Chinmaye

फल-ज्योतिष …. काही प्रश्न !!!


jyotish blog

माझ्या परिचयाची एक तिशीची मुलगी …. लग्न ठरत नाही …. जातीपातीची बंधने (अगदी ब्राम्हण पोटजातीपर्यंत) आणि पत्रिकेचा आग्रह या फेऱ्यात बिचारीचे लग्न अडकून पडले आहे … त्यातच तिच्या वडीलांचा पत्रिका जुळण्याबद्दलचा आग्रह !! पण एका सुशिक्षित मुलाबरोबर पत्रिका जुळली आणि आम्ही सर्वांनी निश्वास टाकला … स्थळ चांगले … कुटुंब तसे साधेच …. मुंबईच्या राहणीमानाच्या हिशेबात पगारही चांगला … पण ज्योतिषी महाशयांनी नवीन पुस्ती जोडून किंतु निर्माण केला आणि पुन्हा खो घातला …. पत्रिका उत्तम जुळते पण पत्रिका पाहून मुलाला श्वसनाचे आजार असल्याचा अंदाज येत असल्याने खात्री करून घ्या …. तो मुलगा जर मी असतो आणि हे विद्वान मला सापडले असते तर त्यांची काही खैर नव्हती …. माझ्याही वेळेला प्रेमविवाह असूनही अशी जुळवाजुळव झालीच होती …. आणि माझ्या बायकोलाच निष्कर्ष ठाऊक …. पण ग्रह काहीही म्हणोत तिने मला पसंत केले हे खरे ….

असो पुन्हा या कथे कडे वळूया ….. ज्योतिषी महाशयांचे हे भाकित ऐकून मुलीचे वडील संभ्रमात पडले …. ‘श्वसनाचा त्रास होऊ शकेल म्हणे’ …..

एखादा निष्कर्ष किती ढोबळ, अचूकता नसलेला असावा ? कोणतेही अनुमान, बातमी किंवा अंदाज खरे असो की खोटे …. ते तेव्हाच उपयोगाचे असतात जेव्हा त्यामध्ये वस्तुनिष्ठता (objectivity) आणि विशिष्टता (specificity) असते

भारताला समुद्रमार्गे धोका संभवतो अशा निष्कर्षाचा कोणाला उपयोग आहे ? समुद्रमार्गे अतिरेकी येणार की सुनामी येणार की एखादे जहाज बुडून प्रदूषण पसरणार हे समजले नाही तर उपयोग काय ? त्यात हजारो किलोमीटर अंतराचा किनारा आपला … सोमालिया जवळ एखाद्या भारतीय जहाजाला चाच्यांनी धरले तरी धोका … जहाज अमेरिकन असले आणि कर्मचारी भारतीय असले तरी भारताला धोका …. तेव्हा असली भाकिते ऐकणाऱ्याच्या फायद्यापेक्षा ज्योतिषाला नंतर मी बरोबर होतो हा दावा करायला जास्ती उपयोगाची असतात …. आता या मुलाचेच पहा … श्वसनाचा आजार म्हणजे काय ? सर्दी-पडसे? दमा? फुफ्फुसात बिघाड? श्वासनलिकेत अडचण? कर्करोग? हृदय कमकुवत झाल्याने श्वसनात त्रास ? वजन वाढून दम लागणे ? उंच प्रदेशात जाऊन होणारे high altitude pulmonary edeama सारखे आजार ? म्हणजे पत्रिका जुळते असे सांगायचे आणि एक नेहमी दडपण वाटेल असे कलम जोडून ठेवायचे …. आपल्याच भाकिताची जबाबदारी नाकारण्याचा हा कातडीबचाऊपणा आहे …. आणि त्यापायी मुलीची, तिच्या कुटुंबाची आणि ज्याचा निकाल तुम्ही लावता त्या मुलाच्या भावनांचा विचार कोण करणार ? आणि व्यावसायिक नैतिकतेचे काय ? एखाद्या डॉक्टरला रुग्णाची वैद्यकीय माहिती गुप्त ठेवावी लागते … तसे कोणतेही बंधन ज्योतिषी पाळताना दिसत नाहीत …. त्यांच्या मान्यताप्राप्त संघटनांची एखादी नियमांची यादी आहे का ? असेल तर प्रत्त्येक ग्राहकाला त्याची प्रत दिली जाते का ? माझा एक मित्र आहे … त्याला सांगितले गेले की अपत्य होण्यास अडचण होईल लग्न करू नका …. आता तो गरीब आहे असे सांगितले असते तर बिचाऱ्याने मेहनत करून पैसे कमावून दाखवले असते …. अपत्य होणार हे तो लग्नाआधी कसे सिद्ध करेल ? थोडा वेळ लागला पण झाली दोन दोन मुले …. आणि वेळ यांच्या बेजबाबदार भाकिताच्या मानसिक दडपणामुळे कशावरून लागला नसेल ?

