या चित्रपटाचे ट्रेलर पाहिले तेव्हाच मनात उत्सुकता निर्माण झाली! आणि रिव्यू वाचून पिक्चर पाहावा की नाही हे ठरवण्यापेक्षा ट्रेलर पाहून चांगला अंदाज येतो! शिवाय सचिन कुंडलकर चा चित्रपट पाहणे म्हणजे एक हैप्पी जर्नी नाही का! पण मग लेका तू कशाला रिव्यू लिहितो आहेस असे तुम्ही विचारणे साहजिक आहे! चित्रपट हा एक अनुभव असतो! तो दोघांनी एकत्र बसून पाहिला तरी प्रत्येकाच्या मनात तो एक वेगळा अनुभव म्हणून घर करतो … पिच्क्चर पाहिला रे पाहिला के त्याबद्दल गप्पा मारायची खुमखुमी येते … आणि जर पिक्चर आवडला तर विचारूच नका … तेव्हा तेच या चावडीवर मांडतो आहे … म्हणून तो पाहावा की पाहू नये यापेक्षा मला तो कसा वाटला हे सांगणे मला जास्ती महत्त्वाचे वाटते …
ही एका खूप श्रीमंत मोठ्या संयुक्त कुटुंबाची गोष्ट आहे … हे सर्व लोक सुखी असतात आणि त्यांना काहीच कसलाच प्रॉब्लेम नसतो असे आपल्याला वाटत असते … पण बाहेर दिसणाऱ्या दिमाखामागे अनेक भावनिक वादळे लपलेली असतात हे आपल्याला सहसा जाणवत नाही … ही या अशा राजवाडे कुटुंबाची गोष्ट … पण ही गोष्ट श्रीमंती सोडली तर प्रत्येक सुखवस्तू मध्यमवर्गीय कुटुंबाला लागू होईल अशी आहे. प्रेम जेव्हा मालकी हक्काकडे झुकू लागते तेव्हा ते बांधून ठेवते … यात कोणी विलन असेल असे नाही … पण यातल्या स्वार्थीपणाला हित चिंतणे आणि व्यवहारी विचार म्हणून पाहिले की मग सुरु होते एक तगमग! देबर्पितो ने केलेल्या गाण्यातून ही छान व्यक्त झाली आहे! कुटुंब आपल्याला घडवते की अडवते याचे उत्तर मला मिळालेले नाही … पण जशी आपापल्या अपेक्षांचे किंवा योग्य-अयोग्यच्या संकल्पनांचे ओझे लादून बांधणारी कुटुंबे आहेत तशीच दूर गेलात तरी पंखात ताकद घेऊन मुक्त उडा असे सांगणारी आणि पाठींबा देणारी कुटुंबेही आहेत … इथेच कथेचा प्राण आहे असे मला वाटते! नाहीतर हे सर्व २bhk मधल्या छोट्या कुटुंबातही होतेच …
सतीश आळेकरांनी उभा केलेला कुटुंबप्रमुख संयत आहे पण या व्यक्तिरेखेतून सत्ता आणि अधिकार याच दृष्टीने निर्णय घेणारा माणूस आपल्यासमोर उभा राहतो… असे कुटुंबप्रमुख फक्त श्रीमंत कुटुंबांतच असतात असे नाही … आपल्याही आजूबाजूला आपण त्यांना अनेकदा पाहिले आहे. जुना वाडा पाडलेला आणि कुटुंब आता पॉश बिल्डींगमध्ये आलेले … पण एकमेकांच्या खोल्यांत दारावर टकटक न करता जाण्याचे कौतुक … कारण सर्व काही खुले आणि मोकळे आहे त्यात वेगळी स्पेस कसली असा आव. पण प्रत्येक पात्राच्या मनात अनेक सुप्त इच्छा, काळज्या, कटुता साचलेली … ज्योती सुभाष यांनी साकारलेली आई … नवऱ्याच्या सत्तेसमोर कधीही आपले वेगळे मत मांडू न शकलेली पण आता तिच्या मनातील तगमग पुन्हा पुन्हा उफाळून येताना दिसते … एकीकडे जुन्या पितळेच्या भांड्यांत जीव गुंतलेला तर दुसरीकडे फेसबुक वर वावरणारी आणि वायफाय सुरु नाही झाले म्हणून तक्रार करणारी…
विद्याधर (सचिन खेडेकर) सर्वात मोठा आणि आज्ञाधारक मुलगा … भोळा सरळ … बीयर पिताना वडील पाहतील अशी काळजी करणारा पण मुलगा आपल्या बरोबर बीयर घ्यायला हो म्हणतो याने सुखावलेला, लक्ष्मी (मृणाल कुलकर्णी) आणि घरजावई म्हणून राहणारा तिचा नवरा वैभव (राहुल मेहेंदळे) … रमेश राजवाडे आपल्यावर विश्वास दाखवत नाहीत, कौतुक करत नाहीत म्हणून चिडणारा आणि परिपक्व विचार नसलेला एक आग्रही आक्रमक नवरा … अभिनेत्री म्हणून नावारूपाला येऊ शकली असती पण वडीलांनी बांधून टाकलेली मृणाल कुलकर्णी … तिच्या मुलीला अनन्ण्याला (मृण्मयी गोडबोले) मॉडेल व्हायचे आहे पण हे शक्यच नाही असे मृणालचे स्पष्ट मत … अनय (आलोक राजवाडे) आणि श्वेता (कृतिका देव) ही विद्याधरची मुले … अनयला संगणकांच्या जगात रस आहे तर श्वेताला जगभर हिंडायचे आहे … थोडक्यात तिसऱ्या पिढीला आवडीचे काम करियर म्हणून करायचे आहे आणि हे राजवाडे कुटुंबाच्या नियमात बसत नाही… शुभंकरची (अतुल कुलकर्णी) बायको गेलेली आणि त्याला लहान मुलगी आहे
रमेश राजवाडे देतील ती आज्ञा प्रमाण म्हणणारी दुसरी पिढी खुश नाही पण तिच्यात तिसऱ्या पिढीप्रमाणे बदलण्याची हिंमतही नाही … इतकेच काय मनातले विचार ते मोकळेपणाने मांडायलाही धजावत नाहीत… पण जे काही मोकळेपणानी करता येत नाही ते लपून छपून करायचे अशी क्लुप्ती लढवलेल्या शुभंकरने आपला मार्ग शोधला आहे!
