काही विषयच असे असतात की त्यावर काही चित्रपट, नाटक, पुस्तक, मालिका आली रे आली की त्याबद्दल कुतुहूल वाटतेच. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र या दोघांचं नातंच असं आहे. काही महिन्यांपूर्वी मराठी चित्रपट पाहायला गेलो होतो तेव्हा बघतोस काय मुजरा कर चा ट्रेलर पाहिला आणि वाटलं की हा चित्रपट पाहायचाच. आणि फर्स्ट डे फर्स्ट शोलाच मुजरा करायला हजर झालो. अनेक लोक चित्रपट पाहायचा की नाही हे परीक्षण किंवा त्याला किती स्टार मिळाले यावरून ठरवतात. परीक्षण हा शब्दच खरंतर मला पटत नाही. तेव्हा अभिप्राय हा शब्द वापरूया! मी ट्रेलर पाहून चित्रपट पाहावा की नाही हे ठरवतो आणि या लेखात मी चित्रपट पाहावा किंवा नाही याबद्दल माझं मत देण्यापेक्षा माझा अनुभव आणि अभिप्राय काय याबद्दल लिहिणार आहे.
कथानक – पात्र परिचय
युवा सरपंच नानासाहेब (जितेंद्र जोशी), पांडा उर्फ पांडुरंग (अनिकेत विश्वासराव) आणि शिवा (अक्षय टांकसाळे) या तीन गावरान शिवभक्तांची ही गोष्ट! महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं खरबुजेवाडी गाव म्हणून सगळीकडे शिवाजी महाराजांच्या नावावर काढलेली दुकानं आणि पाट्या! सरपंचांना टक्कर द्यायला समशेर पाटील (हेमंत ढोमे) आणि त्याचा राजकीय बॉस घाडगे (विक्रम गोखले) शिवाय राजकारणात मुरलेल्या वंदनाताई (अश्विनी काळसेकर) आणि रोमान्सचा तडका द्यायला हिरवीणी म्हणून रसिका सुनील, पर्णा पेठे आणि नेहा जोशींनी चांगलं काम केलंय. सोनाली कुलकर्णी आणि श्रेयस तळपदे पाहुण्या भूमिकेत फटकेबाजी करून गेलेत.
नानासाहेब जरी राजकारणी असला तरी सच्चा शिवभक्तही आहे. सरदार घराण्यात जन्माला आलेला हा गडी याच्या पोराचे नावही संभाजी बरं का… गावापाशी किल्ला आहे … तो स्वच्छ असावा, त्याची निगा राखली जावी, किल्याचा आणि पंचक्रोशीतल्या गावांचा विकास व्हावा अशी त्याची प्रामाणिक इच्छा … नानासाहेबाच्या पत्नीला त्याचं शिवप्रेम वेडेपणा वाटतो … पांडा सरपंचपदावर डोळा ठेवून आहे तर शिवाला स्वतःला सिद्ध करून हिराला म्हणजे समशेरच्या बहिणीला जिंकायचं आहे पण नानासाहेबाला शिवा आणि पांडा मनापासून साथ देतात .. किल्ल्यावर दारू पिऊन धांगडधिंगा करणं , कचरा फेकणं नानाला आवडत नाही … त्याच्या स्वप्नात नेहमी एक घोडेस्वार मावळा तळपती तलवार उचलून नेताना दिसतो … काय असेल या स्वप्नाचा अर्थ? साहेबाच्या देशात पुरातन वास्तूंना जसं जपलं जातं तसंच आपल्या किल्ल्यांचं जतन व्हावं हे या त्रिकुटाला वाटतंय आणि त्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार आहेत … त्यासाठी आमदार व्हायचं असा प्रस्ताव पांडा मांडतो आणि पक्षश्रेष्ठी तिकीट मिळवण्यासाठी काहीतरी धूमधडाका उडेल असं करून दाखवा असं आव्हान नानासाहेबासमोर ठेवतात … आता हे तिघे काय करणार? त्यांना यश येणार का आणि त्यातून किल्ल्याचा विकास करण्याचं स्वप्न साकार होणार का याची ही गोष्ट आहे.
भट्टी जमलीये का?
जितेंद्र जोशी आणि अनिकेत विश्वासरावचा अभिनय जमून आलाय … शिवाला पाहून yz मधल्या त्याच्या व्यक्तिरेखेची आठवण होत राहते! रसिका सुनील शानयाच्या मानाने फारच प्रेमळ साधी आणि मन-मिळाऊ वाटते तर पर्णा पेठे ने खेळकर अल्लड हिरा छान रंगवली आहे … अभिनय आणि खुसखुशीत संवाद … थोड्या साच्यातील विनोद चित्रपटाला रंजक करतात!
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव फक्त राजकारणासाठी वापरणारे सत्तेत असताना त्यांच्या गड-किल्ल्यांचं जतन करणार का? त्यांच्या किल्ल्यांना दुर्लक्षित करून भपकेबाज स्मारक उभारणे योग्य आहे का अशा महत्त्वाच्या प्रश्नांना चित्रपट वाचा फोडतो … पण मनोरंजनप्रधान असला तरी विषयाच्या खोलीत हा चित्रपट जात नाही … ट्रेलरवरून चित्रपट व्हिजुअल ट्रीट असेल असं वाटतं पण त्या फ्रेम कथेत नीट मांडल्या गेल्या नाहीत असं जाणवतं! अमृतराजचं संगीत श्रवणीय आहे!
जय भवानी जय शिवाजी