत राहो।
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।
Wishing you many many more years of togetherness.