
A painting by Dinanath Dalal (1970)
कवी शेखर, राजा विजयादित्याच्या दरबारात राजकवी होता. अमरपूर तसं छोटंसंच राज्य पण कलाकारांना आश्रय देणारं राज्य म्हणून ते प्रसिद्ध होतं. नदीकिनारी असलेल्या आपल्या घरात शेखर एकटाच राहत असे. आजूबाजूच्या प्रत्येकच गोष्टीत शेखरला काव्य दिसत असे. त्याच्या कविता अगदी साध्या, सोप्या … पण थेट हृदयाला भिडणाऱ्या असत. आपली नवनवीन काव्ये तो दरबारात सादर करायचा. जेव्हा तो काव्य सादर करण्यासाठी उभा राहत असे तेव्हा चिकाच्या पडद्याने झाकलेल्या सज्जात त्याला एक आकृती हालचाल करताना दिसत असे. सोन्याच्या पैंजणांची किणकिण त्याला ऐकू येत असे. त्याच तालावर शेखरचे काव्य खुलत जात असे. त्याची गाणी लोकांच्या ओठांवर रुळलेली असत. शेतांत राबणाऱ्या शेतकऱ्यांपासून पेढीवर बसून असलेल्या मुनीमांपर्यंत सगळेच त्याच्या कविता गुणगुणत असत.
असेच दिवस आनंदात जात राहिले. शेखर नवीन काव्ये रचत राहिला. पैंजणांची किणकिणही त्याला प्रतिसाद देत राहिली. अचानक एक दिवस दूर देशातून पुंडरिक नावाचा कवी दरबारात आला आणि त्याने शेखरला आव्हान दिले. पुंडरिकाच्या चेहऱ्यावर विलक्षण उन्माद दिसत होता. शेखरने त्याच्या स्वागतासाठी केलेल्या स्मितहास्याकडेही त्याने दुर्लक्ष केले.
द्वंद्व सुरु झाले. पुंडरिकाने आपल्या धीरगंभीर आवाजात काव्य सादर करण्यास सुरुवात केली. राजाच्या स्तुतीसाठी त्याने ते काव्य रचले होते. भाषेवर त्याचे अगदी चांगलेच प्रभुत्व होते. त्याचा एक एक शब्द राजसभेत निनादत होता. त्याच्या कवितेच्या सामर्थ्याने लोक अवाक झाले होते. टाळ्यांचा कडकडाट करून साऱ्या राजसभेने त्याला प्रतिसाद दिला. शेखरकडे एक तुच्छतादर्शक कटाक्ष टाकून पुंडरिक खाली बसला.
शेखरने आपले उत्तर देण्यास सुरुवात केली. राजाने व त्याच्या पूर्वजांनी प्रजेवर केलेल्या प्रेमावर व ममतेवर ते काव्य आधारलेले होते. लोकांच्याहृदयातील राजाचे स्थानत्यांचे , त्यांचे राजावरील अपार प्रेम यांचा त्याने उल्लेख केला. शेवटी आपल्या काव्यपंक्तींतून शेखर म्हणाला, मला शब्दांच्या खेळात हरवले जाऊ शकते पण माझ्या या राज्यावरील व राजावरील निष्ठेत मला कोणीही मागे टाकू शकत नाही. लोकांच्या डोळ्यांतून ते भावपूर्ण काव्य ऐकून अश्रू ओघळले.
पुंडरिक उभा राहिला.. त्याने शब्दांपेक्षा मोठं कोण अशी पृच्छा केली. पुराणकालीन वाङ्मयाचे दाखले देऊन त्याने शब्दांची थेट ईश्वराशीच तुलना केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून शेखरने आपल्या काव्यातून शब्दांपेक्षा प्रेम श्रेष्ठ असल्याचे सांगितले. राधा व कृष्णाच्या पवित्र प्रेमाची कथा त्याने दाखला म्हणून सांगितली. पुंडरिकाने राधा व कृष्ण या दोन शब्दांच्या विविध रूपांचे अर्थ समजावले. भाषा पुंडरिकाच्या तालावर लीलया वळत होती. भाषापंडितही त्याच्या वाक्चातुर्याने थक्क झाले. शेखर उत्तर देण्यासही उभा राहिला नाही. लोकांना तेव्हा शेखर एक सामान्य माणूस वाटला. लोकांच्या लक्षात आले की आजवर ज्याला आपण महाकवी समजत होतो त्याचे काव्य अतिसामान्य होते. पुंडरिकाला विजयी घोषित करण्यात आले. काहीही न बोलता शेखर दरबारातून निघून गेला.
नदीकिनारी जाऊन शेखरने आजवर केलेल्या काव्याच्या सर्व पोथ्या रचल्या.. एकेक कागद त्याने फाडला व जाळून टाकला. आपली आवडती पांढरी फुले त्याने पलंगावर पसरली. स्वच्छ निरंजनात दिवा तेववला. एका वनस्पतीचे विष प्राशन करून तो निजला. त्याचे डोळे मिटत होते. शरीर क्षीण होत चालले होते. अचानक मंद अत्तराचा दरवळ खोलीत शिरला. सोनेरी पैंजणांची किणकिण ऐकून शेखर म्हणाला, अखेर तू आलीस … युवराज्ञी परिणिताने त्याचा हात हातात घेतला … राजाने आज अन्याय केला … खरा विजेता तूच होतास असं ती म्हणाली. तिच्या मांडीवर डोकं ठेवून शेखरने डोळे मिटले. कायमचे ….
(रबिन्द्रनाथ टागोरांच्या the victory या लघुकथेचा अनुवाद)