Chinmaye

गाण्यांत गुंफलेल्या आठवणी – 1


गाणी आणि आठवणी अगदी घट्ट गुंफलेल्या असतात एकमेकांमध्ये … हा जवळजवळ सगळ्यांचा अनुभव आहे … गाणीच कशाला काही आवाज, काही गंध सुद्धा विशिष्ट आठवणींना जोडले गेलेले असतात … यात काही वेगळं सांगतोय असं नाही … पण मागच्या आठवड्यात सचिनवरचा चित्रपट पाहिला … त्यामधील सचिन सचिन ही आरोळी ऐकताना सुद्धा शाळेतले क्रिकेट पाहण्याचे त्यावर तावातावाने वाद घालण्याचे दिवस आठवले. ते दिवस आमच्या पिढीने एकत्र अनुभवले आहेत … त्यामुळे मित्र-मैत्रिणी, त्यांच्याबरोबरचे धमाल किस्से सगळंच आठवलं …. ए आर रहमान हा माझा सगळ्यात लाडका संगीतकार … त्याला या क्षेत्रात पदार्पण करून २५ वर्षं झाली आहेत … म्हणजे दोन ऑस्कर्सचा विजेता रहमान आणि सचिन आमच्या स्मरणरंजनात तीच जागा व्यापून आहेत. रोजा आला तेव्हा मी दहा वर्षांचा असेन … म्हणजे सचिनची वेगवेगळी शतकं आणि त्यातले शॉट आणि रहमानचे विविध भाषेतले हिट अल्बम ..जवळजवळ आयुष्याला समांतर चाललेले दोन ट्रॅक आहेत असं म्हणायला हरकत नाही … माझ्या nostalgia मधल्या संगीताचा घेतलेला हा मागोवा

  1. मी पाच सहा वर्षांचा असेन … तेव्हा घरी एक लॉन्ग प्ले रेकॉर्ड प्लेयर दुरुस्तीसाठी बाबांनी घरी आणला होता आणि तो टेस्ट करायला ते कट्यार काळजात घुसली ची गाणी असलेली एक लॉन्ग प्ले लावायचे … त्यामध्ये वसंतराव देशपांड्यांनी गायलेलं घेई छंद मकरंद मला फारच आवडलं होतं … मी त्यांच्या सारखं भरभर ताना घेत गायचा प्रयत्न करायचो हे आठवलं की खजिल व्हायला होतं! पण लहान मुलांना भीड नसते हे खरं … मला संगीताची आणि गायनाची गोडी लागली ती पहिली आठवण-

2. नाट्यसंगीत अभिजात कला! पण बॉलिवूड संगीत म्हणजे फास्ट फूड सारखं … त्याची जादू मुंबईकरावर झाली नाही असं विरळाच! कयामत से कयामत चं पापा कहते हैं सुपर डुपर हिट झालं होतं! मला आठवतं आहे मिलिंद दादाच्या फॅक्टरीत दसरा किंवा दिवाळीच्या पूजेला गोल्डस्पॉट पीत पीत या गाण्याचा आनंद घेतल्याचं

3. मी नीट पाहिलेला आणि लक्षात राहिलेला पहिला सिनेमा म्हणजे दो आँखे बारा हाथ … सिनेमा हे चित्रांचं माध्यम आहे हे अगदी तेव्हा डोक्यात पक्के बसले ते शांतारामबापूंच्या या सिनेमामुळे … वसंत देसाईंचे शास्त्रीय धाटणीचं हृदयस्पर्शी संगीत … लतादीदींचे सोपे वाटणारे पण प्रभावी गायन … ती कृष्णधवल चित्र अजून डोळ्यासमोर उभी राहतात

4. मी लहान असताना बाबा माझा अभ्यास घेत असत … कधी कधी मला गाणं शिकवत असत! तेव्हा मला शिंगं फुटलेली नव्हती त्यामुळे मी ते सांगायचे तशीच उत्तरे लिहायचो आणि गायचो सुद्धा ते शिकवतील तसाच … पण माझ्या लक्षात राहिली आहेत ती शंकर जयकिशननी interlude मध्ये वापरलेली व्हायोलिन्स

5. जवळजवळ सगळ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही बडोद्याला जायचो! एक सुट्टी ‘मैने प्यार किया’ मय झाली होती! राम-लक्ष्मण संगीतकार … आते जाते हसते गाते ऐकलं की दांडिया बझार च्या मामाच्या घरी घातलेला धुडगूस आठवतो

6. पाचवीपासून सकाळची शाळा सुरु झाली आणि दुपारी टवाळक्या करायला खूप वेळ मिळायला लागला … तो आम्ही बरेचदा अमेय जोगळेकरच्या घरी घालवायचो … अमेयला खिलाडीची गाणी खूप आवडायची आणि वादा रहा सनम लूप वर लागलेलं असायचं.

