Chinmaye

जात आणि आरक्षण


आरक्षण हा एक वादाचा मुद्दा असतो! आणि त्याबद्दल सर्वांची मते असतात आणि ती अगदी टोकाचीच असतात … ज्यांना ते मिळालेले असते त्यांना ते सर्व सामाजिक प्रश्नांवर जालीम इलाज आहे असा ग्रह असतो … जे ओपन वाले असतात त्यांचे म्हणणे असते की जात-पात नकोच ना मग पाहिजे कशाला जात आणि पाहिजे कशाला आरक्षण! अर्थात मते फुकट मिळतात आणि ती आजूबाजूला जे दिसते किंवा आपले जे काही वैयक्तिक अनुभव असतात त्यातून बनत असतात … त्यासाठी अभ्यास करावा लागत नाही … एखाद्या विषयाचे अनेक कंगोरे असतात ते तपासायची तसदी घ्यावी लागत नाही … आणि त्यामध्ये हरकत काहीच नाही … पण जेव्हा आपण एखाद्या नीतीचा उहापोह करतो तेव्हा हे करणे महत्वाचे असते. आरक्षण नकोच आणि आहे ते सर्व ठीक आहे या दोन्ही टोकाच्या आणि स्वार्थी भूमिका आहेत … शिवाय आम्हाला पण आरक्षण हवे आहे असा एक गट आता विविध जात-धर्म-समाजांच्या राजकीय कंपूगिरीचे हत्यार झाला आहे ते वेगळेच!

जात-पात नको हा अगदी आदर्श विचार झाला. याबद्दल डॉक्टर आंबेडकर आणि गांधीजी आणि अनेक समाजशास्त्रज्ञ यांनी विविध मते मांडली आहेत. अनेकांचे (गांधीजी धरून) म्हणणे असे की विविध उप-जाती एकत्र करून केवळ चार वर्णांत हिंदू समाजाची रचना करुया. बाबासाहेब म्हणतात की दलित आणि मागास समाजाला पुढे आणणे गरजेचे आहे आणि त्यासाठी शिक्षण आणि इतर ऐहिक प्रगती महत्त्वाची आहे. कर्मठ लोकांचे म्हणणे असते की हा फरक ईश्वराने केलेला आहे आणि जात तशीच राहणार.डॉक्टर गोविंद सदाशिव घुर्ये त्यांच्या caste and races in India या पुस्तकात सांगतात की उप-जातींना एकत्र करून मोठे वर्ग तयार केल्याने समाजात तेढ अजून वाढेल आणि ६-७ मोठे अतिरेकी विचारांचे झुंड आपण तयार करू आणि ही जातीय भक्ती, देश-भक्ती पेक्षा प्रबळ होईल … आज महाराष्ट्रात ज्या प्रकारची कटुता विविध जात-आधारित संस्था आणि नेते पसरवत आहेत हे पाहता त्यांची भीती सार्थ आहे हे दिसते. जात आपल्याला जन्माने मिळत असते त्यात आपले कर्तृत्व काय? मग त्याचा अभिमान कसला बाळगायचा हा प्रश्न मला पडतो.

मुळात जात-पात आणि आरक्षण या विषयांची एकदा सरमिसळ झाली की तर्क बाजूला राहतो … स्वार्थ आणि अस्मिता तुमची मते निश्चित करू लागतात. आरक्षण म्हणजे काय हे आधी मुळात समजून घेतले पाहिजे. आणि जात-निहाय आरक्षण हे केवळ एक प्रकारचे आरक्षण झाले. तेव्हा अगदी थोडक्यात मी जात-पात आणि आरक्षण याबद्दल मला काय वाटते हे मी मांडू इच्छितो … याबद्दल सविस्तर निबंध नंतर कधीतरी

ब्रिटीश काळात विविध लोक समूहांना वेगळे ठेवण्याचा उद्योग केला गेला आणि पुणे करारानंतर गांधीजी आणि आंबेडकरांनी एक फार्मुला मान्य केला जो एकीकडे मागास घटकांना सक्षम करणारी पावले उचलू शकेल पण फूट माजेल इतके वेगळे कप्पे समाजात केले जाणार नाहीत.

आरक्षणाला विरोध किंवा पुरस्कार करण्यापूर्वी आरक्षण म्हणजे काय आणि ते कोणासाठी आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. मी जन्माने आणि आडनावाने ब्राम्हण असल्याने माझी सकारात्मक मते आधी मांडतो –

१. आरक्षणाचा लाभ घेणारे लोक ही काही एकाच प्रकारची एक सरसकट जमात नव्हे तेव्हा ते न्याय्य आहे किंवा नाही यावर भाष्य करण्याआधी ही गुंतागुंतीची जात व्यवस्था आणि आरक्षण व्यवस्था सवर्ण आरक्षण विरोधकांनी खुल्या मनाने समजून घेतली पाहिजे.
२. संविधानाचा विचार केला असता लक्षात येते की आपले संविधान समतेचा (दर्जात समतेचा) पुरस्कार करते आणि त्याच वेळी मागे पडलेल्या समाज घटकांना पोषक अशा योजना करण्यापासून सरकारला रोखत नाही.
३. अनेक सरकारी संस्था आहेत … फक्त सैन्य नव्हे … ज्यात खास नियमाद्वारे आरक्षण लागू नाही उदाहरणादाखल भाभा अणुसंशोधन संस्था आणि टाटा मेमोरियल संस्था
४. आरक्षण जातीवरच नाही तर – खेळाडू असण्याबद्दल, शारीरिक व्यंगाबद्दल, भाषिक अल्पसंख्य असल्याबद्दलही मिळते.
५. संवैधानिक पदे आणि अनेक ठिकाणी आरक्षण लागू नाही, शिवाय खासगी क्षेत्रातही आरक्षण नाहीच.

मुळात आदिवासी समाजातील, दुर्गम भागातील scheduled tribe आणि ज्यांना अत्यंत घाणेरड्या अशा अस्पृश्यतेचा सामना करावा लागला आणि आजही लागतो आहे अशा scheduled class च्या लोकांना आरक्षण असणे मला गैर वाटत नाही आणि ते त्यांच्या लोकसंखेच्या समकक्ष प्रमाणातही आहेच.

अनेक लोक आरक्षणाने मेरीट-गुण मारले जातात असा तर्क करतात – त्यात फारसा दम नाही … मी ओपन वाला आहे आणि दोन वर्षांपूर्वी मला IIT मुंबईच्या मास्तर ऑफ डिझाईन ला खूप स्पर्धात्मक असलेल्या परीक्षेतून प्रवेश मिळाला. सोबत जे आरक्षित वर्गाचे विद्यार्थी होते ते हुशारही होते आणि मेहनतीही … ज्या परीक्षेत आपण १०००० अर्जदारांतून ५० जणांची निवड करतो तिथे आरक्षणावर आलेल्या मुलात आणि ओपन च्या मुलात बुद्धीच्या दृष्टीने काहीच फरक दिसत नाही … तीच परीक्षा पुन्हा घेतली तर rank बदलू शकतील. मला स्वतःला २०११ मध्ये ३६० वे स्थान होते आणि २०१२ मध्ये ६१ वे स्थान मिळाले म्हणजे एका वर्षात मी हुशार झालो असे नसून त्या दिवशी मी परीक्षा चांगली दिली इतकेच आणि या बाबतीत एखाद्या वंचिताला काही पायऱ्यांची शिडी मिळाली तर आपल्याला जळण्याची गरज नाही … आपल्या कर्मठ पूर्वजांच्या पापाची परतफेड म्हणून हा छोटा मुद्दा आपण सोडू शकतो … मला प्रवेश मिळायला एक वर्ष जास्त लागले इतकेच!

माझ्यासोबत एक झारखंडच्या आदिवासी भागातून आलेला विद्यार्थी होता … त्याला प्रवेश तर आरक्षणाच्या माध्यमातून मिळाला पण गुणांक, नोकरी यासाठी तर मेहनत, गुण आणि काम सर्व असावे लागते … आज तो एका अमेरिकन कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी करतो … तिथे तर काम पाहून नोकरी मिळते जात पाहून नाही … जी संधी त्याला सुदूर आदिवासी भागात मिळाली नसती ती आरक्षणाने दिली आणि तो सक्षम-स्वयंभू होऊन पुढे गेला … आज आपल्या समाजातील लोकांनी हे क्षेत्र निवडावे म्हणून तो प्रयत्न करतो … ज्युनिअर क्लासमध्ये त्या जिल्ह्यातले अजून पाचजण आहेत … हेच गडचिरोलीतील मराठी आदिवासी मुलांनीही करून दाखवले आहे आणि मराठवाड्यातील दलित समाजातून आलेली मुलेही करत आहेत … या आरक्षणातून फक्त त्याचा फायदा झाला का? नाही? त्याच्या येण्याने आमची संस्था परिपूर्ण झाली आणि तिचे शिक्षण खरोखर भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचायला मदत झाली