जुना वाडा पाडला जाऊन तिथे टोलेजंग इमारत उभी राहणार … अशा वेळेला तिथे धमाल करायला गेलेल्या नव्या पिढीला एक दुवा सापडतो … आणि तिथूनच त्यांना वाट सापडते … दिग्दर्शकाने लपवून ठेवलेला एक्का कथेत प्रवेश करतो आणि मग गाठी सुटायला लागतात… ते सिनेमातच पाहिलेले जास्ती छान.
हैप्पी जर्नी आणि अय्या खूप विजुअल चित्रपट होते … त्यामानाने हा चित्रपट संवादांनी आणि अभिनयाने गुंफलेला जास्ती आहे … पण दृश्य माध्यमाने आपली भूमिका उत्तम निभावली आहे … तगमग या गाण्यातून चित्रपटाचा गाभा उलगडतो … अनेक पात्रे असली तरी ती छान उभी राहिली आहेत आणि मांडणी छान नेटकी असल्याने कुठेही उगाच पात्रांचा पसारा नाही.
आपल्या घरात कोणीही मॉडेलिंग करू नये असा नियम करणारे आजोबा … ते नातीला आपल्या brand चा चेहरा होऊ देत नाहीत पण एक दिवस प्रतिस्पर्धी सराफाच्या होर्डिंग वर नातीचा चेहरा पाहण्याची वेळ या माणसावर येते … ही खूप सूचक घटना आहे! मुले वरवर थिल्लर धमाल करणारी वाटतात … पण सगळे प्रामाणिक आणि मेहनती आहेत
पण चित्रपट मला आवडला कारण मनातल्या अनेक विचारांना सचिन कुंडलकर ने वाट करून दिली आहे … भारतीय संस्कृतीत कुटुंब संस्थेचे महत्त्वाचे स्थान आहे. हे कुटुंब आपल्या स्वप्नांना घडवू शकते आणि बिघडवूही शकते … मुंबई पुण्याच्या सुखवस्तू कुटुंबामध्ये मुलांना पूर्णतः सुरक्षित ठेवून एका जोखीम नसलेल्या मार्गावर चालायला आग्रह करणे ही पालकत्वाची व्याख्या असते हे आपण अनेकदा पाहिले आहे … पण जोखीम नाही असा रस्ता खरोखर असतो का? नेहमी ज्याला कुटुंबाच्या मायेचे संरक्षण मिळाले आहे त्याला खुल्या जगाचा सामना करता येतो का? असे अनेक प्रश्न उभे राहतात …
अनय (आलोक राजवाडे) ने त्याच्या वडीलांना विचारलेला एक मार्मिक प्रश्न लक्षात राहण्याजोगा आहे … हा प्रश्न प्रत्येक कुटुंबप्रमुखाने स्वतःला विचारायला हवा … बिजनेस जॉईन करणे म्हणजे निर्णय घेणे … आपण फक्त पेढीवर जाऊन बसतो … निर्णय तर आजोबाच घेतात, मग आपले तिथे काय काम! फैमिली बिझनेस सांभाळणे हे बाहेरून सर्व काही खूप आयते मिळाले आहे सहजासहजी असे वाटण्याजोगे भासते … पण अनेकदा कुटुंबे नव्या रक्ताला संधी आणि वाव देतात तर अनेकदा हवा असतो एक माणूस … आणि मग धंद्याच्या गरजेसाठी त्याला खुजेही केले जाते
आपल्या अपेक्षांना आणि आयुष्याच्या चूक-बरोबर च्या संकल्पनांना कुठवर कोणावर लादायचे? जबाबदारी आणि अधिकार यांच्यातला समतोल कुठे साधला जातो … अशा अनेक प्रश्नांना हा चित्रपट वाचा फोडतो. ज्यांच्यावर आपले प्रेम असते त्यांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी मुक्त केले पाहिजे आणि प्रोत्साहन दिले पाहिजे … प्रेम अपेक्षांना बांधून ठेवत नाही हा एक छान विचार करण्याजोगा मुद्दा सचिन कुंडलकर ने सहज मांडला आहे! तेव्हा सहकुटुंब पाहायला हवा हा चित्रपट!
mast , very well written ! 🙂