7. बाबा त्या काळात स्पीकर्स बनवत असत … ते तयार झाले की डिलिव्हरीच्या आधी घरी येत असत … स्पीकर कॅबिनेटच्या विविध आकारांच्या चाचण्या सुरु असायच्या … त्यामुळे मोठ्या आवाजात गाणी ऐकायला खूप स्कोप होता … ज्वेल थीफ मधलं होठों पे ऐसी बात … त्यातल्या सगळ्या तालवाद्यांच्या बारकाव्यांसकट मस्त ऐकायला मिळायचं … कदाचित तेव्हाच ताल-सूर-चाल यांच्या पलीकडे जाऊन साउंड कडे मी आकर्षित व्हायला लागलो

8. माझ्या बिल्डिंग मध्ये माझ्या वयाचं असं कोणी नव्हतं त्यामुळे मी खेळायला जय हनुमान सोसायटीत जात असे … प्रभव दीक्षित, राहुल आणि राजेश नवाथे, केदार भाटवडेकर, अमोघ आपटे असा आमचा ग्रुप होता … उन्हाळयाच्या सुट्टीतील व्यायामशाळा आणि संध्याकाळी गच्चीत केलेल्या भेळ पार्ट्या … तेव्हा फिल्म पाहायला वीसीआर भाड्याने आणायला लागत असे! जो जीता वोही सिकंदरचं पहला नशा तेव्हाचं गाणं

9. रोजा आला आणि रहमान एक नवा ध्वनी घेऊन आला … सिनेमाच्या पडद्यावरील दृश्यांना सिनेमॅटिक साउंड मिळाला .. माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करताना ब्रेक म्हणून मी दिल है छोटासा ऐकत बसायचो … संतोष सिवन च्या फ्रेम्स हे गाणं ऐकताना पुन्हा डोळ्यासमोर उभ्या राहत असत.

10. रोजाची कॅसेट आणली तर त्यावर फक्त वादकांची सुद्धा नावं होती … रोजची गाणी खूपच आवडली होती … या संगीतकाराची पुढची फिल्म आली की कॅसेट घ्यायचीच असं ठरवून टाकलं होतं …. त्यामुळे बॉंबे ची कॅसेट आणलीच … आणि उत्सुकतेने प्रथम बॉम्बे थीम ऐकलं आणि नवीन कुमारच्या बासरीवर फिदा झालो … विज्ञान मंडळाचे प्रयोग करत असताना आम्ही बॉम्बेची गाणी ऐकत बसायचो …

11. त्याच सुमारास विश्वविधाता नावाचा एक चित्रपट आला होता … चित्रपट काही फारसा चालला नसावा … पाहिला सुद्धा नाही … पण रहमान च्या नावावर कॅसेट घेतली आणि अजिबात निराश झालो नाही कल नहीं था वो क्या है हे माझं सर्वात लाडकं गाणं … नववीच्या पावसाळ्यात मी ते ऐकत बसायचो … गिफ्ट म्हणून सोनीचा वॉकमन मिळाला होता वाढदिवसाला … त्यावर ऐकलेलं हे पहिलंवहिलं गाणं … सतारीच्या तर्फेने सुरु होणाऱ्या गाण्यात बासरी, सतार आणि वीणेची गुंफण असलेले खूप मस्त interlude होते

12. शाळेत एनसीसीत असताना आमचे कॅम्प असायचे .. पहिला कॅम्प वज्रेश्वरीला होता … तिथं गाणी ऐकत बसायला मजा येत असे रात्री … तेव्हा रंगीला आला होता आणि तनहा तनहा जरी उर्मिला मातोंडकरला पाहण्यासाठी सुपरहिट मुकाबलामध्ये लोकांनी लोकप्रिय केलं असलं तरीही रंगीलाची गाणी म्हणजे हिंदी सिनेमा संगीताचा बाज बदलून टाकणारी घटना होती … हेडफोन लावून रात्री अंधारात तनहा तनहा ऐकण्याचे दिवस ते!

13. नववीत असताना बोर्डीला शाळेची ट्रिप गेली होती! आम्हा गरिबांचा डिस्को म्हणजे सहलीच्या बसमध्ये रेकॉर्डवर नाचणे … तेरे मेरे सपने मधले आंख मारे हे आमचे सर्वात आवडते गाणे होते!

14.दहावीच्या महत्त्वाच्या परीक्षेचा अभ्यास करतानाही माझा विरंगुळा गाणीच असायचा! त्यावेळी ताल नुकताच रिलीज झाला होता! इश्क बिना ऐकताना टेस्ट सीरिजचे पेपर सोडवत बसल्याचीच आठवण होते अजूनही!

15. दिलवाले दुलहनिया ले जायेंगे हा चित्रपट मी पहिला नाहीए! आणि जे काही भाग हल्ली टीवीवर पाहिले त्यातील आचरटपणा पाहता काही फरक पडत नाही असं वाटतं … पण गाणी काय झकास होती … दहावीच्या ट्रीपमध्ये आमचं धुडगूस घालण्याचं गाणं म्हणजे रुक का ओ दिल दिवाने …

16. दहावीच्या वार्षिक महोत्सवाची तयारी करताना मी प्रथम प्रेमात पडलो होतो! त्यावेळी खामोशी आला होता! आज मैं उपर आस्मान नीचे हे त्या आठवणींशी जोडलेलं गाणं

17. जरी ए आर रहमान फॅन असलो तरी जुनियर कॉलेजच्या दिवसांची आठवण विजू शहाच्या टेक्नो साउंड वाल्या गुप्त शी जोडलेल्या आहेत! यहाँ वहाँ धुआँ धुआँ छुपा कहाँ गुप्त है वो ! क्या बात है

18. बारावीचं वर्ष माझ्यासाठी फार कटकटीचं होतं विज्ञानाचा अभ्यास अजिबात आवडत नव्हता! आयत्या वेळेला महिनाभर जागून बारावी पार पडली! तेव्हा ऐकत बसायचो छोड आए हम वो गलियां … विशाल भारद्वाजची गाणीही तेव्हा आवडायला लागली! आणि गुलज़ारचे शब्दही

19. सिनेमॅटोग्राफी या कलेबद्दल माझ्या मनात कुतूहल निर्माण करणारा पहिला चित्रपट म्हणजे दिल से … संतोष सिवनचा मी फॅन झालो! मला पार्ले वेस्टला एक दुकान सापडलं होतं तिथं सेकंड हॅन्ड कॅसेट मिळत असत! दिल से पासून मी पैसे वाचवून गाणी जमा करायला लागलो! त्या दिवसांची आठवण आहे ऐ अजनबी

20. कॉलेजमध्ये असतानाच्या पहिल्या क्रशला शाहरुख खान फारच आवडायचा! तिला विचारलं कुछ कुछ होता है पाहायला जाऊया का? ती आली पण अजून ४ मैत्रिणींना सुद्धा घेऊन आली! तब का गाना तुम पास आए

21. मी एनसीसीच्या एयरफोर्स विंगमध्ये कॅडेट म्हणून दाखल झालो … ते एक वेगळंच आयुष्य होतं … नागपूरला जवळजवळ तीन महिने आमचा कॅम्प होता … तेव्हा मी ऐकायचो डोली सजा के रखना मधलं तारा रम रम पम – बाबुल सुप्रियो ने काय आवाज लावलाय! आणि रहमान as usual फँटॅस्टिक

22. आमचा शेवटचा कॅम्प बंगळूरला होता आणि तिथं रहमानची एखादी कॅसेट मिळते का पाहावं म्हणून प्लॅनेट एममध्ये गेलो … एक गाणं लागलं होतं … अंजली अंजली … तामिळ भाषेतलं … पूर्वी कधीतरी ऐकलेलं पण नीट ऐकताना मला यातील व्हायोलिन्स आणि ऑर्केस्ट्रा खूपच आवडला …. विचारलं हे कोणाचं … तर इल्लैयाराजा असं स्टोअर वाल्याने सांगितलं … बंगळूर हे माझं आवडतं शहर! आम्हाला त्या वर्षी राष्ट्रपतींची ट्रॉफी सुद्धा मिळाली … त्या दिवसांची आठवण आहे अंजली अंजली

23. चेंबूरला मास मीडिया शिकायला लागलो तेव्हा बसने खूप वेळ प्रवास करायला लागायचा … बस क्रमांक ३७४ मध्ये मी ऐकत असायचो मुथूची गाणी! अजूनही थिलाना थिलांना ऐकलं की मला तो प्रवास आठवतो

24. आता मी न कळणाऱ्या भाषेतली गाणी सुद्धा ऐकायला लागलो होतो … संगीतासाठी … बीएमएमच्या पहिल्या वर्षाला असताना अलैपायुदे ची कॅसेट घेतली होती … पुण्याला सिम्बायोसिस फेस्टला आमची सहल गेली तेव्हा वॉकमनवर पचयी निरमे लागलेलं असायचं … मित्र म्हणायचे हे काय आंडू गुंडू ऐकतोस पण मला फरक पडत नसे!

25. सेकंड इयरला आमची मुरुडला एक धमाल ट्रिप गेली होती …. तेव्हा मी आणि माझा मित्र आदेश व त्याची गर्लफ्रेंड (आता बायको) मिंटी रहना है तेरे दिल में चं – जरा जरा महकता है ऐकत बसलो होतो मुरुडच्या किनाऱ्यावर … नंतर हेडफोन लावून वाळूत पडून रात्रपर ते गाणं आकाशाकडे पाहत ऐकल्याचं अजूनही आठवतं!

आता या फ्लॅशबॅक मध्ये १९८५-२००२ ही वर्षे गेली! बाकी पुढच्या वेळी कधीतरी …

One comment

  1. Excellent write up. You have an inborn talent for writing. The memories associated with these songs have been beautifully penned by you and you also have a great knowledge about Bollywood music.
    Keep up the good work.
    Makarand Saraf.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: