चित्रकाराला सगळ्यात लाडकी गोष्ट असते ती त्याचा कैन्व्हास आणि तो कैन्व्हास जर भिंतीइतका मोठा असेल तर सगळ्या चौकटी सोडून थ्रिलिंग पद्धतीने कलाकाराला व्यक्त होता येते. जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून चित्रकलेचे प्रशिक्षण घेतेलेली मैत्रेयी नामजोशी जेव्हा आयआयटी मध्ये थिसिस प्रोजेक्ट करत होती तेव्हा तिला आपण कागदाची चौकट मोडून खुल्या दिलाने आपली कला मांडली पाहिजे असे वाटले आणि मग एका चहाच्या कट्ट्याचा कायापालट झाला.
“जेव्हा मी प्रोजेक्ट सुरु केले तेव्हा फार विचार न करता मोठ्या भिंतीवर आपल्या ब्रशला करामत करू द्यायची इतकेच डोक्यात होते पण हळू हळू चित्र आकार घेऊ लागले तसे जाणवले की यामागे काही विचार … काही संकल्पना असली तर गंमत आहे … चित्र पूर्ण झाले तेव्हा त्या जागेशी लोक एक वेगळा संवाद साधू लागले … वेगळा आनंद आणि अनुभव घेऊ लागले तेव्हा एक डिझायनर म्हणून समाधान मिळाले”, मैत्रेयी सांगते.
मैत्रेयी साठी एक चित्रकार एक डिझायनर म्हणून एक नवी दिशा देणारा तो अनुभव होता. जेव्हा मास्तर ऑफ डिझाईन ची सांगता झाली आणि प्लेसमेंट नक्की होऊ लागल्या तेव्हा आयटीच्या क्षेत्रात इंटरफेस डिझायनर म्हणून काम करायला पुष्कळ वाव होता आणि पैसाही चांगला होता पण मैत्रेयीच्या मनात मोठ्या कान्वास वर मोकळ्या मनाने काम करण्याचे जबरदस्त आकर्षण होते आणि या कलेला व्यावसायिक रूप देण्याचे तिने ठरवले. जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये चित्रकलेचे तंत्र आणि कसब उत्तम रीतीने शिकवले जाते आणि संकल्पनात्मक विचाराचे शिक्षण IDC मध्ये झाले होतेच पण आता केवळ कलाकार म्हणून काम करून पुरेसे नव्हते, या कामाला एक पूर्णवेळ व्यावसायिक स्वरूप देणे हे वेगळे आव्हान होते.
“लोकांशी बोलणे, आपले काम समजावून सांगणे, आपल्या संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, त्यांना काय अभिप्रेत आहे हे समजून घेणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आर्थिक बाजू सांभाळून काम करणे या नवीन गोष्टी मी शिकले”, सुरुवातीच्या काळातील बदल आठवताना मैत्रेयी सांगते.
भिंती रंगवण्याचे काम व्यावसायिक पद्धतीने करणारे बरेच लोक मार्केट मध्ये आहेत मग अशा वेळेला वेगळे काम कसे करावे याचे उत्तर तिला तिच्यामधील डिझायनर ने दिले. एखाद्या जागेकडे लोक कोणत्या दृष्टीने पाहतात … एखाद्या घराकडे किंवा ऑफिसकडे सांगण्यासारखे काय आहे याचा विचार करून मैत्रेयी डिझाईन करू लागली … प्रत्येक ठिकाणी वेगळे डिझाईन एक वेगळी अभिव्यक्ती … सुरुवातीला लोक catalogue आणि मेनू मागत असत … “हल्ली सर्वांना टेम्पलेट पाहून निवड करण्याची सवय असल्याने सुरुवातीला मला समजावून सांगणे कठीण जात असे पण मग मी स्केच काढणे, १ फूट बाय १ फूट रंगवून दाखवणे अशा पद्धती वापरून माझी कल्पना क्लायंट ला समजावू लागले आणि मग गोष्टी सोप्या झाल्या”, मैत्रेयी आपली पद्धत समजावते.
मैत्रेयीला एकदा दहा वर्षांच्या एका मुलीची खोली डिझाईन करायची होती तेव्हा तिला एक संवाद निर्माण करावा लागला. तिचे जग समजून घ्यावे लागले आणि मग तिच्या चित्रकलेच्या पुस्तकालाच संदर्भ घेऊन मैत्रेयीने काम केले. आव्हान हे होते की दहा वर्षाच्या मुलीला ती जागा आवडली पाहिजे आणि ती मोठी होत असताना पुढची पाच-सहा वर्षे तिचे भाव-विश्व सामावेल असे काम केले पाहिजे.
कला माहिती होती पण पैसे कसे वापरावे, घ्यावेत, व्यवस्थापन कसे करावे हे सर्व मैत्रेयी प्रोजेक्ट मधूनच शिकली. कधी कोणी पैसे बुडवले तर कधी अगदी मोकळ्या मनाने तिच्या कलेची कदर करत, सकारात्मक सहभाग घेत तिला खुलून काम करू दिले. उद्योजक किर्लोस्करांच्या घरी मैत्रेयीला खूप समाधान देणारा आणि आत्मविश्वास देणारा हा अनुभव मिळाला. कधी वाटरप्रूफिंग करताना चित्र खराब झाले आणि मग नव्या दृष्टीने विचार करून त्या चित्राला पुन्हा एक नवीन जीवन द्यावे लागले.
सुरुवातीला फक्त पाच हजार रुपये मानधन घेऊन काम करणारे मैत्रेयी आज फेसबुक सारख्या मोठ्या कंपनी साठी आत्मविश्वासाने प्रोजेक्ट घेते आहे. या प्रवासात तिला सहकलाकार आणि कुटुंबाचा चांगला पाठींबा मिळाला. स्वतः कलाकार असलेली आई आणि डिझायनर असलेल्या भावाने नवीन कल्पना दिल्या तर सासरच्या मंडळींनी घराची काळजी घेणे, वेळी अवेळी बाहेरगावी असणे, प्रवास करणे या सर्व बाबींना समजून घेतले. आज आपली ओळख निर्माण करून मैत्रेयी अडीच हजार रुपये प्रती स्क्वेयर फूट च्या दराने मोठी कामे घेते. स्त्री असूनही तिला कधी व्यावसायिक दुजाभावाचा अनुभव आला नाही फक्त एकदाच मोठ्या परातीवर चढून तू कशी काम करणार असे एका क्लायंट ने विचारले इतपतच.
भविष्यात ज्यूट, विनाइल सारख्या नवीन मटेरियल मध्ये नवीन तंत्र वापरून काम करणे आणि अनामोर्फिक ३D खोली असलेले प्रकल्प घेऊन आपला ठसा उमटावा असे मैत्रेयीचे स्वप्न आहे.