काही चित्रपट गोष्ट सांगतात तर काही चित्रपट म्हणजे अनुभवांची गोष्ट असते. किल्ला हा एक असाच अनुभव उभा करणारा चित्रपट. अकरा वर्षांच्या चिन्मय काळेच्या भावविश्वात वडीलांच्या जाण्याने काहूर माजलेले असतानाच त्याच्या आईची दूर गुहागरला बदली होते. ओळखीच्या आणि गजबजलेल्या पुण्यातून दूर या छोट्या ठिकाणी राहणे त्याला फारसे पटलेले नसते. हा बदल स्वीकारायला चिन्मय तयार नसतो. त्याला सोबत फक्त त्याच्या आईची … ती देखील तिच्या दु:खातून न सावरलेली … अनोळखी शहरात एकटी! आपल्या मुलाने या नवीन ठिकाणी एक नवी सुरुवात करावी असा तिचा आग्रह आणि प्रयत्न पण तिला स्वतःलाही हे फारसे जमत नसते. नियमाप्रमाणे सरळमार्गी चालणारी ही आई भ्रष्टाचाराला निर्ढावलेल्या ऑफिसात रुळणार तरी कशी?
चित्रपटाची सुरुवात होते कोकणातल्या एका बागेत … जांभा दगडाची पायवाट आणि उंच झाडांमधून झिरपणारा प्रकाश. जितके हिरवेगार आणि सुखद तितकेच एकटेपणाची भावना देणारे ते दृश्य! मला नवीन दमाच्या मराठी फिल्म मधली एक गोष्ट खूप आवडते … या गोष्टींची पात्रे कुठेतरी स्थळकाळ सोडून अधांतरी लटकत नसतात. गोष्ट कोकणात घडत असेल तर तिथला समुद्र, बागा, आमराई, वाड्या सर्वांना गोष्टींमध्ये गुंफले जाते.
मला छायालेखकाने केलेले चित्रपट खूप आवडतात… पण हा वैयक्तिक आवडीचा भाग झाला … मी असे नाही म्हणणार की एक चांगला सिनेमाटोग्राफर तितकाच उत्तम दिग्दर्शक असतोच. किंबहुना सुंदर चित्रांच्या हौसेपायी गोष्ट हरवून जाण्याचा धोकाच जास्त. पण अविनाश अरुणचे अभिनंदन केले पाहिजे की पहिलीच फिल्म असूनही त्याने अगदी सहजतेने चिन्मय काळेचे विश्व उभे केले आहे. पूर्वी त्याने FTII मध्ये असताना केलेला मॉन्सून मूड्स हा लघुपट मी पाहिला होता तेव्हाच त्याच्याकडे एक वेगळी नजर आहे हे मला जाणवले होते …
त्याची लिंक इथे देतो आहे!!
ताज्या दमाच्या मराठी फिल्म वर आजकाल हा शिक्का मारण्यात येतो की त्या संथ असतात आणि नुसत्याच छान-छान चित्रांची मांडणी करून आणि इराणी फिल्मचे अनुकरण वगैरे करून आपल्याला फसवतात. हा आरोप किल्लावरही होण्याची शक्यता आहे पण मला तरी या टीकेत काहीही दम दिसत नाही.
किल्ला मधील प्रत्येक फ्रेम सूचक आहे आणि कितीतरी दृश्य-प्रतीके आपल्याला अनेक गोष्टी सांगून जातात. दररोज टीवीवर आणि मोठ्या बजेटच्या फिल्ममध्ये खोट्या, स्टुडियोत उभ्या केलेल्या दुनियेची चित्रे आपल्या माथी मारली जातात … खोटी वाटणारी अतिरंजित पात्रे रोज संध्याकाळी भेटत असतात … अशावेळेला खऱ्या दुनियेत तयार झालेला आणि साध्या सोप्या … आपल्या वाटणाऱ्या भावनांना हात घालणारा चित्रपट पाहणे हा ताजा अनुभवच असतो.
लाड करणारे आणि समजून घेणारे वडील नुकते गेलेले … नवीन शहर … नवी शाळा … वेगळेच वागणारे मित्र … मनाला आधार देईल असे काहीच नाही आणि असे असताना सगळ्याशी जुळवून घ्यायची सक्ती … काय वाटत असेल चिन्मय काळेला … . जेव्हा एखाद्या पात्राबद्दल आपल्या मनात सह-अनुभूती निर्माण होते तेव्हाच आपण त्या गोष्टीत रस घेतो … ती गोष्ट आपली वाटू लागते … बालपण म्हणजे मजेशीर आठवणी, मौजमस्ती आणि निष्पाप जग हे समीकरण जितके खरे आहे तितक्याच खऱ्या असतात लहानपणात झालेल्या दु:खद गोष्टी … त्यांनी आपले गोंधळून जाणे … मनात प्रश्नांची वादळे आणि न मिळणारी उत्तरे …. हे भावविश्व अविनाश अरुणने अगदी काव्यमय वाटेल अशा पद्धतीने मांडले आहे. पाऊस, समुद्र, प्राणी अशी प्रतीके दिग्दर्शकाने छान वापरली आहेत. चित्रपट हे असे माध्यम आहे की त्याला विचारांना चालना देऊन व्यक्तिसापेक्ष वेगळा अनुभव निर्माण करता येतो आणि यात अविनाश यशस्वी झाला आहे असे मी म्हणेन.
