रणथंभोर व्याघ्र प्रकल्प ….भल्या पहाटे आमच्या जीपने रूट नंबर दोन चा रस्ता पकडला होता …. वाघोबाचे दर्शन घ्यायचे म्हणजे उजाडायच्या आधीच जंगलाच्या वाटांवर कान टवकारून निघावे लागते … चेकपोस्ट वर कागदपत्रे तपासण्यासाठी आम्ही थांबलो होतो … सहा जणांच्या सफारी जीप मध्ये माझ्यासोबत एक ब्रिटीश फोटोग्राफर, चालक, गाईड आणि चार जणांचे एक कुटुंब होते. अगदी नमुनेदार भारतीय चौकोनी कुटुंब … तेवढया दोन मिनिटांच्या ब्रेक मध्ये प्लास्टिकच्या पिशव्या उघडल्या आणि नाश्ता सुरु झाला … अगदी हॉटेल पासूनच मुलांचा कोलाहलआणि आईबापांचा मोबाईल सुरु होता … त्यात वेफर केक कोल्ड्रिंक ची मेजवानी सुरु झाली आणि आवाज टिपेला पोहोचला! पण आम्ही काही सांगणार इत्यात चार काळतोंडी लंगूर माकडे आमच्या उघड्या जीपवर चढली आणि नाश्त्यावर हल्ला चढवला … गाईड आणि चालकाने शांतपणे लंगुरांना टपल्या मारून हाकलले आणि एकदाची सफारी सुरु झाली … तोवर चांगले उजाडले होते! आज काही वाघोबाचे दर्शन झाले नाही! दोन तास मी आणि परदेशी पाहुणा हरणे, नीलगायी, विविध पक्षी टिपत होतो पण या सुविद्य कुटुंबाची टकळी थांबेना … भारतात वाघ नामशेष झाले आहेत आणि प्रोजेक्ट टायगर एक फसवणूक आहे, पैसे फुकट गेले त्यापेक्षा झू बरे, केनिया मध्ये कशी सफारी भारतापेक्षा चांगली असते अशी मुक्ताफळे उधळणे सुरूच होते. तीनदा त्या सुसंस्कृत कुटुंबाला जंगलात प्लास्टिक फेकण्यापासून रोखावे लागले …. भारतीय जंगलांची कदर करणाऱ्या त्या विदेशी फोटोग्राफर समोर या कुटुंबाने देशाचा मानमरातब बराच वाढवला होता … हा एक प्रातिनिधिक अनुभव आहे … मग रणथंभोर असो, का बांधवगढ, की ताडोबा-अंधारी आपले सगळे नाहीत पण अनेक पर्यटक असे वागताना दिसतात!
मी नुकताच दक्षिण कोरियात चार महीने राहून परतलो होतो आणि घरी ओळखीचे एक काका आले होते! त्यांनी सगळ्या गोष्टी आणि अनुभव चवीने ऐकले आणि मग चौकशी करू लागले की अबक टूर्स ची कोरिया साठी पैकेज टूर आहे का? मी सुद्धा एका मध्यमवर्गीय मराठी ब्राम्हण कुटुंबातील असल्याने असल्या टूर्स ची आमच्या घरीही चलती होती! पण एकदा हिमाचल घाईघाईत पाहण्याचा अनुभव घेऊन मी कानाला खडा लावला आहे! चुकून मी असल्या टूर मध्ये काय मजा आहे असे मनोगत मांडले आणि अरिष्ट ओढवून घेतले … पुढील एक तास त्यांनी फक्त दोन लाखात १५ दिवसांत सगळा युरोप कसा पाहिला याचे वर्णन केले! नंतर त्यांच्या स्वैपाकी स्टाफ ने सतत अगदी शुद्ध शाकाहारी जैन सोवळे सोज्वळ इत्यादी जेवण कसे खाऊ घातले आणि स्विस आल्प्स मध्ये पुलाव कसा खाल्ला याचे गोडवे गायले! सगळीकडे खरेदी कशी केली … गाईड ला सगळी फोटो लोकेशन कशी ठाऊक होती हे ही सांगून झाले … त्यांची सगळी हॉटेल्स तारांकित होती आणि वेळापत्रक आखलेले होते! सहकुटुंब एकदा टूर ला पैसे भरले की आपल्याला कसा काहीही ताप नसतो ते अधोरेखित केले.. शिवाय त्यांचा crowd सुद्धा म्हणे हाय-क्लास होता त्यामुळे ते अबकच्या टूर्स नेहमी घेतात हे कळले. त्यांच्या आठ वर्षांच्या नातवाने कसे पटापट फोटो काढले आणि बारा वर्षांच्या नातीने ते कसे पटापट फेसबुकवर अपलोड करून टाकले याची प्रशंसाही झाली ! आणि हो … कखग मराठी मालिकेचे स्टार अभिनेते टूर वर होते आणि त्यामुळे आजीसुद्धा खुश होत्या! थोडक्यात काय तर त्यांच्या प्रवासाच्या साऱ्या गरजांवर अबक टूर नी व्यवस्थित टिकमार्क केले होते हे मान्य करावे लागणार होते! दोन लाखात युरोप सर झाला होता.