माझ्या कोकणस्थ-ब्राम्हण समाजातील उच्चभ्रू आणि यशस्वी लोक इतकेही करत नाहीत आपल्या लोकांसाठी … प्रत्येक गोष्टीसाठी सरकारकडे भीक मागावी लागत नाही जर आपल्या समाजाबद्दल खरोखर चाड आणि आपुलकी असेल तर … आज माझ्या जातीतले किती लोक अमेरिकेत आहेत … डॉलर्स मध्ये कमावत आहेत … किती शिष्यवृत्त्या तयार केल्या यांनी? जात-संमेलनात दहावी-बारावीत ८०% टक्के मिळाले म्हणून फुटकळ रक्कम बक्षीस दिले जाते त्याची उदाहरणे नका देऊ … एक तर हे दान सत्पात्री नाही आणि त्याने कोणाचे आयुष्य बदलत नाही … अमेरिकेतील कोणतेही उच्च दर्जाचे विद्यापीठ पहा … तिथे तुम्हाला मेक्सिको, घाना, केनिया, बांगलादेश, श्रीलंका अशा छोट्या देशांच्या यशस्वी लोकांनी आपल्या मुलांसाठी तयार केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या शिष्यवृत्त्या सापडतील … या खासगी दानातून आहेत … मराठी/ किंवा ब्राम्हण अशा किती full funding शिष्यवृत्त्या आहेत? मला तरी सापडलेली नाही.

आरक्षण जातीवर कशाला गरिबांना द्या अशीही एक हाकाटी असते … त्यातही दम नाही … आरक्षण ही सामाजिक प्रगतीची गरज म्हणून आले, दलिताच्या घरी पैसे आले म्हणजे शिक्षणाचे वातावरण, संस्कार आले असे नाही … शिवाय गरिबांना सरकार फी सवलत, सबसिडी असे अनेक आधार देतच आहेत … ते चुकीचे लोक उपभोगतात असे ओरडणारे सवर्ण मध्यमवर्गीय gas सबसिडी तर सोडणार नाहीत पण याना महागड्या इंग्रजी international शाळा परवडतात … सणवार, वाढदिवस, बाहेर खाणे यासाठी पैसे असतात हे दिसत नाही. शिवाय जिथे खोटे उत्पन्न प्रमाणपत्र सहज मिळते तिथे असे आरक्षण लागू करणे खूप जिकीरीचे आहे.

याचा अर्थ आरक्षणात सर्व काही आलबेल आहे असा नव्हे

१. मंडल आयोगाने आणलेले ओबीसी नामक जे प्रकरण आहे त्यातील अनेक जाती मागास कशा काय बुवा असा प्रश्न पडतो.
२. आरक्षण शिक्षणासाठी ठीक आहे पण नोकरी आणि बढतीत असू नये
३. कोणते समाज खरोखर मागास आहेत आणि कोणते लाभार्थी पात्र नाहीत याचा पुनर्विचार व्हायला हवा तरच आरक्षण योग्य व्यक्तीला मिळेल
आता जातीबद्दल –

मी मराठी, ब्राम्हण, भारतीय, हिंदू कुटुंबात वाढलो … ही माझी ओळख आहे … मी अनेकदा जात-धर्म सोडून देण्याचाही विचार केला. पण त्यातला फोलपणा माझ्या लक्षात आला … मराठी ही माझी महत्त्वाची भाषिक ओळख आहे आणि भारतीय ही राष्ट्रीय ओळख आणि या मला जन्माने मिळालेल्या असल्या तरीही मला त्यांच्याबद्दल आपुलकी आहे. ब्राम्हण असल्याचे म्हणाल तर ही संकल्पना मला मान्य नाही कारण यात आपण वरचढ आणि इतर कनिष्ठ असा एक अहंकार मूलतः येतो … हिंदू संस्कृतीची छाप माझ्या जडणघडणीवर आणि सांस्कृतिक दृष्टीवर आहे आणि इतर अनेक धर्मांप्रमाणे संकुचित न होता ती मला अज्ञेयवादी होऊ देते आणि नियम लादत नाही म्हणून मला ती हवीशी वाटते. आपल्या identity ला अनेक कंगोरे असतात आणि ते आपल्यासाठी महत्त्वाचे असतात … जोवर त्यात अहंकाराची भावना येत नाही आणि आपण उतरंड नाकारायला तयार आहोत तोवर जात असण्याने काहीच नुकसान होत नाही.

मला वाटते की जात विहित समाज तयार करणे अशक्य आहे आणि त्याने आपले सांस्कृतिक वैविध्य नष्ट होते … त्यापेक्षा एकमेकांच्या जातींचा भाषेचा आदर करणारा आणि गरज पडल्यास देवाण घेवाण करायला तयार असलेला वैविध्यपूर्ण भारत आपण बनवला पाहिजे. समता हवी पण समता म्हणजे छापाचे गणपती तयार करणे नव्हे!

3 comments

  1. Yoginee

    Well written balanced view of the system. However, there is a gaping gap in the research in social studies in India: I haven’t seen any reports on what kind of treatment do cast quota students get when they get entry in education. How many of them are able to cope with the competition and how many suffer through psychological ailments like depression because of bullying by open category students or simply inability to cope etc.
    I haven’t gone actively looking for it, but I haven’t come across such research. Once this kind of study is done exhaustively we will know statistically how many students are benefited and how many are exceptions that prove the rule.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: