अनेकदा तुझं मूळ गाव कोणतं हा प्रश्न विचारला जातो … आम्हाला गाव नाही असं मी सांगायचो! लहानपणी काकाकडे पुण्याला नाहीतर आजोळी बडोद्याला जाणे हाच नेम. पण कुलदैवत कोळेश्वर रत्नागिरी जिल्ह्यात कोळथऱ्याला. तिथं ९-१० वर्षांचा असताना गेलो होतो … ते गाव अगदी चित्रातल्या सुरेख गावासारखं वाटलं होतं. काही शब्द आणि काही चित्र यांची सांगड लहानपणीच अशी एकत्र घातली जाते की त्यांना वेगळं करणं शक्य होत नाही. परवा पुन्हा कोळथरेला जाण्याचा योग आला … माझी एकंदर सातवी खेप असेल इथं … खूप काही बदललं नाही आहे पण … दापोली आणि दाभोळच्या मध्ये हे गाव … बुरोंडीच्या पुढं … मुख्य रस्त्यापासून खाली समुद्रावर वसलेलं … अगदी छोटंसं पण अठरापगड घरांचं … आगोम आयुर्वेदिक कंपनी इथलीच … इथं उर्दू शाळाही आहे आणि एक सुंदर समुद्रकिनारा … आणि पंचनदी नावाची छोटीशी नदी जिथं समुद्राला मिळते तिथं हिरवाई निळाई पाहत रेंगाळत राहावंसं वाटतं
माझी मुंज झाल्यानंतर मी आई-बाबांच्या बरोबर पहिल्यांदा तिथं गेलो … मुंबईच्या गर्दीतला मी तिथली शांतता, साधेपणा खूपच वेगळा आणि छान वाटला होता … आणि साध्या पण चविष्ट कांदे-पोह्यांचा मी चाहता झालो तो तेव्हाच … कोकणातील देवळं शांत आणि स्वच्छ … ही एक गोष्ट इथल्या लोकांनी फार छान जपली आहे … दर काही वर्षांनी या देवळांना रंगरंगोटी केली जाते आणि वेगळा ताजा साज चढतो .. . आमच्या कोळथरच्या कोळेश्वराचं अगदी तसंच आहे.
याखेपेला वेगवेगळ्या रंगांच्या संगतीने मंदिर तजेलदार वाटत होतं … मी गावात चौकशी केली पण मंदिराच्या वास्तूचा नक्की लिखित इतिहास समजू शकला नाही … मंदिराचे घुमट थोडे मुस्लिम शैलीतले वाटतात आणि जांभा दगडातील बांधकाम दोन-अडीचशे वर्षे जुने तरी असेल … पण या सगळ्या गोष्टी आपण छान document करायला हव्या आहेत.
कोकण म्हणजे समुद्र, कोकण म्हणजे आंबे … कोकण म्हणजे काजूची उसळ नाहीतर सोलकडी आणि पापलेट … माझ्यासाठी कोकण म्हणजे सुपारीची बाग आणि त्यातून चालत जाताना झिरपत झिरपत पोचलेला सूर्यप्रकाश