दक्षिण कोरियातील सर्वोच्च शिखर हालासान मी चढून उतरलो तो दिवस मला आठवला! मी जेजूच्या एका हॉस्टेल मध्ये राहिलो होतो. आदल्या दिवस गेलेल्या पर्यटकांकडून मला बरीच माहिती मिळाली … एका दिवसात साडेसहा हजार फूट चढून उतरायचे आणि बर्फात बारा तास चालायचे हा अनुभव अजोड आणि अविस्मरणीय होता … शिखरावर लाव्हाने निर्माण झालेले कोन आणि क्रेटर चा देखावा अद्भुत होता! वय वर्षे पाच ते ऐंशी अशा सर्व वयोगटाचे स्त्रीपुरुष एकटे किंवा ग्रुपमध्ये चढाई करत होते … बरोबर अगदी मर्यादित सामान आणि फोटो काढण्यापेक्षा निसर्गाचा आनंद लुटण्याकडे लोकांचे लक्ष अधिक होते. सर्व विश्रांतीच्या टप्प्यावर आसरा होता … वैद्यकीय साधनसामग्री आणि पिण्याचे पाणी होते. लोक प्लास्टिक वापरत नव्हते आणि असलेच तर ते आपल्या सामानात बांधून घेत होते या गोष्टीने माझे लक्ष वेधून घेतले! ग्वाने उम्सा मंदिरा जवळ उतरलो तेव्हा बस उपलब्ध नाही असे कळले आणि पुढे हायवे पर्यंत तीन किलोमीटर चालू असा विचार करून निघालो, पण एका वयोवृद्ध जोडप्याने त्यांच्या गाडीत मला लिफ्ट दिली आणि हॉस्टेल च्या दारात सोडले.
त्या दिवशी होस्टेल मध्ये विविध देशांतील पंधरा-वीस जण होते … ज्या काही गप्पा आणि मैत्री झाली ते मी अगदी ताज-लीला-ओबेरॉय-हयात मध्येही अनुभवलेले नाही! होस्टेल स्वच्छ होते, वातानुकुलित होते, तिथे कपडे धुवायला मशीन आणि वायफाय ची सोय होती … आणि महत्वाचे म्हणजे स्वतः स्वयंपाक करणार असाल तर अनलिमिटेड चहा-कॉफी, ब्रेड आणि अंड्यांचा पुरवठा होता. विविध संस्कृती, देश, भाषांचे आम्ही … पण भटकंतीच्या धर्माने बांधले गेलेले! त्या संवादाची सर तारांकित हॉटेलच्या बंदिस्त खोलीला कशी येणार? दरही माफक होता …पंधरा हजार वॉन म्हणजे दिवसाचे जवळपास हजार रुपये फक्त!
किंवा मग हैन-सा मंदिरात केलेला मुक्काम असो! डोंगरांच्या कुशीत वसलेले शांत मंदिर … पहाटे तीनच्या नीरव शांततेत ऐकलेली प्रार्थना … संपूर्ण शाकाहारी पण चविष्ट जेवण … पारंपारिक कोरियन पद्धतीच्या ओंदोल नामक लाकडी जमिनीवर साधी चादर अंथरून केलेला आराम! असे अनुभव अबक टूर्सच्या घाईत घेता येत नाहीत … जेव्हा बुसानच्या अजस्त्र जगाल्ची फिश मार्केट मध्ये घासाघीस करून साशिमी आणि बार्बेक्यू वर ताव मारला आणि नाक बंद करून छोटा ऑक्टोपस खाल्ला तेव्हा मालवणी मित्र मैत्रिणी आठवल्याच!
आपले मध्यमवर्गीय पर्यटन फारच तोलून मापून असते नाही का? त्यामध्ये केल्याने देशाटन चातुर्य येते फार ची … खोली नाही किंवा समर्थ रामदास सांगतात त्याप्रमाणे – सृष्टीमध्ये बहु लोक, परिभ्रमणे कळे कौतुकचा उत्साह/ कुतूहल देखील नाही. सगळ्यांनाच backpacking करून हिंडता येणे शक्य नाही हे मी मान्य करतो. पण अशी डोळस आणि बिनधास्त भटकंती एकटया तरुण मुलांसाठीच ठीक आहे हे मात्र खरे नाही … आम्हां भटक्यांची तक्रार थोडी वेगळी आहे. मी हल्लीच MTDC चे गणपतीपुळे रिसोर्ट बुक करत होतो तेव्हा लक्षात आले की एकेका खोलीची किमान किंमत दोन हजार रुपये रोजची आहे … वातानुकुलीत खोली असेल तर दुप्पट! आणि काही वर्षांपूर्वी आम्हा लोकांसाठी रोजचे दोनशे रुपये भरून तंबूची सोय होती ती बंद झालेली! जर महाराष्ट्र सरकारला आम्हा भटक्यांची जबाबदारी अशी झटकायची असेल तर मग खासगी हॉटेल कडून काय अपेक्षा ठेवावी! फक्त विदेशातून पर्यटक आकर्षित करण्यात मग्न असलेल्या सरकारला भरपूर भटकंती करणाऱ्या आम्हा backpackers कडून अनेक पट अधिक महसूल मिळू शकतो … शेवटी प्रत्येकाने आपापला मार्ग आणि आराम निवडावा हे तत्त्व मान्य केलेच पाहिजे. पण मुद्दा खिशाला काय परवडते हा नसून पर्यटन आपण कोणत्या नजरेने करतो हा आहे. भरपूर पगार असणारे आणि तारांकित हॉटेलची सवय असणारे अनेक लोक backpacker म्हणून हिंडतात की! आणि हा संस्कार जर योग्य वयात झाला नाही तर मग प्रवास करायची वेळ आली की हजार स्पीडब्रेकर उभे राहतात … आपण जाऊ तिथे आपले घर निर्माण व्हावे अशा हट्टाने मोठ्या बैगा भरल्या जातात … खाण्या-पिण्याची पार्सले केली जातात … नवीन देश, भाषा, संस्कृती, खाणेपिणे, लोकजीवन यांचा डोळस अनुभव घेण्यापेक्षा पैसे फेकून आराम आणि विरंगुळा विकत घेण्याची प्रवृत्ती बळावते … लोक जोडणे आणि खऱ्या अर्थाने वसुधैव कुटुंबकम चे पालन करण्यापेक्षा आम्ही सुद्धा हे पाहिले हे सांगून कॉलर ताठ करण्याची अहमहमिका आता सोशल मिडीयाच्या कृपेने वाढली आहेच! तारांकित हॉटेल मध्ये राहणे आणि तिथलं ऐश्वर्य अनुभवणे हा एक मजेदार अनुभव आहे आणि त्याची मजाही जरूर घ्यावी पण त्याशिवाय प्रवासच जमत नाही यात मात्र गडबड आहे.
मला प्रश्न पडला की आपल्याला घाई तरी कसली आहे ? रिटायर झालेल्या काकांना युरोप पाहायचा तर आहे पण वेळ नाही! फक्त महाराष्ट्र नीट पाहायला सहा महीने पुरणार नाहीत तर मग एक अख्खा खंड काकांना अबक टूर्स नी कोणती करामत करून पंधरा दिवसात समग्र दाखवला हे कोडे माझ्या मती पलीकडचे आहे!
जैसलमेरच्या बस स्थानकावर मला गुरुमंत्र मिळाला! एक जर्मन माणूस तिथे न्हाव्ह्याकडे चंपी करून घेत होता … त्याला एवढी कसली हौस असे विचारले तेव्हा त्याने सांगितलेले शब्द नेहमी माझ्या लक्षात राहतील … इथल्या चावडीवरचा मेंबर होऊन मी जैसलमेरचा अनुभव घेतो आहे … गोरा विदेशी म्हणून नव्हे!
great blog, chinmaye. i am reading this from a local hostel in bulgaria, as i am getting ready to go out for a trek.