असो …. तरीही अगदी वस्तुनिष्ठ भूमिका घेऊन मी काही प्रश्न विचारू इच्छितो …. ज्यांचे उत्तर संदर्भ, प्रयोग यांचा दाखला देऊन जे देऊ शकत असतील त्यांचे स्वागत आहे … फल-ज्योतिषाला नकारघंटा वाजविण्यापूर्वी या तथाकथित शास्त्राच्या पंडितांना माझ्या प्रश्नांची शास्त्रीय आणि तार्किक उत्तरे देण्याची संधी नाकारण्याचा उपमर्द मी करणार नाही ….

प्रश्नांवर पोहोचण्याआधी काही गोष्टी मी स्पष्ट करू इच्छितो ….१. फल-ज्योतिष शास्त्र आहे असे अजून निर्विवादपणे सिद्ध झालेले नाही आणि तसे सिद्ध करणे ही समर्थकांची जबाबदारी आहे ….२. केवळ असे असताना असे घडते असे सांगून उपयोग नसतो …. त्यामागील कार्य-कारण भाव सिद्ध करता आला पाहिजे३. प्रश्नांना बगल देऊन देव-धर्म-अध्यात्म या गोष्टीमध्ये घुसू नका …. तो श्रद्धेचा विषय आहे आणि व्यक्तीसापेक्ष श्रद्धा बदलतात …४. जगाची उत्पत्ती कशी झाली हे विज्ञानास कळलेले नाही किंवा अनेक प्रश्नांचा शोध अजून लागलेला नाही …. त्याचा अर्थ ज्योतिष बरोबर असा होत नाही मानवी ज्ञानाला मर्यादा आहेत आणि तरीही कसोशीने शोध सुरु ठेवणारा तो वैज्ञानिक … ही अतिशय विनम्र भूमिका आहे …. सत्य सापडलेले नसताना घाई करून उत्तरे जाहीर करून त्यांची कुबडी घेऊन चालायचे असा आंधळा माज विज्ञान करीत नसते …. शास्त्र कुतुहलाच्या इंधनावर चालते …. अज्ञाताची भीती बाळगून पळ काढणारे शास्त्र घडवित नसतात …. केवळ ‘अ’ च्या क्षमतेला मर्यादा आहेत म्हणून ‘ब’ बरोबर ठरत नसते ….५. अनेक लोकांना अनेक पिढ्या ते पटते म्हणून ते बरोबर असा हास्यास्पद दावा करू नये … आपल्याकडे जातीभेद अनेक पिढ्या सुरु आहे आणि गुटखा लाखो लोकांना आवडतोच की …. तेव्हा बहुमत किंवा परंपरेची हाकाटी नको ….

ज्योतिषावर श्रद्धा असावी की असू नये हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे …. त्यामध्ये आम्हास घुसायचे नाही …. त्याला शास्त्र म्हणून मान्यता देऊन दवंडी पिटण्याचा उतावीळपणा करण्याला मात्र आमचा कट्टर विरोध असेल …. भौतिकोपचारशास्त्र सारख्या पन्नास वर्ष जुन्या शस्त्रांनी देखील जी शिस्त आणि काटेकोरपणा पाळला आहे त्याच्या एक टक्काही शिस्त आमचे फल-ज्योतिषी पाळताना दिसत नाहीत …. तेव्हा अगदी वस्तुनिष्ठपणे; भावना आणि परंपरा धर्माचा अभिमान मध्ये न आणता काही प्रश्नांची उत्तरे शोधूया जेणेकरून फल-ज्योतिष शास्त्र आहे ही नाही याची उकल करता येईल …

माझे प्रश्न –अ) औचित्याचे प्रश्न१. ज्योतिषशास्त्र म्हणजे ज्योतींचे शास्त्र …. हे खगोलशास्त्राचे नाव आहे … ते उचलण्याचा अधिकार फल-ज्योतिषी लोकांना कोणी दिला ? संस्कृत शिकलेल्यांनी तरी अशी गल्लत करणे बरोबर नव्हे नाही का ?२. जे देव मानतात …. विश्वाचे नियंत्रण करणाऱ्या चांगल्या शक्तीचे मनापासून पूजन करतात त्यांना प्रारब्ध/ नियती/ ग्रहांचे कोप यांची भीती का वाटावी?३. भगवद्गीतेत वर्णन केलेल्या कर्माच्या महत्त्वापेक्षा प्रारब्ध/ नियती मोठे आहेत का ?४. कोणतेही शास्त्र सिद्धांताला निर्विवाद पुष्टी मिळेपर्यंत त्याचा व्यावहारिक वापर करण्याची परवानगी देत नाही … तुम्हांला घाई का ?५. जर हे शास्त्र आहे तर मग त्याला कायदे लागू का करू नयेत? उदा – ग्राहक संरक्षण कायदा, कॉपीराईट कायदा, भारतीय दंडविधान६. ज्योतिषी कोणत्याही प्रकारचे लिखित दस्तऐवज जपून ठेवत नाहीत …. भाकिते रेकॉर्ड केली जात नाहीत, त्यांच्या प्रती दिल्या जात नाहीत असे का ?७. आपल्या आयुष्यातील हळुवार गोष्टी ज्योतिष्याकडे उघड केल्या जातात … ताण-तणाव असतात … त्यांची काळजी घेऊन भाकिते द्यायची असतील तर मानसशास्त्राचा सखोल अभ्यास हवा …. तो न करता केस हातात घेणे म्हणजे फक्त पुस्तकात वाचून लोकांवर वैद्यकीय उपचार करण्याइतके बेजबाबदार नव्हे का ?

ब) काही सामान्य शंकाहे प्रश्न खरे तर कोणत्याही दहावी पास मुलाला पडायला हवेत पण डोळ्यावर झापडे लाऊन फल-ज्योतिषाला शास्त्र मानणाऱ्या लोकांना हे प्रश्न पडत नाहीत यापेक्षा आपले दुर्दैव काय ? जितके हे गूढ आणि अगम्य आहेत तितकेच भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किचकट आहे … पण सामान्य माणसाला शास्त्रज्ञ उत्तरे देतात … त्यासाठी त्यांनी आपापल्या शास्त्राला अगम्यतेतून बाहेर काढून शाळेतल्या मुलांपर्यंत पोचवले आहे …. तार्किक सिद्धतेसकट …. तेव्हा तीच कसोटी फल-ज्योतिषाला लावायला हरकत नसावी

१. आकाशस्थ ग्रह-तारे आपल्या प्रारब्धावर परिणाम करतात की त्यांचे स्थान आपल्या प्रारब्धाची दिशा दाखविते ?२. जर ते दिशादर्शक आहेत तर त्यांची पूजा-अर्चा करून प्रारब्ध कसे बदलणार ?३. जर त्यांचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो … तर त्यामागील कार्य-कारणभाव स्पष्ट करा ..कोणते प्रयोग करून ही अनुमाने काढली गेली ?४. त्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो तर पृथ्वीसारखे आपल्या जवळचे प्रचंड वस्तुमान पत्रिकेत का नाही ?५. मंगळ आणि गुरुच्या मधील उपग्रहांचा पट्टा का धरला जात नाही ? ज्यामध्ये सेरेस सारखे हजार किमी व्यासाचे प्रचंड गोल आहेत६. शनीला टायटन आणि गुरूला गनिमिड नामक चंद्र आहेत ते बुधापेक्षा मोठे आहेत … शिवाय प्रत्येकी 60 चंद्र आहेत … त्यांच्या वस्तुमानाचे काय?७. जर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो तर राहू-केतू मुळात नाहीतच …. ते ग्रहणात भासणारे भासमान बिंदू आहेत … मग वस्तुमान नसताना गुरुत्व कोठून येणार ?८. अवकाशातील या ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो असे आपले गृहीतक आहे … पण मुळात पत्रिकेतील त्यांचे स्थान हे खरे स्थान नाहीच …. तो आपल्या डोळ्यांना होणारा भास आहे हे आपण शोधून काढले आहे …. मग खऱ्या स्थानाप्रमाणे बदल कधी करणार ?९. जग सपाट आहे पासून …. सूर्य-केंद्रित विश्व … नंतर आकाशगंगा अशा नवनवीन गोष्टी समजत गेल्या पण पत्रिकेत उजळणी का केली नाही ….१०. अल्बर्ट आईन्स्टाईन ने सापेक्षतावाद सिद्धांत मांडला …त्यानंतर खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्रीय धारणेत क्रांतिकारी बदल झाले …. न्यूटनसारख्या विख्यात वैज्ञानिकाचे mechanics सुद्धा या बदलातून सुटले नाही …. मग फल-ज्योतिषात बदल का झाले नाहीत … सोपे करून सांगायचे तर … वेळ, वस्तुमान आणि वेग या तिन्हींच्या अभ्यासात सापेक्षतावादाने आमूलाग्र बदल आणले …. तरीही आमच्या पत्रिका आणि वेळेचे गणित तसेच !!!! अणुविज्ञान आणि लघुकणांचा अभ्यास असो किंवा खगोल शास्त्रातील कृष्णविवारांसारखे शोध असोत … ते लागले कारण भौतिकशास्त्री न्यूटनच बरोबर असा आंधळा आग्रह धरून तिथेच थांबले नाहीत ….

आशा आहे फल-ज्योतिषाचे समर्थक तार्किक आधारावर वरील प्रश्नांची उत्तरे देतील …. सध्यातरी आम्ही त्याला शास्त्र मानायला बिचकतो कारण Quantitative methods तर सोडाच …. समाजशास्त्रासारख्या Qualitative / Ethnographic methods चा वापरही इथे पुरेशा शिस्तीने होत नाही …. आणि मानवाच्या अगदी छोट्या अस्तित्वाचे किंवा मर्यादेचे म्हणाल तर …. जशा ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील त्याप्रमाणे आपल्या धारणांना पुन्हापुन्हा तपासून बदलण्यास तयार असलेल्या शास्त्राला विनम्र म्हणायचे की आम्हीच काय ते कालातीत सत्य शोधले आहे असा आग्रह धरणार्यांना विनयशील मानायचे हे तुम्हीच ठरवा …. अर्धवट सापडलेल्या तथ्याला पारखून घेण्याआधीच वापरात आणून लोकांच्या आयुष्याशी शास्त्र खेळत नसते ….. नाहीतर मेंढ्या-उन्दीरांबरोबर माणसेही एव्हाना क्लोन व्हायला लागली असती ….

जाता जाता गौतम बुद्धाचे त्याने स्वतःच्याच धर्माबद्दल आणि आचरणाबद्दल दिलेले उद्गार उधृत करावेसे वाटतात ….. फल-ज्योतिष या विषयाशी तसा त्याचा संबंध नाही …. पण आपल्या तर्कबुद्धीला लागलेली धर्माची झापडे उघडायला मात्र हा विचार अगदी रामबाण लागू पडेल …

“माझा धर्म म्हणजे नदी पार करण्यासाठी लागणारी होडी आहे. तुम्ही दु:खाच्या नदीला पार करण्यासाठी बुद्ध धम्माचा होडी प्रमाणे वापर करा. होडी तिथेच टाकुन पुढचा प्रवास सुखाचा करा. पण त्या होडीस खांदयावर घेऊन प्रवास केल्यास तुमचा प्रवास त्रासदायक होईल. मी म्हणतो म्हणुन तुम्ही बुद्ध धर्माचे पालन करु नका. त्यातील मुद्दे तुम्हाला बुद्धीच्या कसोटीवर पटत असतील तरच ते पालन करा. या जगात काहीच नित्य नाही, सगळं अनित्य आहे. म्हणुन बुद्ध शब्दम प्रमाणम करु नका.”

येउद्या प्रतिक्रिया !!!!

 

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.