Chinmaye

टेक दुनियेतील मराठीचे शिलेदार


आजच्या युगात भारतीय भाषांचा वापर वाढण्यासाठी मोबाईल आणि वेबच्या दुनियेत योगी प्रवृत्तीने काम करणारे डिझायनर हवेत! त्यांचीच ही गोष्ट

जगात किती असे देश असतील जिथे २२ भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि १२-१३ लिपींची विविधता आहे! भाषिक वैभव आणि वैविध्याच्या बाबतीत इतकी संपन्नता खूप कमी देशांना लाभली असेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व भाषा आणि लिपींमध्ये लहानमोठ्या लोकसमूहांचा व्यवहार चालतो आणि संस्कृती जपली जाते. एका बाजूला हे आपले सांस्कृतिक वैभव आहे तर दुसऱ्या बाजूला इतक्या बहुरंगी लिपींना जपणे, जोपासणे हे एक मोठे आव्हानही! शिवाय भाषा आणि लिपी शतकानुशतके राजकीय हत्यार म्हणूनही वापरल्या गेल्या आहेतच. कालानुरूप सामाजिक व्यवहार बदलतात, नवे रूप घेतात तसे भाषेला कात टाकत राहावे लागते. आणि कोणतीही भाषा जिवंत राहण्यासाठी त्यात मुबलक लिहिले जाणे गरजेचे आहे. भारतीय भाषांबद्दल तर आपल्याला खूप प्रेम आणि आपुलकी आहे पण जसजशी वाचन-लेखनाची आवड कमी होते आहे तसतसा भारतीय लिपींचा वापर झपाट्याने कमी होऊ लागला आहे. आर्थिक, व्यावसायिक संवादाची भाषा इंग्लिश असल्याने हळूहळू केवळ अनौपचारिक गप्पांपर्यंतच आपल्या भाषा मर्यादित होतील की काय अशी भीती कधीकधी वाटते. पण डिजिटल माध्यमे घरोघरी वेगाने पोचत असताना हे चित्र बदलण्याची संधी नवीन तंत्रज्ञान आपल्याला देते आहे असे जाणवते. सोशल मिडीयाने आपले विचार मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ सगळ्यांना दिले आहे. घरोघरी संगणक, इंटरनेट पोहोचले आहे आणि स्मार्टफोनही हळू हळू समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत पोचत आहेत. अशावेळेला गाडी चुकता कामा नये! आपल्या भाषांत व्यक्त होत असताना आपल्या लिपीचा वापर लोकांना सोप्या पद्धतीने करता आला पाहिजे तरच या माध्यमांच्या वाढीची गती आपल्या लिपींनाही घेता येईल.

घाटकोपर पश्चिमेला आमचे घर! एका नावाजलेल्या बिल्डरने बांधलेली टाऊनशिप … तिथे प्रत्येक इमारतीवर आणि रस्त्यावर पाट्या आहेत. पण सगळ्या इंग्लिशमध्ये. आणि हे काही अपवादात्मक चित्र नाही. आपल्याच भाषांबद्दल आपल्याला इतकी अनास्था का? कोणी असे समर्थन देतात की अशा महागडया ठिकाणी जे घरे घेतात त्यांना इंग्लिश समजतेच तेव्हा फारसे काही अडत नाही. पण आर्थिक स्थितीप्रमाणे आपली सांस्कृतिक ओळख बदलत नाही आणि अभिव्यक्तीची भाषाही तीच राहते. एक डिझायनर (अभिकल्पक) म्हणून मी विचार केला तेव्हा मला जाणवले की इंग्लिश साठी डिझाईन करत असताना अक्षरसंचांची जितकी विविधता आहे तेवढी विविधता देवनागरीत नाही, त्यामुळे एखाद्या विशिष्ट दृश्य-भाषेचे डिझाईन तयार झाले की त्यात देवनागरी अक्षरे सहज अनुरूप पद्धतीने बसवणे कठीण जाते.