किल्ल्याला गोष्ट आहे का? सुरुवात-संघर्षबिंदू-शेवट असा आलेख आहे का? मी म्हणेन की एखाद्याला एखाद्या काळात खूप जवळून पाहिल्याचा अनुभव आहे या चित्रपटात! अकरा वर्षांच्या चिन्मयची ही डायरी आहे जणू! अर्धवट वय … वडील गेले आहेत हे न कळावे इतके लहानही नाही आणि त्यांची उणीव न भासावी इतके मोठेही नाही! आईघाल्या म्हणजे काय असे प्रश्न पडण्याचे वय … ज्यांच्यात रमायला आवडते असे लोक दूर गेलेले … अशावेळेला धीराने चिन्मय नवे मित्र शोधतो आणि त्यांच्या बरोबर दूर किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत सायकलची शर्यतही लावतो … त्यांच्यातल्या टग्या असलेल्या युवराजला मातही देतो … किल्ला पाहता पाहता त्याची मित्रांशी ताटातूट होते आणि वादळपाऊस झोडपायला लागतो … बावरून गेलेला चिन्मय एका बुरुजात आश्रय घेतो … त्याच्या लक्षात येते की मित्र त्याला सोडून गेले आहेत आणि त्याने दुखावला गेलेला चिन्मय संतापतो. ही ताटातूट कशी झाली हे आपणच ठरवायचे! खरे आहे की अनेक प्रश्नांचे उत्तर आपल्याकडे नसते आणि आपण फक्त कयासांवर अवलंबून असतो!! पण या एकटेपणाला चिन्मय धीराने सामोरा जातो.
चिन्मयच्या आईलाही एकटेपणा त्रास देत असतोच आणि तिने ते व्यक्त तरी कुणाकडे करायचं? सरकारी ऑफिसात प्रामाणिकपणे काम करणारी ही स्त्री; पण दबावाला बळी पडून एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकते. नवरा गेल्याचे शल्य आणि पोकळी सतत भेडसावणारी. लाईट हाउस पाहताना चिन्मय दूर समुद्रात एकटक पाहणाऱ्या आईला पाहतो आणि तिला धीर देतो. कमी वयात खूप काही भोगलेल्या मुलांमध्ये एक मोठेपणा एक परिपक्वता दिसते … पण या मुखवट्यामागे न दिसणाऱ्या … न व्यक्त होणाऱ्या भावनांचे वादळ असते ते या चित्रपटात खूप छान टिपले आहे.
अर्चित देवधर चिन्मय काळेची भूमिका जगला आहे. साधा सोपा अभिनय पण मनाला भिडणारा … आईच्या भूमिकेत अमृता सुभाष खूप काही व्यक्त करते. नटांची निवड हे या सिनेमाचे निश्चित बलस्थान मानता येईल … पार्थ भालेरावने साकारलेला बंड्याही आपल्याशी नाते जोडून जातो … त्यातल्या त्यात खटकेल अशी गोष्ट इतकीच की चिन्मय काळेचे मित्र कोकणी मराठीत न बोलता फारच सातारा-कोल्हापूरच्या वळणाने बोलतात.
निसर्ग हा चिन्मयचा सख्खा सोबती … त्याला एकटेपणात साथ देणारा किनारा … जरी चिन्मय प्रश्नांनी अस्वस्थ झाला असला तरीही तो उत्तरे शोधतो आहे … एकदा कोळ्या बरोबर दूर समुद्रात जाण्याची हिम्मत करणारा चिन्मय त्या सफरीत खूप मोठा होतो … भाजलेल्या ताज्या मासळीची चव घेतो … हा प्रसंग आशयाने भरलेला आहे … फारसे काही बोलले जात नाही … पण उमगते खूप काही … चिन्मयला आणि आपल्यालाही …. मला या सीनला शब्दांनी न्याय देता येणार नाही … तो पडद्यावर अनुभवायलाच हवा
चिन्मयला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील का? त्याची कोडी सुटतील का? नवीन ठिकाणी नवीन मित्रांशी तो जुळवून घेऊ शकेल का? एका नव्या दृष्टीने तो आयुष्य पाहू शकेल का … नाती जोडू शकेल का … हे जाणून घेण्यासाठी किल्ला पाहायला हवा! एक साधा सोपा पण प्रामाणिक चित्रपट बनवल्याबद्दल आपण अविनाश अरुणचे अभिनंदन केले पाहिजे … सब टायटल आहेत आणि संवादापेक्षा या चित्रपटात दृश्य भाषेचा वापर अधिक परिणामकारक आहे त्यामुळे अमराठी मित्रांना आणायलाही हरकत नाही!
कोकणात – गुहागर, गणपतीपुळे, विजयदुर्ग भागात किल्ल्याचे चित्रण झाले आहे आणि अविनाशच्या अनुभवातून ही रचना प्रेरित आहे हे जाणवते. ब्लॉग मध्ये वापरलेले फोटो हे अधिकृत प्रोमोचे grab असून मॉन्सून मूडस विडीयो दिग्दर्शकाने युट्यूब वर टाकला होता.
मी किल्याला पाच पैकी साडेचार गुण देईन
Thanks for a very good review. The child artist playing Chinmay Kale in this film is my son Archit Devadhar.
Thank you so much for your kind words. Please do share the link with others. Archit was wonderful in the film.
छान ! मनातलं लिहलं आहेस !