ही अडचण मला माझे दक्षिण कोरियावरील पुस्तक मराठीमध्ये डिझाईन करत असताना जाणवली. आजच्या दृश्य भाषेत समारेखा लिपी (मोनो-लिनियर) चा वापर वाढला आहे. म्हणजेच ज्या font मध्ये अक्षराच्या सर्व रेखांची रुंदी एकसमान असते. असा देवनागरी font मला सहजासहजी सापडेना. तेव्हा माझ्या लक्षात आले की द्विभाषिक वापरासाठी आपले font अजून तयार नाहीत. सुदैवाने आयआयटी मध्ये डिझाईन स्कूल चे प्राध्यापक असलेल्या डॉक्टर गिरीश दळवी यांचा एक-मुक्त हा अक्षरसंच गुगल ने तेव्हाच खुला केला आणि काम सोपे झाले. विशेष म्हणजे गिरीशने हा font ओपन सोर्स ठेवलेला असल्याने नवीन टाईप डिझायनर ना प्रयोग करण्यासाठी, शिकण्यासाठी एक रस्ता सोपा झाला आहे. सामान्यत: डिझायनर आपल्या कामाला खुल्या दिलाने लोकांमध्ये वाटून टाकायला उत्सुक नसतो मग गिरीशने असे का केले असावे हा प्रश्न मला पडला! यावर गिरीशने whatsapp वर सोपे उत्तर दिले! “तू तुझ्या android वर मराठी सहज वापरतोस कारण गुगलने मराठी font ची सोय केलेली आहे, फोनेटिक कीबोर्ड तुला सहज उपलब्ध आहे. मराठी भाषेसाठी तयार होणाऱ्या नवीन माध्यमांतील डिझाईनस ना font ची मर्यादा येऊ नये म्हणून मी एक-मुक्त विनामोबदला उपलब्ध केला. शिवाय मला एकट्याला या कामासाठी २-३ वर्षे खपावे लागले तेव्हा एक देवनागरी font आजच्या तंत्रज्ञानाच्या स्तरावर तयार करता आला. उद्या जर कोणाला नवीन टंक तयार करायचा असेल तर त्याला शून्यातून सुरुवात करावी लागू नये आणि तांत्रिक बैठक पक्की असावी हा माझा हेतू होता.”

4

प्रश्न केवळ font तयार करून सुटणारा नाही. आज लोकांचे बरेचसे संवाद मोबाईल आणि नेटवर होतात अशा वेळेला सहज मराठीत किंवा इतर भारतीय भाषांत इनपुट करता येऊ शकेल असा कीबोर्डही महत्त्वाचा. ज्याला इंग्लिश मध्ये इनपुटची सवय आहे त्याला फोनेटिक कीबोर्ड वापरणे सोपे जाते पण इतरांचे काय? प्रत्येक भाषेची, प्रत्येक लिपीची एक विशिष्ट बांधणी असते. मराठीची लिपी ही स्वर आणि व्यंजनांच्या रचनाबद्ध गुंफणीतून बहरते. अमृताशी पैजा जिंकणारी ही बोली लिहायला आणि वाचायला सोपी असली, तरी आजतागायत टाइप करायला मात्र ती एक कोडं बनून राहिली आहे. एरवी कंप्यूटर सर्रास वापरणारे टेक-सॅव्ही लोक देखिल मराठीत चार ओळी टाइप करायच्या झाल्या की “मराठी स्टेनोग्राफर” कडे धाव घेतात. मोबाइल फोनवर मराठी भाषा येऊन दशकाहून अधिक काळ लोटूनदेखिल मराठी टायपिंगच्या बाबतित फार फरक पडलेला दिसत नाही. बऱ्याच लोकांना मराठीत संवाद साधणे तर सोडाच, पण एखादे नावदेखिल आपल्या फोनवर टाइप करायचे म्हणजे दुरापास्त आहे.

आय. आय. टी. मुंबईची एक टीम बऱ्याच दिवसांपासून ह्या समस्येवर काम करीत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वरचक्र नावाचा टचस्क्रीन कीबोर्ड अँड्रॉइड फोनसाठी तयार केला. स्वरचक्र भारतीय लिप्यांच्या मूलभूत रचनेनुसार संकल्पित केलेला असल्यामुळे त्याने मराठीत टाइप करणे सहजसोपे होऊन जाते. स्वरचक्रमध्ये अक्षरांची मांडणी ही मराठीच्या बाराखडीच्या रचनेवर आधारित आहे. त्यामुळे अक्षरे चटकन सापडतात.

swarachakra

swarachakra

हा विषय असा आहे की विविध शास्त्रीय पार्श्वभूमीच्या लोकांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. फक्त एक टाईप डिझायनर यासाठी पुरेसा नाही. नव्या तंत्रज्ञानाला धरून अद्ययावत काम करण्यासाठी programmer ची गरज भासते. शिवाय आर्ट हिस्ट्री सारख्या विषयांचे तज्ज्ञ मोडी सारख्या प्राचीन लिपी आणि पारंपारिक लेखन यांचा अभ्यास आणि संशोधन करून डिझायनर ला योग्य दिशा देऊ शकतात.

पुण्याच्या मुकुंद गोखलेंनी institute of typographic research या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून खूप काम केले. आज ८५ वर्षे वय असूनही ते भारत सारखे नवीन अक्षरसंच तयार करत आहेत. पारंपारिक लेखनशैलीचा अभ्यास आणि भाषेचा गोडवा जपणारी सौंदर्यमूल्यं यावर त्यांचा भर असतो. पण अशा शिलेदारांना एकटेदुकटे काम करावे लागते. आणि दुर्दैवाने लिपींची इतकी विविधता असूनही टाईप डिझाईन या व्यवसायावर लक्ष केंद्रित करून घर चालवणे आपल्या देशात आज तरी अशक्य आहे.

Mukund Gokhale's Work

Mukund Gokhale’s Work

टाईप डिझाईन आणि सुलेखन या क्षेत्रातील गुरु मानले गेलेले र. कृ. जोशी यांनी स्क्रीन वर वाचण्यासाठी योग्य असा मंगल नावाचा युनिकोड टंक तयार केला आणि देवनागरीसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले. आपल्या शिष्यांना ते नेहमी सांगत की अक्षरे तयार करण्यापूर्वी त्या भाषेचा गोडवा आपण समजून घेतला पाहिजे आणि भाषा येत नसेल तर ती माहिती पुरेसा अभ्यास करून मिळवली पाहिजे तरच लिपी सजीव करणारी अक्षरे तयार होतात.

अक्षराय या नावाच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षे र. कृ. जोशींचा वारसा त्यांचे शिष्य चालवत आहेत. या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे ‘अक्षरांना वाहिलेली माणसे’! विविध परिसंवादांचे आयोजन, संशोधन आणि प्रशिक्षण यावर अक्षरायचे सदस्य खूप मेहनत घेत अस्तात. अक्षर-संस्कृतीच्या क्षेत्रामधील तज्ज्ञ एकत्र येउन अक्षरायच्या व्यासपीठावर नवनवीन प्रयोगांची मांडणी करतात आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचाही यात सहभाग असतो.

R K Joshi

R K Joshi

सुलेखन आणि हस्ताक्षर सुधारणे हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शालेय जीवनातला तसा कटकटीचा भाग पण याला सुकर आणि सुबोध कसे करता येईल यावर अक्षरायचे संतोष क्षीरसागर शास्त्रोक्त संशोधन करीत आहेत तर एक टाईप च्या माध्यमातून या कलेला व्यावसायिक प्रगती मिळावी यासाठी सारंग कुलकर्णी प्रयत्न करत आहेत. मराठीची जोपासना यापुढे टेक दुनियेतच होईल आणि त्यामध्ये या सर्व शिलेदारांची कामगिरी भरीव आहे असे दिसते.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: